अन मी मोठा झालो... ( भाग २ )

Submitted by अवल on 1 March, 2012 - 22:09

(अश्मयुगातील गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
भाग १ : http://www.maayboli.com/node/33037 ( पुढे ... )

बाहेर सगळे बाबा थोडावेळ बोलले. मग तेही आले झोपायला.
माझे बाबा आले अन म्हणाले, " बरं का, मोठ्या बाबांनी सांगितलय; उद्यापासून रामलाही बाहेर घेऊन जायचय. तो आता मोठा होतोय. जंगलचे कायदे त्याने शिकायला हवेत. "
आई काळजी करत म्हणाली, " अहो, अजून लहानच आहे तो. इतक्यात कशाला? "

पण मला मात्र खुप आनंद झाला. मी मोठा झालोय अन उद्या मला जंगलात जायला मिळणार , अरे वा !
बाबा हसून म्हणाले, " अगं तुला तो कितीही मोठा झाला तरी तसच वाटेल. पण ते काही नाही. उद्या राम येईल आमच्याबरोबर. काय राम येणार ना? "
मी जोरजोरात हो म्हणून मान हलवली.

आता मला झोपच येईना. बाहेरचे रातकिड्यांचे, माकडांचे इतर प्राण्यांचे, खालच्या नदीच्या पाण्याचे आवाज ऐकत; त्यांना मनातल्या मनात सांगत बसलो; ' उद्या भेटूच!'

"राम, ए राम! अरे ऊठ ! तुला आज जंगलात ना जायचय? चल ऊठ ! " आई हाका मारत होती.
मी डोळे उघडले. बघतो तर काय अजून रात्रच होती.
"आई, झोपू दे ना थोडं अजून. आम्हाला सकाळी जायचय. अजून तर बाहेर अंधारच आहे."
"ऊठ राम," बाबांचा आवाज आला. " अरे आत्ता होईल पहाट ! आपल्याला खुप दूरवर जायचय. चल उशीर होईल. सगळे तयार झाले बघ !"

मग मात्र मी लगेच ऊठलो. पटकन तोंड धुतले, आईने दिलेले पाणी प्यायलो. आणि बाबांसमोर जाऊन उभा राहिलो.
"राम हा टोकेरी दगड धर हातात. पाडायचा नाही बरं का ! जंगलात टोकेरी दगड जवळ असलेला बरा. काल रात्री हा मी खास तुझ्यासाठी ठोकून, तासून तयार केलाय बरं का ! " बाबांनी बोलत बोलत हात पुढे केला.

त्यांच्या हाततला तो टोकेरी दगड घेताना कसलं भारी वाटलं, सांगू !

आईने माझ्या कमरेला एक वेल बांधली. मी त्या वेलीत तो दगड पोटाशी खोचून ठेवला. आईने एक मुळाही त्या वेलीत बांधला. म्हणाली, " भूक लागली तर खा बरं का ! "

हळूहळू गुहेच्या तोंडाशी सगळे बाबा अन मोठी मुलं जमली.
मोठ्या बाबांनी मला हाक मारली.
म्हणाले, " हं राम, आज तुझा पहिला दिवस ! सगळ्या मोठ्यांना नमस्कार करा ! "
मी लगेच सगळ्यांना वाकून नमस्कार केला.

"हं. शाब्बास! आता महत्वाचे ऐक !" मोठे बाबा सांगू लागले. मी नीट लक्ष देऊन ऐकू लागलो.
" जंगलात जाण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे एकट्याने कोठेही जायचं नाही. टोळीच्या शेवटी राहायचं नाही. सुरूवातीला काही दिवस टोळीच्या मध्यातच तू चालायचं. जंगलात आपले कान, डोळे, नाक उघडे ठेवायचे. पण तोंड मात्र अगदी बंद ठेवायचे. चालतानाही खाली बघून नीट चालायचं. बाकी सर्व गोष्टी तू हळूहळू शिकशीलच. "

आता मोठी आई पुढे आली.
मला जवळ घेऊन म्हणाली, " बरं का मुला, ही आपली टेकडी आणि गुहा लक्षात ठेव. आपल्या टेकडीची खूण म्हणजे हे मोठं झाड बरं का ! खुप लांबूनही लक्षात येतं हे झाड. त्याच्यावरच्या आगीच्या रंगाच्या फुलांचाही रंग लक्षात ठेव. त्याच्या मागच्या झाडांच्या पानांचा रंग लक्षात ठेव. इतर झाडांपेक्षा गडद रंगाची ही झाडं वेगळी दिसतं बघ !

आणि हो, एकटा कुठे जावू नको. मोठ्यांचे ऐक. गुहेच्या बाहेरच्या जगात खुप वाईट गोष्टी आहेत. काळजी घे. स्वतःला जप ! नीट जा हो." मोठ्या आईने पुन्हा एकदा मला जवळ घेतलं, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मला जरासं रडूच आलं. मग सगळे हसू लागले.

आई चटकन पुढे झाली माझे डोळे पुसले. अन म्हणाली " मोठा होतोय माझा सोन्या! "

" चला तर. सगळे आले ना? " मोठे बाबा म्हणाले.
आता मलाही घाई झाली होती जंगलात जाण्याची !
तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी एक लांब वेल तोडली. तिचे एक टोक माझ्या हाताला बांधले अन दुसरे टोक माझ्या बाबांच्या हातात दिले. आता मी हरवण्याचा प्रश्नच नव्हता.

आणि मग आम्ही सगळे गुहेच्या बाहेर पडलो.

(पुढे भाग ३ : http://www.maayboli.com/node/33181 ...)

गुलमोहर: 

अवल, मला आवडलाय हा उपक्रम.
एक बारीक सूचना करु का ? त्या काळात आपल्याकडे गुलमोहोर नसावा बहुतेक,
पण पळस असणार. पळसाची फुले केशरी रंगाची, आणि झाडाचा शेप, उभट असतो.
(बहावा, कुसुंब, शिरिष पण असतील. त्यांची फुले अनुक्रमे पिवळी, कुसुंबी आणि पोपटी असतात.)

धन्यवाद सर्वांना !
दिनेशदा, अहो खुप सुचना केल्यात तरी चालतील Happy
अन माझ्या मनात पळसच होता, म्हणून तर "आगीच्या रंगाचा" उल्लेख केला, गुलमोहर का वाटला ? चित्र जरा चुकीचं काढला का मी ? बदल केलाय, लिखाणही थोडं बदलल. आता ठिक आहे का Uhoh

मस्त लिहिलं आहेस! टोकेरी दगड बघुन डोळ्यासमोर आपल्या ३री(बहुतेक)च्या इतिहासाच्या पुस्तकातली अश्मयुगातली हत्यारं उभी रहिली....:)

हो अवल, आता बरोबर आहे चित्र.
दगड ठोकून आणि तासून च्या ऐवजी ठोकून आणि घासून असे, असायला हवे का ?
दगड तासायला, आणखी हत्यार लागणार !

अरे वा ! बरोबर दिनेशदा ! हे असे चांगले अन सकारात्मक समिक्षक आहेत हे मायबोलीचे एक खुप महत्वाचे वैशिष्ट्य ! मनापासून धन्यवाद दिनेशदा Happy करते दुरुस्त .

नाही दगड घासून नाही. दगड ठोकून आणि तासूनच.
दिनेशदा, दगडाच्या सहाय्यानेच दगडाची हत्यारं तयार व्हायची Happy
इथे बघा
http://www.youtube.com/watch?v=-cHM8rfmQII
बघताना जितकं सोपं वाटतं त्याच्या हजारपट कठीण आहे प्रत्यक्षात करायला.

अरेच्च्या मी चुकून बरोबर लिहिले होते काय Happy वरदा करते दुरुस्त. ती लिंक आता मला उपयोगी पडेल. धन्स गं.

अवल,
>> पटकन तोंड धुतले, ...

हे जरा वेगळं वाटतं, नाही? ::-) गुहेतला मानव तोंड धुवत असे? की औषधी काड्या चघळत असे? की यापैकी काहीच करीत नसे?

आ.न.,
-गा.पै.

औषधी काड्या नक्की नाही इतक्यात. कारण अश्मयुगातला मानवाचे दात खुप छान असायचे कारण नैसर्गीक/ प्रक्रिया न केलेले अन्न Happy म्हणून फक्त तोंड धुतले- चेहरा या अर्थाने Happy
वरदा प्रकाश टाक प्लिज Happy

तुमने पुकारा और मैं चली आयी Proud

मलाही इथे तोंड धुणे म्हणजे चेहेरा धुणेच वाटलं होतं. औषधी काड्या का चघळेल? कदाचित अमक्या आजारावर तमकी काडी चघळली की बरं वाटतं हे माहित असेल आणि गरजेपुरते ते उपाय केलेही जात असतील. पण रोज दात घासणं काही त्यांच्या दिनक्रमात होतं असं वाटत नाही Happy

अवल, दगडावर दगड ठोकून त्याचे छिलके काढून हत्यारं तयार केली जात असत.