शांततेचा सूर...

Submitted by स्मितागद्रे on 6 February, 2012 - 22:25

"बस एक चुप सी लगी है, नही उदास नही" सन्नाटा चित्रपटातल हे गाणं परवा अगदी अचानक पणे रंगोलीत ऐकायला मिळालं. रंगोलीत अधून मधून अजून ही बर्‍यापैकी जुनी हिंदी गाणी लावतात. कधी कधी अस अचानक ऐकायला मिळालेल आवडीच गाणं, मुद्दाम ठरवून ऐकलेल्या गाण्यांपेक्षाही जास्त आनंद देऊन जातं तसच काहीस झाल.

सकाळच्या विसंगत वेळातही ह्या शांत गाण्याने लक्षवेधून घेतलं. तबला पेटी पलिकडे एकही वाद्य वाजवलेलं नाही.चाल पण धापा टाकायला लावणारी नाही.. लांबलचक ताना नाहीत.. पण मधे परिणामकारक ठेहेराव मात्र आहेत.(जे एखाद्या वाद्याचंच काम करतात.) ज्यातून शांततेचा सूर, सौंदर्य गवसत . अशी शांतता जी फक्त हिमालयातल्या एखाद्या शिखरावर एकटं बसल्यावर सापडेल असं वाटतं. या गाण्यात त्या शांततेच्या शिखरावर नेण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळेच हे गाणं ऐकल्यावर शांतता हे ही एक आवश्यक जीवनसत्व वाटायला लागतं. हेमंतकुमारच्या आवाजातल हे गाणं ऐकणं म्हणजे जणू आपणं आपल्या अंतर्मनाशी संवाद साधल्या सारख वाटतं. त्यांचा तो अनुनासिक स्वर, शांत ,आशय अभिप्रेत करणार संगीत.पुन्हा शब्द, संगीत की आवाज ? नक्की कशामुळे हे गाण हृदयाला भिडत ते ठरवता येत नाही.

हेमंत कुमारचा धीरगंभीर आवाज,त्यातली खोली आणि त्यांनी दिलेल संगीत मला नेहमीच आकर्षित करत. त्यांनी संगीत दिलेली गाणी इतके वर्षांनी ऐकली तरी सतत आपल्या मनात रुंजी घालणारी, अविस्मरणीय वाटतात.
विलक्षण जादू आहे ह्या माणसाच्या आवाजात आणि संगीतात.अशा शांत, गुढ,गम्य चाली देण्यात बंगाली संगीतकारांचा हातखंडा असावा.

वानगी दाखल त्यांनी संगीत दिलेलं 'चले आओ चले आओ', गीता दत्त नी गायलेल, साहब बीबी और गुलाम मधलं हे गाणं ऐकुन बघा http://www.youtube.com/watch?v=n_FJJr_AVdE
पडद्यावर पाहीलं तर ते अक्षरशः थरकाप उडवतं. 'आपण मध्यरात्री रस्त्यावर एकटेच जीव मुठीत धरून, दबकत दबकत चाललो आहोत' असलं काही तरी वातावरण निर्माण करत.

त्यांनी नुसती शांत, गूढ गम्य चालीची गाणी नाही तर तर विनोदी गाणी पण तितक्याच सहजपणे दिलीयेत
त्यातलीच ही काही गाणी
१. गाना न आया, - किशोर कुमार - मिस मेरी (हे गाणं म्हणताना किशोर कुमारनं पडद्यावर पण
धम्माल आणलीय). http://www.youtube.com/watch?v=-dtgef9cxtw
२. हवाँओंपे लिख दो, किशोर कुमार - दो दुनी चार
३. कश्तीका खामोश सफर है, - किशोर कुमार व सुधा मल्होत्रा, गर्ल फ्रेन्ड.
(दोन प्रेमीं मधले तरल क्षण भावपूर्ण चालीने पेललेले आहेत.)
४. अनुपमा चित्रपटातली या दिलकी सुनो, भीगी भीगी फिझा (आशा भोसले), धीरे धीरे मचल (लता) मंगेशकर

काही वेळा शब्द आणि संगीता पेक्षाही ,केवळ त्यांच्या आवाजामुळे गाण्याचा आशय थेट व्यक्त होतो. त्यांनी सी रामचंद्र, एस डी बर्मन यां सारख्या त्याकाळच्या आघाडीच्या संगीतकारांकडे ही अनेक गीत गायली. जाल चित्रपटातल "ये रात ये चांदनी फिर कहां" किंवा अनारकली चित्रपटातल "जिंदगी प्यार की दो चार घडी" , बात एक रात की मधल "ना तुम हमे जानो" अशांसारखी किती तरी गीत, त्याला दिलेल्या संगीतापेक्षाही त्यांच्या मार्दवी आणि आर्जवी आवाजा मुळे कदाचित जास्त लक्षात रहातात.

हि काही त्यांनी इतर संगीतकारांकडे गायलेली गाणी आजही तितकीच चिरतरुण आणि लोकप्रिय आहेत

१. लहरोंपे लहर
२. जाग दर्दे इश्क जाग
३. मी डोलकर
४. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
५. ना तुम हमे जाने
६. नैन से नैन
७. ये रात ये चांदनी फिर कहां
आणि या सरखी अजून कितीतरी

त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी म्हणजे केवळ अनुभूतीचीच गोष्ट आहे.त्यांनी दिलेल संगीत त्यांच्या आवाजा एवढच परिणामकारक वाटतं. ते जेवढे गायक म्हणून प्रसिद्ध होते, तेवढेच उत्कृष्ट संगीतकारही. त्यांच संगीत जास्त परिणामकारक की आवाज हे ठरवणं कठीणं आहे.त्याच संभ्रमात टाकणारी त्यांनी संगीतबद्ध केलेली ही काही अप्रतिम गाणी

१.कुछ दिल ने कहा - अनुपमा
२.बेकरार करके हमे यु न जाईये, - बिससाल बाद
३.न जाओ सैंया , भंवरा बडा नादान है - साहिब बीबी और गुलाम
४.ओ बेकरार दिल ,ये नयन डरे डरे -कोहरा
५.तुम पुकार लो , वो शाम कुछ अजीब थी- खमोशी
६.जिंदगी कितनी खुबसुरत है - बिन बादल बरसात
७.वंदे मातरम - आनंद मठ
शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारं मिस मेरी चित्रपटातल, लता बाईंनी गायलेल ' सखी री सुन बोले पपीहा उस पार' किंवा बागेश्री रागात बांधलेल ' छुपा लो यु दिल मे प्यार मेरा' या सारखी अनेक.

http://pages.cs.wisc.edu/~navin/india/songs/isongs/indexes/singer/hemant...
ह्या लिंक वर ही अजुन काही गाणी ऐकु शकता.

ते शास्त्रीय संगीत फारसं शिकले नव्हते. त्यांचा आवाज फार पल्लेदार, भरदार नव्हता, प्रेमगीताला साजेसा मधाळ गोड वगरेही नव्हता, त्यांच्या गाण्यात फारसा शास्त्रीय संगीताचा वापरही नव्हता, ताना, पलटे ,सरगम नव्हते , तरीही त्यांच्या आवाजात शब्दातले भाव, आशय प्रभावी पणे व्यक्त करण्याच सामर्थ्य होतं.एखाद्या फिलासॉफिकल गाण्याला, गंभीर गहन अर्थांच्या गाण्यांना किंवा मनाच्या खोल कप्प्यातून येणार्‍या सच्च्या भावनांना सूर देण्यासाठी असला आवाज फारच परिणामकारक वाटतो. त्यांच्या गाण्यातला खर्ज आधी सर्वांगात झिरपतो आणि मग आपल्याला ऐकू येतो. आता विचार केल्यावर असं वाटतंय की जिथे शांततेचा सूर ऐकायचा आहे तिथे हेमंत कुमार शिवाय पर्यायच नाही.

गुलमोहर: 

वानगी दाखल त्यांनी संगीत दिलेलं 'चले आओ चले आओ', गीता दत्त नी गायलेल, साहब बीबी और गुलाम मधलं हे गाणं ऐकुन बघा http://www.youtube.com/watch?v=n_FJJr_AVdE
पडद्यावर पाहीलं तर ते अक्षरशः थरकाप उडवतं. 'आपण मध्यरात्री रस्त्यावर एकटेच जीव मुठीत धरून, दबकत दबकत चाललो आहोत' असलं काही तरी वातावरण निर्माण करत.
+१

यातली काही गाणी ऐकली होती. मस्त लिहिलंस.

छान लिहिलंयस. Happy
तू दिलेली गाणी सगळीच छान आहेत. पण मला ती आवडतात त्यांच्या चालींमुळे.
थोडक्यात, हेमंतकुमार हा संगीतकार म्हणून आवडतो, गायक म्हणून अजिबात नाही आवडत.

मलाही हेमंतकुमार संगीतकार म्हणूनच आवडतो Happy इथे मी 'लली +१' लिहू शकले असते पण नाही, एक ललीच झेपायला अवघड आहे तर +१ आणखी कशाला ना Proud

सुंदर लेख... हेमंतकुमारची गाणी हा माझा वीक पॉइंट नाही.. तरीही ह्या लेखातली सगळी गाणी आवडती आहेत Happy

छान लेख,
"जैसे कोई साधू दूर मंदीरमें बैठे भजन गा रहा हो...." हे लताचे शब्द किती सार्थ आहेत ना !

मराठा तितुका मेळवावा, मधल्या मराठी पाऊल पडते पुढे या गाण्यातला पहिला समर्थ रामदासांचा श्लोक लताने, त्यांचाकडूनच गाऊन घेतला होता.

मुजरा महाराज,

हेमंतकुमारचा प्राचीन फॅन. जवळ जवळ सगळी गाणी ऐकली आहेत त्यांची.

तुम्हाला बसल्या जागेवरुन उचलून दुसर्‍या जगात न्यायची ताकद होती त्यांच्या आवाजात. तसा सच्चेपणा खूप कमी बघायला मिळतो. दुसरा तसाच आवडता आवाज म्हणजे एस् डी.

धन्यवाद लोक्स.
खरय ,मलाही त्यांनी दिलेल्या संगीताबरोबर त्यांचा आवाजही तितकाच आवडतो अगदी सच्चा आणि प्रामाणिक
"जैसे कोई साधू दूर मंदीरमें बैठे भजन गा रहा हो...." हे लताचे शब्द किती सार्थ आहेत ना !>> +१

हेमंत कुमारचा धीरगंभीर आवाज,त्यातली खोली आणि त्यांनी दिलेल संगीत मला नेहमीच आकर्षित करत.>> मलाही. Happy

आवडला लेख.
"छुपा लो दिल में यूं प्यार मेरा के जैसे मंदिर में लौ दिये की" - ममता मधल्या या गाण्याचे संगीतकार रोशन.
हे आणि खामोशी मधलं 'हमने देखी है उन आंखों की महकती खुशबू' हे ऑल टाइम फेव्हरिट.