एक होती सवाना

Submitted by kunitari on 29 February, 2012 - 00:58

खुप वर्षा पूर्वी मिरजे मधे शिराळ शेठ नावाचा एक प्रकार दर वर्षी असायचा. त्याच्या मधे शेणकूटे एकावर एक रचून, एक भला मोठा माणुस तयार करायचे. त्याला अंगावर एखादे उपरणे म्हणून एखादा पंचा किंवा जुने पातळ घालायचे. डोक्यावर एखादी टोपी असायची. नारळ फोडून त्याचे खोबरे काढून त्या खोबर्याचे डोळे लावले जायचे. त्याच्या हातात एक भली मोठी काठी असायची. या काठीला कसली कसली घुंगरे लावलेली असायची. तोंडात एखादी बीडी असायची. असे ते ओंगळ ध्यान एखाद्या चौकात दिवस भर बसून असायचे. येणारी जाणारी सगळी लहान मुले त्याला घाबरायची. काही धाडसी मंडळी कौतुक म्हणून जवळ जाउन बघायची. पण त्याला हात लावायची कुणाचीच हिम्मत नव्हती. त्याचे डोळे उग्र, भीषण आणि भयाण वाटायचे. काही काही घरातली मोठी माणसे घरातून नैवेद्य आणून त्या शिराळशेठ च्या समोर ठेवायची. आणि हात जोडून म्हणायची

'देवा शिराळशेठा, नैवेद्य मानून घेशील.
लेकरे बाळे तुझीच आहेत, त्याना अभय देशील.'

पुढे वर्षभर हीच मोठी माणसे घरातले एखादे मूल ऐकेना झाले, रात्री खुप रडायला लागले तर त्याला दटावायची 'रडू नको नाहीतर शिराळशेठ येइल.' मोठे आश्चर्य वाटायचे.

वास्तविक त्या शिराळशेठची खरी माहिती कुणीच कधी सांगितली नाही. सगळ्या कानोकानी ऐकलेल्या गोष्टी. माझी आजी पण एक गोष्ट सांगायची. तिच्या गोष्टीतला शिराळशेठ म्हणजे खुप मोठा राजा होता. आधी तो खुप प्रेमळ होता आणि त्याला मुले खुप-खुप आवडायची. पण काहीतरी झाले आणि एक दिवस त्याची मुले त्याच्यावर रागावून त्याला सोडून निघून गेली. मग तेव्हा पासून तो खुप कोपीष्ट झाला. आणि भ्रमिष्ट होऊं फिरत राहिला.

आजी म्हणायची की त्याची पूजा केली तर तो आपल्या मुलाना सुखी ठेवतो. आणि नाही केली तर तो मुलाना त्रास देतो. रागाचे, द्वेशाचे, मत्सराचे आणि एकुणच सर्व मनोविकारांचे शिराळशेठ हा एक प्रतिक असावा. अर्थात त्या वेळची माझ्या बरोबरीची बहुतेक सगळी बच्चे मंडळी अनेक प्रसंगातून वाचली आणि मोठी झाली.

बहुतेक माझ्या आजीची प्रार्थना शिराळशेठाने ऐकली असावी!!

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे तिसर्या इयत्तेत शिकणारी सवाना. सवाना अलाबामा मधे रहायची.तिची खरी आई दोन वर्षांपासून घटस्फोट घेउन वेगळी झाली होती. न्यायालयाने सवानाचा ताबा तिच्या वडिलांकडे दिला. आता सवानाच्या घरी तिची आजी, बाबा, सावत्र आई आणि सावत्र भाऊ असे चौघे रहायचे. कामाच्या निमित्ताने तिचे बाबा बर्याच वेळेला बाहेर गावी असायचे. तरी पण सवाना खुप खुश असायची. तिच्या वयाला साजेसे तिचे खेळ खेलायची. तिच्या घरीच एक छोटी घसरगुंडी होती.छोटे मोठे हट्ट करायची. गोळ्या-बिस्किटे मागायची. कागदाची फुलपाखरे करायची. त्यात रंग भरायची. ती अभ्यासात देखिल हुशार होती. सारे छान चालू होते. एका शुक्रवारी नेहमी सारखी ती शाळेतून घरी आली. स्कूल बस मधून उतरून आधी तिच्या आजी कड़े गेली. सवानाला त्या दिवशी बस मधे कुणीतरी एक गोळी खायला दिली होती. ती तिने तिथेच खाल्ली. आणि घरी आल्यावर तिने तिच्या आजीला ही गोष्ट सांगितली.

सवानाची आजी खुपच रागीट होती. सवानाची आई गेल्या पासून तर ती खुपच त्रस्त असायची. सवाना कड़े तिचे खुप बारीक़ लक्ष असायचे. आई विना वाढनार्या सवाना ने सर्व गोष्टी योग्य आणि शिस्तबद्ध केल्या पाहिजेत असा तिचा कटाक्ष असायचा. सवानाने तिला न सांगता गोळी खाल्ली याचा आजीला खुपच राग आला. आणि तिने सवानाला घरा भोवती धावत फेर्या मारायची शिक्षा दिली.

दुपारी ३ वाजल्या पासून सवाना ने धावायला सुरुवात केली. घराचे आवार देखिल खुप मोठे होते. दुपारचे ४ वाजले. शेजारी-पाजारी राहणारे लोक हा प्रकार पाहत होते. पण सवाना का पळते आहे याचे उत्तर त्याना मिळाले नाही. आता ती बिचारी घामा-घूम झाली होती. दुपारचे उन, आणि पोटात अन्नाचा कण शिल्लक नव्हता. आता शरीरातील पाणी देखिल कमी-कमी होत चालले होते. आत्ता आजी हाक मारेल, आत्ता आपल्याला घरात बोलावेल या आशेवर बिचारी सवाना धावत होती. कदाचित आपण मधेच धावायाचे थांबलो तर आजी अजुन रागावेल आणि आपल्याला अजुन काहीतरी शिक्षा होइल अशी तिला भीती वाटत असावी.

हा अघोरी प्रकार कुणीतरी थांबवायाला हवा होता. पण तिथे सवानाला अभय द्यायला कुणीच नव्हते. आजी ही नव्हती आणि शिराळशेठ देखिल नव्हता.

कणा-कणानी सुकत चाललेले हे अबोलीचे फुल अड़खळत, ठेचकाळत धावतच होते. कदाचित या वेळात आजीने दमलेल्या सवानाकड़े खिडकीतुन पाहिले देखिल असेल. पण आजीच्या रागाने तिला आतच बसवून ठेवले. आणि अखेर संध्याकाळी ६ वाजता धावता धावता सवाना कोसळली. ती बेशुद्ध झाली. तिची हालचाल मंद होत गेली. मग आजी आणि आई धावत बाहेर आल्या. सवानाला तातडीने दवाखान्यात दाखल केले. पण आता खुप उशीर झाला होता. सवानाच्या शरीरातील पाण्याचा अंश अतिशय कमी झाला होता. तिच्या शरीरातील क्षार देखिल संपून गेले होते. निपचित पडलेली सवाना आता मृत्युच्या दारात उभी होती. डॉ नी तिला कृत्रिम श्वास दिला. आणि तिच्या वडीलाना बोलावून घायला सांगितले. एका अनवट क्षणी आजीच्या मायेची जागा शिस्तीने घेतली. आणि शिस्तीची जागा रागाने. परगावी गेलेले वडिल परत आले. डॉ नी त्याना वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि निरुपायाने सोमवारी सकाळी सवाना देवा घरी गेली...

रागाच्या शिराळशेठाने एका निरागस पाखराचा जीव घेतला.

आजी इतकी क्रूर वागू शकते? स्वतः च्या मुलाची मुलगी, तिच्या बाबत आजी इतकी कठोर होऊ शकते? सावत्र का असेना घरी असलेली आई तिला का वाचवू शकली नाही? सवाना स्वतः धावायची का थांबली नाही? शेजारी-पाजारी का बाहेर आले नाहीत? पोलिस काय करत होते? सवानाचे वडिल किती चुकले?सवानाच्या अनैसर्गिक मृत्युने प्रश्नांचे एक वारुळ तयार केले आहे.

दोन अश्रु देऊन यांची उत्तरे मिळनार नाहीत.

सवानाचा मृत्यु हा केवळ तिचा एकाटिचा मृत्यु नाही. तिच्या मृत्यु बरोबर मनुष्य प्राण्यामधली निरागसता मुकली. आजीच्या नात्यावारचा गाढ विश्वास आटला. कौटुम्बिक नात्यामधला जिव्हाळा नाहीसा झाला.

कदाचित सवानाच्या वडीलानी दुसरे लग्न केले नसते तर सवाना वाचली असती का? न्यायालयाने सवानाचा ताबा तिच्या खर्या आई कड़े दिला असता तर ती वाचली असती का? वडिल घरी असते तर सवाना वाचली असती का?

सवानाला तिच्या मित्राने गोळी दिली नसती तर सवाना वाचली असती का? हे सगळे जर तर चे प्रश्न आहेत.

शेवटी भाबड्या मनाला असे देखिल वाटते की तिच्या आजीने शिराळशेठला विनंती केली असती तर सवाना वाचली असती का? पण इथे तर आजीच शिराळशेठ झाली होती.

आज माणुस म्हणुन जगण्याची लाज वाटते आणि त्या शिराळशेठा ला एकच ओरडून सांगावेसे वाटते

'मेल्या शिराळशेठा, किती कोप करशील
मेले बिचारे पाखरु, आता तू नरकात जाशील'

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी हि बातमी वाचली होती तेव्हा अतिशय निराश झालो होतो. पण तूमच्या निवेदने शैलीमुळे काळजाला भोके पडल्यासारखे वाटले. आजीचा क्षणिक राग मूलीचा काळ ठरला आणी आजीसाठी जन्मभराच दु:ख देउन गेला.

आत्ता लक्षात आलं की ही घटना अगदी ताजी आहे आणि आजीही सख्खी नसून सावत्र आईची आई आहे. पण म्हणून एकदाही दया येऊ नये त्या मुलीबद्दल?

Sad भयंकर! ईतर वेळी मुलाकडे डोळे मोठे करुन बघितले तरी शेजारी इमर्जंन्सीला फोन करतात आणि अशा केसमध्ये हस्तक्षेप करत नाहीत!

Sad
(लेख अप्रतिम आहे... अतिशय परिणामकारक. सवानाच्या कथेला शिराळशेटची प्रस्तावना आणि शेवट..... केवळ अप्रतिम)

त्या आजीला आणि आईला पण असे पळवून पळवून मारले पाहिजे. आणि सवाना च्या बाबाना आणि सख्ख्या आईला सुद्धा. ते पण तितकेच दोषी आहेत. :रागः
खरचं खुप खुप हतबल आणि अस्वस्थ वाटल ही बातमी वाचून.

ही बातमी जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा मी शब्दशः सुन्न झालो होतो. घरी गेल्यावर आधी माझ्या मुलीला घट्ट जवळ घेउन बसलो. काहीही सुचत नव्हते. झाला प्रकार इतका अमानवीय होता की मनातल्या 'का?' या प्रश्नाला कशानेही उत्तर मिळत नव्हते.
असो. परमेश्वर सवानाच्या आत्म्याला शांति देवो आणि भविष्यात कुठल्याही सवाना वर अशी वेळ न येवो हीच प्रमाणिक प्रार्थना.

लेख वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद्. इथे सवाना चे काही फोटो आपण पाहू शकता.
http://www.facebook.com/pages/Pray-for-the-Family-of-Savannah-Hardin/301...

हा खटला सध्या दोन दिवसांपासून न्यायालयात सुरू झाला आहे. सवानाच्या आजीवर तिच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास तिला मृत्युदंड किंवा जन्मठेप होऊ शकते.