बालपणीच्या गमती-जमती-2

Submitted by मनस्वि on 31 January, 2012 - 06:14

मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.

आमच्या गल्लीतल्या एका मावशींना मात्र आमचे असे दुपारचे उंडारणे अजिबात पसंत नव्हते. उघड विरोध करण्या इतपत त्यांच्यात हिम्मत नसावी. आमच्या वरचा राग मग आमच्या वस्तूंवर निघत असे. क्रिकेट खेळताना ball जर चुकूनही त्यांच्या घरात शिरला तर त्याचे दोन तुकडे होवूनच परत मिळत असे. या मावशींचे नाव बसंती होते. एकदा दादाने त्यांना अद्दल घडवायची असे ठरवले. त्याने गल्लीतल्या प्रत्येक छोट्या मुलाला गाठून एकच प्रश्न विचारला. प्रश्न विचारताना तो हि काळजी घ्यायचा कि त्याचे उत्तर मावशींना ऐकू आले पाहिजे. प्रश्न असायचा: शोले या सिनेमात हेमा मालिनीचे नाव काय होते? उत्तर मोट्ठ्याने दिले तर एक chocklate मिळेल. ज्याने ज्याने उत्तर दिले त्याला chocklate मिळाले. मावशी मात्र त्यानंतर सहसा क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या वाट्याला गेल्या नाहीत.

एका दुपारी क्रिकेटचा खेळ रंगात आलेला होता..........
मोट्ठे तिन्ही दादा आणि त्यांचे चार-पाच मित्र क्रिकेट खेळत होते. खेळ छोट्याश्या गल्लीत सुरु होता. धाकट्या दादाची batting सुरु होती. खेळ अगदी अटी- तटीला आलेला होता. दादाच्या टीमला थोड्याच धावांची गरज होती. म्हणून दादाने अगदी दे घुमाके स्टाइल मध्ये bat घुमवली. ती नेमकी बाजूने जाणाऱ्या एका आजोबांना लागली. झालं! सगळा गोंधळच मग! आजोबांना फारसे लागलेले नव्हते. पण आजोबा थोडे तापट डोक्याचे असावेत. त्यांनी दादासकट सगळ्या मुलांना शिव्या घालायला सुरुवात केली. थोडा वेळ कुणीही काही बोलले नाही. तरीसुद्धा आजोबा थांबत नाहीत हे बघून टीम मधल्या एका मोठ्या मुलाने आरडा-ओरडा सुरु केला. त्याने आजोबांना आणखी चेव सुटला. मग ते असे सुटले कि कुणी त्यांना आवरू शकत नव्हते. सगळी टीम विरुद्ध ते आजोबा असा शाब्दिक वाद बराच वेळ रंगला. शेवटी गल्लीतल्याच एका माणसाने दोन्ही बाजूंना शांत केले. चला झाली एकदाची शांतता असे म्हणून हुश्य करावे तर कळले कि ते आजोबा गल्लीत एका मुलीला बघायला आले होते. त्या मुलीचा भाऊ सुद्धा टीम मध्ये होता!!! आजोबा इतके रागात होते कि त्यांना हे कळल्यावर त्यांनी मुलीला बघायलाच नकार दिला. पण थोरामोठ्यांनी समजावल्यावर ते तयार झाले आणि चहा-पोह्याचा कार्यक्रम पार पडला. क्रिकेटचे नन्तर (त्यादिवसा पुरते) कुणी नावही काढले नाही हे वेगळे सांगायला नको.

गुलमोहर: