श्रध्दा अंधश्रध्दा भाग 3

Submitted by अनिल तापकीर on 27 February, 2012 - 06:55

आणि जो तो त्याला विचारू लागला काय झाले. त्याची अवस्था खरोखर वाईट होती. त्याला खूप धाप लागली होती छाती जोरजोरात वरखाली होत होती. त्याला बोलताच येत नव्हते. तेवढ्यात तेथे निरंजन आला.
निरंजन त्यांचाच मित्रांपैकी एक, वयाने त्यांच्यापेक्ष्या थोडा मोठा तरीपण चांगला मित्र, तो तेथे आल्या आल्या त्याने सर्वांना बाजूला केले. नि म्हणाला - सगळे बाजूला व्हा त्याला मोकळी हवा घेउद्या. राम तू जा पहिले पाणी घेऊन ये रामाकडे पाहून निरंजन म्हणाला.
शिवाला बाजूला घेतले व विचारले काय झाले ----शिवानं सांगायला सुरुवात केली.
काही नाही रे निरंजन भाऊ परवा पोरं पोरं गप्पा मारत बसली होती. गप्पा भुतांविषयी चालल्या होत्या, गवत्याने, नि विठठलनि दोन किस्से सांगितले. सगळी पोरं मन लावून भुताचे किस्से ऐकत होतो. तेवढ्यात हा सदा म्हणाला आरे काय दोस्तांनो जग कुठे चालले आहे नि तुम्ही अजूनही भूता-खेतातच रमताय अरे ह्या सगळ्या खुळ्या समझुती आहेत. भूतं खेतं , अंगात येणे देवीला बळी देणे , भूत लागले म्हणून उतारा टाकणे ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत.
त्यावर सगळी पोरं फिदीफिदी हसली. गवळ्याचा किस्ना म्हणाला -आरं सदा तू शहरात शिकायला गेला म्हणून तू काय लय श्याना झाला काय, वाडवडीलान्पासून भुतांच्या घटना घडतात देवांच्या ग्रंथामधून सुदिक भुतांच्या गोष्टी सांगितल्यात
त्यावर सदा म्हणाला किसन, पुराणांच्या कथा आता खूप जुन्या झाल्यात ते सगळेच खरे होते कि नाही कुणाला माहित, तुम्ही माझे लहानपणापासूनचे मित्र आहात म्हणून मला मनापासून वाटते कि तुम्ही या खुळचट कल्पना सोडून द्या.
तू आमच्यात जास्त शिकलाय तुझ्या बी काही गोष्टी खऱ्या असतील. रामा म्हणाला- पर हिथं आपल्याच गावात भूतांचा अनुभव आलेले कितीतरी सापडतील.
आरे काही नाही रे सगळा मनाचा खेळ असतो. सदा म्हणाला
त्यावर किस्ना म्हणाला हे बघ सदा, तू म्हणतोस ते आम्हाला बी पटतंय पर आम्ही हिथं गावातच राहतो. महिन्यातून एक दोन तरी भुताटकीच्या कथा कानावर पडतात त्यातल्या दहापैकी नऊ खोट्या असतील पर एखाधी तर खरी असलं ना?
ये किस्ना आरं तो सदा शिकलेला हाय तो काय आपल्याला बोलायला ऐकणार नाय त्यापेक्षा असं करू
किस्नाबरोबर बाकीच्या पोरांनी सुद्धा काय म्हणून विचारले.
ह्या सदाचा भूतांवर विस्वास नाय ना?
सदाने नाही म्हणून मान हलवली
मग ह्या सदाने अमावश्येच्या रात्री बारा ते एक स्मशानात एकट्याने थांबवून दाखवायचे
ह्या गोष्टीला सदा एका पायावर तयार झाला.
पोरं त्याला म्हणाली सुदा कि काय झाले तर होणाऱ्या परिणामाला तुझा तू जबाबदार राहशील त्याने तेही मान्य केले.
आणि आता दोन तासापूर्वी सदा स्मशानात गेला होता तिकडे काय झाले कोणालाच माहित नाही पर लयच घाबरलेला दिसतोय. त्याला नक्कीच भूत दिसलं असणार
असे म्हणून शिवाने सारी हकीकत निरंजनाला सांगितली.
तेवढ्यात रामा पाणी घेऊन आला. पोरांनी सदाला पाणी पाजले थोडं पाणी त्याच्या तोंडावर शिंपडले.
त्याला लागलेली धाप आता बरीच कमी झाली होती. डोळ्यातली भीती मात्र तशीच होती.
निरंजनने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. पण सदा घाबरून ओरडला व बाजूला सरू लागला. किस्ना म्हणाला -सदा आरे घाबरू नको आम्ही तुझे मैतर हाये काय झाले, काय दिसलं का तुला घाबरू नको काय झाले ते सांग
सदा बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण तोंडातून शब्द येण्याएवजी त्याचे दात दातावर आपटू लागले थंडी वाजून आली खूपच जोरात थंडी आल्यानंतर पोरांनी त्याला उचलला, उचलतानाही तो खूप घाबरला व किंचाळायला लागला. पण तसाच त्याला उचलून देवळात नेला.
बहूतेक पोरं देवळातच झोपायची सगळी पोरं त्याच्याभोवती कडे करून बसली. थंडी कमी झाल्यावर सदाला चांगलाच ताप आला
सगळी पोरं चिंताग्रस्त झाली होती. पैंज चांगलीच अंगलट आली होती. ती पैंज नव्हतीच पण भूतांवर विश्वास नसणारा सदा भूतं नसतातच हे आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी सदाने हे धाडस केले होते.
सगळ्या पोरांची खात्री झाली होती कि स्मशानात सदा नक्कीच एखादे भूत भेटलं असणार त्याशिवाय सदा एवढा घाबरणार नाही .
त्यानंतरची सारी रात्र सदाने डोळे मिटले नव्हते.व त्याबरोबर त्याची मित्रांनिदेखील .

दुसऱ्या दिवशी आख्या गावात हि बातमी सगळीकडे पसरली. सदाच्या चुलत्याने गावातल्या पोरांच्या नावाने शिव्या घातल्या. कारण सदाला चुलत्यानेच सुट्टीला गावाला आणला होता. सदाचे वडील नको म्हणत असताना चुलता घेऊन आला होता.
दुसऱ्या दिवशीही सदामध्ये काहीच फरक पडलेला नव्हता . चेहऱ्यावरील भीती जराही कमी झाली नव्हती, थंडी -ताप सारखा येतंच होता. शिवाय रात्रीपासून सदाने काही खाल्ले पिले नव्हते .

गुलमोहर: 

कथा काहीच पुढे सरकली नाहीये.
भाग कंटाळवाणा झालाय. शिवाने निरंजनला काय काय झालं हे सांगितलं ते तुम्ही २-३ ओळीत संपवू शकला असतात.
असो..
पु ले शु.

अनिल, प्राजु म्हणतात त्याप्रमाणे कथा पुढे सरकलेली वाटत नाही. ही कथा क्रमश: असावीशी वाटते. तसा उल्लेख शेवटी व्हावा.
आ.न.,
-गा.पै.

पु ले शु साहेब व मायबोलीवर असणाऱ्या सर्व मान्यवरांना एक विनंती करू इच्छितो कि, मी एक फक्त नववी पास इतके शिक्षण घेतलेला, व सध्या शेती नि एक वाहनचालकाची नोकरी करणारा अडाणी माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडून खूप चुका होणारच. आपण सर्वांनी केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी अनमोल असेल. शिवाय मी संगणक देखील शिकलेलो नाही फक्त सरावाने काही गोष्टी जमतात इतकंच. असो. धन्यवाद.