जत्रेत हरवलेला मुलगा.

Submitted by मीरा जोशी on 10 April, 2012 - 08:50

जत्रेत हरवलेला मुलगा.

मूळ हिंदी लेखक - मुल्कराज आनंद

गावात जत्रा भरली होती. एक ६-७ वर्षाचा मुलगा आपल्या आईबरोबर जत्रा पहायाला गेला होता. आईचे बोट धरून चालता चालता तो जत्रेतल्या विविध गमतीदार वस्तू पहात होता. त्याला त्या सर्व वस्तू हव्याहव्याशा वाटत होत्या. मग तो आईकडे नवे कपडे मागायचा, रंगीत खेळणी मागायचा, गोड गोड मिठाई मागायचा. पण प्रत्येक वेळेला ती म्हणायची , "अरे आपण गरीब माणसं, ह्या महाग वस्तू घेणे आपल्याला परवडणार नाही." प्रत्येक वेळेला हेच बोलणे ऐकून त्याला आपल्या आईचा फार राग आला. आईचे लक्ष नाही ते पाहून तो तिचा हात सोडून पळाला आणि जत्रेतल्या विविध रंगी मालामध्ये रमला. ती खेळणी, त्या साखऱ्या, ती मिठाई, ती फिरती चक्रे, ते रंगीबेरंगी चकाकणारे दिवे....पण जत्रेतल्या गंमतीजमती बघून झाल्यावर त्याला अचानक आपल्या आईची आठवण झाली. आणि तो घाबरला. त्याला कळेना आपण काय करावे, कोणाला हाक मारावी. त्या भरगच्च लोकांच्या समुहात तो एकटा पडला होता. तो रडू लागला. लहान मुलगा रडतो हे बघितल्यावर बरेच लोक त्याच्याभोवती जमा झाले. त्याला विचारू लागले तो का रडतो आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचे सांत्वन करू लागले. कोणी त्याला छान खेळणी आणून दिली, कोणी मिठाई दिली, कोणी तलम कपडे आणले... जे जे त्याने आपल्या आईकडे मागितले आणि तिने त्याला दिले नाही, ते सर्व त्याला आता मिळत होते. पण आता त्याला ते सर्व नको झालं होतं. कारण त्याची आई हरवली होती. तिच्याविना तो पोरका होता.

मित्रहो ही एक रूपककथा आहे. त्या मुलाच्या जागी आपण सर्वच आहोत, आणि त्या आईच्या जागी आपली संकृती, आपला धर्म, आपली भूमी, आपल्या भाषा आहेत. त्या सर्व गोष्टीत बरेच काही चांगले आहे, जतन करण्यासारखे आहे, आणि काही गोष्टी त्याज्यही आहेत. बघा विचार करा. सतत आपल्या स्वत्वावर प्रहार करणे, आपणच आपली, आपल्या संकृतीची, आपल्या भाईबन्दांची निंदा करण्याने ते आईचे धरलेले बोट सुटणार आहे. मग स्वत्व गमावलेला सांकृतिक पोरकेपणा आपल्या वाट्याला येणार आहे.

गुलमोहर: