सारासार विचार करण्याची कुवत

Submitted by शुभांगी. on 9 February, 2012 - 00:41

"अरे, तुला काय शिव्या दिल्या की मारलं मी इतकं रडायला?" तो ड्रायव्हर बाकिच्या मुलांच्या स्कुलबॅग्ज व्यवस्थित रचत त्या मुलाला विचारत होता. मुलाचं हुंदके देऊन टिपं गाळणं सुरुच होतं. बाकीचे चिडीचुप, काही बोललं तर दादा आपल्याला पण ओरडेल म्हणुन. मुलांचा वयोगट ५-११ मधला आणि ड्रायव्हरही पंचविशीतला. नेहमीपेक्षा जरा चढलेला आवाज ऐकुन आजुबाजुचे पालकही जमले.

सकाळचे ६.४५-७.०० वाजलेले, सगळ्याच शाळांच्या गाड्या, व्हॅन आणि रिक्षा यायची घाईची वेळ आणि रस्त्यावर बरीच मुलं आपापल्या (दप्तर, डब्याची पिशवी सांभाळणार्‍या) पालकांसह इकडे तिकडे हुंदडणारी. रस्त्यावर पळापळी करताना चुकुन स्वतःच्याच व्हॅनसमोर आल्यावर ड्रायव्हरने ओरडल्यावर रडणारा तो मुलगा. यात कुणालाच काहीही चुकीचं वाटल नाही, कारण समोरच्या घटनेवरची ती इंस्टंट रियॅक्शन होती. हा सगळा गोंधळ ऐकुन त्या मुलाचे वडील खाली आले आणि त्या ड्रायव्हरच्या श्रीमुखात भडकावली कारण सगळ्यांसमोर त्या मुलाचा पर्यायाने त्याच्या पालकांचा अपमान झाला होता. सगळ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते पालक काहीही ऐकायच्या तयारीत नव्हते मुलाचे हुंदके फक्त त्यांना दिसत होते आणि ड्रायव्हरचा चढलेला आवाज.

बरं इतक करुनही ते थांबले नाहीत तर मुलाला व्हॅनमधुन उतरवुन ते स्वतःच शाळेत घेऊन गेले आणि जाताना, 'प्रिन्सिपलकडे तक्रार करतो, तुझी गाडीच बंद करतो वगैरे'. तो ड्रायव्हरही वैतागला आणि प्रकरण शेवटी हमरी- तुमरीवर आले.

हे सगळ चालू असताना नेहमीचे बघे, इतर लहान मुलं आणि त्यांचे पालकही होते. प्रत्येकाने या घटनेचा आपापल्या परीने अर्थ लावला. मला तरी हा उगीचच आकांडतांडव वाटला कुठल्याही गोष्टीला अवाजवी महत्व दिल्यासारखा.

पालकांची सहनशक्ती खरच इतकी कमी झालिये का की छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना अपमान वाटतो? शिक्षक रागावले की त्यांच्यावर राग धरला जातो. शिक्षकांनी शिक्षा केली की त्यांच्या तक्रारी अगदी प्रिन्सिपल आणि वेळप्रसंगी (काही दुर्दैवी घटनांमधे) पोलिसांपर्यंत जातात. शिक्षक काही ठिकाणी दोषी असतीलही. मुलांच्या भांडणातही हिरीरीने भाग घेऊन दुसर्‍याला ओरडणे मग त्याचा पालक आला की त्याच्याशी अरेरावी, खरच हे सगळं बरोबर आहे का?

माझ्या लहानपणी एकदा अ‍ॅडमिशन घेतली की नंतर पालक शाळेत फिरकायचेही नाहीत अगदी प्रगती पुस्तकावर सही पण घरून केली जायची. तेवढा विश्वास त्यांचा शिक्षकांवर पर्यायाने आमच्यावरही होता. स्कुलबसचे मामा, आम्हाला बसमधे दंगा केला की दरडवायचे, वेळप्रसंगी फटकेही द्यायचे पण कधीही चुकुन माझे पालक त्यांना विचारायला आले नाहित.

वर्गात शेजारणीचे खोडरबर तिला न सांगता घेतले म्हणुन सरांनी हातावर मारलेली उभी लाकडी पट्टी अजुनही आठवते. ते व्रण नाहीत हातावर पण पुन्हा कुणाला न सांगता त्याच्या वस्तूला हात लावायचा नाही हे मात्र कोरल गेलय मनावर. पट्टी मारल्यावर हात सुजलेला, सरांचा रागही आलेला. माझं सापडत नव्हत म्हणुन दोन मिनिटांसाठी तिचं खोडरबर घेतलं म्हणुन सगळ्या वर्गासमोर हातावर मारलेली पट्टी आणि नंतर केलेला तिर्थरुपांच्या संस्कारांचा उद्धार ऐकुन मेल्याहुन मेल्यासारखं झालेलं. पण घरी सांगायची हिम्मतच नव्हती कारण खात्री होती की सरांनी शिक्षा दिली म्हणजे मुलगीच चुकली असणार हा त्यांचा दृढ आत्मविश्वास.
अश्या बर्‍याच गोष्टी घडल्या आयुष्यात पण आपली चुक होती हे कळल की सगळा राग निवळायचा. आईने शिकवलेलं कुठल्याही गोष्टीवर स्वतःच्या बाजुने विचार करुन रियॅक्शन देण्यापेक्षा तासभर विचार कर सगळ्याबाजुने आणि मग ठरव की पुढचा चुक की बरोबर, हे अजुनही लक्षात आहे. त्यामुळे सकाळच्या घटनेने उगाच स्मृती चाळवल्या आणि माझ्या चष्म्यातुन त्या घटनेकडे बघितल्यावर त्याची तीव्रता कळली.

प्रश्न पुन्हा आहेतच. पाल्याला दोन मार्क कमी पडले तरी शाळेकडे धावणारे आपण, अभ्यासात मागे आहे म्हणुन शिकवण्यांचा भडिमार करणारे आपण आणि तरीही मुलाला कमी मार्कस पडले तर त्याच शिकवणीच्या शिक्षकांशी भांडणारे आपण, मुलाला कुणी वर्गात मारल कळल्यावर लगेच जाब विचारायला जाणारे आपण, सारासार विचार करण्याची कुवत गमाऊन बसलोय का?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घडलेला प्रसंग व त्यातून लेखिकेने मांडलेले प्रश्न आणि नंतरचे काही आणखीन प्रश्न हे सर्व वाचून असे वाटल की एवढ्याश्या प्रसंगावरून हल्लीच्या समाजातील लोक, पालक असे निष्कर्ष काढणे जरा साहसीच ठरावे. असेही असू शकेल की तो ड्रायव्हर याहीपूर्वी मुलांना असे काही ओरडून वगैरे बोलला असेल, त्याच्याबद्दल मुळातच लोकांच्या मनात राग असेल वगैरे. पण ललितापुरते म्हणायचे तर जे जसे घडले तस्सेच आहे असे मान्य केले तरी त्यातून इतके अनेक प्रश्न उभे राहावेत इतपत तो प्रसंग पोटेन्शिअलचा वाटला नाही व आपल्या काळातील व आजच्या काळातील मुलांची तुलनाही किंचित अस्थानी वाटली. तरीही ललितामागचा दृष्टिकोन व समाजात वावरताना दाखवलेली परिपक्वता अथवा तिची अपेक्षा या गोष्टी अतिशय स्तुत्य आहेत असे वाटते. अर्थात सर्वच प्रतिसाददात्यांच्या मतांचा व गुब्बींच्या मतांचा आदर आहेच, पण मला हा प्रसंग आजच्या समाजाच्या हृदयशून्यतेचे पुरेसे प्रातिनिधित्व करत आहे अथवा त्यावरून असे निष्कर्ष काढण्याजोगा आहे असे नाही असे वाटले. चुभुद्याघ्या

-'बेफिकीर'!

रोज ट्रॅफिक मध्ये वाहने चालवणारी अनेक उदाहरणं दिसतात ज्यांना वाहने देणे ही घोडचुक आहे व ज्यामुळे एखाद दोन लोक कुठल्याही क्षणी प्राण गमावतील असे वाटते.
>>>
केदार अनुमोदन. विषयांतर होतय पण.
रोज कंपनीत जाताना कितीतरी लहान मुले (१२च्या पुढे )बाईक चालवताना दिसतात. यांचे पालक कसे काय यांना गाड्या हातात देतात व ती मुलेही हमरस्त्यावर(पुणे-मुंबई हायवे)जिथे मोठमोठाले कंटेनर चालत असतात अश्या ठिकाणी बेदरकार पणे चालवत असतात देव जाणे. वरुन हेव्ही गाड्यांना ओव्हरटेक करण्याचा उद्दामपणा करतात अश्यात काही झाल तरी गाववाले मिळुन त्या कंटेनर चालकालाच मारतात आधी चुक कुणाची आहे हे बघण्यापेक्षा.

पण मला हा प्रसंग आजच्या समाजाच्या हृदयशून्यतेचे पुरेसे प्रातिनिधित्व करत आहे >>>

बेफिकीर हा प्रसंग केवळ निमित्त आहे. ज्याला वाचून इतरेजनांच्या मनात असलेल्या त्याच भावनांना तोंड फुटले. कोणीही निष्कर्ष केवळ ह्याच प्रसंगातून काढत आहे असे वाटत नाही.

ड्रायव्हरही रुड असतातच. त्याला झुकते माप देण्याचे कारण नाही! पण मुद्दा तो नाही, मुद्दा आहे एकुणच रुड बिहेवियरचा. प्रसंग म्हणजे कावळा समजा.

ओके केदार, तसे असल्यास बरेचसे अर्थातच पटलेच.:-)

पण मला असे वाटते की रूड बिहेव्हियर हे पूर्वीही होतेच, आता त्याबाबत जागरूकता आली असे वाटते.

जसे, पूर्वी शाळेत शिक्षक खरोखरच खूप मारायचे मुलांना, त्या वयातील मुलांना इतके मारावे का हा प्रश्न आज पडतो.पालक त्याकडे लक्ष द्यायचे नाहीत म्हणून मुले बिचारी होऊन मार खात राहायची. पण हे रूड बिहेव्हियरच आहे असे वाटते. आता त्याबद्दल जागरूकता आल्यावर आता पालकांची सहनशक्ती कमी झाली असे म्हणणे चूक ठरेल.

रुड बिहेव्हियर हे कालसापेक्ष आहे असे मला तरी वाटत नाही. Happy

रोज ट्रॅफिक मध्ये वाहने चालवणारी अनेक उदाहरणं दिसतात ज्यांना वाहने देणे ही घोडचुक आहे व ज्यामुळे एखाद दोन लोक कुठल्याही क्षणी प्राण गमावतील असे वाटते. पण केवळ आर्थिक सुबत्ता आहे म्हणून रस्तावर ते माज करतात. ज्याकडे पैसा तो मोठा हा समज पसरला गेला व तोच आज रुढ आहे. म्हणून माजाची उतरंडही तशीच आहे. >>>

परवाचीच एक गोष्ट, चिंचवड मधे १५ वर्षाचं बुटकं ठेंगणं कुठतरी क्लासला निघालं होतं. आई-बापाला येड्यात काढून किंवा हट्ट करून विगो मागून घेतली असेल. नायतर बापानं विकली असेल कुठेतरी जमिन बिमिन. पोरगं पोरींकडे बघत शायनियंग मारत हे जोरात चाललं होतं. समोरून दुधवाला आलाय हे सुद्धा त्याला कळलं नाही. ठोकली गाडी त्याला. इतक्या जोरात ठोकली कि दुधाच्या कॅन्डचं झाकण चांगलच वर उडालं आणि दुधही सांडलं. सुदैवानं काहीही लागलं नाही पण लोकांची गर्दी पाहून लागलं डोळे पाढंरे करायला. मग काय लगेच आई बापाला बोलावलं तर आई आल्या आल्या काय हो कळत नाही का तुम्हाला? पोराला हात लावला तर नाही ना? बाळा बघू काय झालं तुला? वगेरे वगेरे चालु. पण त्या दुधवाल्याची कामशेत लोकल चुकलेली, ५-६ लीटर दुध वाया गेलेलं आणि बिचार्‍याला गुडघ्याला लागलेलं पाहिलं नाही कुणी? मग काय बापानं लगेच लाल लाल कोर्‍या करकरीत नोटा काढल्या दुधवाल्याच्या हाती ठेवल्या आणि सहज म्हणाला घ्या मिटवून... अरेच्या हे काय? साला डोक्यात गेला होता तो.. आता क्लासच्या पोरांसमोर स्वतःच्या कारट्याला दोन झापडी दिल्या असत्या आणि गाडीच्या किल्ल्या काढून घेतल्या असत्या तर चांगला हट्ट जिरला असता पण हे सांगणार कोण? थोडं फार शासन, शिस्त हवीये. आता लहानी पोरं पोरी बदललीयेत आणि त्यांच्या प्रमाणं त्यांचे आई बाप सुद्धा. एवढं तर चालतं आजकाल.. काय होतंय तेव्हा? आपल्याला ह्या वयात परीस्थितीमुळे मिळालं नाही आता मिळतंय तर करूयात लाड हा अ‍ॅटीट्युड नडतो आणि भोवतं हे सगळ्ं.. बापाला एवढं सुद्धा कळलं नाही कि आपणच आपल्या पोराला आपल्यावर मात करायला चान्स दिलाय. उद्या पोरगं मोठा उद्योग करेन तेव्हा समजेल.

बेफिकीर, तुमच्याही मताचा आदर आहेच.
आपल्या काळातील विद्यार्थ्यांची आणि आजच्या विद्यार्थ्यांची तुलना याकरता की तुमचं मुलं तुम्ही जेंव्हा दुसर्‍याच्या स्वाधीन करता काही काळापुरत का होईना तर त्याच्यावर थोडातरी विश्वास ठेवायला हवा ना? प्रत्येक गोष्टीकडे शंकेने पाहिले की त्यांनी दिलेलं ज्ञान, शिकवण, संस्कार यावर शंका घेतल्यासारखं आहे ना?

>>> ज्याकडे पैसा तो मोठा हा समज पसरला गेला व तोच आज रुढ आहे <<< अचूक.
हा समज व पैशाद्वारे आलेला माज, गेल्या पाचपन्चवीस वर्षात फारच पसरला आहे, अन दाट लोकवस्तीच्या शहरात जरा जास्तच ठळकपणे उठून दिसतो, तर तुलतेन विरळ वस्तीच्या खेड्यागावी भागातुन तुरळक, पण तितक्याच तीव्रतेने जाणवू शकतो.

एकदा अ‍ॅडमिशन घेतली की नंतर पालक शाळेत फिरकायचेही नाहीत अगदी प्रगती पुस्तकावर सही पण घरून केली जायची.

बरोबर शुभांगी... Happy आमचे पालक कधी आले नाहीत शाळेत.. शिक्षकांनी मारले तरी किंवा शिक्षा म्हणून थांबवले तरी.. Happy

गाडी चालवताना इतका त्रास होतो.. आवाजाचा नाही होत एकवेळ पण लोकांचा माज असा सहन करायच्या पलीकडे गेलाय.. Sad

हम्म...
अशाच प्रकारे मुलांना दिलेले नको इतके संरक्षण त्यांना पुढील स्पर्धांसाठी कमकुवत बनवत राहते. सतत शाळेच्या शिक्षकांना काही समजत नसल्याचे दाखवणे, येता जात क्षुल्लक गोष्टींचे प्रमाणाबाहेर कौतुक, मुलांच्या खेळातही लुडबुड करणे, मुलामुलात भांडणे झाल्यास लगेच पालकांतही भांडणे होणे हे मुलांसाठीच प्रचंड नुकसान करणारे आहे. अशाने काहीही झाले तरी आईबाबा बघून घेतील हा पोकळ विश्वास फुगत जातो. आणि मग जेव्हा बोर्डाच्या परीक्षा, कॉलेज अ‍ॅडमिशन, प्रेमप्रकरणे सुरु होतात तेव्हा अचानक जाणवू लागणारी असुरक्षितता, स्वत: कुठेतरी कमी पडत असल्याची शंका, इतके दिवस मागेल ते मिळू शकणार्‍या मला आत्ताच का हवे ते मिळत नाही? या भावना तीव्र होऊन मारामार्‍या, आत्महत्यांच्या रुपात व्यक्त होतात. मग 'चांगल्या घरातला होता तो!' असे बोलले जाते. ही अतिशयोक्ती असली तरी सारा दोष आई वडिलांवर येऊन त्यांना 'आपण काय कमी केले की हा दिवस यावा?' असे कपाळाला हात लावण्याचे अनेक प्रसंग येतात. मुलांना समज येईल तसे मोकळे सोडावे. टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय, हरण्याचा अनुभव घेतल्याशिवाय जिंकल्याची किंमत कळणार नाही.
आपल्यापेक्षा मुलांचे भविष्य अधिक अनिश्चित, अधिक तीव्र स्पर्धेचे आहे हे लक्षात घेऊन पालकांनी मुलांना त्याला तोंड देण्यास सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा.

अ‍ॅक्चूली आजकालचे पालक हे मुलांच्या परिक्षा, त्यांच्या टेस्ट्स ह्या स्वतःच्याच असल्यासारखं वागतात. मला तर कधी आठवत नाही घरातल्या कुणी अभ्यास घेतलेला. बाबा फक्त सकाळी तोंडावरचं पांघरूण काढून घेऊन म्हणायचे, दहावीची विद्यार्थीनी तू.. काय उजेड पाडणार आहेस? इतका वेळ अंथरूणात पडून राहतेयस.
असो, अवांतर झालं खरं पण आजकालचा जमाना हा स्पर्धेचा आहे त्यात पालक, पाल्य सगळेच भरडले जातायत. it's a transition phase...

शुभांगी, छान मांडलं आहेस. आपल्या पाल्यावर चांगले संस्कार झालेपाहिजे आणि त्यासाठी आपण कितीही पैसा ओतून संस्कारवर्ग वगेरे लावू, चांगल्या शाळेत घालू जिथे सगळं काही असेल हा विचार बदलायलाच हवा.

हम्म! 'कोण कुठला फडतूस ड्रायव्हर माझ्या मुलाला ओरडतोच कसा?' अशी वृत्ती असलेले पालक असल्यावर हे असे प्रसंग उद्भवतात. आपल्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी ड्रायव्हर ओरडला हे देखील या पालकांना समजत नाही.
असे प्रकार पूर्वीही व्हायचे. फक्त प्रमाण कमी होते इतकेच. त्याच वेळी शिक्षक काय किंवा शाळेचे इतर कर्मचारी काय, कुणावरही पूर्णपणे विश्वास टाकणेही चूकीचे. लहान मूले चुकतात तशीच मोठी माणसेही चुकीचे वागू शकतात.

शुभांगी, छान लिहिलं आहेस. अगदी पटलं.
अरुंधती म्हणाल्याप्रमाणे ह्या लोकांची काही 'विशेष' लक्षणे आहेत. त्यातली ३,४ व ५ सद्ध्या खूपच दिसतात. >आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा हरवलाय आपण>> हा त्याचाच परिणाम.

त्याचबरोबर एकूणच समाजात खूप अस्वस्थता आहे. प्रत्येकाला स्वतःला 'प्रूव्ह' करायचय. रोजच्या जीवनात अनेक प्रसंगी मनाविरुद्ध नमतं घ्यायला लागतं, आणि मग जिथे जिथे संधी मिळते तिथे स्वतःचा वरचष्मा दाखवला जातो. दुर्दैवाने आपल्या समाजात 'मी कसा दुसर्‍याला झापला / गप्प केला' किंवा 'माझ्यावाचून दुसर्‍याचं काम कसं अडलं' हा मोठेपणाचा प्रमुख मापदंड होत चालला आहे असं मला वाटतं.

प्रत्येकाचा स्वतःची मुलं, हा सॉफ्ट कॉर्नर असतोच. वर हल्ली बर्‍याच घरात एकच मूल असल्यामुळे पालकांचं सगळं प्रेम त्याच्यावरच ओतू जात असतं. हातात असलेला प्रचंड पैसा त्या प्रेमाला अजून आंधळ करतोय असं वाटतं. पूर्वीपण असे लोक होते, एकूण समाजाच्या प्रमाणात थोडेच होते. सद्ध्या जो तो तशाच मनोवृत्तीचा होत चाललाय असं वाटतं.

पालकांची ही अरेरावी मुलं बघत असतात आणि कळत नकळत तेच बरोबर आहे असं समजू लागली तर भविष्यातले पालक कसे असतील ह्याची भीती वाटते.

गाडी चालवताना इतका त्रास होतो.. आवाजाचा नाही होत एकवेळ पण लोकांचा माज असा सहन करायच्या पलीकडे गेलाय.. >>>>>>>>>>>>>>

+१००

अगदी सहमत, डोक्यावर बर्फ ठेवून फिरावे लागते रस्त्यावर.
तरीही चिडचिड होतेच.

मूळ धाग्यात उल्लेख केलेल्या घटनेबद्दलही 'माज' हे एकच साधे आणि सोपे कारण आहे.
हा माज मुख्यत्वे भरपूर पैसा असणे किंवा राजकीय/गुन्हेगारी हितसंबध असल्यामुळे मिळणारी सुरक्षितता या दोन गोष्टीतून येतो.

पूर्वीच्या काळी देखील असे होते पण झपाट्याने वाढणाऱ्या आर्थिक/सांपत्तिक परिस्थितीमुळे असे 'माजुरडे' वाढतच चाललेत.

सुंदर विचार मांडले आहेत, शुभांगी... अगदी विचार करायला लावणारं.
प्रतिक्रिया आणि चर्चा अधिक बोधपर आहे... आणि त्यासाठी मूळ लेखिकेचे आभार.
वेळ!.. वेळ नाही! हेच कारण. खरतर जागा आणि वेळ. आपल्या डोक्यात, मनात विचारांना निर्माण व्हायला, प्रोसेस व्हायला जागा हवी, वेळ हवा...
नक्की काय झालय ह्याचा विचार करायला पालकाला वेळ नाही, डोक्यात जागाच नाही.
त्या बिथरलेल्या वडिलांना समजवायला आजूबाजूच्यांना वेळ नाही हे ही तितकच खरं.
वर्गात ६०-६५ मुलं. शिक्षकांना प्रत्येक पाल्यावर "संस्कारक्षम" असा घालवायलाच काय पण घरचा अभ्यास तपासायलाही वेळ नाही.
घरी आल्यावर आईला, वडिलांना मुलांबरोबर द्यायला वेळ नाही, मुलांनाही क्लासेस वगैरे मधून "वेळ" असा नाहीच.
जीव घाबरवणारं आहे हे सगळं.
शुभांगी, खरच सुंदर लेख आहे.

अतिशय छान ललित. खरच आज लोकांची सहनशक्ती, वैचारिक क्षमता, कमी झालेली आढळते. सारासार विचार करून बोलण्याची पद्धत आता लोकांना आउटडेटेड वाटत असावी कदाचित. कारण क्षुल्लक कारणावरून हमरीतुमरीवर येणारे आज काल पावलापावलावर सापडतात. कधी कधी अशा लोकांची कीव येते, साधा विचार करण्याची कुवत अशा माणसांकडे नसते, हे खरच दुर्दैव आहे.

पुण्यात महिला गटग झाले तेव्हा परत येताना मला व राखीला असाच काहीसा अनुभव आला. आम्ही दोघी प्लॅटफॉर्म वर खुप मागच्या बाजुला असल्याने, तिथे आलेल्या डब्यात चढलो. आणि काही सदगृहस्थांनी ''लेडीज डबा रिकामा आहे'' असं सांगितल्याने आम्ही गर्दीतून वाट काढत , नम्र भाषेत विनंती करत आम्ही हळूहळू जमेल तेव्हढे पूढे सरकत होतो. तेव्हा एक व्यक्ती अचानक आम्हा दोघींना पूढे जाऊ देऊ नका असे सगळ्यांना ओर्‍अडून सांगू लागला. आम्हा दोघींना कळेचना की हा असा का करतोय. तो माणूस आम्हाला अडवायचा प्रयत्न करू लागला. कसे बसे आम्ही पूढे निघालो तरी याची बडबड सुरूच! Uhoh आणि त्याचे वयही साधारण माझ्या वडिलांएवढे होते, त्यामुळे आम्ही फार काही न बोलता त्याला सौम्य भाषेत विचारले की ''काय प्रॉब्लेम आहे? लेडीजशी बोलण्याची ही पद्धत आहे का?'' तर आवाज अजून चढवून, '' स्वतःचे हेलीकॉप्टर का नाही वापरत तुम्ही? डायरेक्ट टू होम?''असा अनाहूत सल्ला आम्हाला मिळाला. शेवटी आम्हीच तोंडात आलेली मुक्ताफळे (आमची सारासार विचार बुद्धी अजूनतरी शिल्लक असल्याने) न उधळता तिथून काढता पाय घेतला.

आशुडी, आख्या पोस्टला अनुमोदन Happy
टोकुरिका, मग अशावेळेसच, आपला "व्हाईट् कॉलरवाद" अन "सुसंस्कृत लोकाम्बरोबर वागायचे सुसंस्कार" ताबडतोब बाजुला ठेवुन, अशा नालायक लोकांस "गाडी तुझ्या बापाची आहे का" असे मुस्काटीत चढवायची तयारी ठेऊन/चढवून विचारल्याखेरीज या समाजात तुमची गय होत नाही हेही तितकेच खरे. अहो पण मग "आपला तो पाण्ढरपेशेपणा"? त्याचे काय होणार?

सामाजिक भान आणि जाणीवा पुरेश्या सुसंस्कृत आणि समाजाभिमुख होण्याआधिच मिळालेलं अमर्याद स्वातंत्र्य तसेच सध्याच्या उदारिकरणाच्या वातावरणांत याच गोष्टींचं भान नसताना आर्थिक सुबत्तेतुन निर्माण झालेला अहंकार, दुराभिमान तसेच हाती आलेली सत्ता, हे ह्या आणि अश्या इतरही घटनांच्या मुळाशी असावं. हे भयंकर आहे >>>
>+१
आशुडी यांनी म्हंटल्याप्रमाणे भविष्यात अशा मुलाम्चे काही खरे नसते, पालक मुलांचे नुकसान करत असतात अशा वागण्याने.पण इथल्या प्रतिक्रिया वाचुन बरे वाटले की शहाणे-समजुतदार लोक अजुनही आहेत जगात.

बाकी काही संशोधनांनुसार ,सतत वेगवेगळ्या electrical+eletronic उपकरणांच्या सानिध्यात राहण्यामुळे आपल्या शरीराला सतत EMF (electromagnetic field)चे exposure असते,त्यातुन नकळतपणे काही शारीर आणि मानसिक त्रास बळावतात.पटकन राग येणे ,उच्च रक्त दाब ,मधुमेह ह्याची intesity EMF मुळे वाढते.आता नाइलाजच असतो अशी उपकरणे वापरणे कित्येकदा.
आजकाल अशा हमरी तुमरीवर येण्याच्या घटनांमधे वाढ होण्यामगे हेही एक कारण असावे.

शुभांगी, खरंच अशा वागण्यातून आपण आपल्याच मुलांना कमकुवत बनवत आहोत. तू दिलेल्या प्रसंगामधे,

१. ज्या कोणी त्या ड्रायव्हरच्या श्रीमुखात भडकावली, त्यांनी मुळात आपल्या मुलाला एकटंच रस्त्यावर सोडलं कसं एवढी काळजी आहे मुलाची तर? आणि जर ते त्या मुलाच्या बरोबरच असतील तर मुलगा रस्त्यात पळापळी करतोय तेव्हा हे काय करत होते?

२. ड्रायव्हरच्या श्रीमुखात भडकावण्याबद्दल ड्रायव्हरने कोणाकडे अब्रुनुकसानीची फिर्याद करायची? आणि अशी मारामारी करून ते तीर्थरूप मुलासमोर कोणता आदर्श ठेवतायत?

३. जर खरंच चूक ड्रायव्हरची असेल आणि तो अशाच प्रकारचे वर्तन कायम करत असेल तर मग आपल्या मुलाला त्या व्हॅनने पाठवायच्या वेळी यांनी नीट चौकशी केली नव्हती का?

४. आपल्या आई-वडिलांनी आपल्या गरजेच्या वेळी कधीच आपल्याला सपोर्ट केलं नाही, तसं मी माझ्या मुलाच्या बाबतीत होऊ देणार नाही अशी अनेक पालकांची भावना असते पण मग अगदी प्रत्येक गोष्टीत ते मुलांच्या पाठीशी उभे राहतात का? म्हणजे मुलांना असं वाटतं का, कारण सपोर्ट ही खूपच रिलेटिव्ह टर्म आहे.

लिंबूकाका, खरंतर ती व्यक्ती अतिशय अरेरावीत बोलत होती. मी त्याचे मुस्काट फोडायला कमी करणार नव्ह्ते. पण राखीने अडवलं, अन मलाही वाटलं की अशा निरर्थक अन वायफळ बडबड करणार्‍या मनुष्याच्या नादी न लागणे ह्यातच शहाणपण आहे.

सरांनी शिक्षा दिली म्हणजे मुलगीच चुकली असणार हा त्यांचा दृढ आत्मविश्वास. >>>>>>>

अशी लोकंच आता नाहित. ना तसे सर आता आहेत ना तसे पालक, ना तसा समाज!
आपली सारासार विचार करण्याची कुवत नाहि संपलेली. ती कधीच संपु शकणार नाहि! पण सारासार विचार करण्याची आणी त्याचे परिणाम सहन करण्याची - धमक आणी हिम्मत संपलेली आहे

>>>>घडलेला प्रसंग व त्यातून लेखिकेने मांडलेले प्रश्न आणि नंतरचे काही आणखीन प्रश्न हे सर्व वाचून असे वाटल की एवढ्याश्या प्रसंगावरून हल्लीच्या समाजातील लोक, पालक असे निष्कर्ष काढणे जरा साहसीच ठरावे. असेही असू शकेल की तो ड्रायव्हर याहीपूर्वी मुलांना असे काही ओरडून वगैरे बोलला असेल, त्याच्याबद्दल मुळातच लोकांच्या मनात राग असेल वगैरे. पण ललितापुरते म्हणायचे तर जे जसे घडले तस्सेच आहे असे मान्य केले तरी त्यातून इतके अनेक प्रश्न उभे राहावेत इतपत तो प्रसंग पोटेन्शिअलचा वाटला नाही व आपल्या काळातील व आजच्या काळातील मुलांची तुलनाही किंचित अस्थानी वा>>>><< +१

शाळेच्या ठिकाणी कमी स्पीड गाडी चालवणे ह्याची समज ड्रायवरला होती का?
तसेच जिथे शाळा आहे , तिथे मुलांचा वावरण्याचा/ रस्ता वापरण्याचा पहिला हक्क आहे. तो किती पाळला जातो?
मुलांना रस्त्यावर वाववरायचे कसे ह्याचे शिक्षण, तसेच ड्रायवरला गाडी कशी ,कोठे व लहान मुलांशी बोलायचे कसे व पालकांनी असे मुद्दे कसे हाताळायचे हा शिकवणीचा प्रश्ण आहे.

एवजी तुलनेला काहीच अर्थ नाही. आमच्या काळी... व आताच्या काळी... सदा सर्व काळ बदल घडत असतात, रहाणार. राहता राहिलं स्वभावाचं व संस्काराचं... बघ्याची भुमिका घेवून किंवा लेख वाचून आपण शेरे मारतोच ना... हा प्रकार कसले लक्षण आहे मग?

Pages