प्रश्न आहे असा..

Submitted by ज्ञानेश on 16 March, 2012 - 11:00

==========================

भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो..
दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो !

आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे?
या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो

हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थिर का वाटते?
नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो?

प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..

वाटले सर्व काही नव्याने जरी रोजच्यासारखे,
आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...

-ज्ञानेश.
===========================

गुलमोहर: 

भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो..
दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो !>> छानच

आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे?
या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो>> मस्त

हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थिर का वाटते?>> (अस्थीर)
नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो? - वा वा

प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?>> वा वा

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..>> व्व्वा

वाटले सर्व काही नव्याने जरी रोजच्यासारखे,
आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...>> वा वा

आपली गझल आल्याचा आणि मस्त गझल वाचल्याचा नवा आनंद मिळाला

Happy

-'बेफिकीर'!

ज्ञानेश
गझल वाचून काढल्यावर जाणवलं

हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थिर का वाटते?
नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो?

या शेराने मनाचा ताबा घेतला आहे. या दोन ओळीत जे काही सामावलेलं आहे त्याला दाद द्यायला सध्या तरी मला शब्द सापडत नाहीत. कसं काय सुचलं हे जरूर विचारावंसं वाटतंय.. प्लीजच टेल

हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थिर का वाटते?
नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो?

प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..

वाटले सर्व काही नव्याने जरी रोजच्यासारखे,
आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...

अफाट शेर...... ठळक शेर सर्वात जास्त आवडला.

आणखी एक बहारदार ज्ञानेशी गझल. Happy

धन्यवाद बेफिकीर. काही जागी नकळत र्‍हस्व/दीर्घची सूट घेतली गेली आहे. मला लिहितांना लक्षात आले नव्हते. नंतर कधीतरी संपादित करेन.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानतो.

व्व्वाह्ह ज्ञानेश!

आवडलीच! एक शेर असा नाही जो वेगळा काढून दाखवावा. प्रत्येक शेरात काही ना काही उत्तम जमलंय!

प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो? >>> क्या बात है!

अप्रतीम गझल!

गझलोत्सवातील आपले सादरिकरण खुप सुंदर झाले! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !

नानुभाऊ Happy

युगी गागारीन म्हणतो तो शेर मलाही फार भावला.
गझल सुरेख आहे. फार आवडली. स्वतीने पार्ल्यावर लिंक दिली म्हणून वाचावयास मिळाली. धन्स तिचे.

भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो..
दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो !......व्वा....कातिल!

आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे?
या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो.......क्या बात!

या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो......आहाहा....(बापरे! कस सुचतं अस? ..इतक समर्पक)

प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?..... अफलातून स्वगत!

वाटले सर्व काही नव्याने जरी रोजच्यासारखे,
आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...

आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...

आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...

आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो..........नतमस्तक!

-सुप्रिया.

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..

__________________/\_________________

अफाट आवडला हा शेर.

रस्ता पुढे चालतो, चालता राहतो>>
आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...>>
कसले सहज आलेत हे मिसरे! अतिशय भावली ह्यातली सहजता.

भावनेचा खिळा>> वॉव!

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..>> नदी शहारते! व्वा! 'शेर' आहे हा!

मतलाच एवढा नाही जमला असे वाटले Sad

खूपच दिवसांनी मी वाचली तुझी गझल. खूप मस्त वाटले वाचून. अतिशय सहज, पण आशयघन लिहीतोस! लिहीता रहा! पुलेशु!

अप्रतीम !!!

अगदीच अवांतर पण नदी-पुलाच्या शेरावरुन नुकताच ऐकलेला अन आवडलेला एक शेर आठवला..
" वो किसी रेल सी गुजरती है..
और मै किसी पुल सा थर्राता हूं.... ! Happy

गझल आवडली, विशेष करून

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..

वा... उत्तम गझल. आवडली.

भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो..
दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो !

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..

गझल शोधून पुन्हा वाचली. आवडलीच इतकी..

मी एक शेर कोट केला आहे तोच फक्त आवडला असं नाही.

यात वापरलेली क्रूसाची प्रतिमा माझ्या पाहण्यात आली नाही अजून (कुणी वापरलेली असल्यास ते अज्ञान समजावे ). क्रूसाकडे पाहतांना खरंच अस्थिर वाटतं ही मला आलेली अनुभूति या शेरात जाणवली. आणि पुढच्या ओळीतला प्रश्न तर जेव्हांपासून क्रूस माहीत झाला तेव्हांपासून... अगदी लहानपणापासून मनात आहे.

आपल्याच मनातल्या भावनांना असं शब्दबद्ध झालेलं पाहताना तो शेर मनात घट्ट रुतून बसेल यात नवल ते काय...!!

इतर शेरांचं वर्णन करायचं भानही त्यामुळे राहीलं नाही. निर्धार वगैरे पण अफलातूनच आहेत....
पुन्हा पुन्हा वाचावी, गुणगुणावी अशी गझल झाली आहे.

तुमचे विशेष आभार मानतो, युरी गागारीन.
अंतराळात फिरता फिरता तुम्ही गझलेतही इतका रस घेता, याचे नवल वाटते. Happy

Pages