शककर्ता शालिवाहन- गौतमीपुत्र सातकर्णी (शतकर्णी) नाणी

Submitted by ईनमीन तीन on 23 March, 2012 - 06:45

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मला पुस्तकांतुन, आंतरजालावरुन मिळालेली माहिती व माझ्या संग्रही असलेली काही नाणी खास माबोकरांसाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छांसह.

शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.
तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला.
एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात
उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.

बोरीवली येथील कान्हेरी लेणी हि सुद्धा याच शालिवाहनाची देण आहे आणि हे कळल्यावर तुम्हाला थोडे नवलच वाटेल कान्हेरी लेणी ही त्या काळचे विद्यापिठ होते यावर आजुनही खोल संशोधन चालु आहे.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.
गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदिचे नाणे

त्या नाण्याची पाठची बाजु.

सातकर्णी तांब्याची नाणि

दक्षिणेचेपहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे , कोल्हापूर, तेर, कऱ्हाड, पैठण,जुन्नर, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांब, जस्त इत्यादी धातूंचा उपयोग केला असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी , वसिष्ठीपुत्र सातकर्णी व गौतमीपुत्र श्री यज्ञ सातकर्णी चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत. सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या अक्षरांसहित आकृती एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला साधारणतः पार बांधलेले झाड, मासा, वृषभ, नदी, नंदीपाडा व उज्जैन पद्धतीचे स्वस्तिक या प्रकारची चित्रे आहेत.
यात जाणकार आजुन भर घालतीलच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users