ते तिघे...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

राजेश चांगलाच हुशार होता. म्हणजे शाळेत इतर हुशार विद्यार्थी नव्हते असं नाही, पण राजेश हुशार होता. म्हणजे पाचवीत शाळेत आल्यापासून त्याने पहिला नंबर सोडला नाही. कधी सुनिल, कधी विनय यांनाही मार्क मिळायचे पण ती शेवटच्या पाच दहा मार्कांची उडी त्यांना कधी जमलीच नाही. मग कधी सुनिल दुसरा तर कधी विनय. राजेशच्या त्या हुशारीचं यश मात्र काहीतरी वेगळं होतं. दिवसरात्र तो पुस्तक हातात घेऊन बसालेला असायचा, असं त्याच्या शेजारी रहाणारी पोरं सांगायची. त्याचे वडील शाळेत मास्तर होते. त्यांनी कधी राजेशला पकडून अभ्यासाला बसवलं नसावं, पण तरी आपला मुलगा

भरपूर अभ्यास करून पहिला येतो याचा सार्थ अभिमान त्याना होता, हे पुढे घडलेल्या काही घटनावरून नंतर लक्षात आलं.

पण राजेशच्या या अभ्यासूपणामुळे राजेश एकटाच राहिला. एकतर त्याला इतर कुठल्याही विषयात रस वाटला नाही. त्याच्या बरोबरचे सुनिल, विनय हे गॅदरिंगला असायचे, कधी खेळाच्या मैदानावर उड्या मारताना दिसायचे, कधी चित्रकला स्पर्धेत जिंकले नाही तरी भाग घ्यायचे. त्यामुळे शाळेत त्यांचीही वेगळी ओळख होती, पण राजेश नेहमीच पहिला यायचा.

त्याचा दुसरा एक परीणाम असा झाला की राजेशला शाळेत मित्र कधीच मिळाले नाहीत. एकतर तो म्हणे, आठवड्यातून दोन/तीन वेळा डोक्यावर खोबरेल चोळून शाळेत यायचा. दुसरं त्याला पुस्तकाबाहेरचं जग माहीत नव्हतं. शाळेच्या दिवसात त्याला याचा काहीच त्रास झाला नाही. कधी सगळे एकत्र जमले तरी राजेशची चेष्टा, मस्करी करून मास्तरांकडून मार खायची त्यांची तयारी नव्हती. मुळात राजेशपासून आपल्याला कधी त्रास होईल असं त्यांना कधी वाटलंच नाही. तेव्हा कधी भेटले तर 'काय राजेश, काय वाचतोयस?' यापलिकडे संभाषण गेलं नाही हे तितकच खरं.

दहावीची परिक्षा झाली, निकालही आले. अपेक्षेप्रमाणे राजेश १० वीला शाळेत पहिला. सुनिल, विनय त्याच्यामागे म्हणजे दुसरे/तिसरे आले. शाळेने त्यांच्या प्रथेप्रमाणे मुलांचा सत्कार, बक्षिसं वगैरे केली, आणि हे तिघेही ११ वी सायन्सला भरती झाले.

११ वीचं वर्षं मात्र पूर्णपणे वेगळं वाटू लागलं. एकतर अभ्यासक्रम इंग्रजीत होता, दुसरं त्याला प्रॅक्टीकल नामक एक शेपूट होतं, आणि त्याचे वेगळे गूण मिळू लागले. पुस्तक वाचून जरी परीक्षा देता आली तरी प्रॅक्टीकल मधल्या काही गोंधळामुळे राजेशला मार्क कमी पडले. मुळात फरकाची दरी ५/१० मार्कांचीच होती त्यामुळे यावर्षी सुनिल/विनयचा क्रम वरती लागला. आणि राजेश तिसर्‍या नंबरवर पोहोचला.

राजेशच्या वडिलांना याचा खूपच धक्का बसला. त्यानी शाळेतल्या इतर शिक्षकांना धारेवर धरल्याची बातमी आली. शिक्षक काही करू शकत नव्हते, आणि याचं पर्यावसान, राजेशला त्या शाळेतून काढून एका साखरकारखान्याच्या सुप्रसिध्द शाळेत त्याचा वडिलांनी घातलं.

आता राजेश वसतीगॄहावर पोहोचला. ती शाळा म्हणजे गावची छोटी शाळा नव्हती. वसतीगॄहात दहा गावचं पाणी प्यालेली मुलं होती. त्यात हे वासरू लांडग्यांच्या वस्तीत रहायला आलं. परीणाम व्हायचा तोच झाला. डिसेंबरमधे राजेश शाळा सोडून पुन्हा गावामधे दिसू लागला. बारावीचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्याने कला शाखेत प्रवेश घेतला, आणि मार्च पर्यंत अभ्यास करून बारावीही पास झाला.

पुढच्या शिक्षणासाठी राजेश मुंबईला गेला खरा, पण त्यानंतर तो कुणालाच दिसला नाही, अगदी त्याच्या वडिलांना सुध्दा. तो हरवल्याची बातमी आली, वडिलांनी मुंबईत शोध तपास चालवला, पण नक्की काय झालं काही कळलंच नाही....

*******
समेश असाच एक हुशार मुलगा आहे. लहान असताना तो पुण्याला शाळेत होता. फक्त अभ्यासच नाही तर मैदानी खेळातही तो तसाच प्रविण होता. मित्रमंडळही भरपूर असावं. त्याच्या स्वभावावरून हे आपोआप लक्षात येतंच. पण लहानपणीच आईवडिलांच्या लक्षात आलं की समेश हुशार आहे. मग शिकवण्या, अतिरिक्त वाचन, वेगवेगळ्या परिक्षा मागे लागल्या आणि यातून जाता जाता तो इंजिनियर झाला. लगेच MBA ला प्रवेश घेऊन त्याने तेही पूर्ण करून टाकलं.

समेश आता अमेरिकेला असतो.

समेश आता आईवडिलांना टाळतो. कामानिमित्ताने भारतात आणि पुण्याला वर्षातून दोन्/चार वेळा जाणं होतंच. पण पुण्याला गेल्यावरही घरी दोन / तीन तासावर तो राहू शकत नाही. इथे अमेरिकेतही तो आपल्या भावंडाना टाळण्याकडे त्याचा कल असतो. भावाने कधी पार्टीला बोलावलं असेल, तर पार्टी आधी अर्धा तास अचानक प्लॅन बदलल्याचं कळवतो. अगदीच एकाद्या भाच्या/पुतण्याचा वाढदिवस असेल तर आल्या आल्या 'दुसर्‍या ठिकाणी जावं लागणार असल्याचं' जाहीर करतो, आणि १०/१५ मिनिटात निघतो.
समेशचे आईवडिल नेहमीच त्याची वाट बघत बसलेले असतात.

********
९/१० वर्षांचा राजस आता माझ्या शेजारी रहातो. तसा तो एकुलता एक असल्याने घरातले सगळेच मोठे त्याचे भरपूर लाड करतात. त्याने म्हटलेली कुठलीही गोष्ट त्याला लगेच मिळते. लहानपणापासून त्याच्या उलट उत्तर देण्याच्या कसबाला हुशारी म्हणुन जपल्यामुळे तो कुठे काय बोलेल हेही सांगता येत नाही. घरचे कौतूक म्हणून आणि बाहेरचे 'आपलं काय जातंय?' असा विचार करून त्याचं बोलणं मनावर घेत नाहीत.

पण राजस हुशार आहे. हे त्याच्या आईला कळलेलं आहे. सकाळी ६:३० ला राजस घराबाहेर पडून शिकवणीला जातो. १० वाजता घरी आला की स्कॉलरशिपची शिकवणी शेजारीच असते. दुपारी शाळा होऊन तो संध्याकाळी घरी आला की आई त्याचा अभ्यास घ्यायला बसते. राजसला गॄहपाठ, चाचण्यांची तयारी, स्कॉलरशिपचा अभ्यास, इतर Talent परीक्षांची तयारी करून झोपायला रात्री ११ वाजतात.

मला राजसमधे राजेश दिसतो, कधी समेशही दिसतो. नक्की कळत नाहीय की राजसचा मार्ग असाच काहीतरी असेल की वेगळा असेल?

(समाप्त)..

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मास्तुरे

पण नाईलाज आहे. स्पर्धा इतकी तीव्र आहे कि अमूक एक क्षेत्रातच मुलाला हुषार करून चालत नाही. पालकांना काळजावर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागतात. हल्ली कॉर्पोरेट मधे मोठ्या हुद्द्यासाठी मुलगा कुठे कुठे शिकला हे ही पाहीलं जातं. अशा वेळी मनपाच्या शाळेत शिकलेल्या मुलाला संधी मिळेल का ?

त्याच वेळी कलाक्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात चमकण्याची संधी मिळाली तर नोकरी करण्याची वेळच येऊ नये असा विचार असतो. ज्याच्याकडे कला आहे तो उपाशी मरणार नाही. किमान क्लासेस तर घेऊ शकतो. मुली नृत्याचे क्लासेस घेऊ शकतात. मुलांना भविष्यात अर्थार्जन करता यावे ही कुठल्याही पालकाची इच्छा असणारच. ज्यांची गादी आहे ( सेट व्यवसाय) त्यांचं ठीक आहे. मुलगा जाय युवराजच असतो.

हे बरोबर आहे असं मला म्हणायचं नाही.. पण नाईलाज आहे. डॉक्टर संगीतकार बनताहेत, कवी बनताहेत. संगीत, कविता हे त्यांचे आवडीचे छंद असतीलही.. पण प्रत्येकाला संधी मिळत नाही ना. मग स्वतःच्या पायांवर उभं रहावं आणि मग प्रयत्न करावेत असा हल्लीचा ट्रेंड आहे. त्यासाठी काही तरी गमवावे लागते.

आपल्या मुलाने फक्त क्रिकेटियर(च) व्हावे असे स्वप्न कुणी तरी पाहू शकेल का ? १२५ कोटीमधे केवळ अकरा + ६ जणांना संधी मिळणार. तिथे नशीबाचा भाग केव्हढा तरी आहे. झहीरखान इंजिनीयर बनण्यासाठी गेला होता. चंदू बोर्डेंच्या सांगण्यावरून त्याने शिक्षण सोडले आणि क्रिकेटचा रस्ता धरला. चमकला म्हणून ठीक नाहीतर काय केलं असतं ? ही मोठी रिस्क घेताना चंदू बोर्डे गॉडफादर म्हणून होते. असा गॉडफादर नसेल तर काही खरं नाही.

कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. १९९१ नंतर जी व्यवस्था आपण स्विकारली तिचे परिणाम आहेत हे. भोग आहेत हे.. जे भोगलेच पाहीजेत.

Pages