भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा

Submitted by बेफ़िकीर on 2 May, 2012 - 03:02

गझलेमधे मतला जणू नावास असल्यासारखा
मी राहतो दुनियेत कारावास असल्यासारखा

एका घरी राहूनसुद्धा बाप पत्रे धाडतो
भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा

===============================

बुजवेन या पाउलखुणा उरकेन सारा व्याप मी
चिंता नसावी जीवना संपेन आपोआप मी

नाते तुझे माझे कुठे नेलेस हे समजेल का
आरंभले होते जिथे तेथे उभा अद्याप मी

फोटोतली आई कुठे स्वप्नात थोपटते म्हणा
जागा असा होतो जणू तान्हा कुणी अश्राप मी

माझ्याप्रमाणे भाबडा कोणीच नाही याइथे
केव्हातरी होवो खरी ही मारलेली थाप मी

पापे न केल्याचा म्हणे त्यांना पुरावा पाहिजे
होणार नाही यापुढे कालत्रयी निष्पाप मी

कोणास होतो जास्त हा खटला सुरू दैवापुढे
त्याने दिलेला ताप की त्याला दिलेला ताप मी

साथीस घेताना तुला हे राहिले सांगायचे
पट्टीत बसवावास तू जो घेतला आलाप मी

आहे तसे प्रतिबिंब दाखवल्यामुळे मी हासतो
या आरश्याचा एकदा उडवेनही थरकाप मी

व्यक्तीत्व प्रत्यक्षातले विसरून गेलो शेवटी
हुकुमीपणे साकारले किरदार वारेमाप मी

वेश्येवरी भाळून जर किंमत दिली नसलीच तर
पापात केले पुण्य की पुण्यात केले पाप मी

मी डूख धरला पण कुणाला दंशलो नाही कधी
जहरी जगामध्ये निघालो बिनविषारी साप मी

शुष्कावलेल्या भावना सोकावलेले सोबती
कविता अशी मागीतली...... मागीतला उ:शाप मी

लिहिलीत बापाने मला पत्रे अशी की वाटते
काहीच नाही चांगले ज्यांचे अशांचा बाप मी

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान

गझल आवडली.

खालील शेर विशेष आवडले.

नाते तुझे माझे कुठे नेलेस हे समजेल का
आरंभले होते जिथे तेथे उभा अद्याप मी

आहे तसे प्रतिबिंब दाखवल्यामुळे मी हासतो
या आरश्याचा एकदा उडवेनही थरकाप मी

वेश्येवरी भाळून जर किंमत दिली नसलीच तर
पापात केले पुण्य की पुण्यात केले पाप मी

एका घरी राहूनसुद्धा बाप पत्रे धाडतो
भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा

व्वा व्वा!

बुजवेन या पाउलखुणा उरकेन सारा व्याप मी
चिंता नसावी जीवना संपेन आपोआप मी

परकोटीचे नैराश्य व्यक्त करणारा अफाट शेर.

मी डूख धरला पण कुणाला दंशलो नाही कधी
जहरी जगामध्ये निघालो बिनविषारी साप मी
.
लिहिलीत बापाने मला पत्रे अशी की वाटते
काहीच नाही चांगले ज्यांचे अशांचा बाप मी

व्वा. विशेष आवडलेत. Happy

लांबच्या गावास असल्यासारखा........ वा....... जबरी !!
आरंभ, आरसा, साप....... खूपच आवडले Happy

77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif

फोटोतली आई कुठे स्वप्नात थोपटते म्हणा
जागा असा होतो जणू तान्हा कुणी अश्राप मी >>>>>>>> खूप आवडली...

___/\___ दंडवत बेफी!

<<एका घरी राहूनसुद्धा बाप पत्रे धाडतो
भूषण कटककर लांबच्या गावास असल्यासारखा<<< नि:शब्द केलत!

पापे न केल्याचा म्हणे त्यांना पुरावा पाहिजे
होणार नाही यापुढे कालत्रयी निष्पाप मी>>>>>क्या बात है ! जबरदस्त

मी डूख धरला पण कुणाला दंशलो नाही कधी
जहरी जगामध्ये निघालो बिनविषारी साप मी>>>>>> हे म्हणजे फारच अप्रतिम

जबरदस्त गझल

अप्रतिम गझल!!!!

मला फक्त

गझलेमधे मतला जणू नावास असल्यासारखा
मी राहतो दुनियेत कारावास असल्यासारखा................... दोन्ही मिसर्‍यांचा एकमेकांशी संबंध लागला नाही..

खूप खूप शुभेच्छा!!
Happy

शामशी सहमत (एका शेरापुरता)
इतरान्शीही ................(सम्पूर्ण गझलेबाबत )

बुजवेन या पाउलखुणा उरकेन सारा व्याप मी
चिंता नसावी जीवना संपेन आपोआप मी

नाते तुझे माझे कुठे नेलेस हे समजेल का
आरंभले होते जिथे तेथे उभा अद्याप मी

हे दोन आणि शेवटचा शेर सर्वात जास्त आवडले.
मतला दीर्घकाळ स्मरणात राहील.

अभिनंदन आणि शुभेच्छा.

Pages