'सोबतीचा करार' सी.डी. चा प्रकाशन सोहळा

Submitted by pkarandikar50 on 2 September, 2008 - 03:53

समस्त मायबोलीकरान्ना आनन्द आणि अभिमान वाटावा अशी घटना १ सप्टेम्बरला पुण्यात घडली - ती म्हणजे आपल्या लाडक्या वैभव [जोशी] च्या गझलान्च्या 'सोबतीचा करार ह्या सी.डी. चे दिमाखदार प्रकाशन झाले.

आशिश मुजुमदारने सन्गीत दिलेल्या या गझला गायल्या आहेत वैशाली सामन्त, दत्त प्रसन्न रानडे, अनुराधा कुबेर, अमोल निसळ अशा ख्यातकिर्त गायकान्नी. प्रकाशन- प्रसन्गी या सर्व कलवन्तान्नी आपापल्या रचना सादर केल्या . सुप्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर आणी कवि 'सौमित्र' ह्यान्च्या हस्ते प्रकाशन झाले. कविवर्य अरुण म्हात्रे प्रमुख पाहुणे होते. याखेरिज श्रीकान्त मोघे, सन्गीता जोशी ह्यान्सारख्या अनेक मान्यवरान्ची उपस्थिती लाभली होती. प्रेक्षागार तुडुम्ब भरलेले होते. असा सर्व बेत जमून आल्यावर, कार्यक्रम अफाट रन्गला हे वेगळे सान्गायला नकोच.

अरुण म्हात्रे म्हणाले, " सुरेश भटान्नी मराठी गझल नुसतीच लोकप्रिय केली नव्हे तर तीला प्रतीष्ठा आणि समृद्धी मिळवून दिली. त्यान्च्या नन्तर आता मराठी गझलचे नवे आवर्तन सुरु होते आहे आणि वैभव जोशी त्याचे प्रवर्तक असणार आहेत. गझलेचे सगळे नियम पाळून आणि पारम्पारीक चौकट साम्भाळूनहि वैभवच्या गझलेची माण्डणी आणि विषय आधुनिकोत्तर [ post-modernism] प्रवाहाशी मिळते जुळते आहेत".

कविवर 'सौमित्र' यान्नी आपली 'गालिब, कुठे आहेस तू?' ही गझल पेश केली आणि सान्गीतले की, " वैभवच्या रूपाने मला माझा हरवलेला गालिब गवसल्याचा आनन्द होतो आहे".

सचिन खेडेकरनेही वैभवची गझल आणि आशीशचे सन्गीत यान्ची मुक्तकण्ठाने प्रशन्सा करताना सान्गीतले, " ह्या गझलान्मुळे होणारे सुख भरण्याकरता घागरी गोळा कराव्या लागतील".

सी.डी. मध्ये समाविष्ट न झालेल्या काही रचना वैभव आणि आशीशने सादर केल्या हे ह्या समारम्भाचे वेगळेपण ऊठून दिसले.

असे म्हणतात की आधी चाल बान्धल्यानन्तर त्या चालीवर गीत रचणे म्हणजे कविला एक आव्हान असते, तर आधी लिहीलेल्या कवितेवर सन्गीताचा साज चढवणे ही सन्गीतकाराची कसोटी असते.

चालीबरहुकुम रचलेली गीते काव्यगुणाच्या दृष्टीने थोडी डावी ठरतात असेहि म्हटले जाते. अर्थात याला अनेक सन्माननीय अपवादहि आहेत. साहिर लुधियानवीपासून ते शान्ताबाई शेळक्यान्पर्यन्त अनेक सिद्धहस्त कविन्नी काव्यगुणाच्या दृष्टीने अतिशय कसदार गीते 'आधी चाल- मग कविता' अशा पद्धतीने आपल्याला दिली आहेतच की.

आधी लिहीलेल्या कवितेवर चाल बान्धायची म्हणजे त्या गीताचा कविला अभिप्रेत बाज आणि घाट साम्भाळावा लागतो आणि त्यामुळे सन्गीतकाराच्या प्रतिभेवर बन्धने येतात.क्वचित प्रसन्गी कविला काही एक सुरावट सुचलेली असते त्यावरूनही विसम्वाद होण्याची शक्यता असते.

दुसरीकडे श्रीनिवास खळ्यान्सारख्या युगप्रवर्तक सन्गीतकारान्नी नेहमीच 'आधी कविता - मग चाल' या क्रमाने काम केले. डो्ळ्यान्पुढे शब्द नसतील तर चाल सुचतेच कशी? असा प्रतिप्रश्न ते विचारतात.

'सोबतीचा करार' च्या बाबतीत हा प्रश्न उद्भवलाच नाही. वैभवच्या गझला लिहून तयार होत्या. अशीशने त्यावर चाली बान्धल्या. मात्र वैभवच्या डोळ्यापुढे तरळलेले चित्र समजावून घेऊनच मग त्याच्याशी मिळते-जुळते काम करण्याचा प्रयत्न आपण केला असे अशीशने सान्गीतले. कविच्या मनातल्या सन्कल्पना म्हणजे सन्गीतकाराच्या प्रतिभेवर पडणारे बन्धन किम्वा मर्यादा नसतात असेच तो सुचवून गेला. एकूण काय, दोघामधे छान 'ट्युनिन्ग' झाले होते आणि याचा प्रत्यय प्रत्येक गाण्यामधे येतो.

भावगीतापेक्षाहि गझल सन्गीतबद्ध करणे थोडे जास्त कठिण जात असावे, असा आपला माझा तर्क आहे कारण गझलचा प्रत्येक शेर ही स्वतन्त्र काव्य रचना असते. गझल मधल्या शेरामध्ये काही समान सूत्र असावे असा नियम नाही. कवितेचे तसे नाही. प्रत्येक चरणातून पुढे जाणारा, उलगडणारा असा एखादा ठाशीव आणि बराचसा एकसन्ध विचार प्रवाह कवितेत असतो. तीचा असा एक 'मूड' असतो, तो पकडून सन्गीतकार चाल बान्धू शकतो. गझलेला तसा एकसन्धपणा असेलच असे नाही. फक्त मीटर आणि यमके समान असलेल्या शेरान्ची मिळून एक गझल हो ऊ शकते. त्या दृष्टीने पाहता, अशीशने वैभवच्या गझला स्वरबद्ध करण्याचे आव्हान अत्यन्त समर्थपणे पेलले असेच म्हणावे लागेल. अर्थात, वैभवच्या प्रत्येक कवितेत, अगदी मुक्त छन्दातल्या कवितेलाही, एक सुन्दर आणि सरळ लय असते, नाद असतो आणि तोलहि. त्यामुळे सुद्धा सन्गीतकाराचे काम सोपे होत असावे. चमकदार [स्मार्ट] शब्द-रचना किम्वा अफलातून कल्पनाविलास आणि गझलच्या 'ग्रामर' वरची घट्ट पकड ह्या गृहीतान्पलीकडे झेपावणारी अशी ही वैभवच्या कवितेची काही खास सामर्थ्य-स्थळे. अशीशने ती नेमकी हेरली असल्याचा प्रत्यय जगोजाग येतो.

'सोबतीचा करार' मधली प्रत्येक चाल वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्र त्येक चाल कोणत्या ना कोणत्या तरी रागावर आधारित असली तरी अशीशने आशयाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रागदारीच्या व्याकरणाचे आशयावर कुठेहि आक्रमण न होता अपेक्षित परीणाम साध्य होतो, हे विशेष. उलट, कधी ललत, कधी पूरिया, कुठे भैरव, कुठे भूप अशा रागान्च्या काही अस्पष्ट, अस्फुट आणि कदाचित त्यामुळेच मनोहारी छटा जाणवतात अन सुखवून जातात. एक रचना कव्वालीच्या अन्गाने जाते, अतिशय जोरकसपणे.

सर्वच गायकान्नी जीव ओतून ह्या गझला गाईल्या आहेत. गझलेचा शब्द्न्शब्द स्पष्टपणे श्रोत्यान्पर्यन्त पोचेल याची काळजी त्यान्नी घेतली आहे. वैशाली सामन्त आणि दत्त प्रसन्न रानडे हे अनुभवी आणि गुणि कलाकार आहेत. त्यानी आपली कामगिरी चोख बजावली आहे. अमोल निसळचा विशेष उल्लेख करायला हवा. मूळातला हा शास्त्रीय सन्गीताचा तालीम-बन्द गायक पण सुगम सन्गीताच्या फीरत, लवचिक वळणे, आवाजाचा 'थ्रो' इत्यादी खूब्या आत्मसात करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्याने केल्याचे जाणवते. मन्ना डे किम्वा रविन्द्र साठे यान्सारखीच भरदार आवाजाची निसर्गदत्त देणगी त्याला लाभली आहे. अनुराधा कुबेर हिलाहि शास्त्रीय सन्गीताची पक्की तालिम लाभली आहे. तीनेहि दोन गीते छानच गायली आहेत.

'सोबतीचा करार' ही सीडी एक अतिशय उच्च प्रतीचा श्रवणान्द आणि काव्यानन्द देवून जाते. वैभव आणि अशीश, बहोत खूब, आगे बढो!

-बापू करन्दिकर

गुलमोहर: 

वैभव बद्दल वाचून खूप खूप आनंद झाला. आत्ताच विचारलं त्याला... कुणी लिहिणार आहे का कार्यक्रमाबद्दल... अणि... वाचायला मिळालं.
कार्यक्रमाला यायला जमलं नाही ह्याचं खूप वाईट वाटतंय....
वैभव, अभिनंदन.

अभिनंदन वैभव.... लवकरच सीडी मिळवतो आणि ऐकून मग कळवतो Happy

बापू तुम्हीपण होतात?????? अरेरे भेट हुकली म्हणायची Sad

कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, सीडीपण सुरेख झाली आहे त्यातल "तूला पाहून कळते काय असते चांदणे"तर जीवघेणं गायल आहे दत्तप्रसाद रानडे यांनी.
तसच वैशाली सांमंत नी गायलेल ऋतू येत होते ऋतू जात होते अगदीच मस्त Happy

आणि "शेवटी शेवटी खूप आल्या सरी हे सुफि ढंगाच संगीत असलेलं गाणं हा एक नवीनच प्रयोग आणि नवीन काहीतरी असूनही मस्त Happy
आवर्जून आपल्या संग्रही ठेवावी आणि स्नेहीतांना भेट द्यावी अशीच सीडी Happy

व्वा बापू
दोन्ही लेख छान, प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा केलात आणि त्या सोहळ्याचा परत एकदा आनंद दिलात.

सुधीर

कुठे मिळेल ही सीडी? online मिळेल का?

बापू, धन्यवाद हो!
किती उत्सुकता होती ह्या प्रसंगाबद्दल अधिक जाणून घेण्याची. वैभव हा "आपला" माणूस, आपल्या मायबोलीचं "वैभव"! त्याच्या कलाकृती जगासमोर येण्याचा समारंभ हे मग "जरा" घरचं कार्य असल्यासारखं होतं. आणि आपण तिथे नसल्याचं किती किती जाणवलं म्हणून सांगू...
आमचं हे एक कोड पुरवलत तुम्ही!

अमोलचं गाणं इथे सिडनीत ऐकलय गेल्याच वर्षी. शास्त्रीय गाण्याच्या तालमीतला कसलेला पैलवान आहे तो. आणि तुम्ही म्हणताय तस्सा भरदार आवाज आहे. समोरच्यांना भरभरून ऐकवण्याची त्याची तयारी वादातीत! सिडनीतले समस्त कानसेन त्याच्यावर बेह्हद्द खूष आहेत.
पण, त्याचबरोबर पाय जमिनीवर ठेवून असलेला सहृदयी तरूण म्हणून मी त्याला १०० पैकी २०० तरी मार्क देईन.
असो.

वैभवा, मनापासून अनेकानेक शुभेच्छा, रे. तुझं कवित्त लोकांना वाचायला मिळावं, ऐकायला मिळावं ही समाजासाठी एक आवश्यक गोष्टं आहे. चांगलं साहित्य उपलब्ध असणं हा प्रत्येक पीढीचा अधिकार आहे... आणि तो तू पुरवावास. त्यासाठी आवश्यक ते सारं सारं तुला मिळत राहो, हा प्रवास आत्यंतिक समाधानाचा होवो (मग तो सुखाचा होईलच होईल)!!

बापू... तुमचे मनापासून आभार Happy या घरच्याच कार्याला हजर न राहू शकल्यामुळे खूपच वाईट वाटत होतं हो...... पण तुम्ही इतकं सुरेख वर्णन केल्यामुळे हुरहुर अजून वाढली.......का चुकवला आपण इतका जबरदस्त कार्यक्रम्.....असं राहून राहून वाटतंय.... Sad

वैभवा......तुझं हे वैभव उत्तरोत्तर वाढत जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!

जया,
खर आहे...

वैभव शेठ,
पुन्हा एकदा अभिनंदन! आता जयाच्या अल्बम सारखे तुमचाही अल्बम मायबोलीवरून विकत घ्याय्ची सोय करा पाहू.. नाहितर व्यक्तीगत भेटून फुकट मधे लाटून नेईन...:)

बापू ,

सर्वप्रथम तुम्ही आवर्जून आलात ह्याबद्दल मन:पूर्वक आभार. किती दिवसांनी भेटलो आपण्..तसेच हा वृत्तांत आणि मला लिहीलेली सविस्तर मेल ह्याबद्दलही धन्यवाद. मेलला उत्तर देतोच. आधी त्यातील सर्व गोष्टी समजून घेतो आहे. खूपच अभ्यासपूर्ण निरीक्षणं आहेत.

कार्यक्रमाला आलेल्या माझ्या सर्व मायबोलीकर मित्रांचा मी अत्यंत ऋणी आहे. मायबोलीपासून सुरू झालेल्या ह्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर तुम्ही लोकांनी मला मोलाची साथ दिलेली आहे.

* सीडीज मायबोलीवर विकत मिळणेबाबत समीर काहीतरी करतो आहे. लवकरच ती सोय होईल अशी आशा आहे.

पुन्हा एकदा मायबोली, ऍडमिन व जुने नवे सर्व मायबोलीकर ह्यांना खूप खूप धन्यवाद

धन्यवाद.

अरे झक्कास... आता सी.डी बँगलोर मध्ये कशी मिळवता येईल ते बघुच फार अवघड काम नाही.

बापु फार सुंदर व्रुतांत, असा अमृतमयी सोहळा चुकला याची खंत सदैव राहील.

वैभव अभिनंदन, सी.डी सुंदर असेलच यात शंकाच नाही..

वैभवा - अभिनंदन
आणि क्षमस्व - सोहोळ्याला न आल्याबद्दल .

बापू - तुम्हाला धन्यवाद - मायबोलीवरून ही सीडी नक्किच घेईन मी.