शेर-ओ-मणी - १. "दिल"

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'साईब' दो चीज़ मी शिकनद क़द्रे शेर रा I
तहसीने नाशनास व सकूते सुख़नशनास II

काव्य, मग ते कोणतंही असो, कोणत्याही भाषेतलं असो, त्याला दोन गोष्टी मारक ठरतात, एक म्हणजे कलेची जाण नसलेल्याची दाद आणि जाणकारानं त्याबद्दलचं राखलेलं मौन.

बर्‍याच वर्षांपुर्वी माझ्या आत्यानं मला संगिता जोशी यांचं नजराणा शायरीचा हे पुस्तक वाचायला दिलं, त्याच्याच एका पानावरचा हा वर मांडलेला शेर, तेव्हापर्यंत उर्दु हा विषय अत्यंत क्लिष्ट, किचकट आणि अवघड वाटायचा.. यातले शेर वाचल्यानंतर मला उर्दु विषयाची ताकद समजली. खूप जास्त आशय कमीत कमी शब्दात चपखलपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद बाळगणारी उर्दु ही भाषा. Happy इतर कोणत्याही भाषेत हे सामर्थ्य नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण या पुस्तकात प्रत्येक शेराचा अर्थ सुद्धा दिलेला आहे.

उर्दु भाषेत, विशेषकरून जेव्हा शायरीचा भाग येतो तेव्हा विविध विषय हाताळले गेले आहेत. उदा. तगाफुल, हिज्र, इन्तजार, वस्ल, शराब, गम/दर्द, कयामत, गली, कुचा, हुस्न, दिल, याद, वादा.. आणि इतर अनेको...

ही भाषा शांत, संयमी, तडफदार, नजाकतदार आहे, विनोद वगैरे कुणि उर्दुतून केला आहे असं माझ्या तरी ऐकिवात नाही पण काही हलक्या फुलक्या शायरी सुधा उर्दुत केल्या गेल्या आहेत. एकेक करत पाहूच त्या आपण.

तरूणाई, प्रेम, आयुष्याची उमेदीची वर्ष म्हणजे प्रेमाचे गुलाबी दिवस... प्रेम हे हृदय असल्याशिवाय, किंवा दिल्या घेतल्या शिवाय कसं काय करणार?

"दिल"

दिले-नादाँ तुझे हुवा क्या हैI
आखिर इस दर्दकी दवा क्या हैII

- गा़लिब.
हा शेर तर आपल्यापैकी ९९% लोकांनी ऐकला असेल, घोकला असेल वेळप्रसंगी स्वतःबद्दल उदगारला सुद्धा असेल. गालिब स्वत:च्या हृदयालाच विचारतोय की अरे वेड्या तुला नक्की झालंय तरी काय? इतकं कसलं दु:ख बाळगलयस तु जवळ? आणि या प्रेमरूपी वेदनेचं औषध कोण देणार तुला?

आगे आती थी हाले-दिल पे हंसी I
अब किसी बात पर नही आती II

- गा़लिब.
मराठित एक म्हण आहे 'अति झालं आणि हसू आलं' तसंच हृदयाच्या या अवस्थेचं पहिल्यांदा हसू यायचं पण ही अवस्था (प्रेमात पडून अपयशी होण्याची) इतकी शिगेला पोचली आहे की अति होऊनही आता त्याचं हसू येणं बंद झालंय. त्याचंच काय इतर कोणत्याही गोष्टीवर हसू येणं बंद झालंय.

दिल टूटनेकी थोडीसी तकलीफ़ तो हुई I
लेकिन तमाम उम्रको आराम हो गया II

- सफी़ लखनवी
प्रेमातील अपयशामुळे हृदयाचे तुकडे तुकडे झाले खरे.. पण या पुढे ती भीती राहिली नाही. एकंदरीत जे झालं ते बरच झालं, या पुढे अशा तोडफोडीची शक्यताच उरली नाहिये.

इक इश्क़का ग़म आफ़त और इसपे ये दिल आफ़त I
या ग़म न दिया होता या दिल न दिया होता II

- चिराग हसन 'हसरत'
देवराया माझं हृदय इतकं संवेदनशिल आहे की एकिकडे हे असं हृदय म्हणजे एक संकट त्याचबरोबर हे प्रेमाचं दु:ख भोगण्याचं संकट... असं दोन्ही बाजुंनी आयुष्य हैराण झालंय. एक तर हे प्रेमाचं दु:ख किंवा संवेदनशील हृदय यापैकी एकच काहीतरी द्यायला हवं होतस.

दिल भी तेरा, हम भी तेरे, हमको प्यारे हैं ग़मभी तेरे I
और भी हो सितम तो कर ले, ये सितम भी करम हैं तेरे II

-अनामिक
प्रेमात पडल्यावर हे हृदयच नव्हे तर अख्ख्या मला मी तुला समर्पण केलं आहे, त्यामुळे तुझी दु़:ख ही सुद्धा माझीच दु:ख झाली आहेत. तु अजूनही काही अत्याचार करणार असशील तर करून घे, कारण ते अत्याचार सुद्धा मी तुझी कृपा समजून स्विकृत करेन.

प्रेम हे निव्वळ दृदयाच्या एका चुकिच्या (?) धडधडीने होतं असं मानणारे कित्येक प्रेमवीर आहेत. प्रेमाला तर कुणितरी 'कमबख्त इश्क' म्हटलेलंच आहे, हृदयही कमबख्त आहे असं हा शायर 'मोमिन' म्हणतोय.
ना ताब हिज्रमें है, न आराम वस्लमें I
कमबख्त दिलको चैन नहीं है किसी तरह II

विरहाचं दु:ख तर राहूच दे, पण मिलन समयी सुद्धा हे हृदय बेचैन असते. असल्या या मुर्ख हृदयाला कुठेच धड चैन पडत नाही.

प्रेम हे निव्वळ हृदयाच्या चुकिमुळे होतं, असं म्हणून कित्येकांनी ह्या चुकिचं खापर हे हृदयावर फोडलं.
तक़सीर यारकी न कु़सुरे-उदू है कुछ I
'अख्तर' हमारे दिलहीने हमको जला दिया ||
'अख्तर'च्या मते त्याच्या प्रेमात पडण्यास कोणताही शत्रू, किंवा प्रेयसी यापैकी कुणीच कारणीभूत नाही तर त्याच्या भावुक हृदयानेच त्याचा घात केला आहे.

फक्त इतकंच नाही हृदयच नव्हे तर प्रेमाचा मार्गातली प्रत्येक गोष्ट ही 'उपमा' देण्याजोगी असते.. अगदी प्रेयसी देखिल 'आफ़ते-जाँ' म्हणून संबोधली जातेय.
हुआ एक आफ़ते-जाँ पर फि़दा दिल I
न दे दुश्मनकोभी ऐसा खु़दा दिल II

- जि़या

हृदय अगदी कसं का असेना, ते शेवटी आपलंच असतं.. म्हणून कधी कधी ईश्वराला प्रश्न ही विचारला जातो की.....
लाख तूफाँ समेटकर या रब I
किसलिये एक दिल बनाया गया II

-राजेन्द्र कृष्ण.

भावूक हृदय बाळगणारे अगदीच धीरगंभीर असतात असं नाही, कुठेतरी हलकेफुलकेपणा आणतातच आपल्या बोलण्यातून.. आणि आपल्या अप्लवयीन प्रेयसीला विनवतोय हा 'दाग़' ...
अभी कमसिन हो, रहने दो,
कहीं खो दोगे दिल मेरा I
तुम्हारेही लिए रक्खा है
ले जाना जवाँ होकर II

अपरिपक्व प्रेयसीला हृदय हिरावून घेण्याची झालेली घाई पाहून, शेवटी शायरच संयम बाळगताना दिसतोय..

सरतेशेवटी जाता जाता हे हृदय जितकं भावूक, कमकुवत वाटतं तितकंच ते हसरं आणि प्रसन्न सुद्धा आहे. दु:खाची आलेली संकटं जो हसत खेळत झेलून पुढे जाईल तोच खरा "माणूस". आणि ती दु:ख व संकटं झेलायला आपल्या जवळ बाकी काही नसलं तरी चालेल फक्त एक हसरं आणि प्रसन्न मन (हृदय) हवं
मुश्किलें ग़मकी खु़शीसे काट दे, ईन्साँ है वो I
कुछ नहीं पहलूमें एक हँसता हुआ दिल चाहिए II

साभार संकलित - संगिता जोशी लिखित 'नजराणा शायरीचा'
--------------------------------------------------------------

क्रमश:

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

नजराणा खेरिज, विनय वाईकरांची उर्दू शायरीची ओळख करुन देणारी दोन पुस्तके आहेत, आईना-ए-गजल व गजलदर्पण............. उर्दू शायरीच्या महासागरातील ''चुनिंदे अशरार'' घेवून मराठी आस्वादकास त्याची ओळख या तिन्ही पुस्तकांत फार प्रभावीपणे केली आहे.

चांगला लेख दक्षिणा. मनःपूर्वक धन्यवाद.

नजराणा शायरीचा माझ्याकडे आहे. या पुस्तकाची खासियत म्हणजे उर्दू शेरांचा मराठी व वृत्तबद्ध अनुवाद करण्याचा यात प्रयत्न केलेला आहे व तो बराच सफल झालेला आहे.

मात्र एक पुस्तक म्हणून मला यापेक्षा उर्दू शायरी मराठी माणसाला समजावून सांगणारी इतर खूपच पुस्तके श्रेष्ठ वाटतात याचे कारण या पुस्तकात जे शेर सिलेक्ट केले गेले आहेत त्यातील बहुतांशी शेर हे केवळ नावाजले गेलेले शेर आहेत. खोल शेर वाटत नाहीत. प्रत्यक्ष गद्य अर्थ न देता पद्यात देऊ केला आहे. त्यामुळे रसभंग होतो. Sad

अहो माझ्याकडे आला होतात की Happy

माझ्याकडे शंभरावर पुस्तके आहेत उर्दू शायरीची, जा गेहून कोणतेही Happy (परत द्याल हे माहीत आहे)

हा दहा फेब्रुवारी २०१२ चा लेख आज का वर आला आणि इतके दिवस कुठे होता समजले नाही.

दक्षिणा:

उर्दू शायरी व त्याचा अर्थ (एका विशिष्ट कवीची नाही तर एकंदरच) अशीही अनेक पुस्तके आहेत माझ्याकडे, हवी तर घेऊन जा Happy