कोकणासाठी हवी जलवाहतूक

Submitted by Mandar Katre on 21 April, 2012 - 04:15

कोकणासाठी हवी जलवाहतूक

कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.

कोकण किनारपट्टी आजही पर्यटकांच्या पसंतीचा भाग मानली जाते. कोकणात जाण्यासाठी अनेक पर्याय उलपब्ध आहेत, तरी बोटींमधून प्रवास करण्याची धम्माल कशात नाही, असंही मानलं जातं. वाहतुकीच्या दृष्टीने चांगला असणारा हा पर्याय लवकरात लवकर खुला व्हावा, अशी मागणीही नेहमी केली जाते.

सुमारे पन्नास वर्षांपूवीर् चाकरमान्यांची एकमेव पसंती कोकण बोटीलाच असायची. त्यातूनच ते विजयदुर्ग, देवगड, वेंगुलेर् असा प्रवास करायचे. 1845 च्या सुमारास ब्रिटिशांनी प्रवासी सेवेसाठी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. 1940 ते 1950 च्या सुमारास संत तुकाराम, संत रामदास, अँथोनी अशा बोटी नावारूपाला आल्या होत्या. त्या वेळी प्रवाशांची क्षमता अडीशे ते तीनशेच्या आसपास होती आणि तिकीट अडीच, तीन, चार रुपये असायचं. पुढे बोट उद्योगाला मोठ्या प्रमाणात चलती मिळाली आणि त्यानुसार तिकीट दरही वाढले.

साधारण या बोटीवर तीन डेक असायचे, त्यांचे दर लोअर डेक (12 रु.) अपरडेक (16 रु.), केबीन (40 रु.) असे असायचे. मंुबईतून चाकरमानी याच बोटीने मंुबई ते मालवणचा प्रवास करू लागले. तेव्हा माझगावच्या भाऊच्या धक्क्यावर गदीर् जमायची ती सकाळी 9 वाजताची कोकण बोट पकडण्यासाठी.

बोट सुटताना तीन भोंगे व्हायचे. दुसऱ्या भोंग्याला सर्व प्रवासी बोटीत चढायचे आणि तिसऱ्या भोंग्याला शिडी उचलली जायची. सकाळी 10 वाजता काळेकुट्ट धुरांचे लोट आकाशात सोडत बोट मंुबई बंदर सोडायची. एकदा बोटीत स्थानापन्न झालं की वेगळंच विश्व निर्माण व्हायचं. तिथे गप्पांचे फड रंगत जायचे. जेवण असो की नाश्ता, सर्व जण एकत्र बसून त्याची मजा लुटायचे.

मात्र, रामदास बोट बुडाली ते प्रकरण चांगलंच गाजलं. पुढे बॉम्बे स्टीम कॉपोर्रेशनने रत्नागिरी, चंदावती, इरावती अशा नवीन बोटी ताफ्यात सामील केल्या. ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था त्या वेळी सर्वप्रथम सुरू करण्यात आली. त्याच वषीर् मार्चमध्ये चंदावती बोट मालवणच्या बंदरात रुतून बसली ती कायमचीच. पुढे 1964 साली काही कारणांनी ही कंपनी बंद पडली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गोव्यातील उद्योजक विश्वासराव चौगुले यांच्या स्टीमशिपमार्फतच्या चौगुले बोटसेवा पुन्हा सुरू केली. चौगुले स्टीमशिपने रोहिणी, सरीता, कोकणसेवक बोटी सुरू केल्या. मात्र, या बोटींचं आथिर्क गणित जमेना. त्यातच मालवणात बंदरात रोहिणी बुडाल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागला. नंतर खाजगी उद्योजक पुढे येत नसल्याने या सेवेचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.

मंुबई-गोवा सागरी वाहतूक मोगल लाइन्सच्या अधिपत्याखाली चालवण्यात आली. पण या सेवेत कोकणातील प्रमुख बंदरं वगळण्यात आली. 1988 मध्ये मोगल लाइन्स वाहतूक सेवाही बंद पडली. ब्रिटिशांनी नफ्यात चालवलेली बोटसेवा तोट्यात का आली, याचं कारण अजून लक्षात आलेलं नाही. कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी बोटसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. पर्यटनाच्या दृष्टीने या उद्योगाला चालना मिळू शकतो. ही सेवा पुन्हा एकदा सुरू झाल्यास त्यास प्रवाशांचा नक्कीच प्रतिसाद लाभेल. मात्र, ही सेवा सुरू होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वत: त्या चौगुले स्टिमशिपच्या बोटीतून केलेला प्रवास लख्ख आठवतोय. केबिन खरेच आरामदायी असायच्या. पण जलवाहतूक बंद व्हायचे कारण, "बंदरे गाळाने भरली" असे सांगण्यात आले होते. त्या काळातदेखील बोट, मालवणच्या किनार्‍यापासून लांबच थांबत असे. मग पडावातून किनारी जावे लागे.

रोहिणी बुडाल्याचे पण मला चांगलेच आठवतेय. पण ती मालवण बंदरात बुडाली नव्हती, तर राजकोटाजवळ बुडाली. त्यात अजिबात जिवितहानी झाली नव्हती. सर्व प्रवासी सुखरुप बाहेर आल्यावर, ती कलंडली. तिचा तळ पाण्यावर बरेच महिने दिसत असे. लोकांनी तिच्या वरचे सामान लुटले. आणि ती हळू हळू पाण्यात गेली. तिला बाहेर काढायचे प्रयत्नही झाले नाहीत. एकंदर तिचे बुडणे, संशयास्पदच होते.
कारण गोव्याला जाणारी बोट, त्या ठिकाणी जायचे काही कारणच नव्हते.

<< रोहिणी बुडाल्याचे पण मला चांगलेच आठवतेय >> राजकोटच्या खडकावर जावून कलंडलेल्या 'रोहिणी'च्या तळाला हातही लावतां येत असे; हा उद्योग आम्ही केलाय !

अगदीं लहानपणापासून अनेक वेळां बोटीने कोकणात ये-जा केल्याने तो प्रवास 'रोमान्स'भरा असायचा हें ठामपणे सांगू शकतो. प्रत्येक बंदर त्यावेळीं गजबजलेलं असे; प्रत्येक बंदराचं बोटीतून घडणारं दर्शन वैशिष्ठ्यपूर्ण व रोमांचकारी असे.रात्री खोल समुद्रात मच्छीमारी करणार्‍या होड्यांवरचे डुलणारे कंदील मधूनच खुणावत असत. उजाडतां उजाडतां येणार्‍या देवगड, मालवण, वेंगुर्ला ह्या बंदरांचे किनारे म्हणजे विलोभनीयच दृश्यच असे. सक्काळी मांडवी नदीतून पणजीपर्यंतचा प्रवास तर अवर्णनीयच असायचा. पण ....
बंदरापासून आपल्या गांवी पोचणं [ व गांवापासून बंदर ] इथं खरी मेख होती. रस्त्यांचं व एस्टीचं जाळं सर्वत्र पसरल्याने आज जसं मुंबैकर मुंबईहून आपल्या जवळच्या एस्टी स्थानकात बसमधे बसून तडक आपल्या गांवात अगदीं घराजवळ पोचतो, तसं तेंव्हा नव्हतं. शिवाय , बोटीसाठी मुंबैच्या अगदीं दक्षिणेला यावं लागायचं, हेंही होतंच. आज कोकण रेल्वेच्या स्थानकांपासून दूर असलेले गांव एस्टीलाच अग्रक्रम देत असावेत. त्यामुळें, गर्दीच्या मोसमात इतर साधन नसेल तर किंवा गंमत म्हणून बोटीने प्रवास करणारे प्रवासी एखादी बोट सर्व्हीस कितपत फायदेशीर करूं शकतील याबद्दल साशंकता आहेच. मला वाटतं अशी सेवा सुरूं होण्यामधे हाच मोठा अडसर असावा.

मंदार, दिनेशदा आणि भाऊ नमसकर -- तुम्ही तिघांनी छानच अनुभव मांडले आहेत. हे सर्व काहीही माहिती नव्हतं. धन्यवाद.

कोकणदर्शन क्रुझ सुरु करायला हवी , बराच प्रतिसाद मिळेल . मोठ्या बोटीने कोकणातल्या बंदरांपर्यत यायचं आणि खाड्यांमध्ये लहान बोटीने फिरवायचं. अजुनही कोकणचे बरेचसे समुद्र किनारे दुर्लक्षित आहेत.

आता ही सेवा परत सुरू होणार आहे.
गडकरींनी तशी घोषणा केल्याचे मागे वाचले होते.
पण काम कुठवर आले काही कळले नाही.

बंदरांची काम चालले आहे असे कुणाला माहिती आहे का?