सवाल-जवाब F.I.R.

Submitted by तुमचा अभिषेक on 7 March, 2012 - 03:30

सवाल-जवाब F.I.R.

खालील कथेतील/लेखातील/उतार्यातील जे काही आहे त्यातील सार्या घटना आणि पात्रे काल्पनिक आहेत याची नोंद घ्यावी.
तरी वाचताना याचे भान नाही ठेवले तरी चालेल. कारण योगायोग सापडायला पुरेसा वाव आहे.

स्थळ - महानगरातील एक रेल्वे पोलिस स्टेशन.
वेळ - दुपारी बारा-साडेबाराची.

तसे रेल्वे स्टेशन बरेच गजबजलेले पण पोलिस स्टेशन मात्र बर्यापैकी निवांत. तेवढ्यात तिथे एक जोडपे, साधारण पंचविशीतले असावे, आपल्या चोरी गेलेल्या सामानाची तक्रार नोंदवायला येते. नवरा पुढे येउन सामान चोरी झाल्याचे सांगतो. आणि ते ऐकताच समोरील अधिकार्याच्या चेहर्यावर, कपाळावर अश्या काही आठ्या पडतात की जरा कुठे आरामात बसलो होतो तर लावला कामाला. तक्रार ऐकताच असे प्रश्न विचारले जातात, किंवा उलटतपासणी म्हणा हवे तर की तक्रार करणारा फ़िर्यादी "झक मारली आणि इथे आलो" असा विचार करून आल्यापावली परत जावा.

फ़िर्यादी : साहेब सामान चोरीला गेले... ट्रेनमधून... झोपलो असताना... बायकोची पर्स, माझे पाकिट, मोबाईल... आणि काही दागिने पण होते... सकाळी उठलो ते समजले... आताच्या सेवाग्राम ट्रेनने आलो... ... ...
जे तोंडात येईल ते उलटसुलट पटापट बोलत होता. पोलिसात तक्रार करायची ही त्याची आयुष्यातील पहिलीच वेळ असावी. कदाचित या गैरसमजात असावा की त्याने सांगताच तो समोरचा पोलिस अधिकारी लगेच उठेल आणि आपल्या हाताखालच्या शिपायाला लगेच हाक मारेल, "पांडू गाडी काढ, आपल्याला तपासाला जायचे आहे."
पण असे थोडी ना असते कुठे.. पोलिसाने त्याला जरा थांबवले आणि स्वता एकेक करत क्रमाने प्रश्न विचारायला सुरुवात केली.

पोलिस : काय सामान चोरीला गेले?
फ़िर्यादी : साहेब, बॅग गेली. ३-३ मोबाईल होते, ६-७ हजार कॅश होती. घड्याळ, दोन सोन्याच्या अंगठ्या होत्या...
पोलिस : कुठुन गेले?
फ़िर्यादी : सेवाग्राम ट्रेन.
पोलिस : कुठची आता बाराला येते ती?
फ़िर्यादी : हो साहेब आताच आली, १५ मिनिटे झाली.
पोलिस : मग त्यामध्ये आत अटेंडर असतो. त्याच्याकडे तक्रार केली का?
फ़िर्यादी : नाही साहेब, शोधले सगळीकडे पण नाही दिसला कुठे. आम्ही ए/सी च्या डब्यात होतो. तिथे तरी नव्हता.
पोलिस : ए/सी च्या डब्यात तर मग असायलाच हवा.. बघितले का नक्की?
फ़िर्यादी : बघितले साहेब, ए/सी चा चंद्रपूरवरून येणारा एकच डबा होता. नागपूरचे डबे पण चेक केले, तिथेही नाही दिसला.
पोलिस : असा कसा नाही दिसणार, मग गेला कुठे?

थोड्यावेळच्या शांततेनंतर,
पोलिस : हो की नाय? असायला हवा ना कुठेतरी, सगळे डबे चेक केले नसणार... काय?
परत एक पॉज.. मामा बहुतेक काहीतरी उत्तराची अपेक्षा करत होते, पण फ़िर्यादी बिचारा काय उत्तर देणार होता. आता हा पोलिस परत ‘त्या टी.सी. ला शोध जा जाऊन’ असे बोलून परत पाठवतो की काय असे याला वाटते. जास्त काही बोलून उगाच विषय वाढू नये म्हणून शांत राहणेच योग्य समजतो.

परत पोलिसमामाच या शांततेचा भंग करतात,
पोलिस : नक्की कुठे गेले सामान?
फ़िर्यादी : साहेब मनमाड स्टेशनला गेले बहुतेक? गाडीतल्या एकाने पाहिले कोणालातरी बॅग घेउन ट्रॅक क्रॉस करताना.
पोलिस : तुम्हाला कधी समजले?
फ़िर्यादी : आम्हाला सकाळी उठल्यावर समजले.. इगतपुरीला... नऊ वाजता...
पोलिस : मग ते सांगा ना. मनमाड कशाला बोलत आहात?
फ़िर्यादी : पण साहेब, बरोबरच्या एका प्रवाश्याने तशीच बॅग मनमाडला कोणालातरी नेताना पाहिली ना त्यावरून...
पोलिस : तुम्ही पाहिलेत का?
फ़िर्यादी : नाही.
पोलिस : मग तुम्ही फक्त आपले सांगा ना, ते इगतपुरी वाले करतील याचा तपास. तुम्ही मनमाड बोललात की ते त्यांच्याकडे केस सरकवतील. आणि मनमाडवाले सुद्धा मग तुम्हाला परत बरोबर घुमवतील. कसे आहे ना, चोरी कुठे झाली त्या एरीयात तक्रार नोंदवली जाते. तुम्हाला इगतपुरीला समजले ना चोरीबद्दल, मग आता तिथे जाऊन तक्रार करा. ते बघतील मग पुढे काय ते... ते शोधतील बरोबर पुढे..

बिचार्या जोडप्याच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह. म्हणजे आता आपण जायचे का इगतपुरीला? मुंबईहून तब्बल तीन-साडेतीन तास. आदल्या दिवशी दुपारी गडचिरोलीवरून जे निघाले होते ते संध्याकाळची चंद्रपूरवरून ट्रेन पकडून आज दुपारी बाराला इथे पोहोचत होते. बरोबरचे मौल्यवान सामान चोरीला गेले होते. आणि आता इथून परत तीन तासाचा उलट प्रवास करून फक्त चोरीची तक्रार करायची म्हणून इगतपुरीला जायचे. काय वेड लागले आहे का? साधे घरी कळवायला जवळ फोन नव्हता की सारे पैसे गेल्याने सकाळपासून काही खाल्ले नव्हते. त्याची बायको तर जाम वैतागली होती एव्हाना. "what rubbish? आता आपण स्वता जायचे का इगतपुरीला? चल जाऊया परत?" पण त्याने तिला समजावले की थांब जरा, आधी नक्की काय बोलत आहेत ते बघू्या.... कम्प्लेंट तर टाकावीच लागणार होती, बॅकेंचे डेबिट कार्डस, क्रेडिट कार्डस तसेच पॅनकार्ड सुद्धा चोरीला गेले होते.

पुढे काय बोलायचे, काय करायचे हे न सुचल्याने दोघे तसेच उभे राहतात.. आशेने.. ताटकळत.. की आता समोरचे हवालदार साहेब काहीतरी बोलतील आणि स्वताच यावर तोडगा काढतील. पाच-दहा मिनिटे ते देखील आपल्याच कामात मग्न.. थोड्यावेळाने अंदाजा घेऊन त्यातील एकजण बाजूच्याला विचारतो, "काय कदम, घ्यायची का यांची तक्रार, ईगतपुरीला पाठवावी लागणार."
"घ्या मग आता, काय करणार." दुसरा उत्तरतो.
मग सावकाश पेन पेपर घेतला जातो. कोरी कागदे व्यवस्थित पॅडला लावणे, पेन चालते की नाही चेक करणे हे सोपस्कार होतात. जणू काही पोलिसस्टेशन उघडल्यापासून कितीतरी महिन्यांनी आज एखादी केस आली होती. सुवाच्य अक्षरात काहीतरी त्या पेपरवर खरडवले जाते. पण न पटल्याने ते खोडून कागद फाडला जातो. पुन्हा नवीन कागद. परत नव्याने लेखणी सरसावली जाते. आणि परत एकदा प्रश्नोत्तरांची मालिका सुरू होते. अरे हो, आता त्या जोडप्याला बसायला खुर्ची दिली जाते. खुर्चीवर बसल्याबसल्याही त्यांचे अर्धे चित्त दाराच्या जवळच असलेल्या उरलेल्या सामानाकडे असते. नुकताच दुधाचा चटका बसलेला असतो ना..

पोलिस : नाव काय तुमचे?
फ़िर्यादी : अभिषेक.. अभिषेक नाईक.
(बायकोचे नाव देखील सांगितले जाते.)
पोलिस : कुठुन येत होता?
फ़िर्यादी : म्हणजे गडचिरोली वरून येत होतो पण ट्रेन चंद्रपूरला पकडली.
पोलिस : गडचिरोलीला काय करता?
फ़िर्यादी : बांधकाम विभागात कामाला होतो. असिस्टंट ईंजीनीअर म्हणून, पण नोकरी सोडून परत येत होतो.

थोड्यावेळासाठी फिर्यादीला वाटते की बांधकाम विभागाचे नाव ऐकून सरकारी माणूस म्हणून यांचा रवैय्या जरा बदलेल. पण कसले काय.. तक्रारीमध्ये नोंद करण्यासाठी विचारावा लागणारा तो फक्त एक औपचारीक प्रश्न होता. याने त्या हवालदारावर काही फरक पडला नव्हता.
पोलिस : कधी पासून होता तिथे कामाला?
फ़िर्यादी : पाच महिने झाले.
पोलिस : चंद्रपूरवरून कधी ट्रेन पकडली?
फ़िर्यादी : तसे म्हणजे ट्रेन सहा वाजताची होती पण आली सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी.
पोलिस : तुम्ही किती वाजता आलात स्टेशनला?
फ़िर्यादी : आम्ही तर बर्याच आधी आलो होतो.
पोलिस : म्हणजे नक्की किती वाजता?
फ़िर्यादी : साधारण पाच वाजता.

हातातल्या कागदावर आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराची नोंद होत होती.

पोलिस : झोपण्यापूर्वी बॅग जवळ होती ना?
फ़िर्यादी : हो, झोपायच्या आधीच तर त्यात पैशाचे पाकिट आणि मोबाईल काढून ठेवला होता.
पोलिस : झोपलात कुठे?
फ़िर्यादी : मी एकदम वरच्या बर्थला होतो आणि ही खालच्या बर्थवर झोपली.
पोलिस : ते नाही, कुठच्या स्टेशनला?
फ़िर्यादी : वर्ध्याला जेवण केले त्यानंतर अर्ध्या-पाउण तासाने झोपलो. म्हणजे तरी अकरा-पंचेचाळीस झाले असावेत.
पोलिस : वर्ध्याच्या नंतर गाडी परत कुठच्या स्टेशनला थांबली होती का?
फ़िर्यादी : नाही.. म्हणजे हा, छोटीमोठी दोनतीन स्टेशने येऊन गेली, पण अंधारात कोणती ते लक्षात नाही आले.
पोलिस : वर्ध्याला गाडी किती वाजता पोचली?
फ़िर्यादी : दहाच्या आसपास पोचली असावी. आणि तिथून अकराला सुटली.

एवढी माहीती संकलित केल्यावर मामा परत लिहायला सुरुवात करतात.
सुरुवातीचा प्रश्न परत एकदा विचारला जातो.
पोलिस : चंद्रपूरवरून गाडी किती वाजता सुटली?
फ़िर्यादी : सहा-पंचेचाळीसला.
पोलिस : मगाशी म्हणालात की सहा-पंचेचाळीसला स्टेशनला आली.
फ़िर्यादी : हा, पण जास्त वेळ थांबत नाही तिथे. लगेच सुटते.
पोलिस : तरी दोन-पाच मिनिटे थांबत असेल की नाही.
फ़िर्यादी : हो, दोनेक मिनिटेच थांबली असेल. सहा-सत्तेचाळीसला सुटली.
पोलिस : सहा पन्नास लिहितो. पाच मिनिटे तरी थांबली असेलच ना.
फ़िर्यादी : नाही लगेच सुटली. लेट झाली होती ना आधीच. दोनच मिनिटे थांबली.
फ़िर्यादी देखील जरा हट्टीच दिसत होता. त्यालाही माहीत होते की याने त्याच्या तपासावर काही फरक पडणार नव्हता तरी उगाच त्या दोनचार मिनिटांच्या हिशोबासाठी आपलेच खरे करायचा प्रयत्न करत होता. पण शेवटी मामांनी त्रासून त्यांना हवे होते तेच लिहिले.
पोलिस : वर्ध्याला कितीला पोहोचली?
मगाशी याचे उत्तर त्याने सहजपणे दहा असे दिले होते. पण आता मागच्या प्रश्नाच्या अनुभवावरून नक्की मिनिटे किती झाली होती ते पण आठवायला लागला. बायकोशी सल्लामसलत करून नऊ-पन्नास हा टाईम फायनल केला.
पोलिस : तिथून किती वाजता सुटली?
फ़िर्यादी : अकरा वाजता.
खरे तर या वेळी त्याला नक्की टाईम माहीत नव्हता. तरी त्याने आपल्या बोलण्यात ते जाणवू दिले नाही. एव्हाना त्याला कळून चुकले होते की ततपप केले तर हे त्याच मुद्द्यावर आणखी घेत बसतील.
पोलिस : झोपायच्या आधी सामान कुठे ठेवले होते.
फ़िर्यादी : दोन मोठ्या बॅगा होत्या त्या सीटखाली ठेवल्या होत्या आणि जी पर्स चोरीला गेली ती हूकला अडकवली होती.
पोलिस : अशी कशी हूकला अडकवली. जवळ घेऊन झोपायला हवी होती ना.
फ़िर्यादी : हा, चुकलेच ते.. नेहमी तसेच करतो पण यावेळी नेमके लक्षात नाही आले. आणि कंपार्टमेंटमध्ये बरोबर लहान मुलेच होती, पडदे पण सारे लावून घेतले होते. त्यामुळे असे काही होईलसे वाटले नव्हते.
पोलिस : बर्थ नंबर काय होते?
फ़िर्यादी : हिचा A57 आणि माझा A62. ही खालच्या बर्थवर झोपली होती आणि मी समोरच्या वरच्या बर्थला.
पोलिस : पर्स कशी होती?
फ़िर्यादी : जांभळ्या रंगाची, लेडीज पर्स.. खांद्यावर अडकवायची.
पोलिस : पर्स मध्ये काय काय होते?
(शेवटी एकदा सामानाची यादी करायची वेळ आली. फ़िर्यादीच्या दृष्टीने हेच सर्वात महत्वाचे होते.)
फिर्यादी परत धडाधड सांगायला सुरुवात करतो तसे पोलिसमामा परत टोकून एकेक करून सांगायला सांगतात.
फिर्यादी मग महत्वाच्या आणि किमती वस्तूंपासून सुरुवात करतो.

फ़िर्यादी : ३ मोबाईल होते.
पोलिस : कोणत्या कंपनीचे?
फ़िर्यादी : तिन्ही नोकियाचे होते.
पोलिस : मॉडेल नंबर सांगा.
फ़िर्यादी : एक नोकिया N73, एक Music Express, आणि एक CDMA मॉडेल होते.
पोलिस : रंग?
फ़िर्यादी : दोन काळे होते आणि एक सिल्वर कलरचा.
पोलिस : आत सीम कार्ड कोणते होते?
फ़िर्यादी : दोघांमध्ये रिलायन्सचे आणि एकात एअरटेल.
पोलिस : कश्यात नक्की काय होते नीट सांगा.
फिर्यादी डोकावून पेपरात बघतो तर सगळे उलट सुलट लिहिले असते. दुरुस्ती करून सांगतो तसे मामा वैतागतात.
फ़िर्यादी : काय फरक पडतो? मोबाईल स्विच ऑफ आहेत. कार्ड काढून त्यांनी फेकून पण दिले असेल.
(अजूनही फिर्यादीला समजले नसते की पोलिसांना शहाणपणा शिकवू नये. किंवा तो स्वताला तरी खूप शहाणा समजत असतो.)
पोलिस : आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या. F.I.R. मध्ये सारे लिहावे लागते. बरे त्यांच्या किंमती सांगा आता.
फ़िर्यादी : एक जुना होता, तीन वर्षापूर्वींचा. घेतला तेव्हा सोळा हजाराला होता. बाकी दोन तसे नवीनच होते. एक दहा हजाराचा तर एक नऊचा... सोळा-दहा-सव्वीस-नऊ-पस्तीस हजार टोटल तिघांचे मिळून.
मामांचा चेहरा पहिला त्रासतो मग थोड्यवेळाने हसायला लागतात. आणि शेजार्याला बोलतात, "ओ कदम, हे बघा काय बोलतात. तीन मोबाईलचे पस्तीस हजार."
कदमदेखील हसायला सुरुवात करतात.
फिर्यादी अजून संभ्रमात. परत एकदा मनाशीच टोटल मारतो. बरोबर तर होती.. सोळा-दहा-सव्वीस-नऊ-पस्तीस हजार..
पोलिस : एवढे कसे लिहायचे. नीट काय ते सांगा.
फ़िर्यादी : अहो पण ज्या किंमतीत घेतले तेच तर सांगितले.
पोलिस : पण आता ते वापरल्यावर जुने झाले असतील ना. आता ते विकायला गेलात तर कोणी देईल का एवढे त्याचे?
फ़िर्यादी : पण विकत घ्यायला गेलो तर एवढेच पैसे पडणार ना?
फिर्यादीचा प्रतिप्रश्न.. हा पण असा सहजासहजी ऐकणार्यातला नव्हता.
पोलिस : ते ठीक आहे पण हल्ली मोबाईलचे भाव पण कमी झाले आहेत. पंधरा हजार लिहितो तिघांचे मिळून.
फ़िर्यादी : वीस-पंचवीस तरी लिहा.
पोलिस : कशाला वाद घालत आहात, याचे काय तुम्हाला पैसे नाही मिळणार आहेत.
("हो का, हे मला माहीतच नव्हते.." फिर्यादी मनातल्या मनात म्हणतो)
एवढा वेळ शांत असलेली त्याची बायको बोलते, "सोड चल, जे काय लिहायचे आहे ते लिहू दे"
तरी शेवटी मामा दिलदारपणा दाखवून वीस हजार लिहितात. आणि फिर्यादीच्या चेहर्यावर पाच हजारांचा फायदा झाल्याचे समाधान पसरते.

फ़िर्यादी : झोपण्यापूर्वी मी माझे पैशाचे पाकीट सुद्धा त्यात ठेवले होते ज्यात पाच-सहा हजार कॅश होती. आणि हिचे पण एक-दोन हजार होते.
जास्त प्रश्न न विचारता टोटल सात हजार रुपये रोख रक्कम होती अशी नोंद केली जाते.

फ़िर्यादी : पाकिटात चार बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्डस होते, तसेच पॅन कार्ड होते.
याचीही रीतसर नोंद केली जाते.. बॅंकांच्या नावानुसार.

फ़िर्यादी : पर्समध्ये सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या.
पोलिस : खर्या होत्या का?
(हा काय प्रश्न? खर्या होत्या म्हणून तर तक्रारीत उल्लेख करतोय ना?)
फ़िर्यादी : हो, खर्या होत्या.
पोलिस : काय वजन काय होते?
फ़िर्यादी : प्रत्येकी चार-पाच ग्रॅमच्या होत्या.
तशी नोंद करून पुढे त्या दिवशीच्या सोन्याच्या रेटने त्यांची किंमत लिहिली जाते.

फ़िर्यादी : एक लेडीज घड्याळ होते. टायटन कंपनीचे, सोनेरी पट्ट्याचे आणि साधारण त्याच रंगाची डायल असलेले.
(एव्हाना फिर्यादी प्रत्येक गोष्टीचे कसे रीतसर वर्णन द्यायचे असते हे शिकला होता.)
पोलिस : कितीचे होते?
फिर्यादी बायकोकडे बघतो.
बायको : गिफ्ट मिळाले होते. पण हजारचे तरी नक्कीच असेल.
पोलिस : पाचशे लिहितो.
(इथे वाद घालण्याचा प्रश्नच नव्हता.)

फ़िर्यादी : तसेच एक गॉगल पण होता. सनग्लासेस.
पोलिस जास्त मनावर घेत नाही. असल्या छोट्यामोठ्या गोष्टींची नोंद करून त्याला उगाच पान भरायचे नसावे.
फिर्यादी हे ओळखतो आणि पुढे बोलतो, "अडीच हजारांचा होता."
पोलिस : एवढा महाग? कोणत्या कंपनीचा होता.
फ़िर्यादी : टॅटू
पोलिस : काय?
मामांना नक्की काय ते नाव दोनतीन वेळा सांगून पण समजत नाही.
म्हणून एका कागदावर लिहून द्यायला सांगतात.
फिर्यादी जसा ईंग्लिशमध्ये लिहितो तसे परत टोकून मराठीत लिहायला लावतात.

सर्व मौल्यवान वस्तूंची यादी तयार झाल्यावर परत एकदा फिर्यादीला ती नजरेखालून घालायला सांगतात. त्यानंतर टोटल मारली जाते. खाली स्वाक्षरी घेतली जाते.
बरीच खाडाखोड झाली असते. पण आतापर्यंत लिहिलेले सगळे डिटेल अचूक लिहिले गेलेले असतात. तब्बल दोन पाने, ती ही सुवाच्य अक्षरात भरलेली पाहून पहिल्यांदाच फिर्यादीच्या मनात समोरच्या मामांबद्दल आदर दाटून येतो.
तक्रारीची प्रत घ्यायला दुसर्या दिवशी बोलावले जाते. त्या जोडप्याकडे परत जायला ट्रेनचे पैसे देखील नसतात. म्हणून टी.सी. ने पकडले तर त्याला सांगायला म्हणून मामा तेथील फोन नंबर देतात. त्यांनाही स्वताच्या घरचा नंबर देऊन ते दोघे निघतात.

अर्ध्या तासाचा प्रवास करून घरी पोहोचतात. एव्हाना दुपारचे तीन-सव्वातीन वाजलेले असतात, पण सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण नसतो. घरी चोरीची खबर देऊन होते. आई जेवण गरम करायला घेते आणि हे दोघे फ्रेश व्हायला जातात तसे घरचा फोन खणखणतो. त्याच रेल्वे पोलिस स्टेशन मधून आलेला असतो. खाडाखोड झालेली प्रत चालणार नाही म्हणून पुन्हा सारे नव्याने लिहिणे गरजेचे असते. पर्यायाने त्यावर यांच्या स्वाक्षरीही आलीच. "तात्काळ या" असा आदेश. आता जेवण राहून दे बाहेरच काही खाऊ असे बोलून दोघेही तणतणत निघतात. तरी आई हट्टाने चहा-बिस्किट खायला लावतेच. तेवढाच काय तो पोटाला आधार.
स्वाक्षरी करू आणि मग तिथेच जवळच्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ अश्या बेतात दोघे जातात खरे, पण जेव्हा हे तिथे पोहोचतात तेव्हा मगासच्या पोलिस अधिकार्यांचा पत्ता नसतो. आता येतील, आता येतील, म्हणत अर्धा तास उलटतो. अर्ध्या तासांनी त्यांचे आगमन होते तसे यांना जरा दिलासा मिळतो, पण तोही तात्पुरताच. एखादी सही खरडवून निघूया अश्या विचारात आलेले असतात पण सुधारीत रिपोर्ट लिहायचा अजून बाकी असतो. पुनश्च लेखणी सरसावली जाते. पुनश्च नवे कोरे कागद पॅडला अडकवले जातात. फरक असतो तो एवढाच की आता आधीच्यासारखी प्रश्नोत्तरे नसतात. तरीही अधूनमधून निर्माण होणार्या शंकांचे निरसण करावे लागत होते. त्या शंकांचे परत सविस्तर वर्णन देणे हा वाचकांवर अन्याय होईल. म्हणून इथेच थांबूया. थोडक्यात काय, तर आणखी अर्ध्या तासाच्या मगजमारी नंतर अंतिम F.I.R. एकदाचा तयार होतो. रजिस्टरमध्ये नोंद करून त्याची कार्बनकॉपी त्वरीत म्हणजे फक्त पंधरा-वीस मिनिटातच दिली जाते. आता परत उद्या यायची गरज नाही यातच ते जोडपे समाधान मानते. संध्याकाळ झाली म्हणून आता काय जेवणार, तशीही भूक मेलीच आहे असा विचार करून सरळ घराचा रस्ता धरतात. चोरी झाल्याच्या दुखापेक्षा दिवसभर झालेला मानसिक आणि शारीरीक त्रास त्यांना जास्त वाटू लागला असतो. परिणामी चोरीचे दुख बर्यापैकी निवळले असते. काय गमावले यापेक्षा काय कमावले याचा विचार करतच ते घरी परततात.

... तुमचा अभिषेक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हा स्वानुभव आहे का?

घटना मात्र छान लिहीली आहे, अगदी समोरच घडतेय असे वाटते.

पुढील लेखनास शुभेच्छा Happy Happy Happy

काय हे Uhoh
मी उद्याच सेवा ग्राम ने चंद्रपुर ला जाणार आहे ते पण एसी ने
आता जाउ की नको असा विचार कर्तिये

@ सुरश - स्वानुभव असल्यानेच जमलेय लिहायला. त्यामुळे लिखाणाला दाद मिळो ना मिळो.. सहानूभुतीची अपेक्षा आहे.. Happy

@ प्रितीभूषण - तुम्ही माझ्या पुढील लिखाणाला शुभेच्छा द्या आणि मी तुमच्या उद्याच्या प्रवासाला देतो.. Happy

मोबाईल मधे कसाला तरी कोड असतोना त्यावरुन track करता येते आणि डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड चे पेमेन्ट स्टॉप करता येते

@ प्रितीभूषण - हो, तीनही मोबाईलचा तो IMIE कोड देउन आता सहा महिने उलटलेत.. Sad
बाकी कार्ड सगळे घरी गेल्यागेल्याच स्टॉप केलेच..

अभिषेक.. सहानुभूती व्यक्त करतो.
एवढ्या चौकशीनंतर किती नमुनेदार एफ्.आय्.आर. लिहिला असेल, ते पण लिहा.

@ दिनेशदा - प्रामाणिकपणे सांगायचे तर का ते माहीत नाही पण तो FIR मी स्वता आजतागायत नीट पुर्णपणे नाही वाचला.. हे लिखाण करतानाही संदर्भासाठी म्हणून नाही वाचला..