लोकसाहित्य आणि लोकपरंपरा

Submitted by विनीता देशपांडे on 12 February, 2012 - 02:14

"अहिराणी लोकपरंपरा"
लेखक- डॉ. सुधीर देवरे
प्रकाशक-ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

भारत अनेक लोकपरंपरेनी नटलेला देश आहे. पिढी दर पिढी या परंपरा काळासोबत पुढे चालत रहातात. या प्रवासात कधी सोयीनुसार बदल केले जातात तर कधी परिस्थितीमुळे नकळत घडत असतात. अशीच एक लोकपरंपरा जपण्याचे आणि ती सगळ्यांपर्यन्त पोहचवण्याचे कार्य डॉ. सुधीर देवरे यांनी "अहिराणी लोकपरंपरा" या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.
या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत लेखकाने त्यांचे जन्मगाव विरगावातील अनुभवसमृद्धीचे जे शब्दचित्र रेखाटले आहे त्यावरुन या पुस्तकाची निर्मिती केवळ अभ्यासकाच्या दृष्टीकोनातून न होता त्यांच्या अनुभूतीचे, लोकसाहित्याबद्दल आस्था, ती जपण्याची तळमळ आणि सर्वांपर्यन्त पोहचवण्याचा मानस यांच्या संयुक्ताने झाली आहे. लेखक डॉ.सुधीर देवरे हे भाषा, कला, लोकजीवन आणि लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचे अहिराणी आणि मराठी भाषेत कवितासंग्रह, समीक्षा ग्रंथ व आत्मकथन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या साहित्यसंपदेत नाटकं आणि कादंबरीचाही समावेष आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने अहिराणी लोकपरंपरेचा उगम , त्याचे भौगोलिक आणि साहित्यिक दृष्टीने प्रगत स्वरुप मांडले आहे, त्यावरुन लेखकाच्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीचा प्रत्यय येतो. लोकसाहित्य हे लोकसमूहाच्या आविष्काराचे शास्त्र नाही तर लोकसमूहाच्या परंपरागत चालत आलेल्या जीवनाचे ते शास्त्र असते. अहिराणी लोकपरंपरेबद्दल लिहितांना लेखकाने विषयानुसार दिलेल्या वर्गीकरणामुळे वाचकाच्यासमोर अहिराणी संस्कृती एका चलचित्राप्रमाणे उलगडत जाते. प्रस्तुत पुस्तक या परंपरेच्या अभ्यासकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
प्रस्तुत पुस्तकातील पहिला विभाग म्हणजे " लोकपरंपरा " . यात वैषाखातील अक्षय तृतीयेच्या सुमारास तीनरात्री रंगणारा भोवडा ज्यात देव-दैत्यांचे सोंग घेतले जाते, त्यांचे महत्व ,त्यांच्याशी निगडीत लोककथा, लोकगीते याबद्दल माहिती सांगितली आहे. " रात्र थोडी आणि सोंग फार ’ या म्हणीचा उगम याच लोकपरंपरेतून झाला असावा. अहिराणी परंपरेत नवजात अर्भकाचे नाव ठेवण्याच्या काही श्रद्धा आणि पारंपारिक समजूती लोकं आजही पाळतात. या पद्धतीचे विश्लेषण लेखकाने अनेक उदाहरणांसह केले आहे. बार- एक सांस्कृतिक लढाई अक्षय तृतीयेला दोन गावांमधे खेळला जाणारा एक खेळ आहे. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या या खेळाचे महत्व आणि विशेषता या भागात सांगितले आहे. अशाच प्रकारचा खेळ बैलपोळ्याला विदर्भात पांढुरणागावी " गोटमार ’ म्हणून खेळला जातो . प्रत्येक लोकपरंपरेची आपली विशेष खाद्य्संस्कृती असते. लेखकाने अहिराणी ताटलीत अनेक दुर्मिळ पदार्थांची जसे कोंडाळ, घाटा, वड्याचे बट्ट, ढासलं, सुघरं भुगरं, फुणगं अशा पदार्थांची मेजवानी दिली आहे. मेघराज प्रसन्न व्हावे म्हणून परंपरेनुसार एक विधी केला जातो तो म्हणजे धोंड्या धोंड्या पाणी दे . या लोकश्रध्देबद्दल लेखक सांगतात "अंधश्रद्धेतून का होईना ही लोकपरंपरा अजूनही टिकून आहे. या परंपरेमुळे भावनिकदृष्ट्या विस्कटलेले गाव एक होते, ही जमेची बाजू." लोकदैवत जेजुरीच्या खंडोबाचे भक्त मोठ्या प्रमाणात आढीजागरणाचा कार्यक्रम करतात आणि काठीकवाडीचे डफ आजही विरगावात गुंजतात. अहिराणी रडणे ही राजस्थानातील "रुदाली" या करुण काव्यकलेशी मिळती जुळती आहे.
लोकसंस्कृती संस्कारसक्षम असते यात शंका नाही. आजच्या आपल्या प्रगत आणि व्यापक समाजाचा पाया हा अहिराणी सारख्या अनेक लोकपरंपरेतून सामर्थ्यशील झाला आहे. भारताचे विकसित स्वरुप लोककला, लोकपरंपरा, लोकसाहित्य याने समृध्द असण्याचे कारण हे सारे वेळोवेळी अभ्यासकांनी शोध-संशोधन आणि साहित्याच्या माध्यमातून जपला आहे.
दुसरा विभाग लोकदेव-दैवत त्यांचे पूजन आणि लोककथेवर आधारित आहे. या लोकपरंपरेतील खानदेशातील लोकदैवत कानबाई, तिची स्थापना, त्या संबधित प्रचलित कथा, रुढी, तिची गाणी या बद्दल विस्तृत माहिती देली आहे. याच परंपरेतील चक्रपूजा, व्रत घेणे , आदिवासी दैवते जसे वाघदेव, खांबदेव, म्हसोबा, मुंजोबा आणि प्रमुखदेव डोंगरदेव, ही सारी दैवते लोकसमूहाचे दैनंदिन जीवन आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. अहिराणी भागात आदिवासींच प्रमाण भरपूर आहे. प्रत्येक आदिवासींचे श्रद्धास्थान, रुढी, परंपरा थोड्याफार फरकाने एकसारखे आहे. प्रत्येक लोकसमूहासाठी सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा असतो. या सुरक्षिततेसाठी संघटित होउन देव-दैवतांचे पुजन होता होता ती एक सांस्कृतिक प्रतीक ठरली. अहिराणी परंपरेतील कन्सरा माउली, सुखगाडी ही दैवत उत्तम उदाहरण आहेत. लेखकाने या दैवताची उपासनासंबधी अतिशय छान वाक्य लिहिले आहे. " खरे तर ही परंपरा नष्ट व्हायला नको कारण हे एक सांस्कृतिक प्रतिबिंब आहे आणि या उपासना परंपरेतील हीनही आपल्या भविष्याच्या डोक्यावर बसायला नको, असा मधला मार्ग काढून ही परंपरा सुरु राहायला पाहिजे "( पान-९३ ) हे वक्तव्य पटण्यासारखे आहे.
प्रस्तुत पुस्त्काच्या तिसर्या विभागात लेखकाने लोकभाषा ज्यामधे संत एकनाथांच्या भारुडावरुन तयार झालेले "लळित" हा नाट्यप्रकार, खरतरं सप्तश्रृंगी गडाच्या पायर्या चारशेचौरह्यात्तर पण देवीच्या गाण्यात त्याचा उल्लेख तीनशे साठ असा केला आहे. या संकेताचे स्पष्टीकरण या लेखात दिले आहे. लोककथा, लोकगीते, लोकपरंपरा, लोकव्यवहार यांचा अभास करतांना लेखकाच्या नजरेतून नऊ लाख, सव्वा लाख, छपन्न, सव्वा मण, सतराशे साठ ही संकेताक्षर सुटली नाहीत. सामान्यजनतेला लक्षात रहाण्यासाठी संख्यासंकेत आजही आपल्या अवतीभवती प्रचलित आहेत. आण्हे अर्थात कूट किंवा काव्यात गुंफलेली कोडी. रोजचे जगणे सहज सुलभ करणारे, मनोरंजन करणारे, बौद्धिक आणि चातुर्याचे प्रतीक म्हणजे अहिराणी आण्हे. यात जवळपास चौपन्न आण्हे लेखकाने दिली आहेत. अहिराणी ही जरी प्रमाणभाषा नसली तरी जळगाव-नाशिक जवळील अनेक गावात ती बोलीभाषा म्हणून प्रसिध्द आहे. निसर्गकन्या बहिणाबाईंच्या सार्या रचना या भाषेत गुंफल्या आहेत.

लोकसाहित्य म्हणजे लोकांनी मौखिक परंपरेने जपलेले साहित्य, या साहित्याच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे प्रातिनिधिक दर्शन घडत असते. डॉ सुधीर देवरे यांनी या पुस्तकातून प्रादेशिक संस्कृती अहिराणी या लोकजीवनाची अभिव्यक्ती मांडली आहे. त्यांच्या एक लोकसाहित्य जपण्याच्या या प्रयत्नानां नक्कीच यश मिळेल.

विनीता देशपांडे

गुलमोहर: