लोगो संगणकभाषा (प्रोग्रामिंग लँग्वेज)

Submitted by Ajay Bhagwat on 17 January, 2012 - 12:01

लोगो भाषा ही एक संगणकभाषेच्या शिक्षणासाठी शैक्षणीक साधन म्हणून १९६७ साली निर्माण केली गेली. "लोगो" हा एक ग्रीक शब्द असुन त्याचा अर्थही "शब्द" असाच आहे. लोगो संगणकभाषा अत्यंत सोपी, पण समर्थ भाषा आहे. लोगोला "लो फ़्लोर हाय सिलींग" भाषा असेही म्हणतात. म्हणजे, लोगोच्या अद्भुत जगात प्रवेश करून प्रोग्रॅमिंगची मजा लुटणे सुरू करणे कुणीही सहजगत्या करू शकते. पण याचा अर्थ असा नाही की, ती केवळ लिंबू-टिंबूंची भाषा आहे. लोगोमध्ये अवघड समस्या सोडवणे व क्लिष्ट प्रोग्रॅम लिहिणेही शक्य आहे.

LogoBook_Web_11.12.3 - Final with Fonts and High Quality Graphics_Page_1.jpg

आंतरजालावर लोगो भाषेविषयी अनेक स्रोत उपलब्ध आहेत. पण एखाद्या शालेय क्रमिक पुस्तकाच्या स्वरुपाची उपयुक्तता एकही स्रोत पुरी करु शकत नाही. त्यामुळे लहानांना शिकवण्यासाठी त्या आंतरजालावरील माहीतीचा उपयोग सहजा-सहजी करता येत नाही. ही उणीव भरुन काढण्याचे काम श्री. अभय जोशी आणि संदेश गायकवाड ह्या एकेकाळच्या वर्गमित्रांनी केले आहे.

लोगोभाषेतील प्रोग्रामिंग हे केवळ "प्रोग्रामिंग"पुरते मर्यादीत नसुन, ही भाषा मुलांच्या मनाची जडणघडण अशा पद्धतीने करते की जी, एका "विद्यार्थ्याला" आवश्यक असते. लोगोभाषेच्या ह्या वैशिष्ठ्याची जाणीव व फायदा मुलांना व्हावा अशा दृष्टीने पुस्तक लिहीतांना लेखकांनी खालील उद्दीष्ट्ये डोळ्यासमोर ठेवली आहेत:

  • मुलांना संगणकाच्या खऱ्या शक्तीची कल्पना येते, व संगणकाविषयीची भीती दूर होऊन मैत्री प्रस्थापित होते.
  • मुले ताणविरहित वातावरणात (संगणक कधीच तक्रार करत नाही किंवा रागवत नाही) शिकतात.
  • प्रोग्रामिंग करताना मुले गणित व शास्त्र अशा विषयांतील तत्त्वांचा व नियमांचा वापर करतात.
  • मुले विचार करण्याच्या नवीन पद्धती शिकतात: (अ) तर्कशुद्ध (logical) व पद्धतशीर (systematic) विचार, (आ) स्वतःची विचार करण्याची व समस्या सोडवण्याची पद्धत समजुन घेणे (analytical thinking)
  • किचकट (complex) समस्या सोडवायची असेल, तर ती समस्या छोट्या छोट्या उप-समस्यांत विभागुन त्या आधी सोडवाव्यात, हे तत्त्व (divide and conquer) मुले शिकतात.
  • प्रश्नाचे उत्तर निव्वळ "बरोबर" किंवा "चुक" असत नाही, तर समस्यांची उकल चुका शोधुन (ज्याला debugging म्हणतात) हळुहळू उत्तर सुधारण्यानेच होते, हा मौलिक शोध मुलांना लागतो.
  • प्रोग्रामिंग करताना मुले सक्रीय बनतात - ते स्वतः करीत असलेल्या कामातून व चुकांतुन शिकतात.
  • शिकण्याच्या प्रक्रियेचे स्वरूप "माहिती गोळा करणे" एवढेच न राहता "सृजनशील विचाराची" (creative thinking) जोड मिळते.

हे पुस्तक सुबोध आहे. शाळेतील विद्यार्थी पुस्तक वाचुन लोगो भाषेची जादू अनुभवु शकतात. पुस्तकात लोगो संगणकभाषेतील अनेक संकल्पना (कॉन्सेप्ट) समजावुन सांगितल्या आहेत. त्यापाठोपाठ त्यावर आधारलेला प्रोग्राम, आणि काही सोपे स्वाध्याय असे स्वरुप असल्यामुळे अगदी सहजतेने एखादा विद्यार्थी हे पुस्तक वाचुन कुशलतेने लोगोवर राज्य करु शकतात.

लोगोभाषा वापरुन मुले खालील चित्रे संगणकावर काढु शकतात. अशी चित्रे काढता येई पर्यंत त्यांनी प्रोग्रामिंगच्या अनेक महत्वाच्या संकल्पना शिकलेल्या असतात. ही चित्रे काढतांना त्यांना ज्या समस्या येतात, त्या सोडवतांना त्यांच्यावर वरील उद्दीष्टांचा प्रभाव पडत राहतो.
untitled2.JPGuntitled4.JPGuntitled5.JPGuntitled6.JPG

लोगो प्रोग्रामिंग हे पुस्तक नोव्हेंबर २०११ मधे प्रकाशित झालेले असुन त्याची किंमत रु. २५० आहे. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी श्री. संदेश गायकवाड ह्यांना संपर्क साधावा - Sandyg31794@gmail.com / ९८६०९ ०४०४७

लेखक व्दयीविषयी:

श्री. अभय जोशी व श्री. संदेश गायकवाड हे दोघेही "ना नफा ना तोटा" ह्या तत्वावर चालणाऱ्या स्पार्क इन्स्टीट्युट, पुणे (टाईम फाऊंडेशनचा प्रकल्प) ह्या संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था शाळकरी विद्यार्थ्यांमधे संगणकभाषेची गोडी निर्माणा व्हावी ह्यासाठी लागणाऱ्या शैक्षणीक साधनांच्या निर्मितीच्या एकमेव उद्दीष्टाने स्थापली आहे. ह्या संस्थेने लोगो भाषा गेली काही वर्षे पुण्यातील काही शाळांत, उदा. अक्षरनंदन, यशस्वीरीत्या शिकवली आहे.

गुलमोहर: 

वा, चांगल्या पुस्तकाची व उपक्रमाची ओळख करुन दिलीत.
हे पुस्तक मायबोली खरेदी विभागात उपलब्ध करुन दिलेत तर अजून जास्त लोकांपर्यंत पोचेल .

मदतपुस्तिका लिंकवर क्लिक करुन तिथे प्रश्न विचारा, मदत समिती अथवा वेब मास्टर जास्त माहिती देऊ शकतील.

छान