बाबा नसताना...

Submitted by सुमेधा आदवडे on 22 April, 2012 - 11:54

मानवाच्या जन्मापासुन सर्वप्रथम त्याच्याशी निगडीत अशी सर्वात सशक्त आणि प्रभावी सामाजिक संस्था जर कुठली असेल तर ते त्याचं ’कुटुंब’. रक्ताच्या,लग्नाच्या किंवा दत्तक ह्या नात्यांनी एकत्र किंवा विभक्त पद्धतीने राहणारी माणसे ही ’अमुक-अमुकचे बाबा’ किंवा ’अमुक-अमुकच्या आत्याची मुलगी’ या व अशा नात्यांनी ओळख पटण्यापलिकडेही एकमेकांशी जोडली गेलेली असतात. पण जागेची निकड,व्यवसाय-नोकरी,शिक्षण किंवा रोज नव्याने येणारे जुनेच मतभेद या व अशा अनेक कारणांमुळे हल्ली विभक्त कुटुंब जास्त पहायला मिळतात.

एका छताखाली राहणाऱ्यांपैकी आई-वडील आणि मुले ’एका संपुर्ण कुटुंबाचे’ चित्र नक्कीच पुर्ण करतात. पण कधी ह्या चित्रातलं कोणी नसेल तर? ते ’कोणी’ म्हणजे ’कोण’ यावर सगळं अवलंबुन आहे. हल्लीच्या काळात मुलगा किंवा मुलगी शिक्षण/नोकरी/लग्न ह्या पैकी कोणत्याही कारणाने ह्या चित्रात नसणे अगदी ग्राह्यच धरले जाते. पण वडील नसतील तर?कसं असतं ते घर आणि कुटुंब? नसणे म्हणजे जवळ नसणे,सोबत नसणे किंवा जगात नसणे ह्या तिन्ही शक्यता येतात. माझ्या एका मैत्रीणीचे बाबा बाहेरगावी असतात. तिच्या साठीला आलेल्या आईला दोन वयात आलेल्या मुलींची शहरातल्या ठिकाणी संपुर्ण जबाबदारी पेलताना जेव्हा जवळुन पाहते, तेव्हा पटतं की बाबा असणं घरासाठी किती महत्वाचं आहे.

मुलांच्या जन्मापासुन त्यांच्या शारीरिक-मानसिक जडण-घडणीत,शिक्षणात,पालन-पोषणात ’आई’ आणि ’वडील’ हे दोघेही अत्यंत महत्वाचे घटक असतात. ह्यात ’आई’ची ममता,कर्तॄत्व,प्रेम,त्याग सगळ्या सगळ्या बद्दल भरपुर लिहिलं-वाचलं-बोललं-ऐकलं गेलेलं आहे. पण त्याच सोबत वडिलांच्या अस्तित्वाचं महत्व आणि आवश्यकता याकडेही तितक्याच जाणीव पुर्वक लक्ष द्यायला हवं.

’दमलेल्या बाबाची कहाणी’ सारखी गाणी कधीही ऐकली तरी डोळ्यांत पाणी आणतात. ’जन्मदाता’चं पद भूषवण्याहुन अधिक, स्वत:च्या मुलांना सर्वोत्तम सुफल जीवन लाभावं म्हणुन आपलं संपुर्ण आयुष्य मुलांसाठी वेचणारा बाप, प्रत्येक संकटाला धाडसाने तोंड द्यायला शिकवणारा बाप, मुलांची दु:खं आणि वेदना पाहुन रडु शकत नाही म्हणुन आतल्या आत घुसमटणारा बाप,मुलीच्या सासरचं आणि मुलाच्या वागणुकीचं दडपण घेऊन जगणारा बाप असे अनेक मुखवटे लावुन ’वडील’ हे पात्र आयुष्याच्या रंगपटावर उत्तोमोत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतं.
ह्या विषयाचा सखोल अभ्यास केलेले प्रख्यात समाजतज्ञ डॉ. डेव्हिड पोपोने म्हणतात, ’वडील’ किंवा ’बाप’ हे पद घरातली ’दुसरी मोठी व्यक्ती’ किंवा ’कर्ता-कमवता’ माणुस ह्यापलिकडेही खुप मोठं असतं. सामान्य घरातील सामन्यरित्या मुलांंशी एकरूप असलेला बाप मुलांच्या संगोपनात जे फायदे देऊ शकतो ते दुसरं कोणीच देऊ शकत नाही.

लहानपणी धाराच्या जाहिरातीमधे ’माय डॅडी स्ट्रॉन्गेस्ट!" म्हणणारी लहान मुलगी आठवते का? ती कल्पना जरी बालिश असली तरी बाबा सोबत असताना मुलांना येणारा आत्मविश्वास आणि वाटणारा प्रचंड आधार इतर कोणासोबत असताना वाटत नाही हे अगदी खरं आहे. मुलं भावनीकरित्या आणि आजुबाजुच्या वातावरणाबद्दल अधिक सजग आणि सुरक्षित बनतात. वडिलांसोबत राहणाऱ्या आणि न राहणाऱ्या मुलांचा आणि त्यांच्या एकंदर आयुष्याचा बराच अभ्यास अमेरीकेत करण्यात आलेला आहे आणि अजुनही केला जात आहे. ह्या अभ्यासानुसार बाल्यावस्थेपासुन किशोरावस्थेतुन अगदी तारुण्यातही मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासाचा पायंडा मजबूत करायचं काम वडील करत असतात.
सामान्यरित्या सगळ्याबाबतीत मुलांची काळजी करणं हे माप आईकडे जास्त झुकतं तर यशप्राप्तीसाठी स्वत:ला झोकुन द्यायला लागणारं बळ देणं हे माप वडिलांकडे झुकतं. याला अपवादही असतील, पण तरीही ही दोन्ही मापं मुलांच्या सर्वांगीण विकासाला तोलुन धरण्यासाठी अत्यावश्यक आहेत ही बाब नाकारता येणार नाही.

आई-वडिलांच्या परस्पर संबंधांचा सर्वाधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. बाहेरच्या आणि आपल्याही देशात वाढणारी घटस्फोटांची संख्या आणि त्यांचा मुलांच्या विकासावर आणि एकंदर आयुष्यावर होणारा परिणाम ही चिंतेची आणि आकलनाचीही बाब आहे. मुलांच्या सोबत राहुन त्यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्याशी एकरुप असलेले वडील त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवुन त्यांच्या संपुर्ण व्यक्तीमत्त्वाचा पुरेपुर विकास करण्याचं महत्वपुर्ण काम करतात.

मुलगा असो वा मुलगी, दोघांच्याही एकुण वागण्यात वडील असल्यामुळे बराच फरक पडतो. एकतर घरात वडिलांचा धाक आणि दबदबा कायम मुलांवर राहतो. मुलगा असेल तर तो आई-वडिलांच्या परस्पर संबंधातुन स्त्रीयांशी वागणुकीबद्दल बोध घेतो. तसंच मुली पुरूषांच्या वागणुकीचं आकलन करुन विश्वासाचं नातं निर्माण करायला शिकतात. अर्थात हे सगळं, प्रत्येक घर आणि घरातील व्यक्ती आणि परिस्थिती सापेक्ष असतं. पण मुलांना वैयक्तिक आणि सामाजिक मर्यादा राखणं, तत्वनिष्ठता आणि व्यवहारीपणा या गोष्टी शिकवणारे जबाबदार वडील नक्कीच त्यांच्या मनाची घडण सुयोग्य रितीने करत असतात.

याउलट वडिलांपासुन लांब असणाऱ्या मुलांमधे वडिलांबद्दल अटत चाललेली प्रेमाची भावना आणि प्राप्त परिस्थितीत वाढत चाललेला द्वेष त्यांच्या मनावर आणि बुद्धीवरही परिणाम करत असतो. ह्यामुळेच परिस्थितीनुसार शिक्षण लवकर सुटणं, व्यसनांच्या आणि अन्य वाईट मार्गांना लागणं, मिळकतीच्या बाबतीत अजिबात किंवा फार यश न संपादन करु शकण्याचे प्रमाण अधिक आहे असे आतापर्यंत या बाबतीत झालेला अभ्यास सुचवतो. वरील सगळ्या बिकट समस्या वडील घरात असतानाही येऊ शकतात. पण त्याची कारणं मूळत: परिस्थितीजन्य आहेत किंवा बेजबाबदार संगोपनाशी निगडीत आहेत.

माणुस आयुष्यात काय करु शकतो किंवा काय करतो ही बाब तीन महत्वांच्या गोष्टींवर अवलंबुन आहे- त्याचं शिक्षण, चरितार्थ निवडलेला मार्ग आणि वाईट किंवा व्यसनी दुष्मार्गांपासुन तो किती दूर आहे. वडील जवळ/हयात नसताना येणाऱ्या आर्थिक अडचणी, वडिलांचा वेळ आणि लक्षाचा अभाव आणि सामाजिक परिस्थिती एकत्रीतपणे वरील तिन्ही गोष्टींवर खुप मोठा प्रभाव पाडतात. वरील तिन्ही महत्वाच्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पाया घडवतात...तो मजबूत किंवा कमजोर,कसाही घडतोच! मग वडील नसले तर मुलं स्वत:च्या आयुष्यात काहीच धड करु शकत नाहीत का? तर असं नाही आहे.

मुलांचे वडील नसतानाही अती बिकट प्रसंगांना सामोरं जाऊन, अनेक समस्यांना तोंड देऊन एकट्या आईने मुलांचं संगोपन केलेली कितीतरी उदाहरणं आपण पाहतो. ह्यातल्या समस्या बऱ्याच वेळा आर्थीक स्वरुपाच्या असतात. तसंच सामाजिकही असतात. काही झालं तरी मुलांच्या पालन-पोषणावर आणि काही प्रमाणात यश संपादनावर ह्या समस्या नक्कीच सूड उगवत असतात. मग याला इलाज काय? तर, जर आई-वडिलांनी एकमेकांपासुन वेगळं होण्यापुर्वी (सोबत न राहणे/जवळ न राहणे/मृत्यु ह्या कुठल्याही कारणामुळे) मुलांना त्यांच्या मार्गातील आर्थिक आणि वेगळेपणाला जोडुन हमखास येणाऱ्या सामाजिक कंटकांवर चालण्यासाठी आधीच पायघड्या घालुन ठेवल्या आणि एकट्या आईने मुलांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचं उत्तमोत्तम पालकत्व करण्यासाठी एक सुफल दैनंदीनी आखली, तर वडील नसतानाही मुलांचं आयुष्य अगदी ते असताना घडलं असतं तसंच घडेल. पण अडचण अशी आहे हे उद्देश पुर्ण करणं अतिशय कठीण बाब आहे.

सर्वसाधारणपणे एका प्रेमळ आणि जबाबदार बापाची व्यक्तीरेखा आणि तिचं मुलांच्या आयुष्यातलं स्थान आपण पाहिलं. पण बापाच्या वेषातले अनेक नराधमही समाजात वावरत असतात. मुलांकडुन शैक्षणिक किंवा इतर कौशल्यात अवास्तव अपेक्षा ठेवणे, व्यसनाधीन होऊन मारहाण करणे, मुलांच्या अन्न-वस्त्र-निवारा-प्रार्थमिक शिक्षण ह्या मूळ गरजांकडेही पुर्ण दुर्लक्ष करणे (हे परिस्थिती सापेक्ष आहे), मुलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे,पोटच्या मुलींवरही बळजबरी करणे इत्यादी हादरवुन टाकणारे प्रकार ही हल्ली पहायला-ऐकायला मिळतात. असं काही पाहिलं किंवा ऐकलं की वाटतं की स्वत:च जन्माला घातलेल्या आणि कणाकणाने स्वत:च्या डोळ्यांसमोर वाढताना पाहिलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याशी असं वागायला कुठून येतं हे मानसिक बळ त्यांना ? असा बाप असण्यापेक्षा नसलेला काय वाईट? तसंच ह्या सर्वातुन फोफावणारी गुन्हेगारी ही मोठी चिंतेची बाब आहे.

ह्या गुन्हेगारीला कारणीभूत असणारी पार्श्वभुमी, तिचा मुलांच्या मनावर होणारा परिणाम आणि त्याला जबाबदार असणाऱ्या बापांची मनस्थिती ही अक्षरश: डोक्याला मुंग्या आणणारी गोष्ट आहे. वडिलांच्या काही निकडी ह्या गुन्हेगारीच्या मूळाशी आहेत. गरिबी,बेकारी,सतत लागलेली पैशाची चणचण आणि ह्या सगळ्यामुळे वाढणारे मानसिक ताणतणाव अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी घालत असतात. मद्यपानाच्या आधीन गेलेल्या अर्ध्याहुन अधिक घरात मारहाण आणि शारिरीक छळ होतात आणि त्याच्या अर्ध्या पटीने विनयभंगाचे प्रकार घडतात. शिवाय स्वत:च्या आई-वडिलांकडुन मिळालेली वाईट वागणुकही काही वेळा स्वत:च्या मुलांशी वाईट वागायला कारणीभूत ठरते. म्हणजे वाईट वागणूक सुद्धा अनुवंशिक असावी? माणसाचा मूळ स्वभाव ’बापपण’ ही बदलु शकत नाही ही खुप मोठी खंत आहे.

असे सगळे प्रकार कळल्यावर, आपण सामान्य माणसांनी स्वत:च्या कुटुंबाचा मजबूत पाया आणि त्यावर आई-वडिलांचा भक्कम आधार असल्याबद्दल स्वत:च्याच नशिबाचा हेवा केला तर त्यात काही नवल नाही.कुठल्याशा एका कार्यक्रमात मागे कोणीतरी बोलताना ऐकलं होतं. "जगातला सर्वात धनाढ्य माणुस कोण? तर ज्याचे आई-वडील जीवंत आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सोबत आहेत."
त्यामुळे तुमच्या-माझ्यातल्या काही धनाढ्य मंडळींनी तरी देवाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, नाही का?

त.टी: यातील बरीचशी माहिती अंतरजालावरुन साभार. लेख फार पुर्वी लिहील्या असल्यामुळे संकेतस्थळांची नावे व्यवस्थित लक्षात नाहीत.
-सुमेधा मनिष आदवडे

गुलमोहर: 

अगदी मनातले लेखन. मुलांना जास्तीत जास्त वर्षे उर्जा पुरवठ्याचे काम करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

"जगातला सर्वात धनाढ्य माणुस कोण? तर ज्याचे आई-वडील जीवंत आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सोबत आहेत.">>>>>>>>++१११

छान लिहिलंयस, गं, सुपु. Happy

(पण आंतरजालावरची माहिती वाचून काढून त्यावरच्या तुझ्या विचारमंथनाचा पर्सनल टच मिळाला असता, वाचायला अधिक छान वाटलं असतं.)

खूप छान लेख. आपल्या एकटे पालक बाफ वर पण चिकटवा हा लेख. मदत होइल. कसे का होइना पुरूषाची सोबत हवी किंवा आधार हवा या भूमिकेतून एकट्या पालक स्त्रीया कधीकधी चुकीच्या पुरुषा बरोबर नवे जीवन सुरू करायचा प्रयत्न करतात. पण अनुनय करणारा मित्र व घरातील सर्व कंट्रोल्स हातात असलेला/ घेतलेला/ किंवा आपणच कंट्रोल्स त्याच्या हातात दिलेला पुरूष फार वेगळे असू शकतात. बाबा ह्या नात्याने तो मुलांना मार्गदर्शन देऊ शकेलच असे नाही. आई व मुलांच्या सुरक्षिततेला ही धोका पोहोचु शकतो.

दोन्ही पालक असणे खरेच फार भाग्याचे आहे. Happy

अ.मा., अगदी पटलंच...
तशीच गत (न्युक्लिअर फॅमिली असलेल्या) घरातल्या कर्त्या पुरूषाच्या अकस्मात मृत्यूनंतरही होऊ शकते. घरचे ज्येष्ठ-श्रेष्ठ लगेच त्या बाईच्या मागे लागतात, की आता ते घर, गाव सोड, मुलांना घेऊन सासरीच येऊन रहा. पुरूषाविना बाई एकटी राहू शकणारच नाही असं का वाटतं लोकांना, कोण जाणे !!

अश्वीनीमामी, लले...पुर्ण अनुमोदन.

मा़झ्या माहेरी आमच्या जुन्या बिल्डींग मध्ये एका काकींचा नवरा त्यांची मुलगी अवघी ३-४ वर्षांची असताना गेला. त्या एकट्या मुलीला घेऊन राहत होत्या. काही दिवसांनी त्यांच्याच फ्लोअर वर काही बॅचलर्स रहायला आले. त्यांना ह्या काकी जेवण करुन देऊ लागल्या काही ठराविक रक्कम घेऊन. तर त्यातल्या एका माणसावरुन त्या काकींवर संशय घेतला सगळ्यांनी आणि त्यांची बदनामी केली Sad
काही वर्षांनतर त्या काकी पण गेल्या. आता त्यांची म्हातारी आई त्या पोरी बरोबर त्या घरात राहतीये. तिने वडील नसताना वेगळ्या समस्यांना तोंड दिलं पण नकळत्या वयात पुढे सरसावली कशीतरी...आता आई-वडील दोघे नसताना त्या मुलीची जडणघडण कशी होत असेल ह्याचा विचारही करवत नाही.