एक होते कुसुमाग्रज (१0) : 'पाचोळा' (mkarnik)

Submitted by संयोजक on 3 March, 2012 - 01:05

kg2.jpg

कुसुमाग्रजांची कविता ’पाचोळा’

हे गीत इथे ऐकता येईल

रसग्रहणात्मक दोन शब्द.
समुद्रातून मोती किंवा खाणीतून हिरे मिळणं हे भाग्य सामान्य माणसाला बहुधा अलभ्यच असतं. ते असतं मोठ्यामोठ्या कवी, लेखकांच्या ठायी. पण हे थोर लोक सामान्यांसाठी असे हिरे-मोती शोधून व त्याना परखून आपल्या काव्य दालनांत मांडून ठेवतात. आपण फक्त ही संपदा वेचायचेच काम करायचे. पण हेही तितके सोपे नाही. रसग्रहणाची क्षमता ही देखील एक आगळीच शक्ती आहे. आर्ततेने जीवनातील सुखदु:खांकडे पहाण्याची दृष्टी लाभलेल्या रसिकांनाच ते जमते. माझ्या लेखणीत ती क्षमता नाही तरीही कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ’पाचोळा’ या साध्यासुध्या पण माझ्या अत्यंत आवडत्या कवितेचे रसग्रहण करण्याचा आज मी माझ्या अल्पमतीनुसार प्रयत्न करणार आहे.
पाचोळा ही कविता सुंदर का? केवळ कुसुमाग्रजांसारख्या थोर कवीच्या लेखणीतून पाझरली म्हणून? मुळीच नाही. तसे असते तर मोठमोठ्या कवींच्या कितीतरी कविता रसिकांनी दुर्लक्षित केल्या नसत्या. कविता सुंदर, देखणी, दीर्घायुषी ठरते ती तिच्यातील आशयामुळे. काही काळापूर्वी कवितेतील अलंकार, गेयता आदी गुणांना व पर्यायाने यमक, वृत्त आदींना खूप महत्व होते. आज ते तितकेसे राहिले नाही. रानातील कविता रानफुलाप्रमाणे नैसर्गिक व खडबडीत असेल तरच सत्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोचेल, गावाकडील कविता रांगडी असेल तरच मनाला भावेल, अशा कवितांना उगाच पोषाखी करणे म्हणजे खेड्यातील काळ्यासावळ्या बाळाला श्रीमंती जरतारी बिनमापाचा झगा चढविल्यासारखे अवाजवी आहे अशा विचारांचा आजचा काळ आहे. पण हे सर्व खरे असले, अगदी गद्य आणि पद्य या दोन्ही लेखनप्रकारांच्या बाबतीत, तरीही मी कवितेसाठी आशय हा आत्मा असला तर यमक, अलंकार, गेयता ही सुंदर आणि आवश्यक आभूषणे आहेत असे मानतो. 'पाचोळा' ही कविता गेय आहेच. लताजींनी ती गाणे हेच त्याचे परीमाण आहे. 'जीर्ण पाचोळा' या कल्पनेचा जादूभरा स्वराविष्कार करताना लताजींनी जी आर्तता प्रकट केली आहे ती एकदा कानावरुन जाणे हे सार्थकच. पण गेयतेशिवाय दुसराही एक गुण या कवितेत आहे. ही कविता अत्यंत श्रीमंत अशा आशयाने परिपूर्ण आहे. आपण अर्थ काढायला बसलो तर या कवितेतून अनेक अर्थ निघतील.
कविता गंभीरपणे वाचावीशी वाटणे, वाचावी लागणे व तशी वाचल्यावर तीतून अधिकाधिक अर्थ निघणे हे उत्तम कवितेचे लक्षण व यश आहे.
आपण 'पाचोळा' बाबत अशी काही उदाहरणे पाहू.
कवितेतील एक मुख्य पात्र आहे 'आडवाटेच्या माळावरील एक विशाल तरु.'
हे पात्र उभे करताना कवीच्या मनात काय असावे याचा विचार रसग्राहक किंवा रसास्वादक नेहमीच करेल. माझा कल नेहमीच 'फेस व्हॅल्यु' प्रथम पहाण्याकडे आहे. म्हणजे जे समोर दिसते आहे ते मी प्रथम जसेच्यातसे स्वीकारतो. या कवितेत जो तरु दिसत आहे तेच चित्र कवीला रेखाटायचे आहे असे समजले तर काय आढळते? एक तरू, त्याच्या बुंध्यापाशी पडलेला जीर्ण पाचोळा, थोडेसे हिरवे गवत. झाडावरची हिरवी पाने, व पाचोळा तुडवीत जाणारे वाटसरू आणि याच दिशेने पुढे जात राहिले तर कवितेच्या अखेरीस वार्‍याने उडून जाणारा पाचोळा व झाडाच्या बुंध्यापाशी नव्याने मोकळी झालेली जागा.
हीच कविता, जशी आहे तशी ती सुंदरच आहे. पाचोळ्याबाबत काही करण्याची शक्ती ना हताश पाचोळ्यात आहे, ना झाडात. झाड विशाल असूनही हेल्पलेस आहे. सशक्त असूनही अशक्त आहे. कर्ताकरविता आहे तो दुसराच कोणी. या कवितेत तो आहे 'क्षुब्ध वारा'. तोच पाचोळ्याला उडवून लावतो. नव्या पाचोळ्यासाठी जागा बनवतो. हा कर्ताकरविता वारा म्हणजे कोण? परमेश्वर? की माणूसच? पाचोळा उडवून लावणे म्हणजे काय, परमेश्वराने आत्म्याला मुक्त करणे की माणसाने एखाद्या नदीत मृताचे रक्षाविसर्जन करणे! माझ्या मते हे आशयाबाबतचे मंथन याबाबतीत कवितेचे रसग्रहण ठरते.
कुसुमाग्रजांची ही कविता सुंदर नाही असे कोण म्हणेल? सुंदर अर्थ, गेयता, चपखल शब्दयोजना; काय नाही या कवितेत? पण कवितेचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर आणखी काही अर्थ तपासून पाहूया:
असे समजूया की कुसुमाग्रजांनी वर्णन केलेला हा तरु म्हणजे खर्‍या अर्थाने एक 'थोर विचारी महापुरुष' आहे. कवितेत लिहिल्यानुसार तो 'आडवाटेच्या माळावर' उभा आहे म्हणजे एकतर विस्मृतीत गेला आहे किंवा मृत झाला आहे. पाचोळ्याच्या रुपात जगाने त्याचे पूर्वी डोक्यावर घेतलेले विचार आता जीर्णशीर्ण म्हणून टाकून दिले आहेत. नव्या विचाराची वावटळ येते व विरोधाचा अखेरचा भडीमार होऊन त्या महापुरुषाच्या विचारांचा पाचोळाही उडवून लावते. या तरुचे, महापुरुषाचे अस्तित्व अशा रितीने पुसून जाते.
उदाहरणादाखल आजच वाचनात आलेल्या एका बातमीचा विचार या दृष्टीने करूया:-
गरिबीतच खरा कलाकार निर्माण होतो. कारण त्याच्या कलेला भावनेची साथ मिळते. मात्र, कलेच्या या देणगीला नम्रतेची साथ असेल, तर कलाकार यशस्वी होतो. श्रीमंती म्हणजे शिक्षाच आहे. कारण श्रीमंतांना सतत कोणत्या ना कोणत्या भयाखाली वावरावे लागते. अशा वातावरणात कला विकसित होणे अवघड असते... आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया सांगत होते.
सज्जनगडावरील समर्थ सेवा मंडळाच्या दासनवमी उत्सवात बासरीवादनाच्या कार्यक्रमानिमित्त पंडितजी साताऱ्यात आले होते. त्या वेळी "सकाळ'ने त्यांच्याशी खास संवाद साधला. आपल्या ओघवत्या शैलीत आणि खास अलाहाबादी हिंदीत पंडितजींनी एकूणच संगीत क्षेत्राचा आढावा घेतला.
पंडितजींसारखा असा एखादा थोर कलाकार ’पाचोळा’चा नायक असू शकेल. आज हा तरू सक्षम आहे. त्याचा हा विचार आज समाजात सन्मानाने स्वीकृत होईल, मात्र कालांतराने तो पाचोळा ठरण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर तर एखादी प्रभावी शक्ती उद्भवली तर हा पाचोळाही इतस्तत: विखरून जाईल.
आता आपण जीवित व्यक्तीऐवजी तरूची तुलना एखाद्या शक्तीशी करून पाहू. उदाहरणार्थ साक्षात 'मृत्यु'. मृत्यूचा विशाल तरु उभा आहे. मृत्यु अप्रियच, त्यामुळे हा तरूही आडवाटेलाच उभा आहे. या तरूच्या पायापाशी जीर्ण पाचोळा म्हणजेच विस्मृतीत चाललेल्या मृत व्यक्तींच्या आठवणी पसरल्या आहेत. येणारे जाणारे ऋतू, दिवस, रात्र, उन पाऊस यांचे घण सोसत या स्मृती उदासवाण्या पडून आहेत. त्यांच्याही प्राक्तनात कधीतरी सैरभैर होऊन उधळून जाणेच लिहिले आहे. त्या स्मृती जातील तशी जागा खाली होईल. आज तरूवर लटकत असलेली हिरवी पाने पाचोळा बनून तिथे पडतील, पुन्हा कधीतरी उडून जाऊन कायमचे नष्ट होण्यासाठी.
अशा रीतीने कवितेतील नायक कोणीही बनू शकेल: एखादा संत, कोणी एक व्यसनी, चोर, चंद्र, सूर्य, अगदी कोणीही, काहीही.
हे सर्व खरे, पण खर्‍या अर्थाने कवितेचे रसग्रहण तेव्हा होईल जेव्हा आपल्याला कवीच्या स्वभावाची थोडीशी तरी माहिती असेल. ती कविता रचत असताना कवीची मनोवृत्ती कशी होती, अथवा एखादा प्रसंग अनुभवून कवीने ती कविता रचली आहे किंवा काय याबद्दल माहिती असेल तर रसिक कवितेच्या अंतरंगात प्रवेशून उत्तम रसग्रहण करू शकेल; मग त्याने काढलेला रस, अर्थ कवीला अभिप्रेत असो वा नसो.
मी आता आपल्याला एका थोर लेखकाची जीवनकथा सांगू इच्छितो. हा महान लेखक आयुष्यभर उत्तमोत्तम विचारांची, सुभाषितांची, कथा-कवितांची पखरण रसिकांवर करत राहिला. लोकांनीही त्याला डोक्यावर घेतले. दुर्दैवाने कुठल्याशा व्याधीने ग्रासल्यामुळे त्याने लेखन बंद केले. आता तो जवळजवळ विस्मरणात गेला आहे. नवीन तरुण लेखक उदयाला आले आहेत. प्रसगोपात ते या लेखकाच्या लेखांची, कवितांची, विचारांची हेटाळणी करतात. रेवडी उडवतात. हे नवकवी फारसे टिकणारेही नाहीत. त्यांना समाजात फारसे महत्वही नाही. तरीही त्या महान लेखकाच्या मनावर, त्याच्या विचारांवर आघात तरी जरूर होतो, जखम तर जरूर होते. पण असे दिवस जातील. नवीन लेखक उगवतील, मावळतील; जीवनात प्रकाश पसरेल वा अंधार, तो महान लेखक जरी आडवाटेला पडून असला तरी विचलीत होणार नाही. त्याचे विचार जुनेपुराणे होऊन कधीतरी नष्टही होऊन जातील. कदाचित कोणा अधिक प्रभावी लेखकाचे विचारलेखन एखाद्या झंझावाताप्रमाणे येऊन त्याच्या विचाराना पाचोळ्याप्रमाणे उडवून लावेल. पण त्या विचारांमध्ये हे सर्व सहन करण्याची क्षमता आहे, सहनशीलता आहे. सर्व काही सहन केले जाईल. व्याधीवर विजय मिळवून हा लेखक पुन्हा कार्यरत होईल. त्याच्या नव्या कविता रसिकांना पुन्हा आवडू लागतील. पुन्हा आलेली लेखनपालवी मोहरू लागेल- कालांतराने पुन्हा काहीकाळ विस्मरणात जाण्यासाठी. ती तर जगरहाटी आहे.
पाचोळा ही कविता वाचा आणि विचार करा की वरील अर्थ कवितेला अनुरूप आहे? की नाही? आणि कवितेतील सर्व उपमा, अलंकार या अर्थाच्या अंगाला चपखलपणे बसल्या आहेत का? मला असे वाटते की या प्रश्नांना होकारार्थी कौल मिळाला तर समजता येईल की रसग्रहणाची प्रक्रीया योग्य रीतीने पार पडली आहे.
कुसुमाग्रजांच्या या कवितेत साधीशी गेयता आहे. लताजींनी गायलेल्या (यू-ट्यूबवर उपलब्ध) जीर्ण पाचोळा या गाण्यातून ती पूर्ण अनुभवता येते. आख्ख्या कवितेत एक एकसंधता आहे. कविता बांधीव आहे. एका वृक्षाची आडबाजूची जागा, माळरान. पालवी, पाने, पानांचे गळणे, पाचोळा बनणे, उडून जाणे, आजुबाजूचे गवत, येणारे-जाणारे वाटसरू ही सारी चित्रे एका चित्रात सहज बसावीत. काहीही बाहेरून आणल्यासारखे वाटू नये इतके परीपूर्ण व चपखल आहे यामुळीच तर या कवितेला कधीही जीर्णता येणार नाही. ती अजरामर राहील.

- मुकुंद कर्णिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका वृक्षाची आडबाजूची जागा, माळरान. पालवी, पाने, पानांचे गळणे, पाचोळा बनणे, उडून जाणे, आजुबाजूचे गवत, येणारे-जाणारे वाटसरू ही सारी चित्रे एका चित्रात सहज बसावीत. >>>
वा!

या निमीत्ताने 'जीर्ण पाचोळा' हे गीत ऐकले. आधी ऐकले नव्हते.

मुकुंदजी, कविता.. गीत छान आहे आणि तुम्ही केलेले रसगहण देखील छान आहे. कवितेची लिंक देण्याची कल्पना छान आहे.

>> एका वृक्षाची आडबाजूची जागा, माळरान. पालवी, पाने, पानांचे गळणे, पाचोळा बनणे, उडून जाणे, आजुबाजूचे गवत, येणारे-जाणारे वाटसरू ही सारी चित्रे >> सारे डोळ्यांसमोर उभे राहिले.

धन्यवाद. रसग्रहण आवडले.

कर्णिकजी, रसग्रहण उत्तम वाटलं. त्यातून कवितेबाबत एक नवा विचार समजला.

ही कविता निवडल्याबद्दल धन्यवाद. (८/९ वी त) ही कविता आमच्या पाठ्यपुस्तकात होती.
आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळाला.