'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा २

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 February, 2012 - 11:56

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओ़ळख(आयडेन्टिटी)-' परिसंवाद विशेषांक

मंडळी, ह्या विषयावर काय लिहायचं ह्या बाबतीत तुमच्या मनात थोडा संभ्रम आहे असं आम्हाला वाटतंय म्हणून हा नवीन घोषणाप्रपंच. 'लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री' अर्थात Genderless Identity-Friendship असा हा विषय. 'लिंगनिरपेक्ष' ह्या शब्दाची तुमच्यापुरती असणारी व्याख्या काय ? आपलं स्त्री किंवा पुरुष असणं ही जन्मापासून असणारी अटळ ओळख आणि ह्या ओळखीवर झालेली कामाची विभागणी ( gender roles ) आपण बघतच असतो. असे असताना समाजात वावरताना हा महत्वाचा तपशील कधीकधी बिनमहत्वाचा होऊ शकतो का ? आपण स्त्री / पुरुष आहोत हे विसरुन केवळ एक मनुष्यप्राणी म्हणून वावरता येते का ? जर येत असेल तर असे कुठले प्रसंग तुम्हाला आठवतात ? आणि जर आपण स्त्री आहोत की पुरुष हे पुसताच येत नसेल तर का येत नसावे असे तुम्हाला वाटते ? व्यावसायिक जगात स्री/पुरुष याच्यापलीकडे जाऊन केवळ एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीची केवळ ज्ञान, गुणवत्ता यावर आधारित ओळख शक्य असते का? हे झालं स्व-ओळख - identity बद्दल.

एखादा माणूस स्वतःकडे कसा बघतो ( self-identity ) हा मुद्दा तो समोरच्याशी कसा संवाद साधेल ह्यावरही प्रभाव पाडतो.लिंगनिरपेक्ष मैत्री ही दोन मनुष्यप्राण्यांमधे असते. ती दोन माणसे स्त्रिया आहेत वा पुरूष वा स्त्री-पुरूष हा मुद्दाच जिथे बिनमहत्वाचा आहे अशी मैत्री ही लिंगनिरपेक्ष मैत्री. अशी मैत्री असू शकते का? अशी मैत्री होण्यास तुमची सामाजिक, वैचारिक बैठक महत्वाची भूमिका निभावते का ? की मैत्रीमध्ये लैंगिकता आड येऊ शकते ? तुम्हाला याबद्दल काय वाटते ?
एकदा लिंगाधारित ओळखीच्या पलीकडे जायचे असे ठरवले तर मग स्त्रीवाद ह्या शब्दालाच काय अर्थ उरतो ? स्त्रीवादाची खरंच गरज आहे का ? लिंगनिरपेक्षता आणि स्त्रीवाद हे परस्परविरोधी आहेत की लिंगनिरपेक्षतेपर्यंत पोचण्याचा तो एक टप्पा आहे ?

ह्या अनेक प्रश्नांची उकल करायचा प्रयत्न म्हणजेच हा परिसंवाद. हे प्रश्न दिले ते केवळ विचारप्रक्रियेला चालना द्यायला. त्यातल्या एखाद्याच मुद्द्याला धरुन तुम्हाला लिहावेसे वाटेल किंवा तुमचे लिखाण ह्यातल्या अनेक पैलूंना स्पर्श करेल. कदाचित ह्यात न आलेला सर्वस्वी वेगळाच मुद्दा तुम्ही मांडू पाहाल. थोडक्यात 'लिंगनिरपेक्ष ओळख / मैत्री ' खरंच अस्तिवात असू शकते / नसते / कधीकधीच असते ह्याविषयीचं तुमचं मत आम्हाला हवं आहे. तुमचं मत होकारार्थी / नकारार्थी काहीही असलं तरी त्याचं स्वागत आहे फक्त जे लिहाल ते विचारपूर्वक लिहिलेले असावे एवढीच अपेक्षा आहे.

हे मुद्दे लेखाच्या स्वरुपात लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात नव्हे.

तुम्हाला रोजच्या व्यापातून वेळ काढणे कठीण जात असेल हे लक्षात घेऊन लेख पाठवण्यासाठी मुदतवाढ करीत आहोत. लेख पाठवण्याची अंतिम तारीख आता २० फेब्रुवारी अशी आहे.

शब्दमर्यादा १०००.
तुमचे लिखाण आम्हाला ह्या लिंकवर पाठवा.

अजून एक विशेष सूचना. ही स्पर्धा नाही. हा केवळ परिसंवाद आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा विषय पुर्ण गोंधळात टाकणारा आहे.

मूळात म्हणजे ह्या विषयाची जाहिराती (apt) नाही वाटल्या तर विनोदी वाटल्या कारण ह्या विषयाच्या चर्चेतून नक्की काय अपेक्षित आहे हे कळू शकत नाही.

लिंगनिरपेक्ष मैत्री ओळख ह्या विषयात प्रेमाने मागणी(प्रपोज) करायचा काय संबध हे कळले नाही. इथे पुन्हा समाजाचे बंधन , केलेले वर्गीकरण असल्याने मुलगी मुलाला मागणी घालू शकत नाही असे सुचित करून वर परत लिंगनिरपेक्ष मैत्री/ओळख ती कशी काय? त्या वरून नक्की काय मुद्दे अपेक्षित आहेत?

आता मी जर मुलगी असेन तर समोरच्या 'मुलाला/मुलीला' मागणी घालू शकते लिंग विसरून असे आहे का? Happy
नक्की अर्थ स्पष्ट केला अश्या जाहीरातींचा तर बरे.

अशी जाहीरातीवरून बरेचसे लेख मग समाज , समाजाच्या चालीरीती मग पुरुष व स्त्री भेद... मग हळू हळू पुरुषाचे अत्याचार.. ,मुलीला दुय्यम वागणूक अश्या मुद्द्याने जाणार असेच दिसतेय.

उदाहरणार्थ, समजा मी स्त्री/पुरुष आहे हे विसरून मैत्री कशी करायची? एका ठराविक काळानंतर माझ्यातील बदलाने मी मुलगी/मुलगा आहे हे मला जाणवणारच.

एका स्त्रीने एका पुरुष डॉक्टराकडे न जाण्याचे कारणं बरीच असु शकतात (सामाजिक, लिंगाची जाणीव, शिक्षण वगैरे) त्यामुळे ती जाहिरात ही काही योग्य(apt) वाटली नाही ह्या विषयाबाबतीत.

लेख लिहायचाच झाला तर मग, हिंदी मूवीतील डायलॉग चपखल आहे एक लडका और लडकी कभी सिर्फ दोस्त नही बन सकते..
(There is nothing called platonic about relationship between girl and boy) Proud

हा विषयाला बरेच पदर आहेत व तशी चर्चा ही बोरींग होवु शकते. तरी एक इथलेच उदाहरण,

लिंगनिरपेक्ष मैत्री/ओळख असे जर सकारार्थी घेतले तरी मग संयुक्ता असा फक्त "स्त्रीयांसाठी" धागा उघडलाच नसता ना मग..

मी स्त्री/पुरुष आहे हे विसरून आणि समोरचा पण स्त्री/पुरुष आहे ह्याची तपासणी न करता काहीही चर्चा केलीच वा कशावरही गप्पा मारल्या असत्या .. मग मला संयुक्ताची गरज न्हवती. Happy
आता हे लिहिल्यावर आणखी लेख लिहायची गरज नाही वाटत. Happy

झंपी, मुद्दे चान्गले आहेत तुमचे. Happy पण.........
तुम्ही जे मान्डलय, ते "जे सर्रासपणे अस्तित्वात" आहे त्याचे वर्णन आहे.
अन जे सर्रास अस्तित्वात आहे, त्यात "लिन्गनिरपेक्षता" नाहीच्चे. (अन तस नस्त, तर तिकडे त्या दुसर्‍या एका धाग्यावर व्हॅलेन्टाईनडेच्या घाऊक प्रेमव्यक्त करण्याच्या, हल्ली कायद्याने "अधिकृत" मानल्या गेलेल्या प्रथान्च्या समर्थनार्थ इतक्या आयडीजच इतक्या अहमहमिकेने तुटून पडल्याच नस्त्या, नै का? Proud )

तरीही, जर आपल्याच आयुष्यात नीटपणे डोकावुन बघितले, तर मला नाही वाटत की दरवेळेसच एखादी व्यक्ति चौविस तास "स्वलिन्गसापेक्ष" जगत असते, वा परलिन्गी व्यक्तिबरोबर वावरताना/जगताना दरवेळेसच "परलिन्ग अस्तित्व" पायात खुपलेल्या बोचर्‍या काट्याप्रमाणे (वा उलटपक्षी गालावरुन फिरणार्‍या मोरपिसाच्या हळूवार प्रेमळ स्पर्षाप्रमाणे) जाणवुन घेत असते. जीवनात असे असन्ख्य प्रसन्ग, घटना, वेळा येतच अस्तात की त्या ठिकाणी लिन्गसापेक्षता गळून पडते. हां, असे अनुभव आलेच नसतील, तरीही इम्याजिन करुन बघायलाही काय हरकत आहे?
अन तरीही, अशा वेळा, अशी स्थळ, अशा घटना, एकुण मानवी आयुष्यात तुरळकच अस्तात. अन म्हणूनच, व्यवहारात शम्भर टक्के लिन्गनिरपेक्षतेची अपेक्षा मला तरी अनैसर्गिक वाटते पण त्याचबरोबर, जिथेतिथे स्त्रीपुरुष भेदही अवाजवी वाटतो.
असो. तर याबद्दलच जे तुम्हाला वाटते ते सोदाहरण/चर्चात्मक मांडायचे असावे. अस्तित्वात काय आहे ते मांडाच, पण त्यात बदल होऊ शकतो का? असा बदल असूच शकतो का? त्याची गरज आहे का? वगैरे वगैरे.... ! Happy

<<मला नाही वाटत की दरवेळेसच एखादी व्यक्ति चौविस तास "स्वलिन्गसापेक्ष" जगत असते, वा परलिन्गी व्यक्तिबरोबर वावरताना/जगताना दरवेळेसच "परलिन्ग अस्तित्व" .. जाणवुन घेत असते. जीवनात असे असन्ख्य प्रसन्ग, घटना, वेळा येतच अस्तात की त्या ठिकाणी लिन्गसापेक्षता गळून पडते>> +१

लिंबुभौ, तुमचं माझं कधी नव्हे ते या वाक्यापुरतं एकमत झालं की Happy

लिंगनिरपेक्ष मैत्री/ओळख असे जर सकारार्थी घेतले तरी मग संयुक्ता असा फक्त "स्त्रीयांसाठी" धागा उघडलाच नसता ना मग..

मी स्त्री/पुरुष आहे हे विसरून आणि समोरचा पण स्त्री/पुरुष आहे ह्याची तपासणी न करता काहीही चर्चा केलीच वा कशावरही गप्पा मारल्या असत्या .. मग मला संयुक्ताची गरज न्हवती.
आता हे लिहिल्यावर आणखी लेख लिहायची गरज नाही वाटत.

१०००० अनुमोदन ! संयुक्ता हा ग्रुप फक्त स्त्रीयांसाठी आहे ना. मग हि चर्चा कशाला? मुळात ज्यांनी या परिसंवाद उपक्रमाची घोषणा केलीये तेच लिंगभेद मानतायेत. अर्थात, माझा आक्षेप संयुक्तावर मुळीच नाही कारण असा एखादा प्लॅटफॉर्म असावाच. पण हा विषय निवडण्याचे कारण समजले नाही.

>>>पण हा विषय निवडण्याचे कारण समजले नाही<<

बरोबर. मलाही कळले नाही आणि न कळण्याचे कारण हेच की, जर आपण( चर्चा घडवू पहाणारे (संयुक्ता ग्रूप)) अजुन भेदात अडकले आहे मग ह्या फुकाच्या गप्पा वा चर्चा कशाला?

ह्या चर्चेपुरता हा धागा ओपन करून ही चर्चा करा मग काय करायचे पुन्हा "फक्त स्त्रीयांसाठीचे विषय असले की धागा मर्यादित करायचा का? Happy

ही अशी चर्चा मला तर " बेसिक मे लोचा है भाइ" असे वाटले.
पुन्हा, मला काही संयुक्ताची अ‍ॅल्रर्जी नाहीये.. (नाही कारण काही लोकं अर्धवट पोस्ट वाचून इतक्याच निर्णयात येवो शकतात त्याच्या क्षमतेनुसार म्हणून हे वाक्य खुलासासाठी.. आता तरीही असेच मत होत असेल तर त्यांच्या बु. दो.समजेन)

झंपी, मी तूमच्याशी सहमत आहे. मी मुद्दाम लेख दिला आहे. आपणही अवश्य आपले विचार लिहा. किंवा जे लेख प्रसिद्ध होतील त्यावर अवश्य प्रतिक्रिया द्या.

झंपी यांच्या मताशी पूर्णपणे सहमत.
हाच विषय जरा वेगळ्या पद्धतीने मांडला.. म्हणजे नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी लिंगनिरपेक्षता असे काहीतरी तर जरा जास्त मुद्देसूद चर्चा होऊ शकेल असे वाटते.

>>>> संयुक्ता हा ग्रुप फक्त स्त्रीयांसाठी आहे ना. मग हि चर्चा कशाला? मुळात ज्यांनी या परिसंवाद उपक्रमाची घोषणा केलीये तेच लिंगभेद मानतायेत. <<<
रायबा अन झम्पी, क्षणभर मान्य की आयोजकच "संयुक्ताचे रुपाने" लिन्गभेद मानताहेत, पण इथे "आयोजक संयुक्ता" याचेवर निशाणा न साधता, तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात "लिन्गनिरपेक्ष मैत्री/ओळख" इत्यादीमधे जगु शकला आहात का, जगू शकाल का, किम्बहुना, एकुणच "मानवी जीवनात" (संयुक्ता मण्डळात नाही Proud ) लिन्गनिरपेक्ष सहजीवन असू शकते काय, याबाबत तुमचे प्रत्यक्ष अनुभव वा विचार मांडणे अपेक्षित आहे.
आता अस आहे, मी पुर्वी हापचड्डि घालायचो, पण मग काय आयुष्यभर हापचड्डिच घातली का ? विचार केलाच ना की फुलप्यान्ट घातली तर काय होईल? हल्ली तर मी धोतरही नेसुन सगळीकडे वावरतो, ते प्यान्ट टाकुन धोतर नेसायचा विचार केला म्हणूनच ना? तसाच विचार करण्यासाठी एक धागा 'संयुक्ता"ने प्रस्तावित केला तर बिघडले कुठे? त्यान्नी काय "लिन्गनिरपेक्षता" असा शब्द उच्चारल्या उच्चारल्या मला लगेच प्याण्टधोतर वगळून साडी नेसायची सक्ती नै केलीये! नै का? Wink Proud सबब, विषय कुणी प्रस्तावित केलाय यापेक्षा, विषयावरील, तुमची मौलिक मते मांडलीत तर ते अधिक चांगले नाही का? Happy

तुमचे आक्षेपही लेखाच्या स्वरूपात पाठवल्यास चालेल.
शब्दमर्यादा १०००
अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०१२

लिंबू, यावर तुझं असं उत्तर? नवलंच झालं म्हणायचं Proud फारच प्रभाव पडलेला दिसतोय या एकूण विषयाचा. आता आपण थेट भेटू परिसंवादाच्या चर्चेत.

रायबा अरे नवल काय त्यात? (नीटच तर लिहीलय ना सांसदीय भाषेत? :चिंताक्रान्त चेहरा:

बर, ठीके, मग भेटूच तर परिसंवादाच्या चर्चेत (की च्यर्च्येत? आयमीन कुरुक्षेत्रावर? Proud )
(मी माझा एक लेख केव्हाच दिलाय, पण अजुन लिहायच आहे तर वेळ मिळत नाहीये. Sad तू तुझा देऊन टाक बघु चट्टकिनी!)

>>रायबा अन झम्पी, क्षणभर मान्य की आयोजकच "संयुक्ताचे रुपाने" लिन्गभेद मानताहेत, पण इथे "आयोजक संयुक्ता" याचेवर निशाणा न साधता, तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात "लिन्गनिरपेक्ष मैत्री/ओळख" इत्यादीमधे जगु शकला आहात का, जगू शकाल का, किम्बहुना, एकुणच "मानवी जीवनात" (संयुक्ता मण्ड<<<

अहो, पण आम्ही मायबोलीला आपले जीवन मानले आहे ना... Happy
आता उठल्यापासून ह्या स्थळावर काय होते नी काय नाही ह्याच्यातून आम्ही बोध घेतोच ना.. मग निशाणा संयोजकावरच साधलाय असे कशाला म्हणताय राव? उगाच काय.. जे डोक्यात नाही ते घालताय(आमच्या नाही हो, त्यांच्या( संयोजकाच्या)).:)

आता ग्रूपवर नजर केली तर आमचा गोंधळ उडतो ना की संयोजकासारखे (उच्च पातळीवर(वैचारीक दृष्ट्या हुशार )लोकांकडूनच आम्ही शिकणार ना.. मग तेच जर अजून उजवे डावे करून सुरुवात करतील मग आमचा तराफा डगमगणारच ना.
शेवटी मायबोलीवर पण समाजाच्या एका स्तराचे चित्रण होतेच ना. मग तिथून मिळालेल्या माहीतीनुसार, आचाराविचारानुसार बरेच लोक बोध घेतातच ना.. तेव्हा ग्रूप कोणी काढला हे दुय्यम ठरत नाहीच.

उदाहरणार्थ, आता धर्माच्या गोष्टी करत नाही असे म्हणणार्‍या पक्षाची पंच लाईन अशी असेल, "गर्वसे कहो हम हिंदू है" आणि त्यांनीच उद्या सांगितले की , धर्म नसता तर देश कसा असता? अशी चर्चा जनतेकडून अपेक्षित आहे असे म्हटल्यावर कसे वाटेल? Proud

बाकी, लिंबू तुमचा तराफा डगमग्लाय काय आधीच? तसेही तुमची पोस्ट वाचली (दोन वाक्यापुढे) डगमगायला होते... आम्हाला नाही हो... (आमच्या विचारांना की अरे आज काय वाचताय हे... ? ह्या विचाराने.) Proud

ह. घ्या.

संयोजक सांगतीलच, पण मला वाटतं इथे कोणी कोणाला २४X७ लिंगनिरपेक्ष जगायला सांगत/सुचवत नाहीये. ते शक्यही नाही आणि तशी आवश्यकताही नाही.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की संयोजकांनी बर्‍यापैकी स्पेसिफिक विषय दिला आहे.
ओळख (आयडेन्टिटी या अर्थी) आणि मैत्री या दोन पातळ्यांवर काही जागा / काही वेळा तरी आपल्या आयुष्यात असू शकतात की नाही, जिथे लिंग हा भाग मागे पडेल?

आपली ओळख आपल्याच मनात कशी असते / कशी तयार होते? ती नातेसंबंधांतून (अमुक यांचा/ची मुलगा/मुलगी किंवा अमुक यांचा/ची नवरा/बायको) येते का, आपल्या कामातून येते का, आपल्या छंदातून येते का, आपण काही विषयांवर बोलायचं / विचार करायचं / कृती करायचं बुद्धीला पटत असूनही अमुक जेन्डरचे आहोत म्हणून टाळतो का? आपण स्वतःसकट कोणाविषयी बोलतांना 'मुलगी असून / मुलगा असून' अशा शब्दांनी सुरू होणारी वाक्यं उच्चारतो का? का?
आपण भिन्नलिंगी व्यक्तींशी सहज मैत्री करू शकतो का? ती करतांना / निभावतांना केवळ लिंगभिन्नतेमुळे त्यात काही संकोच किंवा उलटपक्षी चोरटेपणा येतो का...

मला विषयाचा अर्थ आणि आवाका कळला तो असा.
यात अर्थातच मतमतांतरं असतील आणि तशी ती असावीतच आणि मांडली जावीतच. तरच त्याला परिसंवाद म्हणता येईल.

राहता राहिला संयुक्ताचा मुद्दा.
संयुक्ताच्या सुरुवातीच्या काळात असा ग्रूप का तयार केला याबद्दल प्रकट निवेदन मायबोलीवर केलं गेलं होतं.
स्त्रियांना स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल खुलेपणाने आणि विश्वासाने मतप्रदर्शन / वैचारिक आदानप्रदान करता येण्यासाठी ही एक जागा मायबोलीने उपलब्ध करून दिलेली आहे. संयुक्ताचं सदस्यत्व (उद्योजक ग्रूपप्रमाणेच) वैयक्तिक माहितीची पडताळणी करूनच दिलं जातं. यामुळे सदस्यांना परस्परांविषयी विश्वास वाटतो आणि आवश्यकतेनुसार सखोल चर्चा आणि कृती करता येते.

याचा अर्थ संयुक्ता सदस्य जनरल विषयांवर संयुक्ताबाहेर मतप्रदर्शन करत नाहीत का? अर्थातच करतात. 'यांना कशाला वेगळा ग्रूप लागतो' हा प्रश्न अप्रस्तुत आहे. काही बाबींची चर्चा जाहीरपणे आणि जिथे आयडीजची विश्वासार्हता प्रमाणित नाही तिथे करणं स्त्रियाच काय, कोणालाही संकोचाचं वाटतं.
तसंच
>> लिंगनिरपेक्षता आणि स्त्रीवाद हे परस्परविरोधी आहेत की लिंगनिरपेक्षतेपर्यंत पोचण्याचा तो एक टप्पा आहे ?
हा प्रश्न खुद्द संयोजकांनी उपस्थित केला आहेच. या अनुषंगाने लिहायची मुभा सर्वांना आहेच.

संयोजक, इथे मुदलात विषयाबद्दलच प्रवाद दिसले म्हणून ही पोस्ट लिहिली आहे. अयोग्य / अस्थानी / दिशाभूल करणारी वाटल्यास जरूर उडवा.

स्वाती, उत्तम पोस्ट! अगदी माझ्या मनातले! मला असे सुसंगत मांडता नसते आले. खूप खूप धन्यवाद!

>>>> लिंगनिरपेक्षता आणि स्त्रीवाद हे परस्परविरोधी आहेत की लिंगनिरपेक्षतेपर्यंत पोचण्याचा तो एक टप्पा आहे ?
>>हा प्रश्न खुद्द संयोजकांनी उपस्थित केला आहेच. या अनुषंगाने लिहायची मुभा सर्वांना आहेच.

अगदी! स्वातीशी सहमत.
मला वाटते त्यासाठीच स्त्रीवाद या विषयांच्या जोडीने आला आहे.

शुम्पी + १

जाहिरातींमुळे थोडा गोंधळ झाल्याची शक्यता आहे पण अगदी नेमका विषयच काय हे न समजण्याइतका गोंधळ वगैरे अजिबात वाटत नाही.

ज्या कुणाला ह्या विषयावर लिहावसं वाटतं आहे पण काय लिहावं ह्याबद्दल गोंधळ आहे त्यांनी कॄपया वरची घोषणा परत एकदा नीट वाचावी अशी विनंती आहे. त्याचबरोबर घोषणा क्रमांक १ आणि ह्या धाग्यावरील स्वाती_आंबोळे ह्यांची पोस्टही वाचावी. ह्या सगळ्यांतून विषय पुरेसा स्पष्ट होत आहे असे आम्हांला वाटते.
तरीही काही शंका, प्रश्न मनात असतील तर जरुर विचारा. आम्ही त्याचे उत्तर द्यायचा पूर्ण प्रयत्न करु Happy

जाहीराती नक्कीच गोंधळात टाकणार्‍या आहेत.

तशी वरची पोस्ट पहाता पुर्णपणे परपस्पर विरोधी (contradictory) गोष्टी बोललेल्याच दिसते आहे Wink

संयुक्ताचे उदाहरण बाकी वेगळ्याचे 'अंगाने' घेतलेले दिसतय. हाच तर घोळ आहे ना.. Wink

बाकी >>आपण भिन्नलिंगी व्यक्तींशी सहज मैत्री करू शकतो का? ती करतांना / निभावतांना केवळ लिंगभिन्नतेमुळे त्यात काही संकोच किंवा उलटपक्षी चोरटेपणा येतो का...
>>> स्त्रियांना स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल खुलेपणाने <<<
हि खरी मेख आहे. Wink

झंपी, तुम्ही तुमच्या मनातले सगळे गोंधळ लेखाच्या स्वरूपात का बरे मांडत नाही?

जाहिरातींबद्दल - संभ्रमात पडल्याशिवाय विषयाचा शोध कसा चालू होईल.

वरती मांडल्या गेलेल्या मुद्द्यांच्यातून एव्हाना लिंगनिरपेक्षता या संदर्भाने सर्व बाजूंनी चर्चा अपेक्षित आहे हे तुम्हाला लक्षात यावे.
इतकी तीव्र मते असतील तुमची तर ती बाजू परिसंवादात अधिकृतरित्या यायलाच हवी.

जरूर लेख लिहा. अजून २ दिवस आहेत.
शब्दमर्यादा: १०००

किंवा नाहीतर अ‍ॅडमिन किंवा वेमा यांना संयुक्ता असणे, संयुक्ताने हा उपक्रम करणे, हा उपक्रम एकूणातच होणे या सगळ्याबद्दल आक्षेप घेणारं खरमरीत पत्र लिहा बरं. कुणी सांगावं तुमचा जर वेगळा काही त्रास असेल तर त्याने दूरही होईल.

जाहिरातींबद्दल - संभ्रमात पडल्याशिवाय विषयाचा शोध कसा चालू होईल. >>> वा, अपयश लपवावं तर असं. एकतर जाहिरातीं मधून गोंधळ निर्माण करायचा आणि असं शंका निरसन करायचं. किमान संयोजकांकडून तरी हे अपेक्षित नव्हतं. अर्थात मी माझं खरमरीत पत्र संयोजकांना पोहचवलं आहेच. आता त्याचं खरमरीत प्रमाणावरूनच ते निवडावं कि नाही हे ठरेल. अर्थात, तो निर्णय संयोजकांनी राखून ठेवलेला आहेच घोषणेप्रमाणे.

स्वाती_आंबोळे, आपली पोस्ट आणि संयुक्ताबद्दल काही गोष्टी क्लिअर केल्याबद्दल धन्यवाद. पण इथेही या विषयाला अनुसरून जेव्हा 'संयुक्ता' बद्दल शंका घेतली गेली तेव्हा आपण रितसर उत्तर दिल्याचं कौतुक वाटतं.स्त्री सदस्यत्वाची विश्वासाहर्ता पडताळून संयुक्ताचं सभासद करून घेतलं जातं पण इथे किती तरी असे सभासद आहे कि जे नात्याने नवरा-बायको आहेत तेव्हा त्या स्त्रीच्या पतीच्या विश्वासअहर्तेबद्दल काय? ती कुठे पडताळून पाहिली जाते? आणि संयुक्ता सभासद तिथली चर्चा आपल्या नवर्‍याशी शेअर करत नाही हे कशावरून? आणि ती शेअर केली तरी हरकत नाही पण त्या नवर्‍याने त्याबद्दल बाहेर कुठेही चर्चा केली नसेल हे हि कशावरून ? अर्थात हा वाद नव्हे किंवा संयुक्ताच्या ह्या अश्या स्तुत्य उपक्रमावर कारण नसताना अश्या नाहक शंका घेणे गरजेचे नाहिये पण.... ! जाहिर प्रकटन करून लोकांना तो विषय काय आहे याची ओळख करून दिली जाते पण मुळात त्या सभागृहात काय आणि कोणत्या मुद्यांवर चर्चा होते यावर पडदा टाकला जातो. त्यामुळे इथे सहजासहजी शंका घ्यायला वाव आहे.

संयुक्ता ग्रुपने काही सर्व्हे केलेत त्याबद्दल सविस्तर वाचतोच आहे. त्यातल्या लिंगभेदानुसार कुटुंबातल्या कामाची विभागणी हा भाग वाचतो आहे. Happy इथे आणखी जास्त चर्चा करण्यात काहीही अर्थ नाहीये.

मलाही या विषयाचा अर्थ आणि अवाका कळलाय पण कदाचित हा परिसंवाद संयुक्ता अंतर्गत न होता संपूर्ण मायबोली अंतर्गत व्हायला हवा होता. हे माझं वैयक्तिक मत.

>>>कुणी सांगावं तुमचा जर वेगळा काही त्रास असेल तर त्याने दूरही होई>>><<<

अहो आम्ही फालतु आहे, अतिशय भयाण आहे अश्या शब्दात तुमच्यासारखे कुणाच्या प्रतत्नांना किंवा कामाला(जाहीरती बद्दल) हीणवायची सवय नाही कारण तशी 'भाषा' आम्ही वापरतच नाहीच मुळी. तरी तुम्ही चिडलात. कमाल आहे कारण तुम्ही रोजच्यासारखी प्रतिक्रिया दिली नाहीत.
(काहे लोकं खरी भाषा म्हणतात, ते म्हणजे नक्की काय ह्याचा अर्थ आम्हाला विचारु नका. हवा असेल तर संपर्क देतो).

अरेरे, पण तुम्हाला नक्कीच त्रास झालाय हे दिसून आले ह्या वाक्याने.

बाकी, खरे तर प्रामाणीकपणे लेख लिहायचा विचार होता एका चांगल्या विचाराने. पण लिहून उपयोग नाही असे दिसते.

कारण तुम्ही आधीच त्रासलेले आहात, आणखी त्रासलेल्या त्रास देण्यात काय अर्? (हे वाक्य, ज्याला समजत नाही, त्याला सांगण्यात काय अर्थ किंवा ज्यला अपचन झालेय त्याला कशाला आणखी खायला घाला असे वाचलेत तरी चालेल ). Happy

---------------------------------------
आजची पाटी: फुकट दात विचकायला माणसं मिळतात, आजच करा कॉन्टॅक्ट, रीकामी बसलीत आहेत. Wink

स्वाती आंबोळेची पोस्ट उत्तम आहे.
ह्या विषयावर जास्त एक्स्प्लेन करु इच्छित नाही कारण परिसंवादाच्या दृष्टीनं ते योग्य होणार नाही - ह्याशिवाय नीधपने सांगितल्या प्रमाणे घोषणा वाचा.

मलाही या विषयाचा अर्थ आणि अवाका कळलाय पण कदाचित हा परिसंवाद संयुक्ता अंतर्गत न होता संपूर्ण मायबोली अंतर्गत व्हायला हवा होता. >> हा परिसंवाद संयुक्ता अंतर्गत होत नाहिये, तर मायबोली आयडी असणारं कुणीही ह्यात सहभागी होऊ शकतं. संयुक्ता केवळ ह्याचं आयोजन करतेय.

ह्यापलिकडे विषयाला अनुसरुन वेगळी मतं असतील तर परिसंवादात सहभागी व्हा.

हा परिसंवादाविषयी असलेल्या शंकासाठीचा धागा आहे. संयुक्ता कशासाठी ह्या चर्चेसाठी प्लीज योग्य धागा वापराल का?

मामी..अर्थातच ! जेवढं पडद्याबाहेर आहे तेवढ्याचा तर दांडगाच अभ्यास करतोय. आता पडद्याआड गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यातल्या गोष्टी, प्रयोजन समजावून घेण्यासाठी मला यासारख्या शंकाच उपस्थित कराव्या लागतील ना? बाकी, मामी आपण नक्की माझ्या अभ्यासाचं कौतुक करताय ना? Proud रच्याकने, शंका उपस्थित करणे याला उगाच वाद उकरून काढणे अशी मतं मांडणार्‍यांचा प्रवाह इथे गृहितच आहे.काही दिवसांपुर्वीच्या अनेक चर्चेमुळे ते अधोरेखित झालेलंच आहे.
माझा अभ्यास किती आणि केवढा हे वाचलेलं पुस्तकावरूनच ठरवता येईल ना? आता पुस्तकाची काही पाने दडवलेली असेल तर मी तरी काय करणार म्हणा. शेवटी अडाणीपण आणि त्यातून निर्माण होणारं कुतुहलच अश्या शंका उपस्थित करतं ना?

या विषयावर लिहिण्याचं माझ्यासाठी एक आव्हानंच होतं आणि ते आव्हान स्विकारुन संयोजकांना प्रतिआव्हान देण्याचं काम मी नक्कीच केलंय.

नानबा, वरच्या पोस्टींमधे काहीही गैर वाटल्यास त्या पोस्ट जरुर उडवाव्यात. यापुढे इथे या विषयावर चर्चा होणार नाही.

Pages