अन मी मोठा झालो... ( भाग ३ )

Submitted by अवल on 3 March, 2012 - 07:25

(अश्मयुगातील गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
भाग १ : http://www.maayboli.com/node/33037
भाग २ : http://www.maayboli.com/node/33147 ( पुढे ... )

मग आम्ही सगळे टेकडी उतरू लागलो. हळूहळू उजेड होत होता. सूर्यदेव आकाशात आला. सगळीकडे चकचकीत उजेड झाला. आम्ही आता नदीच्या जवळ आलो. नदीत सगळ्यांनी स्वच्छ होऊन घेतलं. मला तर नदीत डुंबायला खुप मज्जा आली. मग बाहेर आलो.

तेव्हढ्यात मोठे बाबा ओरडले, " राम! हातातला वेल कुठे आहे? का काढलास ? "
मी घाबरलो, रडू लागलो. नदीत पाण्यात खेळताना तो कधी गळून पडला, हे कळलंच नव्हतं.
बाबाही मला हाका मारत धावत पुढे आले. ती वेल त्यांनी पुन्हा माझ्या हाताला बांधली, यावेळेस जरा जास्तच घट्ट !

मग आम्ही नदीच्या कडे कडेने थोडे वर जाऊ लागलो.
"बाबा, जंगल तर तिकडे खाली आहे. आपण वर का जातोय? " मी जरा जोरातच विचारलं.
"शूsss! राम हळू बोल बरं. बघ तो ससा घाबरून पळून गेला बघ. अशाने आपण शिकार कशी करणार? आणि दुसरं म्हणजे, आपल्याला जंगलात जायचं तर नदी ओलांडावी लागते. अन वरच्या अंगाला नदी छोटी असते. शिवाय तिथे मोठे मोठे दगड असल्याने त्यांच्यावरून नदीच्या पलिकडे जाणं सोपं जातं.

चल आता लवकर लवकर. आपल्याला टोळीच्या मध्ये राहायला सांगितलय ना मोठ्या बाबांनी ? " बाबांनी समजावलं.

जंगलातल्या माझ्या शिक्षणाची अशी सुरुवात झाली. जंगलात हळू का बोलायचं आणि नदी कोठून ओलांडायची याची माहिती आता मला मिळाली होती.

हळूहळू आजूबाजूची झाडं गच्च व्हायला लागली. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. मध्येच माकडं ओरडत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. बाबांनी हळुच सांगितलं, " आपण आलोय हे माकडांना समजलं की ते हे असं ओरडून म्हणजे हूल देऊन, सांगतात बरं का इतर प्राण्यांना ! "

तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी हात वर केला अन ते थांबले. त्याबरोब्बर सगळे थांबले. मला आपोआप कळले, आता अजिबात आवाज करायचा नाही. मोठ्या बाबांनी बोटानी खूण केली. पुढे उजवीकडे थोडी मोकळी जागा होती. अन मध्ये गवताचे रान उगवले होते. सकाळच्या उन्हात खुप ससे छोटी झुडुपं उकरून त्या खालची गाजरं खात होते.

अरे वा ! आज पहिल्यांदा मी शिकार पाहणार होतो, नाही-नाही करणार होतो. बाबा, मोठे बाबा यांनी सांगितलेल्या कितीतरी शिकारीच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. पण आता मी ती शिकार प्रत्यक्ष पाहणार होतो. अनुभवणार होतो.

हळुहळु सगळे लांब लांब झाले. लांबूनच सगळ्यांनी त्या सशांभोवती गोल केला.

आणि खाली वाकून, हळुहळू, आवाज न करता सगळे जवळ येउ लागले. आता ससे आमच्या अगदी दोन हातांवर होते. मला तर त्यांना उडी मारून पकडावे वाटत होते. तेव्हढात एका माकडाला आमची चाहूल लागली अन त्याने हूल दिली. म्हणजे वेगळाच आवाज काढून सशांना सांगितलं, "माणसं आलीत."

माकडाच्या त्या आवाजासरशी सगळे ससे सुसाट पळत सुटले. मग आम्हीपण जलदी केली. पटापट त्या सशांवर आपले टोकेरी दगड मारले. काहींनी सशांवर उड्या मारल्या अन त्यांना हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळात मी पण एका सशाला पकडण्यासाठी धावलो. पण माझ्यापेक्षा तो ससा जास्ती अनुभवी होता ना ! तो माझ्या पायांतून उडी मारून पळून गेला. मध्येच काहींचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. सशांचेही ओरडणे ऐकू आले. मग थोड्यावेळाने सगळे शांत झाले.

प्रत्येकाने आपापले टोकेरी दगड शोधून काढले. आणि मग आम्ही सगळे एकत्र आलो. सगळ्यांनी मिळून हाताच्या बोटांइतके ससे पकडले होते. त्यातले काही जिवंत होते. मग मोठ्या बाबांनी बंटीच्या बाबांना हाक मारली. त्यांच्याकडे जुनी मोठी वेल होती. त्या वेलीने सगळे ससे एका वाळक्या फांदीला बांधून घेतले.

" चला आता आपण रताळी गोळा करूयात." मोठे बाबा म्हणाले.
मग मला बाबांनी रताळ्याचे झाड कसे ओळखायचे ते शिकवले. लांब, थोडीशी खरखरीत हिरवी पानं पाहून मी ते झाड जोरात ओढले. तशी फक्त काही पानं तुटून माझ्या हातात आली, अन मी मागे धाडकन पडलो. सगळी हसू लागली.

बाबांनी मला उठवले, म्हणाले, " अरे घाई करू नको. आधी सगळे समजून घे. मग कर. बरं का रताळे असे उपटू नको. हातात काहीच येत नाही. इतकं सोपं नसतं कोणतही काम ! " बाबा सांगू लागले. " हे बघ तुझ्याकडे तो टोकेरी दगड आहे ना? त्याने आधी या झाडाच्या खालची माती बाजूला करायची, ही अशी बघ." बाबा दाखवू लागले.

झाडाची मूळं अन त्याच्या खालचे रताळे मोकळे करून घायचे. मग ते ओढायचा. कळलं ? "

मी लाजलो. " बरं, बरं. " म्हणत कमरेशी खोचलेला टोकेरी दगड बाहेर काढला.
आता घाई न करता, बाबा कसं करताहेत ते बघत बघत, तसे करत मी हळूहळू रताळे बाहेर काढले. मला इतका आनंद झाला. मी मोठ्यांदा ओरडलो, "माझे रताळे, माझे रताळे ! " सगळ्यांनी मला शाब्बासकी दिली.

9_1.jpg

मोठ्या बाबांनी मला जवळ घेतलं. मला खुप अभिमान वाटला. रताळे माझ्या कमरेशी लटकवत मोठे बाबा म्हणाले, " आज जे जे रताळे तू काढशील ते सगळे तुझ्याजवळ ठेव. गुहेत गेल्यावर ते सगळी रताळी मोठ्या आईला दे आणि नमस्कार कर. ती सगळ्यांना तुझी रताळी वाटेल. आजची ही तुझी पहिली कमाई ! शाब्बास ! असेच कष्ट कर. आपल्या कुटुंबाला वाढव, सांभाळ ! शाब्बास पोरा ! "

मला खुप आनंद झाला होता. पहिल्यांदा वाटलं, 'नाही नाही , हे माझे रताळे आहे. तो मीच खाणार !' पण मग मला मोठ्या बाबांचं म्हणणं पटलं. मी आता मोठा होतोय. माझ्या आधी माझ्या कुटुंबाला मी दिलं पाहिजे. त्यामुळे सगळी रताळी मोठ्या आईलाच दिली पाहिजेत.

मी उत्साहाने नवीन झाडं शोधू लागलो. पुन्हा हळूहळू माती बाजूला करून रताळी बाहेर काढू लागलो. मी आता नक्कीच मोठा झालो होतो. मी भराभर काम करू लागलो. काढलेली रताळी माझ्या कमरेतल्या वेलीत खोचू लागलो.

"राम, राम. आता पुरे."बाबा म्हणाले. " पहिल्याच दिवशी एकदम फार जोर करू नकोस. हात सोलून निघतील."
मी थांबलो. हातांकडे बघितलं तर सगळे लाल लाल झाले होते. हातावरची माती झटकत मी उभा राहिलो. पाठ दुखत होती अन हातही चुरचुरत होते.

मी आजूबाजूला बघितलं. बाकीच्यांनी खुप रताळी गोळा केली होती. त्यांच्या छोट्या छोट्या जुड्याकरून आम्ही सगळे आता परत गुहेकडे चालू लागलो.

(पुढे चालू...)

गुलमोहर: 

अवल हा भाग पण छान जमलाय.
परत एकदा आगाऊपणा.
लाल मुळा तेव्हा नव्हताच. हा बहुतेक मानवाने विकसित केलेला आहे. (अर्थात श्रोते मंडळीना तो आवडत असेल, तर भाग वेगळा )
त्या काळात आपल्याकडे, रताळे, अळू, सुरण, करांदे, काटीकणंग अशी कंदमूळे असणार. फळात पेरु, जांभूळ, केळी, आंबा, फणस, चारोळ्या, बोरे, करवंदे, मोह, बेलफळ असणार. भाज्यात दूधी भोपळा, कारले, पडवळ, लाल भोपळा असणार. मश्रुम असणार. रानटी धान्यात, वरी, राजगिरा, नाचणी, राळे, जंगली भात असणार.
चिखलात वाढणारे कमलकंद, शिंगाडे असणार. उंबरे, वडाची फळे पण खाण्यात असणार.

या भाज्या कशा निवडायच्या, पूर्ण वाढ झालेल्या भाज्या कशा ओळखायच्या, विषारी भाज्या कश्या ओळखायच्या याचे शिक्षण पण अशावेळी दिले जात असणार.

दिनेशदा, माझ्या मनात रताळे आले होते पण ते त्या काळात असेल का असे वाटले Happy पण आता तुम्ही म्हणता तर तेच टाकते. धन्स. अन प्लिज आगाऊपणा नका हो म्हणू . खरच ही फार मोठी मदत आहे मला Happy इतरीही सगळी दिलेली माहिती "अन मी मोठी झाले..." याला उपयोगी पडेलच. तेव्हा आधीच धन्यवाद Happy
गिरी धन्स Happy

अरे ! मी पाहिलंच नव्हत हे.... एकदम अभिनव कल्पना.... आत्ताच सगळे भाग वाचले,मला खूप आवडले.
अनन्या तिसरीत आहे तिला हे वाचायला सांगते व कळवते तुला Happy