'हा भारत माझा' शुभारंभ खेळ - वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by माध्यम_प्रायोजक on 4 May, 2012 - 00:33

'हा भारत माझा' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. ३ मे, २०१२ रोजी पुण्याच्या सिटीप्राईड,कोथरुड,, चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसहा वाजता होता. त्याला आपले काही मायबोलीकर गेले होते. त्या खेळाचा वृत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा.

hbm.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"हा भारत माझा" हा चित्रपट पाहून संपल्यावर मनात एकच प्रतिक्रिया उमटली. अप्रतिम! या एका शब्दाशिवाय दुसरी कोणतीच यथार्थ प्रतिक्रिया मनात उमटली नाही.

सबबन तुलसी भयी
परबत सालिगराम |
सब नदिये गंगा भयी
जाना आतमराम ||

जेव्हा आत्माराम (विवेक) जागृत होतो तेव्हा सर्व वनस्पती तुळस (तुळशीसारख्या पवित्र) होतात, सर्व पर्वत शाळीग्राम होतात आणि सर्व नद्यांचे जल गंगाजल होते.

या संत कबीरांच्या पंक्तींनी चित्रपटाला सुरूवात होते आणि काही क्षणातच अखेरपर्यंत चित्रपट आपल्या मनाची पकड घेतो. एप्रिल २०११ ते ऑगस्ट २०११ या चार महिन्यांत संपूर्ण भारत ढवळून काढणार्‍या अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा खुलते. संपूर्ण अहिंसेवर आधारलेले व देशातल्या तरूणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेले आणीबाणीनंतर झालेले भारतातले हे पहिलेच आंदोलन. धोतर, टोपी अशी साधी वेशभूषा करणार्‍या, मोडकेतोडक्या हिंदीत आपले विचार समजावून सांगणार्‍या साध्याभोळ्या अण्णांची संपूर्ण भारतालाच भुरळ पडली होती. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार कळसाला पोहोचल्यामुळे व त्यांना सरकारी पातळीवर संरक्षण मिळाल्यामुळे अत्यंत अस्वस्थ असलेल्या भारतीय जनतेच्या मनाची नाडी अण्णांनी बरोबर ओळखून आपले आंदोलन उभारून यशस्वी केले. फेसबुक, ई-मेल, मोबाईल फोन्स अशा अनेक आधुनिक संपर्क यंत्रणेतून व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून देशातल्या तरूणांनी आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व सत्ताधार्‍यांवर प्रचंड दबाव आणला. अण्णांचे चारीत्र्यहनन करण्याचे, त्यांचे आंदोलन दडपण्याचे, त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचे सत्ताधार्‍यांचे प्रयत्न त्यांच्यावर बूमरँग झाले. पण शेवटी सत्ताधार्‍यांना नमते घ्यावे लागले. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या मनातल्या विवेकाची व व्यवहाराची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार्‍या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा.

भ्रष्टाचारमुक्त, गुन्हेगारीमुक्त समाज असावा अशी सर्वांचीच मनातून इच्छा असते. पण मनातून अशी इच्छा असणे आणि व्यवहारात अशा आदर्श विचारांनी जगणे अवघड असणे या विरोधाभासाची विवेकी मनाला टोचणी लागते. कितीही उदात्त विचारसरणी असली तरी व्यवहारात विचारांशी नाईलाजाने का होईना तडजोड करावी लागणार या विचाराने एका सरळमार्गी, मध्यममार्गी कुटुंबाची कुतरओढ होऊ लागते. "व्यवहारी जगात व्यवहारानेच वागावे लागते" असा सल्ला देणारे काहीजण तर अण्णांना पाठिंबा असलेले पण स्वतः अत्यंत व्यवहारी असलेले काही जण अशा अनेकांच्या गलबल्यात हे कुटुंब गोंधळून जाते. आपण नीट कायदे पाळून सुरक्षित वाहन चालविले तरी समोरून येणारा बेफाम असेल तर आपल्याला सुद्धा अपघात होणारच. तसेच आपण कितीही स्वच्छ असलो तरी समाज आपल्याला तसा राहून देणार नाही, या विचाराने भयभीत होऊन अस्वस्थ झालेले हे कुटुंब. व्यवहार की आदर्श या द्विधा मनःस्थितीत घुसमटलेल्या या कुटुंबातही मतभेद सुरू होऊन सर्वांचीच मन:शांती हरवायला लागते. अशा वेळी हे कुटुंब या परिस्थितीतून कसा मार्ग काढते, त्यांच्यातला आत्माराम जागृत होतो का ते व्यवहार आणि आदर्श विचार यांच्यात ते स्पष्ट सीमारेषा आखतात हे पडद्यावरच बघायला हवे. आदर्श जिंकायला हवा, आदर्शाने व्यवहारावर मात करायला हवी अशी सर्वांचीच इच्छा असते. चित्रपट बघताना आपणही त्या कुटुंबाशी एकरूप होऊन अगदी असाच विचार करायला लागतो. प्रत्यक्ष जीवनात आपण अगदी असेच वागू का हा विचारही काहीसा अस्वस्थ करून जातो. पण शेवटी नक्की काय होते हे पडद्यावर बघण्यातच मजा आहे.

तसं पाहिलं तर या चित्रपटात रूढार्थाने नायक/नायिका नाही. 'इंद्र'चे काम केलेल्या आलोक राजवाडेभोवती चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. त्याने महाविद्यालयीन तरूणाचे काम उत्कृष्ट केले आहे. त्याचे सरळमार्गी, पापभीरू वडील विक्रम गोखले, मोठा भाऊ ओंकार गोवर्धन, धूर्त जावई जितेंद्र जोशी, विवाहीत मुलगी देविका दप्तरदार, भाची रेणुका दप्तरदार या सर्वांचीच कामे उत्तम. चित्रपटात एखाद्याच प्रसंगात डोकावणारे किशोर कदम, दीपा श्रीराम हे देखील चांगलेच लक्षात राहतात. मुलांविषयीच्या ममतेमुळे व्यवहाराने विचारांवर मात केलेल्या मातेची भूमिका उत्तरा बावकर यांनी समर्थपणे पेललेली आहे. खरं तर हे सर्वजणच चित्रपटाचे नायक/नायिका आहेत.

चित्रपटात एकही गाणे नाही, पण कसदार कथेमुळे हे लक्षातच येत नाही. सुमित्रा भावेंनी लिहिलेली अतिशय कसदार कथा व संवाद सुनील सुकथनकर यांनी तितक्याच समर्थपणे पडद्यावर आणले आहेत.

ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या निमित्ताने सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, अनिल अवचट, लालन सारंग, आनंद मोडक, जितेंद्र जोशी, उत्तरा बावकर असा अनेक रंगकर्मींना प्रथमच जवळून बघता आले. ह्या उत्तम चित्रपटाचा प्रिमियर पाहण्याची संधी दिल्याबद्दल "मायबोली" व "माध्यम_प्रायोजकांचे" मनःपूर्वक आभार!

छान परिक्षण मास्तुरे! Happy

> चित्रपटात एकही गाणे नाही, पण कसदार कथेमुळे हे लक्षातच येत नाही.
अगदी!

काही चित्रपट आपल्या कथानकातून व मांडणीतून आपल्याला आपण स्वीकारलेल्या जीवनमूल्यांबाबत, परिस्थितीबाबत विचार करण्यास उद्युक्त करतात. मनोरंजनाबरोबरच जागृती आणण्याचे काम करतात व त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेतात. 'हा भारत माझा' चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व साध्य होते का, हे पाहण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा व मुलांनाही दाखवावा.

''हा भारत माझा'' चित्रपटाच्या मायबोलीकरांसाठी खास आयोजित केलेल्या खेळाला मला काही कारणाने जायला जमले नव्हते, पण चित्रपट बघायची इच्छा मात्र होती. काल सायंकाळी ३ मे रोजी ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटाच्या प्रीमियरला मायबोली तर्फे जायला मिळते आहे याचाही आनंद मनात होताच! तिथे पोचल्यावर अगोदर अरभाटाला फोन लावला. अन्य कोण मायबोलीकर खेळाला उपस्थित राहणार आहेत त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी आजूबाजूला उभ्या बर्‍याच लोकांकडे बघत 'हा कोणता आयडी असेल?' असा विचार करत अल्पसा टाईमपास केला. थोड्याच वेळात अरभाटाला भेटून व प्रवेशिका हाती घेऊन मी अन्य काही प्रेक्षकांसमवेत स्क्रीन क्रमांक ४ कडे कूच केले.

दारातच एका गोबर्‍या गालाच्या छोट्या मुलाने आमचे एक सुंदर बुकमार्क देऊन स्वागत केले. नंतर कळले की तो चित्रपट अभिनेत्री रेणुका दफ़्तरदार यांचा सुपुत्र होता. त्या बुकमार्कवर एका बाजूला कबीराचा चित्रपटात झळकलेला दोहा व दुसर्‍या बाजूला 'हा भारत माझा' चित्रपटाच्या कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींचे नामनिर्देश होते. कबीराचा तो दोहा वाचताच मन प्रसन्न झाले.

प्रेक्षक व निमंत्रितांमध्ये काही चंदेरी पडद्यावरचे ओळखीचे चेहरे तर काही सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचे चेहरे दिसत होते. लवकरच चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी कार्यक्रमास सुरुवात केली. ह्या 'झीरो बजेट' चित्रपटाची कल्पना अण्णा हजारेंच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कशी स्फुरली, काय निमित्त झाले, मान्यवर कलाकारांनी - तंत्रज्ञांनी कशा तारखा दिल्या, मदतीचे पुढे झालेले हात, नंतरची जुळवाजुळव यांबद्दल सांगितले. चित्रपटाच्या दिग्दर्शिका, कथालेखिका, पटकथाकार व संवादलेखिका सुमित्राताई भावे यांसह चित्रपटातील सर्व उपस्थित कलाकार, तंत्रज्ञ तसेच किर्लोस्कर कंपनीचे प्रतिनिधी यांना स्टेजवर बोलावून त्यांची ओळख करून देण्यात आली व त्यांचे खस अत्तराची भेट देऊन स्वागत केले गेले. कलाकारांपैकी उत्तरा बावकर, रेणुका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, मदन देवधर यांसह चित्रपटात इतर छोट्यामोठ्या भूमिका केलेली मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मायबोली.कॉमचा व मायबोलीतर्फे केल्या गेलेल्या मदतीचाही विशेष उल्लेख सुनील सुकथनकरांनी आवर्जून केला.

सुरुवातीलाच राष्ट्रगीताची धून व त्या जोडीला भारताच्या सीमाप्रांतातील लष्करी ध्वजवंदनाच्या चित्रणाने मनात देशाबद्दल व देशसैनिकांबद्दल जे काही उचंबळून आले त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे. नंतर कविता खरवंडीकरांनी गायलेला कबीराचा दोहा जणू पुढे उलगडत जाणार्‍या चित्रांची पूर्वकल्पनाच देतो. चित्रपटाची कथा येथे देत नाही. परंतु अगदी कोणत्याही मध्यम वर्गीय घरात घडू शकेल असे हे कथानक आहे. त्यात तरुण पिढी व जुन्या पिढीच्या समोरील व्यावहारिक व मानसिक आव्हाने आहेत. स्वार्थ मोठा की कोणाला न दुखावता, भ्रष्टाचार न करता साधलेला आनंद मोठा यावर कोणत्याही कुटुंबात घडतील अशा घटनांमधून साकारणारी कथा आहे. एकीकडे अण्णा हजारेंनी छेडलेले भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी अहिंसक आंदोलन, जगात अन्य ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उमटलेले त्याचे जगव्यापी पडसाद, प्रसारमाध्यमे - सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून घरांघरांमधून पोचलेले हे आंदोलन, त्यातून झडलेल्या चर्चा, ढवळून निघालेली मने, शहरी लोकांबरोबरच ग्रामीण जनतेचा सहभाग, भ्रष्टाचाराला कंटाळलेली आणि सरावलेली मने व या सर्वांचे टीव्ही फूटेज या सर्व घटनांचा सुरेख वापर या चित्रपटात दिसून येतो. त्यातूनच चित्रपटाचे कथानक पुढे सरकत राहते. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घडामोडी, त्या कुटुंबातील सदस्यांच्या समोर उभे राहिलेले प्रश्न, त्यांची त्यांनी शोधलेली उत्तरे, त्यातून निर्माण होणारे मानसिक आंदोलन - द्वंद्व यांचा जो मेळ घातला आहे तो खरोखरीच उत्तमपणे मांडला आहे. विक्रम गोखले व उत्तरा बावकर ज्या सहजतेने वावरतात त्यामुळे त्यांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. तीच गोष्ट चित्रपटातील इतरही कलाकारांची म्हणावी लागेल. जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, ओंकार गोवर्धन, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार यांचे अभिनय हे अभिनय न वाटता अतिशय स्वाभाविक वाटतात. कोठेही दे मार मारामारी, अंगावर येणारी गाणी, संवाद, चित्रे न वापरता आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहोचविण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. शैलेश बर्वेंनी दिलेले संगीतही चित्रपटात बेमालूमपणे मिसळून जाते. किशोर कदम व दीपा लागूंच्या छोट्याच परंतु प्रभावी भूमिका लक्षात राहणार्‍या आहेत व त्यांनी त्या नेहमीच्याच सफाईने वठविल्या आहेत.

दोन तासांचा हा चित्रपट प्रत्येक भारतवासियाने पाहावा असाच आहे. चित्रपटाला सबटायटल्सही आहेत, त्यामुळे अमराठी लोकांनाही तो सहज समजू शकेल. यातील भाषा आपल्या प्रत्येकाची आहे. या चित्रपटात मांडली गेलेली मानसिक आंदोलने, द्वंद्व, प्रश्न, वातावरण आपणही रोजच्या जीवनात कोठे ना कोठे अनुभवत असतो. त्यामुळेच जो संदेश चित्रपटाच्या शेवटच्या भागात कथानकातून समोर येतो तो नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करायला लावतो. पर्याय शोधायचा प्रयत्न करायला लावतो. भ्रष्टाचाराचा विरोध हा आपण आपल्या वैयक्तिक जीवनातून सुरू केल्याशिवाय पर्याय नाही - तसे केले तरच हा लढा सार्थ होईल - भ्रष्टाचार करणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो सहन करणे हाही एक गुन्हा आहे याची जाणीव ज्या सहज सूक्ष्मतेने चित्रपटातून प्रसारित केली आहे त्याची दाद देण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी बघावा व इतरांना दाखवावा.

इतका सुंदर चित्रपट पाहायला व अनुभवायला मिळाल्याबद्दल मायबोलीचे व माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार! Happy

तसं बघायला गेलं तर गोष्ट आहे इंद्र सुखात्मेची, पण ही त्याची एकट्याची गोष्ट नाही, सर्वांची आहे. आणि या सर्वांमध्ये आपण - प्रेक्षकही येतो. इंद्रला बारावीत ९० % मार्क आहेत पण ऍडमिशन ९१ % लाच थांबली आहे. याच काळात अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू आहे, ते आपल्याला दिसतं फक्त टीव्हीच्या माध्यमातून. घरात रोजचं जगणं चालू असताना आंदोलन पार्श्वभूमीमध्ये नेहेमीच असतं पण चित्रपट वेग घ्यायला लागतो तसा आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न पडायला लागतात. प्रेक्षकांना हे प्रश्न पडणं ही 'हा भारत माझा' या चित्रपटाची खासियत आहे.

ही गोष्ट सांगण्यासाठी लेखक आणि दिग्दर्शकांनी एक अभिनव तंत्र वापरलं आहे. प्रत्येक प्रमुख पात्राचा दिवस आपल्याला जवळून बघायला मिळतो. प्रत्येकाचा दिवस जवळून पाहिला तर तुकोबांच्या 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ओळी आठवतात. प्रत्येक दिवशी त्याला किंवा तिला अनेक छोट्या-छोट्या लढाया कराव्या लागतात आणि या प्रत्येक लढाईत मूल्यांची कसोटी लागते. एकीकडे अण्णांचं देशव्यापी आंदोलन चालू असताना साधा गॅस मिळवण्यासाठी गृहीणीला ज्या खटपटी कराव्या लागतात त्यातून भ्रष्टाचाराचं आपल्या देशातलं रूप किती खोलवर पसरलं आहे याची जाणीव होते. कथा उलगडत जाताना लोक दोन पातळ्यांवर आयुष्य जगताना दिसतात. एकीकडे अण्णा जे म्हणतात ते आतून पटतही असतं, पण मूल्याधिष्टीत आयुष्याचा खडतर मार्ग पत्करायची तयारीही नसते, आपण जी तडजोड करतो आहोत तिच्याबद्दल अपराधीपणाही वाटत असतो. अशा अनेक कात्र्यांमध्ये सापडलेलं सुखात्मे कुटुंब हे आजच्या मध्यमवर्गीय समाजाचं प्रतीक ठरावं. चित्रपटात फक्त सुखात्मेच नाही तर त्यांच्या आयुष्याला स्पर्श करणार्‍या समाजाच्या विविध स्तरातील लोकांचं दर्शन होतं.

मूल्यांशी तडजोडीच्या अनुषंगाने चित्रपटात आणखी एक मुद्दा येतो. हा मुद्दा भ्रष्टाचाराच्या मुद्याइतका ठळकपणे मांडलेला नाही. आपण 'चलता है' च्या नावाखाली मूल्यांशी जी तडजोड करत असतो ती सरकारी कामे वगळता आपल्या इतर व्यवहारांमध्येही झिरपते का? 'देशाशी प्रामाणिक राहणे' या मूल्यामध्ये सवलत घेतली तर हळूहळू इतरांशी प्रामाणिक राहण्यातही आपण दिरंगाई करायला लागतो का? आणि असं होत गेलं तर ही मूल्यांची ढासळणारी उतरंड कुठे थांबेल का? 'द पॉवर ऑफ हॅबिट' नावाचं एक पुस्तक नुकतंच वाचनात आलं. यात हाच मुद्दा उलट्या बाजूने मांडला आहे. आपण आयुष्यातील एका भागाला चांगल्या सवयी लावून घेतल्या तर हळूहळू त्यांचा परिणाम इतर भागांमध्येही होतो.

चित्रपटाच्या शेवटी येणार्‍या एका दृश्यानं अपेक्षेपेक्षा जास्त वेळ विचारात गुंतवून ठेवलं. आंदोलन संपल्यानंतर टिव्हीवर आंदोलक राष्ट्रगीत म्हणत असताना सुखात्मे कुटुंब उभा राहून मानवंदना देतं. अशा वेळी प्रेक्षकांनी काय करावं असा प्रश्न पडतो. चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्र्गीत चालू असताना आपण उभे राहिल्याची आठवण ताजी असते त्यामुळे आता आपण बसलो आहोत ही भावना अधिक टोचते. इथे मुळात सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत दाखवण्यामागची कारणमीमांसा काय असा मूलभूत प्रश्न पडतोच. शिवाय चित्रपटात राष्ट्रगीत चाललेलं असताना ते काल्पनिक मानायचं की खरं असाही आणखी अवघड पेच पडतो. याचं उत्तर मिळवण्यासाठी कदाचित नाट्यसंहितेमधील 'चौथ्या भिंतीच्या' अनुषंगाने विचार करावा लागेल. हा प्रश्न कदाचित लेखक-दिग्दर्शक यांना अपेक्षित नसेलही. पण सकस कलाकृतीचं हे एक वैशिष्ट्य आहे की तिचे निरनिराळे अर्थ वाचकांना किंवा प्रेक्षकांना उलगडत जातात.

बहुतेक चित्रपटांची मोठी बजेट ही अभिमानानं सांगण्याची गोष्ट असते मात्र 'हा भारत माझा'च्या बाबतीत दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी म्हटल्याप्रमाणे कमी बजेट हीच विशेषता होती. सुमित्रा भावे यांनी पटकथा लिहिल्यानंतर विक्रम गोखले, उत्तर बावकर, जितेंद्र जोशी, रेणुका दफ्तरदार यांच्यासह सर्व कलाकारांनी मानधन न घेता काम केलं आणि चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य ओळखून चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं ही उल्लेखनीय बाब आहे.

आपण सिनेमा बर्‍याच कारणांसाठी बघतो. मनोरंजन हे त्यातलं महत्वाचं कारण. 'हा भारत माझा' ही एका प्रकारची परीक्षा आहे, आपणच विद्यार्थी आणि आपणच परीक्षक. आपण जगताना कोणती मूल्यं, कशी वापरतो यावरची. हे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे आहेत. प्रश्न सोपे नाहीत, उत्तरं लगेच मिळतील अशी खात्रीही नाही. पण या परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं हे ही तितकंच महत्वाचं आहे.

एक सुरेख सिनेमा बघण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली आणि माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार.

राजकाशाना, अरूंधती,

तुम्ही दोघांनीही सुंदर परीक्षण लिहिलं आहे. तुमचं परीक्षण वाचल्यावर मी बरेचसे मुद्दे लिहायचे विसरलो हे लक्षात आलं.

बादवे, मी आणि राजकाशाना शेवटून दुसर्‍या ओळीत बसलो होतो.

राजकाशाना, वा! नेमके व उत्तम मांडले आहेत विचार! राष्ट्रगीताबद्दल.... चित्रपटातील राष्ट्रगीत सुरू असताना माझा नेमका हाच गोंधळ उडाला होता... बसावे की उभे राहावे? Happy
भारतात चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत असते ना? मलाच आठवत नाहीये!

मी आणि राजकाशाना शेवटून दुसर्‍या ओळीत बसलो होतो. >> हो का? मी बरीच पुढे बसले होते आणि माझ्या रांगेमागच्या २-३ रांगांमधील लोकांकडे 'ह्यात कोणी माबोकर असतील का?' विचार करत निरखून बघत होते! Lol

>>भारतात चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत असते ना? मलाच आठवत नाहीये!>>
कालही होतं म्हणूनच आठवण ताजी होती. Happy

>>हो का? मी बरीच पुढे बसले होते आणि माझ्या रांगेमागच्या २-३ रांगांमधील लोकांकडे 'ह्यात कोणी माबोकर असतील का?' विचार करत निरखून बघत होते!>>
रहस्यकथा वाचताना नवीन पात्र आलं की हा गुप्तहेर असेल का असं वाटायला लागतं ते आठवलं Proud