अचानक सापडलेला संगीतकार..

Submitted by चिमण on 19 January, 2012 - 07:35

टिव्हीवर लागलेला क्लिंट ईस्टवूड आणि शर्ले मॅक्लेनचा 'टू म्युल्स फॉर सिस्टर सेरा' पहात असताना माझं लक्ष एका गोष्टीनं वेधून घेतलं. शर्लेनं नाही हो.. त्यातल्या टायटल म्युझिकनं!

सुरवातीला एक क्लॅरनेट किंवा फ्लूट एक शांत धुन वाजवून थोडंस गूढ वातावरण निर्माण करतं. मग एक तंतुवाद्य साधी सरळ सोप्पी सुरावट चालू करतं.. कापूस पिंजताना जसे आवाज होतात साधारणपणे तसे सूर ऐकू येतात.. हाच त्या पूर्ण संगीताचा पाया! मग इतर चित्रविचित्र आवाज करणारी वाद्य हजेरी लावतात. तंतुवाद्याच्या पार्श्वभूमीवर परत क्लॅरनेट किंवा फ्लूट आणखी सुंदर सुरावटी फेकतं आणि एक अवीट गोडीचं, परत परत ऐकावसं वाटणारं असाधारण संगीत ऐकायला मिळतं!

ते इथे ऐका -- http://www.youtube.com/watch?v=Yl6DA1YDGcc&feature=related

ते ऐकल्यावर माझं पूर्ण पिक्चर मधलं लक्ष उडालं. परत तेच म्युझिक कधी येतंय त्याचीच वाट आतुरतेने माझे कान बघत राहीले. नशीबाने ते म्युझिक पिक्चर भर अधून मधून ऐकायला मिळालं.

खर तर मला संगीतातलं खालच्या 'सा' पासून वरच्या 'सा' पर्यंतच काहीही कळत नाही. संगीतातली माझी गती 'सा'धारणच! मला हिमेश रेशमिया पासून कुमार गंधर्वांपर्यंत सगळे सारखेच! संगीतात कुणी 'गल्ली चुकला' तरी मला तो हमरस्त्यावरूनच चालला आहे असंच वाटतं. सवाई गंधर्वला जाण्यात माझा अंतस्थ हेतु वेगळाच असायचा! अशा संगीत बधीर माणसाचं केवळ संगीतानं लक्ष वेधणार्‍या संगीतकारावर संशोधन करणं अपरिहार्य होतं.. त्यातून एक महत्वाचा शोध लागला.. तो म्हणजे संगीतकार एनिओ मोरिकोने! निदान मी तरी हे नाव कधी ऐकलेलं नव्हतं. त्या उत्खननात मिळालेली ही माहीती....

१९२८ साली रोममधे जन्मलेला एनिओ मोरिकोने ट्रम्पेट वाजवायला शिकला होता. सुरवातीचं त्याचं संगीत फारसं गाजलं नाही. तरीही सर्जिओ लिऑनने 'ए फिस्ट फुल ऑफ डॉलर्स' या वेस्टर्न पिक्चरचं संगीत दिक्दर्शन त्याच्याकडे सोपवलं. त्यातल्या चित्रविचित्र वाद्यांची सरमिसळ करत केलेल्या अविस्मरणीय सुरावटींमुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला. इथेही सुरवात फक्त गिटारच्या धुनने होते आणि हळूहळू इतर वाद्यांची जोड मिळत एक सांगितिक भूलभुलैय्या बनतो. त्या नंतर लिऑनच्या बहुतेक पिक्चर्सना त्यानंच संगीत दिलं. नवकेतन - एसडी बर्मनसारखी लिऑनची आणि त्याची जोडी जमली.

याच माणसानं 'फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर' व 'द गुड द बॅड द अग्ली' सारख्या चित्रपटांचं संगीत दिलं होतं हे वाचून मला तर जुना मित्र अचानक भेटल्याचा सुखद धक्का बसला कारण कॉलेजात असल्यापासून त्या संगीतानं माझ्या मनावर एक ठसा निर्माण केला होता. माझ्याच काय पण शोलेचं टायटल म्युझिक ऐकलंत तर आरडीच्या मनात पण त्यानं घर केलं होतं हे जाणवेल.

जरी त्याचं नाव बहुतांशी वेस्टर्न चित्रपटांच्या संगीताशी जोडलं जातं तरीही त्यानं कॉमेडी, हॉरर, रोमँटिक, थ्रिलर्स असल्या सर्व प्रकारच्या सुमारे ४०० चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. त्याला काही चित्रपट संगीतासाठी ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली होती पण बक्षीस कधीही मिळालं नाही. पण त्याची प्रचंड लोकप्रियता आणि नेहमीच्या पठडीतलं नसणारं व अशक्य सुरावटींनी मढलेल्या संगीतानं जगाचा कर्णवेध करण्याचं सामर्थ्य याचा आदर म्हणून २००७ साली क्लिंट ईस्टवूडच्या हस्ते सन्माननीय ऑस्कर देण्यात आलं.

जुन्या वेस्टर्न सिनेमांचं, वैविध्यपूर्ण, मला फार आवडणारं, म्युझिक एनिओ मोरिकोनेनं दिलं होतं हे आता मी मात्र कधीच विसरणार नाही!

ए फिस्ट फुल ऑफ डॉलर्स -- http://www.youtube.com/watch?v=JaNogNtT0zA

फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर -- http://www.youtube.com/watch?v=WtblCZQXRsA&feature=related (यातलं गिटार ऐकताना अंगावर काटा आला).

द गुड द बॅड द अग्ली -- http://www.youtube.com/watch?v=_hJ3iteU2RU&feature=related (यातलं एक मिनीट १८ सेकंदानं येणारं ट्रम्पेट जबरी आहे)

शोलेचं टायटल म्युझिक -- http://www.youtube.com/watch?v=eR4TlB8yaaU

वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका: डेबोराज थीम -- http://www.youtube.com/watch?v=E0jFrXO22_o (अप्रतिम आहे.. ऐकताना समुद्राच्या लाटांवर तरंगत असल्यासारखं वाटलं मला!)

मॅलेना चित्रपटाचं संगीत -- http://www.youtube.com/watch?v=dzJxHw4JF10 (या सुंदर संगीताला २००१चं ऑस्कर नॉमिनेशन होतं)

द मिशन -- http://www.youtube.com/watch?v=gonKhSIBP54 (१९८६चं ऑस्कर नॉमिनेशन. यातून ए आर रेहमानला प्रेरणा मिळाली असावी असं वाटून जातं)

वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्टः मॅन विथ हार्मोनिका -- http://www.youtube.com/watch?v=HpQBwzQ2Wb8&feature=related (यातला माउथऑर्गन प्रचंड गूढ वातावरण निर्माण करतो)

-- समाप्त --

गुलमोहर: 

छान

छान लिहिलयस चिमण, लिंक्स ऐकुन बघायला पाहिजेत,
बाकी संगीताचा' कान' असणारा 'संगीत बधीर' कसा ??

टू म्युल्स फॉर- च टायटल साँग ऐकल होत आधी तेव्हाही ही ट्युन आवडली होती. एकदम हटके वाटली होती.

'द गुड द बॅड द अग्ली'
माझा फेवरेट वेस्टर्न.
कोल्ड माउन्टन या अलिकडच्या मुव्हीचे म्युझिक पण एका ऑस्करच्या कार्यक्रमाच्या सुरवातीला
वाजावले होते, ते पण खास आणि मुव्ही पण छान होता. हॅन्ड टु हॅन्ड वार सीन्स एकदम अंगावर येणारे.

http://www.youtube.com/watch?v=wU7MEtAYSkA&feature=related

स्पाघेटी वेस्टर्न चित्रपटांमध्ये मॉरिकोनेचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. कसली जबरदस्त वातावरणनिर्मिती करते त्याचे संगीत! अजून एक भारी संगीतकार म्हणजे व्हँजेलीस (Vangelis). याची सर्वात प्रसिद्ध धून म्हणजे 'चॅरियट्स ऑफ फायर'मधली. 'ब्लेडरनर'चे संगीतसुद्धा त्याचेच होते. तेही ऐकून बघा.

याच माणसानं 'फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर' व 'द गुड द बॅड द अग्ली' सारख्या चित्रपटांचं संगीत दिलं होतं हे वाचून मला तर जुना मित्र अचानक भेटल्याचा सुखद धक्का बसला >>> मला पण... Happy

ट्यून्स् ऐकेन आता सगळ्या.

धन्यवाद!

निलिमा, तू दिलेल्या लिंकवरचं म्युझिक मस्त आहे. Happy

अरभाटा, तू सांगितलेल्या पिक्चरांचं पण ऐकेन आता! धन्यवाद!