करमरकर शिल्पालय - सासवणे (अलिबाग)

Submitted by जिप्सी on 1 April, 2012 - 02:41

सासवणे (अलिबाग) येथील करमरकर शिल्पालयाबद्दल बरंच ऐकुन होतो, पण भेट देण्याचा योग काहि आला नव्हता. ३ मार्च रोजी मायबोलीकर परदेसाई यांच्या गटगनंतर योरॉक्स, सुन्या आणि अस्मादिक यांचा प्लान ठरला ४ तारखेला अलिबागला जायचे. कोरलई किल्ला करायचा किंवा गेटवे ऑफ इंडियाला भेटुन बोटीतुन एक फेरी मारायची असा प्लान होता. कोरलईला बराच वेळ गेला असता म्हणुन गेटवेहुन बोटीने मांडवा आणि मांडव्यावरून सासवणे येथील प्रसिद्ध करमरकर शिल्पालय आणि नंतर सासवणे समुद्रकिनारा आणि साधारण तीन-चार वाजेपर्यंत मुंबईला परत असा साधारण बेत होता.

करमरकर शिल्पालयाबद्दल थोडंसः
अलिबागच्या निसर्गरम्य अष्टागारातील आवास जवळील सासवणे या गावी जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर तथा नानासाहेब करमरकरांचे हे संग्रहालय आहे. अलिबाग-मांडवा रस्त्यावर आवास फाट्यापासुन साधारण तीन किमी अंतरावर करमरकर शिल्पालय आहे.
चित्रकार द.ग.गोडसे म्हणायचे, "आम्ही चित्रकार चित्रं काढतो, तेंव्हा रसिक म्हणतात हि चित्रं जिवंत आहेत, बोलतात. पण रंग-रेषाच्या करामतीनें कला कुसरीने ते शक्यहोऊ शकतं पण करमरकर जेंव्हा दगडाला जिवंतपणा आणतात हे काम मुश्किल आणि भारीच अवघड कारण इथे सुधारण्याला अवकाश नसतो. एकदा छिन्नी मारली की तो क्षण गेला..." हे क्षण अनुभवायचे असेल तर तर करमरकर शिल्पालयात जावेच लागेल.

जायचे कसे:
१. मुंबईहुन अलिबाग. अलिबागहुन मांडवा-रेवसला जाणार्‍या रस्त्याने आवास फाट्यावर उतरून (चोंडीगावाच्या थोडे पुढे) रिक्षाने सासवणे गावात.
२. मुंबई (गेटवे ऑफ इंडिया) येथुन सुटणार्‍या बोटीने (तिकिट दर ११० रूपये अप्पर डेक आणि ९० रूपये लोअर डेक) मांडवा येथे आणि त्याच तिकिटाने बसने आवास फाट्यापर्यंत. तेथुन रिक्षाने सासवने (अंदाजे ७-८ रूपये माणशी).
संग्रहालयाचे तिकिटः माणशी फक्त ५ रूपये आणि कॅमेर्‍याचे १० रूपये.

फेब्रुवारी २००९ च्या लोकसत्ता पुरवणी आलेला श्री अभिजीत बेल्हेकर यांचा हा लेखः
(या शिल्पालयाची ओळख माबोकरांना व्हाही म्हणुन सदर लेख इथे देत आहे.)

पुण्याच्या शिवाजी प्रिप्रेटरी स्कूल समोरील तो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा गेले अनेक दिवस खुणावायचा. नुकताच त्याचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा झाला. त्यानिमित्ताने त्याला पुन्हा डोळे भरून पाहिले. याच वेळी डोक्यात एक नाव घोळू लागले, शिल्पकार विनायक पांडुरंग ऊर्फ नानासाहेब करमरकर! या अद्भुत विधात्याचा शोध घेत एके दिवशी असाच अलिबागच्या निसर्गरम्य अष्टागारातील सासवण्यात दाखल झालो आणि कलेच्या या अंगणात बुडायला झाले!
गतकाळात शिरलेले मन थेट २ ऑक्टोबर १८९१ या रोजनिशीला येत इथे थांबते. गणेशमूर्तिकार पांडुरंग करमरकरांच्या घरी याच दिवशी हा विनायक जन्माला आला. हा विनायक, पण कलेबाबतची आपली झेप त्या ‘गणेशा’पलीकडची असल्याचे त्यांनी लहान वयातच दाखवून दिले. घरा-भिंतींवर, गावातील देवळांत करमरकरांची ही चित्रे रंगू लागली. अशातच त्यांनी एक अश्वारूढ शिवरायांचे चित्र काढले आणि त्यातून करमरकरांची भाग्यरेषा उमटली! अलिबागचे तत्कालीन कलेक्टर ऑटो रॉथफील्ड यांनी हे चित्र पाहिले आणि त्यांनाही या कलेची-कलाकाराची भुरळ पडली. रॉथफील्डच्या मदतीने करमरकरांसाठी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे दरवाजे उघडले गेले. कलेचे हे औपचारिक शिक्षण घेत करमरकर बाहेर पडले ते ‘लॉड मेओ’ हे मानाचे पदक घेऊनच! करमरकरांची ही ख्याती रवींद्रनाथ आणि सुरेंद्रनाथ टागोरांच्या कानी गेली आणि त्यांनी करमरकरांना कलकत्त्याला बोलावले. याच काळात त्यांना टाटांनी पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठवले. लंडन, मग इटली, फ्रान्स, स्वित्र्झलड असा कलेसाठीचा मोठा प्रवास करत ते पुन्हा मुंबईत परतले. मुंबईत देवनारला स्टुडिओ उभारला आणि पहिलेच शिल्प साकारले त्या ‘शंखध्वनी’चे! ज्याने देशविदेशात मोठी खळबळ उडवून दिली. पुढे काही वर्षांतच तेवढेच तोलामोलाचे शिवरायांचे ते भव्य अश्वारूढ शिल्पही आकारास आले आणि करमरकर हे कलेच्या प्रांतातील एक वादळ ठरले! वेगवेगळय़ा कलाकृती आणि त्यापाठी मानसन्मानही चालत येऊ लागले. यात शिरपेच खोवला तो १९६२च्या पद्मश्रीने! अशा या कलाकाराची ही सारी दौलत इथे सासवण्याच्या दारी आणून सजवली-मांडली आहे.या वास्तूत शिरताच माणसांऐवजी अगोदर हे पुतळेच बोलायला लागतात, पण यातही ती मराठमोळी माऊली स्वागत करत पुढे येते. स्वागताच्या या पहिल्या शिल्पानेच भारावयाला होते. पुढे आत अशीच एक माऊली आल्यागेल्यांशी बोलत असते. ‘‘..हे विनायक करमरकर यांचे शिल्प संग्रहालय! मी त्यांची सून सुनंदा करमरकर..’’ आपलीही ओळख होते आणि मग त्यांच्याबरोबर हा कलेचा प्रवासही!
एकूण दोनशे कलाकृती! इतिहास जागवणाऱ्या शिवमुद्रा, स्वातंत्र्यातील दीपस्तंभ, धीरगंभीर थोर पुरुष, समाजमन दाखवणारे निष्पाप चेहरे, पाळीव प्राण्यांचे निस्सीम प्रेम आणि बालमनांची निरागसता अशा या कलाकृती. विषय वेगळे, तरी प्रत्येकीत एक समान धागा- सचेतन सजीव देह! जणू प्रत्येकाच्या कंठी प्राण ओतलेला!
प्रथमच दर्शन होते अंगणातील त्या सुरसुंदरीचे! या खरेतर करमरकरांच्या ‘मायेच्या पुतळय़ा’! कुणी घाटावर स्नान करून घडा घेऊन निघाली आहे. तिची लगबग अन् ओले अंग जणू अजून निथळते आहे..! ती पहा, ती कष्टविणारी साऊली अन् बाळाची माऊली! आत्ता काही क्षणापूर्वीच एकमेकांना ती बिलगली! पलीकडे लोटा-बोचके घेऊन बसलेली ती खरेतर मोलकरीण. पण देवाने बहाल केलेले सौंदर्य तिच्या या गरिबीतूनही उमलले आहे.
नानांचा मोरू नावाचा नोकर इथे वाटेतच पाय दुमडून कधीचा बसला आहे. हडकलेली शरीरयष्टी! केवळ कमरेभोवती वस्त्र आणि कुठल्याही कामासाठीची तत्पर मुद्रा! थोडेसे सांजावले की याच कलाकृतीभोवती काही मजेशीर किस्सेही रोज घडतात. येते-जाते नवखे या अचेतन (?) देहालाच विचारतात, ‘अहो, म्हात्रे कुठं राहतात.. ओ, पाटील कुठं राहतात.. अलिबागची बस गेली का?’ प्रश्न उठतात, पण मोरू उत्तरं देत नाही. कसा देईल?
एक तेलुगू स्त्री करमरकरांच्या या सर्व कलाकृती रोज चोरून पाहायची. करमरकरांनी एकदा तिला पकडले आणि आपल्या या कलेतून हळूच शिल्पबंद करत इथेच दरवाजापाशी उभे केले. जिन्याने वर वळावे तो आई भवानी छत्रपती शिवरायांना त्या तलवारीतून आशीर्वाद देत असते. पुढे जिन्याच्या पहिल्या पायरीवरच कुणा ‘व्याघ्री’ जातीचा तरुण हाती भाला घेत आपली चौकशी करू पाहतो. एखाद्या कलेत फक्त तंत्र देऊन भागत नाही. कलाकाराला त्यात आपला आत्मा सोडावा लागतो. असे घडते तेव्हाच त्या निर्जीव देहातून सजीव हालचालीही जाणवू लागतात.
वरचा मजला म्हणजे अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वाची मांदियाळी! छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, आचार्य कृपलानी, न. चिं. केळकर आणि अशीच कितीतरी! प्रत्येक व्यक्तिमत्त्व फुलवताना त्याची स्वभाववैशिष्टय़ेही कळतात-उलगडतात.
शांता आपटे एकदा कार्यक्रमासाठी सासवण्यात आल्या. नानांनी त्यांना भेट म्हणून पुतळा करायला घेतला. तेव्हा त्यांनी आपला हात आणि बोटांवर आपले खूप प्रेम आहे, तेव्हा तीच गोष्ट ठळकपणे बनवा असे सांगितले. हाती डमरू घेत नृत्य, अभिनय आणि गायन करणारी ही कलाकार त्यांनी साकारली, पण ती पाहताना सारे लक्ष स्थिरावते ते हाता-बोटांच्या ताल-लय आणि गतीमध्ये!
मामा वरेरकर तर करमरकरांचे मित्र! या मैत्रीतूनच त्यांनी मामांचे एक खटय़ाळ शिल्प घडवले! वरकरणी कडक-रौद्र असणारे, पण आतून मऊ-शांत असणारे हे व्यक्तिमत्त्व दाखवताना करमरकरांनी त्यांना चक्क फणसाचे जाकीट घातले आहे. त्यांच्या स्त्रीप्रधान नाटकांना एक चिमटा घेत या पुतळय़ात त्यांना स्त्रियांप्रमाणे वळणदार केस दाखवले आहेत, कानात मासोळय़ा अडकवल्या आहेत, कलाकारांचे हे असे असते!
निरागस बालपण हा तर करमरकरांचा खास विषय! एकदा त्यांच्या नोकराचे एक रांगते मूल सतत त्यांच्यामध्ये घुटमळायचे, तेव्हा त्यांनी मूळ कलाकृती सोडून देत त्यालाच मातीतून साकार केले. पुढे या चित्राने अनेक पुरस्कारही पटकावले. त्यांची मुलगी शकुंतला एकदा हट्ट करत म्हणाली, ‘तुम्ही सगळय़ांचे पुतळे करता, माझाच नाही?’’ मग हाताची घडी, मांडी घातलेल्या आणि गाल फुगवलेल्या या आपल्या लाडक्या लेकीला त्यांनी तशाच मुद्रेत अडकवले. हे निरागस चेहरे पाहिले, की आपल्या वयाचेही भान हरपते आणि हसू फुटते! प्रश्न एकच पडतो की करमरकरांनी हे साकारताना त्या मुलांवर प्रेम केले की या शिल्पांवर!
यापुढेही किती आणि कुठल्या-कुठल्या कलाकृती! प्रत्येक शिल्प निराळे, त्यामागचा विचार, सौंदर्यखुणाही निराळ्या! पाहताना आपले भान हरपते आणि आपलाच पुतळा होतो. भवतीची शिल्प जणू बोलू-फिरू लागतात. निर्गुणाला दिलेले हे सगुण रूप! निर्जीवाला बहाल केलेले चैतन्य! कलेच्या या पंढरीतून बाहेर पडताना या कलाकाराचे हेच ‘ईश्वरी देणे’ कायमचे लक्षात राहाते!

याच करमरकर शिल्पालयातील काहि प्रकाशचित्रे (भरपूर प्रचि असल्याने दोन फोटोंचे एक कोलाज केले आहे)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
(पुढिल सफर: मुंबई-मांडवा-मुंबई) Wink )

गुलमोहर: 

व्वा छान प्रकाशचित्रे आणि ओळख, या संग्रालयाला एकदा भेट दिली होती. आज पुन्हा एकदा योग आला तुझ्या मुळे धन्यवाद.

पुण्याच्या शिवाजी प्रिप्रेटरी स्कूल समोरील तो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्यावरिल "इतिहास पुतळ्याचा" असा एक लेख आहे माझ्याकडे, त्या मध्ये स्वत: करमरकरानी पुतळा निर्मिती पासून ते त्याच्या स्थापने पर्यंतचा इतिहास सांगितला आहे. कधीतरी टाकीन मायबोलीवर.

उदय, बित्तु, विजय धन्यवाद Happy

तो जिना खूप छान आहे.>>>>अगदी अगदी. म्हणुन आवर्जुन तो फोटो टाकलाय.

त्यावरिल "इतिहास पुतळ्याचा" असा एक लेख आहे माझ्याकडे, त्या मध्ये स्वत: करमरकरानी पुतळा निर्मिती पासून ते त्याच्या स्थापने पर्यंतचा इतिहास सांगितला आहे. कधीतरी टाकीन मायबोलीवर.>>>>नक्कीच आवडेल वाचायला. Happy

जुन्या मराठी बालभारती मधे या विख्यात शिल्पकारावर " माझ्या भाग्यरेषा " नावाचा धडा होता. अलिबागला माझ्या घरी पाहुणे आले की त्यांना हे संग्रहालय पहायला मी आवर्जून नेतो, व प्रत्येकवेळी पुनःप्रत्ययाचा आनंद घेतो. अनेकदा आपल्यालाच आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचे मोल ठाउक नसते. एकदा ही शिल्प मुंबईला जे जे कलादालनात प्रदर्शनाकरता नेली होती तेव्हा परदेशातून आलेल्या कलासमीक्षक पत्रकारांनी करमरकर आजींना विचारल " अलिबाग हून समुद्रातन बोटीनी ही शिल्प आणलीत, या शिल्पांचा विमा किती कोटी डॉलर्स चा काढलाय?" - या प्रश्नावरून या शिल्पांच कलाविषयक महत्व लक्षात यावं - आजींनी आपल्या पिढ्या न पिढ्या त्यांच्या घरी काम करीत आलेल्या गडी माणसांकडे बोट दाखवल अन म्हणाल्या " हा बघा माझा विमा!! धिस इज माय इनश्युअरन्स!!"

शिल्पांच सौंदर्य अन जिवंतपणा काय वर्णावा? माझा मुलगा छोटा असतांना त्या कुत्र्याच्या व म्हशीच्या शिल्पाला घाबरून त्यांच्या जवळ जात नसे. जेमेतेम एक फूट उंचीच्या पुतळ्यात बोटाच्या दोन अडीच पेरांइतकाच चेहरा; पण पाहिल की लगेच लक्षात येत; अरे!! हे तर गोपाल कृष्ण गोखले!! हे तर शाहू महाराज!! प्रसिध्द शिल्प शंखध्वनी व फक्त पंचा नेसलेले पालथी मांडी घालून बसलेले कृश शरीराचे गांधीजी बघितले की नानासाहेबांचा मानवी शरीरशास्त्राचा-ह्यूमन अ‍ॅनॉटॉमीचा अभ्यास दिसून येतो. पुस्तक वाचणार्‍या छोट्या मुलाचही एक शिल्प आहे तिथे; आत्ता तो वाचता वाचता मान वर करुन आपल्या कडे बघेल अस वाटत.
अलिबागला येउन एकवेळ समुद्रस्नान केल नाही तर चालेल-तसाही तिथे समुद्र उथळ अन गढूळ आहे-पण हे संग्रहालय पहायच सोडू नका.

व्वा छान पोष्ट श्रीकांत!
>>अलिबागला येउन एकवेळ समुद्रस्नान केल नाही तर चालेल-तसाही तिथे समुद्र उथळ अन गढूळ आहे-पण हे संग्रहालय पहायच सोडू नका.<< अगदि.....अगदि

सुरेख पोस्ट श्रीकांतजी

अलिबागला येउन एकवेळ समुद्रस्नान केल नाही तर चालेल-तसाही तिथे समुद्र उथळ अन गढूळ आहे-पण हे संग्रहालय पहायच सोडू नका.>>>>+१

फक्त पंचा नेसलेले पालथी मांडी घालून बसलेले कृश शरीराचे गांधीजी बघितले की नानासाहेबांचा मानवी शरीरशास्त्राचा-ह्यूमन अ‍ॅनॉटॉमीचा अभ्यास दिसून येतो. >>> हा घ्या फोटो..

बाकी फोटोज लवकरच..

मस्त... हे प्रदर्शन कधीपासून बघायचे आहे. खांदेरीला गेलो तेंव्हा देखील चुकवले.. Sad आता लवकरच जमवावे लागेल पुन्हा.. Happy

वा! अप्रतिम!!! धन्यवाद जिप्सी तुझ्यामुळे ,आणि तुझ्या फोटोमुळे करमरकरांची ही कलाकॄती बघायला मिळाली.

वा !! अप्रतीम शिल्पकला, फोटो सगळेच. मला हे माहीतच नव्हते. भारतात आल्यानंतर येथे भेट आता द्यावीच लागेल. धन्यवाद मित्रा.

मस्तच Happy

मस्त फोटोबद्दल धन्यवाद.
दोन वर्षांपूर्वीच मी हे संग्रहालय पाहिलं होतं. आमच्याबरोबर एक ४ वर्षांचा मुलगा होता.
अंगणातली ती म्हैस(प्रचि २७) बघून तो घाबरला. पुढे यायला तयार होत नव्हता.
कशीबशी समजूत काढली होती त्याची.

खूपच छान माहिती व छान परिचय करुन दिलास, प्रत्यक्ष पहाण्याची उत्सुकता वाढलीये हे सगळं वाचून, प्र चि बघून......
आभारी आहे...........

कसली अप्रतिम शिल्पं आहेत ही. एका एका शिल्पाच्या चेहर्‍यावरचे भाव अगदि खरे खुरे. Happy

ह्याविषयी बिलकुल माहिती नव्हती. ही माहिती आणि फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद मित्रा. Happy

एक से एक शिल्पे आहेत..
प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचे भाव अगदी जिवंत आणि वेगळे...

सुंदर.

Pages