जीवनाचे रंग सारे.....(तरही)

Submitted by वैवकु on 12 April, 2012 - 04:46

_______________________________________
जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे
चिंबसे वैशाख माझे पोळणारे भादवे
_______________________________________
खालच्या गोष्टीत सांगा भक्ति-शक्ति कोणती
वाघरू हाके कुणी तर भिंत कोणी चालवे

चोखयाचे हाड देखिल विठ्ठलाला 'जप'तसे
मिरवतो ऐटीत मी माझे करंटे जानवे
________________________________________
देवळाचा आस कलतो 'वीट' होते पोरकी
माझिया गझलेत जेंव्हा तो स्वतःला नाचवे

वैभवा शेरात त्याला मांडशिल इतकेच ना............
सावत्या हृदयात बघ त्या सावळ्याला साठवे
_________________________________________
वैभवा शेरात त्याला मांडशिल इतकेच ना..........??
(...................मांडशिल इतकेच ना.................??)

गुलमोहर: 

खालच्या गोष्टीत सांगा भक्ति-शक्ति कोणती
वाघरू हाके कुणी तर भिंत कोणी चालवे

चोखयाचे हाड देखिल विठ्ठलाला 'जप'तसे
मिरवतो ऐटीत मी माझे करंटे जानवे
________________________________________
देवळाचा आस कलतो 'वीट' होते पोरकी
माझिया गझलेत जेंव्हा तो स्वतःला नाचवे

वैभवा शेरात त्याला मांडशिल इतकेच ना............
सावत्या हृदयात बघ त्या सावळ्याला साठवे

वैभव ,केवळ अप्रतिम . मी जाम खुश आहे ही गझल वाचून . मार डाला . गझले मागचं चिंतन आहाहा ... माऊली .. माऊली ...जय हरी ..

चोख्याचे हाड आणि करंटे जानवे... अगदी कॉन्ट्रास्ट फक्कड जमला आहे.. सर्वसामान्य संत आणि ऐटबाज बडवा अशीच जणु तुलना वाटते.

छान

रा.डु. , जामोप्या.............. धन्यवाद !!

वैभवराव! तुमची गझल आवडली! फक्त ‘जानव्यास’ आपण ‘करंटे’ का म्हणत आहात याचा बोध नाही झाला. कृपया खुलासा करावा! बेफिकीरांच्या याच तरही गझलेवरील माझे प्रतिसाद वाचलेत का? मला आपणाकडून प्रतिक्रिया ऎकायला आवडेल. माझा फोन नंबर माझ्या कोणत्याही गझलेखाली तुम्हाला दिसेल.

आन्ग्रेजी : धन्यवाद !!

सतीशजी :
' करंटे जानवे' .........खुलासा:
१) यात कोणत्याही जातीचा उल्लेख करणे /कमीपणा आणणे / मोठेपणा देणे हा मुळीच उद्देश नाही

२) मी मूळचा पंढरपूरचा असल्याने आणि आतापर्यंतच्या उण्यापुर्‍या २७ वर्षाच्या आयुष्यात १९-२० तरी इथेच घालवल्याने असेल.... विठ्ठल हा माझ्या एकूणच जगण्याचा अनन्य विषय आहे (लेखाप्रति विषय अनन्य तूचि झाला .....की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने........)

३) या शेरात संत चोखामेळा यांचा उल्लेख आलाय आपणास त्यांची कथा माहीतच असेल .त्यांचे हाड विठ्ठल नामाचा जप करीते .अजूनही........ !!
मंगळवेढ्यात त्यावर्षी आधीच प्रचंड दुष्काळ होता त्यात भूकंप झाला होता चोखामेळा यंदा वारीला आला नाही तेंव्हा ज्ञानदेव ,नामदेव , इतर सगळे जमलेले संत काळजी करू लागले .त्यांनी मंगळवेढ्यात जायचे ठरवले (पंढरपूर-मंगळवेढा = १८ / १९ किमी )

तिथे सगळेकाही उध्वस्त बेचिराख झालेले .....चोखोबा चे काय झाले असेल याची कल्पना एव्हाना त्याना आली होती .त्याच्या अस्थी गोळा करून त्याची समाधी बांधावी असे ठरले (आजही नामदेवाच्या पायरीच्याही आधी तिथे समोरच असणार्‍या या समाधीचे दर्शन घ्यावे लागते मगच पांडुरंगाचे )

पण त्याच्या अस्थी कशा ओळखाव्यात हा प्रश्न होता तो ज्ञानदेवाने सोडवला...........प्रत्येक हाड उचलून कानाला लावू लागला म्हणाला ज्या हाडातून विठ्ठल-विठ्ठल असा जप सुरु असेल ते चोखोबाचे .असे करून सर्वांनी ती हाडे जमवली आणि त्यांची समाधी सिद्ध झाली.
त्यांचे हाड विठ्ठल नामाचा जप करीते .अजूनही........ !!

४) हाड सहसा अपवित्र समजले जाते तर जानवे पवित्र !!

पण माझ्या मते जे हाड विठ्ठलनाम जपते त्यासारखी दुसरी पवित्र गोष्ट असू शकत नाही..........
जे "माझे" जानवे विठ्ठलनामाचा जप करत नाही त्याला मी उगाच पवित्र का मानतो मग? ही माझी व्यथा आहे आणि म्हणून मी माझ्या ("माझ्या !!") जानव्याला ते करंटे आहे असे म्हणालो ...........

५) जानवे पवित्र असतेच......... यात काहीच वाद नाही..........पण जिथे "माझ्या" जानव्याचा प्रश्न आहे तिथे त्याला जर पवित्र म्हणवून घ्यायचेच असेल तर त्याने चोखयाच्या हाडासाराखा विठ्ठलनामाचा जप केलाच पाहिजे असा माझा त्याच्याकडे हट्टच आहे जणू !!

>>पण त्याच्या अस्थी कशा ओळखाव्यात हा प्रश्न होता तो ज्ञानदेवाने सोडवला...........प्रत्येक हाड उचलून कानाला लावू लागला<<

ते संत ज्ञानेश्वर नसुन, संत नामदेव आहेत.

मी ती कथा तशीच ऐकली होती
आपले मत बरोबर असेलही
मी जाणकार व्यक्तीस विचारून पाहीन याबद्दल.......... सध्या पंढरपुरात आहेचंय ( एखाद्या ह. भ. प. ना गाठावे लागेल. )
पण मला वाट्ते कोणीका असेना चोखोबाना शोधून काढणे महत्त्वाचे ...................