महापालिका निवडणूक २०१२

Submitted by आशुचँप on 17 February, 2012 - 06:02

आत्ताच हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीने मुंबईची महापालिका हातात राखण्यात यश मिळवले आहे. पुण्यात राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले तर नाशिकमध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारली आहे.
मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे कॉँग्रेसला फायदा होईल असा अंदाज होता. पण तसे झाल्याचे दिसून येत नाहीये.
या २०१२ च्या निकालांविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा...
काय वाटते, मनसेला अजून जागा मिळू शकल्या असत्या का...शिवसेना-भाजपाला सत्तेसाठी मनसेची मदत घ्यावी लागेल असे वाटत होते पण तसे न होता ते थेट सत्तेवर येऊ शकतात. राज ठाकरे यांचा करिष्मा तितका चालला नाही का अजून पक्षाला लोकांनी स्वीकारलेले नाही...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पु्ण्यात बहुमतासाठी ७७ जागा हव्या होत्या. आणि राष्ट्रवादी (५०) व कॉँग्रेस (२८) मिळून हा आकडा पार करत आहेत. अजित पवारांनी आत्ताच कॉँग्रेसवर आरोप घोळ घातल्याचा आरोप केला असला तरी पुण्यात युती राहणारच हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुण्याची त्रिशंकु अवस्थेतून सुटका झाली पण सत्ता कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडेच राहणार हे नक्की.

पण एकूणच ५०% मतदान न केलेले लोक कोण असतील? मध्यमवर्गीय बरेच असले तरी यात मुख्य संख्या त्यांची असण्याची शक्यता कमी वाटते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मुळात मतदान सक्तीचा कायदा झालाच पाहिजे..... मग भले "कोणीही उमेदवार लायक नाही" असा पर्याय ठेऊन त्यल हवे तर मत द्या..... पण मत हे दिलेच पाहिजे......... सगळे झाडून मतदान करत नाही म्हणून महाराष्ट्रात "टगेगिरी" चाललीये......... महाराष्ट्राचा बिहार होईल अश्याने (तिकडे परिस्थिती बरीच सुधारत चाललीये)..... पिंपरी चिंचवडमध्ये त्याची झलक दिस्दतेच आहे..... सगळे गुंड....... दादा मामा नाना ........ Sad

आपल्याकडे कुठलीही गोष्ट सक्तीने लादली जाऊच शकत नाही. उद्या सगळ्यांनी शुद्ध हवा घ्यावी, व्यायाम करावा तरी पुणेकर त्याला विरोध करतील.
व्यायाम करताना आमच्या हातापायांना दुखापत झाली तर सरकार भरून देणार आहे असा प्रश्न विचारतील....
त्यामुळे मतदानाची सक्ती होऊच शकत नाही. तरी या वर्षी लोकांनी मतदान करावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. लोक शनिवार-रविवार पाहून फिरायला जातात म्हणून मुद्दाम कुठलीही राष्ट्रीय सुट्टी किंवा विकांत जवळ येणार नाही म्हणून गुरुवारी मतदान ठेवण्यात आले. लोक मतदान केंद्रावर जायाचा कंटाळा करतात म्हणून मतदान केंद्रे सोसायट्यांजवळ आणण्यात आली. कहर म्हणजे पुण्यात एका मतदान केंद्रावर जायला वळसा पडत होता. तो देखील पार करण्यात पुणेकर आळशीपणा करतील म्हणून तिथल्या भिंतीला भगदाड पाडून लोकांना जायला यायला रस्ता केला होता. अनेक पक्ष कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन स्लीपा वाटल्या...
अजून काय करायला पाहिजे होतं?

कहर म्हणजे पुण्यात एका मतदान केंद्रावर जायला वळसा पडत होता. तो देखील पार करण्यात पुणेकर आळशीपणा करतील म्हणून तिथल्या भिंतीला भगदाड पाडून लोकांना जायला यायला रस्ता केला होता.
>>>>>>>>>>>>>>

टू मच...... Rofl जरारारारारारा अतीच झालं हे Wink

चला सगळीकडचे निकाल आले..पण मनसेच्या दृष्टीने नाशिक महत्वाचे

तिथले आकडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - ४०
काँग्रेस - २०
शिवसेना - १९
राष्ट्र्वादी - १५
भाजपा - १४
अपक्ष - ६
ईतर - ५
कम्युनिस्ट - ३

एकूण - १२२ (बहुमतासाठी ६२ )

उगाच मोट बांधून फायदा नाही हे राजचे म्हणणे पण खरेच आहे........ आपल्या मनासारखे निर्णय घेताना नेहमी इतर तंगड्या घालणार Sad

मतदान कमी होण्यात मतदारांची काहीच चूक नाही याची कारणे अशी

१) कार्यालयांना सुट्टी नाही . दिवसाचा पगार सोडून कोण मतदान करणार .
२) सामान्य मुंबईकर संध्याकाळी कार्यालयातून येतो त्यानंतर इतर कामे करतो त्यामुळे मतदान केंद्रांची वेळ कमीत कमी रात्री दहा पर्यंत करावी .
३) मतदार यादीचा कायम असलेला घोळ

या लोकांचा भरोसा नाही रे..... काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असे एकत्र येतील Sad

सत्तेसाठी काहीही युत्या करतात हे.....

सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर उदासीनता दाखवली हे कसे ठरवता येइल?
१. पुण्याचा कोणताही भाग घेतला तरी गरीब वर्ग प्रचंड प्रमाणावर असणारच, त्यामुळे त्यावरून ठरवता येणार नाही.
२. आपल्या ओळखीत खूप असे लोक जर दिसले तर निदान अंदाज येइल. पण निदान माझ्या ओळखीत तरी तसे दिसले नाही.
३. मतांवरून वैयक्तिक माहिती काढता/जाहीर करता येत नसल्याने तसेही करता येणार नाही.

मिडल क्लास मतदान करत नाही हे एक जुने गृहीतक आहे. पण ते अजूनही खरे आहे का हे कसे ठरवणार?

की जवळजवळ अर्ध्या मतदारांची नावे लिस्ट मधे नव्हती, त्यांना मतदान केंद्रापर्यत जाता आले नाही, ते गावाबहोते?/देशाबाहेर होते?

पुण्यात २५ लाख मतदार धरले तर जवळजवळ १२ लाख मतदार उदासीन होते? तसे असते तर आपल्या आजूबाजूला खूप असायला हवेत.

मुंबईकर - खाजगी कार्यालयांना लोकांना थोडा वेळ "ऑफ" देणे सक्तीचे नव्हते का? माझ्या ओळखीत एक दोघांना अर्धा दिवसच ऑफिस होते (पुण्यात).

की जवळजवळ अर्ध्या मतदारांची नावे लिस्ट मधे नव्हती, त्यांना मतदान केंद्रापर्यत जाता आले नाही, ते गावाबहोते?/देशाबाहेर होते?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

बर्‍याच प्रमाणात. मी स्वतःहून कॉल करून केले का मतदान असे ओळखीतल्या "सो कॉल्ड मध्यमवर्गीय व्हाईटकॉलर" ३५ लोकांना तरी विचारलेले आहे....... विविध कारणे देऊन त्यातल्या फक्त १६ जणांनी मतदान केल्याचे सांगितले........ हीच ती उदासीनता. Sad

त्या ३५ लोकांवरून सर्व मध्यमवर्गीयांचे गृहितक कसे ठरवणार असे वाटेलही, पण
निदान आपल्यापुरते तरी आपण अंदाज काढू शकतोच ना...... ओव्हरऑल अंदाज बांधायला इतर यंत्रणा आहेतच की...... Happy

काही मायबोलीकरांनाही इथे विचारले होते..... दुपारपर्यंत तरी त्यांचे उत्तर नाही अजून असेच होते.... नंतर केले असेल मतदान तर नशीब आपले.

या गंभीर चर्चेत थोडा विनोदाचा शिडकावा करू का? एकदम विषयाला धरून आहे आणि खर्राखुर्रा घडलेला विनोद आहे.

आज दुपारीच बारा-साडेबाराच्या सुमारास मी डेंटिस्टकडे होते. तिथला डायलॉग :

बाहेर रीसेप्शनिस्ट आणि पेशंट उत्सुकतेनं टिव्हीवर निकाल लाईव्ह बघतायत. आतमध्ये डॉक्टर एकाएका पेशंटला आटपतायत. माझा नंबर लागला आणि आत गेले. काम सुरू असतानाच रीसेप्शनिस्ट आत आली आणि तिने घोषणा केली.

री : देशपांडे आले.
डॉ: आँ???
री: देशपांडे आले.
डॉ: असे कसे आले? अपाँइंटमेंट होती का?
री: आपल्या भागातून निवडून आले.

डेंटिस्टच्या खुर्चीत बसले असूनही मी इतकी हसलेय ना!

मामी Rofl

लगेच डेंटिस्ट आणि रिसेप्शनिस्टला विचारायचं ना, तुला आनंद झालाय पण तू केलं होतेस का मतदान??????

उत्तर अहो, वेळच नव्हता... सरांनी सोडलंच नाही असंच मिळालं असतं Biggrin Proud

भुंगा, तू लिहीले आहेस त्यात काही चुकीचे आहे वगैरे म्हणत नव्हतो मी. गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीयांबद्दल जे बोलले जाते ते सध्या अजूनही लागू आहे का हे कसे ठरवता येइल विचार करत होतो.

तू ३५ जणांना विचारलेस तर तुझा 'सेट' नक्कीच मोठा आहे आणि त्यावरून बरेच लोक जमत असूनही मतदानाला गेले नाहीत असे नक्कीच म्हणता येइल. माझा अनुभव मात्र उलटा होता.

फारेंड, मी यावेळी मुद्दाम ठरवून हे केलेय की निदान आपल्या ओळखीतले तरी किती लोक मतदान करतात आणि राहून गेलं तर किती जण चुकचुकतात...... पण अनुभव फारसा चांगला नव्हता.....

मतदान न केलेल्या नात्यातल्याच एका साठीच्या व्यक्तीला विचारलं तर, "हे दोघे भाऊ आपापसात लढून आम्हा मराठी माणसांची अशीच वाट लावणार..... आपला मराठी माणसांचा इतिहास हेच सांगतो" वगैरे हास्यास्पद बोलायला सुरुवात केली...... स्वतः मत द्यायचं नाही आणि मग अश्या फालतू गप्पा करायच्या. Sad
दिवसभर तंगड्या वर करून घरात बसणारा माणूस ... काय हरकत आहे जाऊन मतदान करायला ... बूथ २ बिल्डिंग सोडूनच होता.

चला सगळीकडचे निकाल आले..पण मनसेच्या दृष्टीने नाशिक महत्वाचे

तिथले आकडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - ४०
काँग्रेस - २०
शिवसेना - १९
राष्ट्र्वादी - १५
भाजपा - १४
अपक्ष - ६
ईतर - ५
कम्युनिस्ट - ३

एकूण - १२२ (बहुमतासाठी ६२ )

शिवसेनेला मनसेने मुंबईत बिनशर्त पाठींबा द्यावा आणि त्या बदल्यात नाशीकात घ्यावा. इअतक सोप्प जर या दोघांना कळेल तर मराठी माणुस कशाला म्हणायच ? तिकडे उत्तर प्रदेशात भाजपाने कधी काळी मुलायम सिंग आणि अटलजींच सरकार पाडणार्‍या मायावतींबरोबर एकेकदा टॅक्टीकल समझोता करुन आपली जागा टिकवली आहे हे लक्षात घ्या म्हणाव.

पुणेकरंवर अनावश्यक लिहिलंय वर.

या धाग्याच्या माध्यमातून पुणेकरांवर राग काढणे हे समजले नाही.

मनसे - सुशिक्षित आणि सुशिक्षित नसले तरी तरुण (वयाने लहान) असणारे अशांनी निवडून आणलेला पक्ष आहे. राज ठाकर्‍यांपुढे आता सातत्याने लाईमलाईट मध्ये राहणे, पक्षात अजिबात फूट पडू न देणे, चांगल्या कामांची जाहिरात व्यवस्थित करणे व टीकेचा झोत उद्धव ह्यांच्यावरून राष्ट्रवादीवर हालवणे अशी आव्हाने / कर्तव्ये आहेत.

राष्ट्रवादी - खरे तर त्यांनी हा स्वतःचा पराभव समजायला हवा. सर्वात मोठा पक्ष जरी ते असले आणि मनसेने जरी सकृतदर्शनी सेनेच्या जागा उचलल्यासारखे वाटत असले तरी राष्ट्रवादीमध्ये 'ग्रोथ' झाली नाही हे त्यांनी मान्य करायला हवे. राष्ट्रवादी केवळ पवार साहेबांच्या करिश्म्यावर तर सेना आणि मनसे केवळ ठाकरे कुटुंबियांच्या करिष्म्यावर तरत आहेत असे दिसते. केवळ 'एक पक्ष' या दृष्टीने (त्यातल्या त्यात) मते काँग्रेस आणि भाजपला मिळालेली दिसतात.

पुणेकरंवर अनावश्यक लिहिलंय वर.

या धाग्याच्या माध्यमातून पुणेकरांवर राग काढणे हे समजले नाही.
>>>>>>

बेफी, ती पुणेकर पत्रकारानेच माहिती लिहिलीय कय झालं त्याची.

केवळ 'एक पक्ष' या दृष्टीने (त्यातल्या त्यात) मते काँग्रेस आणि भाजपला मिळालेली दिसतात.
>>>>>>>>>>>>>>>

भाजपा ठीक आहे एकवेळ कारण यावेळी मोठ्या नेत्यात्च दुफळी असताना आणि कोणतेही राज्यस्तरिय नेतृत्व सक्रीय नसताना त्यंना चांगलं यश मिळलं....... पण काँग्रेस हा पक्ष म्हणून कसा लढला कळलं नाहे....... आपापसातच लढलेत ते. गुरुदास कामत गट आणि कृपाशंकर गट या भानगडीत मुंबईत सडकून आपटले. अजीत सावंतना निलंबित केल्याचे चूक महागात पडली..... त्याला उत्तर भरतीय वि. मराठी असे पक्षातच वळण मिळाले.

आणि तसेही प्रत्येक पक्ष कोणाच्या ना कोणाच्या करिष्म्यानेच चालतो..... सगळीकडे तेच आहे...... फक्त महाजन गेल्यापासून भाजपा उघड्यावर पडलाय....... मुंडे घरातल्याच आगी विझवण्यात लागलेत. Sad

मी भुंग्याशी सहमत. आज संपर्क साधने एवढी वाढलीत, पण मतदानाची सोय नीट होत नाही. आमच्याच घरचे उदाहरण. मी कधीच मतदानाला मुंबईत हजर राहू शकत नाही. त्यामूळे मला हक्क बजावता येत नाही.
वहीनीला कायम इलेक्शन ड्युटी असते, त्यामूळे तिला मतदान करता येत नाही.
आई मात्र या वयातही उत्साहाने मतदान करते. भाऊ पण करतो.
एक सुनियोजित साईट निर्माण करुन इंटरनेट द्वारे मतदान करायची सोय का होऊ शकत नाही ?
मतदान केले नाही (यात नकाधिकारही असावा) तर कुठलीही सरकारी सुविधा, कुठल्याही विम्याचे नुतनीकरण, पासपोर्ट, देश सोडायची परवानगी.... असे मिळणारच नाही. असा कायदा होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भारतीय नागरीक, देशात काय जगात कुठेही असला तर त्याला मतदान करता आले पाहिजे.
मला तर असेही वाटते, कि स्वतःचे मतदान गुप्त ठेवायचे कि नाही, हे ठरवण्याचा अधिकारही मतदाराला असावा.

इथे मतदान कमी होण्याच्या विविध कारणांवर चर्चा होत आहे म्हणून माझा अनुभव लिहावासा वाटला.

माझी २००६ साली पिआरओ ची ड्युटी होती. मुंबई महापालिकेच्या निवडणूका - सेंटर बाणगंगा, मलबार हिल एरिया. माझ्या एकट्याच्या बुथवर सर्वात जास्त म्हणजे ७५४ मतदान झाले होते. बाकी सर्व बुथ वर शुकशुकाट होता. माझ्या बुथ वर सगळी झोपडपट्टी लोटली होती बाकी सर्व बुथ वर उच्चब्रु वर्गातील लोक. ७५४ आकडा हा मोठेपणा सांगण्यासाठी नसुन माझी उडालेली तारांबळी साठी मुद्दाम नमुद केला आहे. हे मतदान देखील मला मिळालेल्या मतदार यादीच्या निम्म्याहुन थोडेसे जास्त होते (जेमतेम ५५%)

माझ्याकडे यादी १२२५ जणांची होती. मतदान सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत असते म्हणजे ६०० मिनिटे. बुथमधे आल्यावर माणसाचे नाव मदतार यादीतून व्हेरिफाय करणे, आयडेंटिटी चेक करणे, नाव - सही लिहून घेणे, बोटाला शाई लावणे, कंट्रोल युनिट अ‍ॅक्टीव्हेट करणे आणि मग मतदात्याने बियु युनिट वर बटण दाबणे या सर्व क्रियेला किमान एक मिनिट जाते. बर सर्वजण सकाळी ७.३० पासुन रांग लावत नाहीत. मतदान वेगवेगळ्या वेळांच्या पॅटर्न्स मधे होते. त्यामुळे मतदान ऑप्टिमम होण्याचा आकडा ६०० इतका असु शकतो (एका बुथवर) ७५४ माणसांचे मतदान होताना माझी काय भंबेरी उडाली असेल ते बघा. पहाटे ५.३० पासुन रात्री १२.३० पर्यंत मी एका बिस्किटावर होतो.

वरिल अनुभव लिहिण्याचे कारण हेच की ६०० मि. मधे बुथ मागे जास्तीत जास्त ६०० मतदाता असले पाहिजेत. असं वाटतं की, इलेक्शन कमिशनने देखील हे गृहीतच धरले आहे की मतदान सरासरी ५०% हून अधीक होत नाही.

यासाठी मतदानाचे वेगवेगळे पर्याय खुले झाले पाहिजेत. उदा. नेट वोटिंग (घरातून निघण्याचा कंटाळा करणार्‍यांसाठी आणि ऑफिस मधून लवकर निघता न येणार्‍यांसाठी तसेच बदलीच्या ठिकाणी असणार्‍यांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरु शकतो), बुथ संख्या वाढवणे इ.

६०० मि. मधे बुथ मागे जास्तीत जास्त ६०० मतदाता असले पाहिजेत. असं वाटतं की, इलेक्शन कमिशनने देखील हे गृहीतच धरले आहे की मतदान सरासरी ५०% हून अधीक होत नाही.

विवन.. चांगला मुद्दा मांडलाय.. Happy

भुंग्या

मतदान सक्तीचं नको रे मित्रा !
हा स्वेच्छेचाच भाग आहे. मतदान करावं असं मला वाटायला हवं. फक्त उमेदवार चांगले कि वाईट हा प्रश्नच नाही, एकंदरीतच उदासीनता आहे. निवडून आल्यानंतर वाल्मिकीचा पण वाल्या कोळी होतोय. ज्याला जिथे संधी मिळेल तो तिथे लुटतोय. लोकप्रतिनिधी तरी काय आकाशातून पडलेले असतात का ? राजकारण म्हणजे समाजकारणाचाच आरसा आहे. समाजात जसे लोक आहेत तसंच प्रतिनिधित्व राहणार. कायदे बनवूनही फायदा नाही. गावातला माणूस म्हणतो पैसे खाल्ले तरी चालतील पण आमची कामं करा. एव्हढं पण होत नाही.. मग आम्ही पिकनिकला गेलो तर बिघडलं कुठं ?

आज मोठे मोठे लेक्चर्स देणारे पण काही वेगळं करणार नाहीत याचा दुर्दम्य विश्वास आहे आम्हाला. पक्षांमधे आम्ही वाटलो गेलोत. आमच्यात एकी नाही नाहीतर रस्त्यात या लोकांची गचांडी धरता आली असती आणि वॉर्डातल्या समस्यांचा जाब विचारता आला असता. तोपर्यंत कसलीही सुधारणा होणार नाही हे माहीत आहेच..

पुणेकरंवर अनावश्यक लिहिलंय वर.

या धाग्याच्या माध्यमातून पुणेकरांवर राग काढणे हे समजले नाही.

बेफी यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. मी पाहिजे तर हे कुठे झाले याची तपशीलवार माहीती देऊ शकतो. आणि ती भिंत पाडण्याचे कारण म्हणजे मतदार वळसा घालून येणार नाहीत हेच सांगण्यात आले होते.
गुरुवारी मतदान ठेवण्याचे कारण तर निवडणूक आयुक्तांनीच जाहीररित्या सांगितले होते. मतदान केंद्रे सोसायट्यांजवळ ठेवण्याचे पण छापून आले होते.
आता यात राग कुणी आणि कसा काढला हे जरा सांगणार का...आपण इथे निवडणूकांबद्दल बोलत होतो आणि यात काही अवांतर मला वाटत नाही.

काढा, मतदान कमी झाले म्हणून मध्यमवर्गीयांनाच झोडपून काढा ! Angry

अरे, मतदार यादीत मरण पावलेले, स्थलांतरित झालेले देखील मतदार आहेत.
नवीन नोंदणी केलेल्या मतदारांची नावे चुकलेली, गायब आहेत.

मला स्वतःला यादीत आडनाव चुकीचे आहे (जे महिन्याभरापूर्वीच पडताळणी केलेले होते) म्हणून मतदान करता नाही आले, निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलल्यावर 'तुम्ही बोगस मतदान करताय का ?' अशी विचारणा झाली.
यादीत समजा १०० नवे असतील आणि त्यातील अस्तित्वात नसलेली, चुकलेली ३० नावे असतील तर मतदानाचे प्रमाण ५० % कसे निघू शकते? वास्तविक ते ७१% यायला पाहिजे.

निवडणूक सुधारणा, सक्तीचे मतदान याच्याआधी निवडणूक यंत्रणा सुधारायला अधिक वाव आहे. मध्यमवर्गीय माणूस या जड-व्यंगाळ यंत्रणेपुढे अगदीच हतबल आहे.

इथे मुंबै पुण्याची बरीच चर्चा वाचली. यासर्व प्रक्रियेचा मी ही जवळुन भागिदर होतो ठाण्यात..
मतदान ५४%
कमी झाल्याची कारण अनेक प्रभाग रचनांमध्ये बदल,
नाव यादीत नसणे, असले तर नक्की कोणत्या केंद्रावर नंबर लागला याबाबत बराच घोळ
पक्षनिहाय काही निर्णायक निकाल काही धक्कादायक.
युति-- काठावर बहुमत--
आघाडी -- असमधानकारक निकाल
मनसे--मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा केवळ राज च्या जोरावर अनेक ठिकाणी २र्या क्रं. ची मते.

काही निरीक्षणः
यापुर्वी केवळ स्लम विभाग त्या त्या ठिकाणचे निकाल फिरवतात असा आरोप असतो , पण यंदा मध्य आणि काही प्रमाणात उच्च मध्यम वर्गातुनही मतदान झालयं .
पण प्रकर्षानी जाणवले संघटीत सोसायटी आणि चाळींमधुन झालेले मतदान.
अनेक ठिकाणी सोसायटी आणि चाळींमधुन ३/५ लाखापर्यंत कमीट्मेंट होत्या यात , सोसायटी आणि चाळींमधुन रंगकाम शेड बांधुन देणे, प्रोपर्टी ट्याक्स ३ वर्षाचा भरणे अशांचा भरणा होता
मतांचा भाव
ठाणे मुळ शहर १०००/-
घोड्बंदर/वागळे एक गठठा साधारण १०० ते १५० मतामागे ५००००/-
कळवा/मुंब्रा/कोलशेत्/विटावा- १०००/१५०० मतामागे
यापद्धतीने १४-१५ तारखेपर्यंत वाटप सुरु होते.
निवडुन आलेले सर्व नगर सेवक किमान १ते १.५ कोटीची गुंतवणुक करुनच निवडुन आले आहेत असा साधारण अंदाज आहे. अर्थात हे सर्व आकडे केवळ ४ते १६ फेब्रुवारे पर्यतचे आहेत. त्या अगोदर अधिक्रुत तिकिट घेण्यासाठी साधारण ५० लाखापर्यंत खर्च होतो हा घड्याळ आणि धनुष्यबाणा कडुन कळलेला आकडा आहे...

एक सुनियोजित साईट निर्माण करुन इंटरनेट द्वारे मतदान करायची सोय का होऊ शकत नाही ?
ते सध्या भारतात शक्य नाही.
इथे अमेरिकेत तसे करण्याचे घाटते आहे, प्रोग्रॅमींगला अर्थातच भारतीय. तो प्रयोग जर यशस्वी झाला तर मोठ्या प्रमाणावर लगेच हा प्रकल्प हाती घेण्यात येईल. मग आधी अमेरिकेचे काम करायचे का स्वतःचे? (म्हणजे पैसे कुठे जास्त मिळतात? अमेरिकेत का, भारतात? शिवाय कं. च्या खर्चाने अमेरिका!! अहो इथल्या कुणि कं. ने मला पैसे देऊन अगदी भारतात जरी पाठवले तरी मी जाईन. इंडोनेशियात गेलो होतोच. )
मग जे काय सॉफ्ट्वेअर तयार होईल ते अमेरिकेकडून घ्यायचे, की झाले.

Pages