श्रद्धा-अंधश्रद्धा

Submitted by अनिल तापकीर on 21 February, 2012 - 02:43

वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .
मस्त गार वारे सुटले होते तरी त्याला घाम आला होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने घड्याळात पहिले. सव्वा बारा, धक्का बसून त्याने पुन्हा घड्याळ पहिले सव्वा बाराच वाजले होते. म्हणजे त्याला तिथं येऊन फक्त पंधराच मिनिटे झाली होती. अजून पाऊन तास त्याला तिथे काढायचा होता.
मित्रांबरोबर पैंज लावली होती त्याने, 'अमावश्येच्या रात्री बारा ते एक स्मशानात थांबण्याची' आणि त्याला विश्वास होता कि हि पैंज आपण नक्की जिंकणार कारण भुताखेतांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता.
शहरात शिकायला गेला तेथील शिकलेल्या मित्रांच्या सानिध्यात राहून भूतं-खेतं,घुमणारे भगत, देवाचे बळी,करणी, या सर्व लोकांच्या खुळ्या समजुती आहेत. या मताचा तो बनला होता. शहरातील मित्रांबरोबर तो अंधश्रद्धा निर्मूलनाचे देखील काम करायचा.म्हणूनच गावात आल्या आल्या त्याने गावातल्या मित्रांबरोबर स्मशानात एक तास एकट्याने काढायचा अशी पैंज लावली होती.
सद्या जरी आधुनिक विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता, तरी लहानपणापासून मनात काही संस्कार ठसलेले होते आणि मेंदूत ते कुठेतरी लपून बसलेले होते.
तो जेव्हा स्मशानात आला तेव्हा एकही विचार त्याच्या मनात नव्हता.आल्या आल्या त्याने एक सिगारेट शिलगावली नि स्मशानभूमीतील शेडच्या खांबाला टेकून मस्त पाय पसरून बसला. सिगारेट संपेपर्यंत त्याला काही वाटले नाही. आणि कसला विचार देखील आला नाही. सिगारेट विझली .. ..... होता नव्हता तेवढा उजेडही संपला, सगळीकडे गच्च अंधार,जीवघेणी शांतता, दूर गाव,पक्षी, वारा सारं जगच झोपलेले. आणि हा एकटाच टक्क जागा. थोड्याच वेळात जे नको तेच घडू पहात होते. लहानपणी ऐकलेल्या भुतांच्या गोष्टीतील भुते नि त्यांचे वर्णन केलेले भयानक आकार त्याच्या डोळ्यासमोर यायला लागले होते.तो त्या विचारांना झटकण्याचा प्रयत्न करत होता. तो जेवढा विचार झटकण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कितीतरी पटीने तेच तेच विचार पुन्हा पुन्हा येऊ पहात होते.
भुते नसतातच या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे तो मनाला वारंवार बजावत होता. तर दुसऱ्या मनात लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतील भूतांचे चित्रविचित्र अवयव फेर धरत होते. अतिशय द्विदा मनस्थितीत असतानाच,शांततेचा भंग करत भयंकर कर्कश्य आवाजात टिटवी ओरडत गेली नि अक्षरशा तो हादरूनच गेला छातीचे ठोके वाढले दरदरून घा म आला. कसे बसे मनावर नियंत्रण आणले.छाती अजूनही धडधडत होती. क्रमश;

गुलमोहर: 
शब्दखुणा: