मुरलेलं आयुष्य

Submitted by सा.ज. on 20 January, 2012 - 00:22

जीवनात नक्की काय असतं
किंचीत तिखट, थोड्याश्या अळणी
जास्तच कडु, अल्पश्या गोड
फक्त कच्च्या पक्क्या आठवणी

आठवणींमागची माणसं
माणसांचं वागणं बोलणं
बोलण्यातला गोडवा अन
त्याच गोडव्याचं लोणचं

प्रत्येकाची वेगळीच बरणी
अन काळ, वेळ, घटना
याप्रमाणे बदलत जाणारी
वेगळीच चव

गोडव्याचं लोणचं
हवंहवंस, ओढ लावणारं
हरेक फोडीत
मनसोक्त आनंद देणारं

नुकतीच जन्माला आलेली नाती
अन त्याच्यात रमलेलं मन
नुकत्याच घातलेल्या लोणच्यांची
न कळणारी सारखीच चव

हळु हळु नाती आकार घेतात
संक्रांत संपवुन वर्तमानात जगतात
मुरायला घातलेल्या लोणच्यासारखं
प्रत्येक बरणीची निराळीच चव

कशी का असेना
पण प्रत्येक चव
चाखता आली पाहिजे
अगदी मनापासुन

खराब होवु नयेत लोणची
म्हणुन घ्यावी खबरदारी वेळीच
तिखट-गोड असतंच त्यात
पण मीठ-मोहरीने दृष्ट काढावीच

गुलमोहर: 

प्रत्येकाची वेगळीच बरणी
अन काळ, वेळ, घटना
याप्रमाणे बदलत जाणारी
वेगळीच चव >>>>>>>> छान!!!

नुकतीच जन्माला आलेली नाती
अन त्याच्यात रमलेलं मन
नुकत्याच घातलेल्या लोणच्यांची
न कळणारी सारखीच चव >>>>>>>>>> सुरेख!!!

एकूणच सुंदर लेखन.