भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा

Submitted by बेफ़िकीर on 2 May, 2012 - 03:02

गझलेमधे मतला जणू नावास असल्यासारखा
मी राहतो दुनियेत कारावास असल्यासारखा

एका घरी राहूनसुद्धा बाप पत्रे धाडतो
भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा

===============================

बुजवेन या पाउलखुणा उरकेन सारा व्याप मी
चिंता नसावी जीवना संपेन आपोआप मी

नाते तुझे माझे कुठे नेलेस हे समजेल का
आरंभले होते जिथे तेथे उभा अद्याप मी

फोटोतली आई कुठे स्वप्नात थोपटते म्हणा
जागा असा होतो जणू तान्हा कुणी अश्राप मी

माझ्याप्रमाणे भाबडा कोणीच नाही याइथे
केव्हातरी होवो खरी ही मारलेली थाप मी

पापे न केल्याचा म्हणे त्यांना पुरावा पाहिजे
होणार नाही यापुढे कालत्रयी निष्पाप मी

कोणास होतो जास्त हा खटला सुरू दैवापुढे
त्याने दिलेला ताप की त्याला दिलेला ताप मी

साथीस घेताना तुला हे राहिले सांगायचे
पट्टीत बसवावास तू जो घेतला आलाप मी

आहे तसे प्रतिबिंब दाखवल्यामुळे मी हासतो
या आरश्याचा एकदा उडवेनही थरकाप मी

व्यक्तीत्व प्रत्यक्षातले विसरून गेलो शेवटी
हुकुमीपणे साकारले किरदार वारेमाप मी

वेश्येवरी भाळून जर किंमत दिली नसलीच तर
पापात केले पुण्य की पुण्यात केले पाप मी

मी डूख धरला पण कुणाला दंशलो नाही कधी
जहरी जगामध्ये निघालो बिनविषारी साप मी

शुष्कावलेल्या भावना सोकावलेले सोबती
कविता अशी मागीतली...... मागीतला उ:शाप मी

लिहिलीत बापाने मला पत्रे अशी की वाटते
काहीच नाही चांगले ज्यांचे अशांचा बाप मी

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

नि:शब्द!

एका घरी राहूनसुद्धा बाप पत्रे धाडतो
भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा ....चर्रर्र झाल वाचून

नाते तुझे माझे कुठे नेलेस हे समजेल का
आरंभले होते जिथे तेथे उभा अद्याप मी....... प्रत्येकाच्या मनातील आशय उतरलाय या शेरात.

साथीस घेताना तुला हे राहिले सांगायचे
पट्टीत बसवावास तू जो घेतला आलाप मी..........वाह!

व्यक्तीत्व प्रत्यक्षातले विसरून गेलो शेवटी
हुकुमीपणे साकारले किरदार वारेमाप मी......सही!

भूषणजी! आपले दोन शेर व पूर्ण गझल प्रचंड आवडली. वृत्तातील गोडवा, सफाई, शब्दकळा, कल्पनाविलासातील नाविन्य, सगळेच विलोभनीय व मनोहारी आहे. तुमची ही गझल काळजाला चटका लावून गेली, ओठांवर अजूनही रेंगाळते आहे. मला झपाटत आहे, विचार करायला लावत आहे. तुमची प्रद्न्या अन् प्रतिभा दोन्ही या गझलेत ओसंडताना दिसत आहेत! अत्यंत ताकदीची अन् कामयाब गझल आहे ही, काही शेर सोडून.

तुमच्या सुरवातीचे दोन शेर व पूर्ण गझलेवर मी खूप विचार केला, तिचा अभ्यास केला.
तुमच्या या गझलेवर माझे काही खयाल इथे देत आहे. कसे वाटतात ते, या बाबतीत कृपया मार्गदर्शन कराल का?
माझे खयाल खालील प्रमाणे........
.........................................................................................................

गझलेतल्या मक्त्यात मी नावास असल्यासारखा!
मी राहतो दुनियेत कारावास असल्यासारखा!!
..........................................................................................
मी मैफिलीमध्ये जणू नावास असल्यासारखा!
मी राहतो दुनियेत कारावास असल्यासारखा!!
.........................................................................................................
पत्रे लिहावी त्याप्रमाणे बाप माझा बोलतो!
भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा!!
.........................................................................................................

मिटवेन मी पाउलखुणा, निपटेन माझा व्याप मी!
निश्चिंत हो तू जीवना, संपेन आपोआप मी!!

“आलेच मी जावून” तू म्हटलीस, अन् गेली युगे;
मी भेटलो जेथे तुला, तेथे उभा अद्याप मी!

आई न अंगाई तरीही, झोपलो मी गाढ का?
जागा असा झालो जणू, तान्हा कुणी अश्राप मी!

देते झुकांड्या यश मला प्रत्येक वेळी का असे?
वाटे मला देवा जणू, तू मारलेली थाप मी!

पापे न केली, पुण्यही, नाही कमवले मी कधी;
‘पापी’ मला म्हणतो कुणी, कोणी म्हणे ‘निष्पाप’ मी!

त्यांनी मला केले जवळ, पाहून केवळ फायदा!
का आज वाटू लागलो डोक्यास त्यांच्या ताप
मी?

रोमांच उठले मैफिलीवर गायला बसताच मी;
त्या जीवघेण्या मारव्याचा घेतला आलाप मी!

का आरशाला या तडे पडतात मजला पाहुनी?
अभिशाप मी, उ:शाप मी, की, वाटतो थरकाप मी!

हरवून मी बसलो स्वत:चा चेहराही शेवटी!
हुकुमीपणे साकारले किरदार वारेमाप मी!!

वेश्येवरी मी भाळलो, पण, टाळुनी गेलो पुढे;
पापात केले पुण्य की, पुण्यात केले पाप मी?

मी दंश करणे दूर....ना फुत्कारही केला कधी;
जहरी जगामध्ये निघालो बिनविषारी साप मी!

चुपचाप मी उपभोगला, अभिशाप जो मज लाभला;
ना भेटलो कोणासही मागायला उ:शाप मी!

केली टवाळी मुक्तकंठे याच लोकांनी जरी;
ते लागले मानायला.....त्यांचाच आहे ‘बाप’ मी!

...................प्रा. सतीश देवपूरकर

सर्वांचा आभारी आहे

-'बेफिकीर'!

प्रोफेसर साहेब, आपल्याला विस्तृत प्रतिसाद काही वेळाने देतो Happy

प्रोफेसर साहेब,

आपल्या शेरांबाबत माझी मते:

पत्रे लिहावी त्याप्रमाणे बाप माझा बोलतो!
भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा!!>>

माझ्या वडिलांनी मला प्रत्यक्ष पत्र लिहिले आहे आणि त्यावरून तो शेर झाल्यानंतरच या गझलेतील बाकीचे शेर सुचत गेलेले आहेत. पत्रे लिहिल्याप्रमाणे वडील बोलतात हा बदल तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून सुचवलात हे लक्षात येत नाही. मला प्रत्यक्ष पत्र लिहिण्यात आले आहे आणि मी जे म्हणू पाहात आहे तेच तुम्ही बदलता आहात. असे करायचे झाले तर प्रत्येकाच्या सर्व गझला आमुलाग्र बदलता येत राहतील व मूळ गझल कोणती होती हा एक गोंधळच होईल. फॉर् वन्स, मला एका प्रश्नाचे उत्तर द्याल का, की तुम्ही पर्यायी शेर देता त्यामागचा हेतू काय असतो??
.........................................................................................................

मिटवेन मी पाउलखुणा, निपटेन माझा व्याप मी!
निश्चिंत हो तू जीवना, संपेन आपोआप मी!!>>> शब्दयोजनेत किंचित फरक, खयाल सेम आहे.

“आलेच मी जावून” तू म्हटलीस, अन् गेली युगे;
मी भेटलो जेथे तुला, तेथे उभा अद्याप मी!>> माझा मूळ शेर प्रेयसीबाबत असावा असा आपला गैरसमज झालेला दिसतो. किंवा निदान एखाद्या स्त्रीबाबत असावा असा तरी गैरसमज झालेला दिसत आहे. तुम्हाला माझ्या गझलेचा जो अर्थ लागला तो घेऊन तुम्ही पर्यायी शेर करणे याला काही अर्थ आहे का? माझा मूळ शेर मला स्वतःला उद्देशून आहे.

आई न अंगाई तरीही, झोपलो मी गाढ का?
जागा असा झालो जणू, तान्हा कुणी अश्राप मी!>>>

ठीकठाकच, पण हे बदल करण्याचे कारण समजले नाही

देते झुकांड्या यश मला प्रत्येक वेळी का असे?
वाटे मला देवा जणू, तू मारलेली थाप मी!>>

मी तुमची ही दुसरी ओळ गेले तीन दिवस वाचून मनातल्या मनात उत्स्फुर्त दाद देत आहे. 'वाटे मला देवा जणू तू मारलेली थाप मी' - व्वा व्वा! पण मला खरंच मनापासून असे वाटत आहे की मला जो अर्थ जाणवतोय त्याच अर्थाने तुम्ही ती ओळ रचली आहेत की नाही हे नक्की नसणार. बरं, एकंदर हा पर्यायी शेर म्हणजे माझा जो मूळ शेर आहे त्यातला विचारच बाजूला टाकून एक चक्क वेगळाच शेर रचण्यात आला आहे. आता मी काय बोलू?

पापे न केली, पुण्यही, नाही कमवले मी कधी;
‘पापी’ मला म्हणतो कुणी, कोणी म्हणे ‘निष्पाप’ मी!>>> मूळ विचार पूर्णपणे बदलला

त्यांनी मला केले जवळ, पाहून केवळ फायदा!
का आज वाटू लागलो डोक्यास त्यांच्या ताप मी?>> मूळ विचार पूर्णपणे बदलला

रोमांच उठले मैफिलीवर गायला बसताच मी;
त्या जीवघेण्या मारव्याचा घेतला आलाप मी!>> मूळ विचार पूर्णपणे बदलला

का आरशाला या तडे पडतात मजला पाहुनी?
अभिशाप मी, उ:शाप मी, की, वाटतो थरकाप मी!>> मूळ विचार पूर्णपणे बदलला

हरवून मी बसलो स्वत:चा चेहराही शेवटी!
हुकुमीपणे साकारले किरदार वारेमाप मी!!>> माझा मूळ शेर अधिक प्रभावी आहे हे माझे त्रयस्थापरी मत

वेश्येवरी मी भाळलो, पण, टाळुनी गेलो पुढे;
पापात केले पुण्य की, पुण्यात केले पाप मी?>> मी वेश्येला टाळून गेलो असे मला म्हणायचेच नाहीये. मला असे म्हणायचे आहे की मी वेश्यागमन केले, पण तिच्यावर प्रेम बसल्यामुळे तिला पैसे दिले नाहीत. आता प्रेम बसले म्हणून पैसे देणे टाळून तिच्याबद्दलचा आदर व्यक्त करणे हे पुण्य माझ्याकडून झाले आहे की एका वेश्येचे पोट त्या पैशांवर अवलंबून असताना तिला मी पैसे दिले नाहीत हे पाप झाले आहे? शेरातील मूळ खयाल असा आहे की प्रेम हे नेहमी चांगलेच असेल असेही नाही आणि प्रेम करणे हे नेहमी पुण्यच असेल असे नाही. आता वेश्येवरी भाळून माणूस नुसताच पुढे निघुन गेला तर हा शेर निर्माण होईल का? नाही निर्माण होणार.

मी दंश करणे दूर....ना फुत्कारही केला कधी;
जहरी जगामध्ये निघालो बिनविषारी साप मी!>> शब्दयोजनेत फेरफार

चुपचाप मी उपभोगला, अभिशाप जो मज लाभला;
ना भेटलो कोणासही मागायला उ:शाप मी!>> मूळ विचार पूर्णपणे बदलला

केली टवाळी मुक्तकंठे याच लोकांनी जरी;
ते लागले मानायला.....त्यांचाच आहे ‘बाप’ मी!>> मूळ विचार पूर्णपणे बदलला

मी लिहिलेल्या जमीनीत आपण जवळपास पूर्णपणे वेगळी गझल करून माझ्याच गझलेखाली प्रतिसादात ती देऊन मार्गदर्शनाच्या नावाखाली आपल्या अस्तित्वाचा ठस्वा उमटवू पाहात आहात आणि इतर सर्व गझलकार हे अजून कच्चेबच्चे आहेत अशा अनाकलनीय गृहीतकाने वावरत आहात यावर काय मार्गदर्शन करावे?

क्षमस्व

-'बेफिकीर'!

कुठला शेर सर्वाधिक आवडला, हे सांगणे अशक्य!
सगळेच अगदी सहज स्वतःच स्वतःला लिहिल्यासारखे..!

अफाट गझल.. बस्स, अजून काहीच म्हणू शकत नाही.......

मतला तुफान आहे
गझलेचा तर प्रश्नच नाही !!

पुनःश्च धन्यवाद

Pages