''आजकाल मी असाच सूर ठेवतो''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 16 January, 2012 - 11:26

राग लोभ मत्सरास दूर ठेवतो
आजकाल मी असाच सूर ठेवतो

वाटते भिती , कुणा कळेल यामुळे
रक्त जाळतो मनात धूर ठेवतो

खुंटल्यात मानवी जगात जाणिवा
व्यर्थ उंच मान ताठ ऊर ठेवतो

मांडतो प्रदर्शनात काच पांढरी
आत कोळश्यात आबनूर ठेवतो

वागतो निलाजरा दिगंबरापरी
लाजण्या जगास चूर चूर ठेवतो

विरहयातना नको जगामधे कुणा
भावते मला तयास दूर ठेवतो

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

वाटते भिती , कुणा कळेल यामुळे
रक्त जाळतो मनात धूर ठेवतो>>>

खूप सुंदर शेर.

खरे तर सगळी गझलच आवडली, शेवटचे तीन जरा कमी पडलेत.

वागतो निलाजरा दिगंबरापरी
लाजण्या जगास चूर चूर ठेवतो>>>>>

व्वा!

डॉक अप्रतिम गझल, आशय तर खूपच भावला.

फक्त आबनूर चा अर्थ कळला नाही, आणि त्यानंतरचा शेर ही.
थोडा नीट समजावून सांगाल का?

Superb !

आबनूर म्हणजे बहुमोल हिरा...... ''कोहिनूर'' हा शब्दही चालेल पण एक वेगळा फ्लेवर यावा म्हणून आबनूर लिहिलं आहे.

दुसर्‍या शेरचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे.

खुंटल्यात मानवी जगात जाणिवा
व्यर्थ उंच मान ताठ ऊर ठेवतो

मस्त्.......खूप आवडली..... Happy

वागतो निलाजरा दिगंबरापरी
लाजण्या जगास चूर चूर ठेवतो>>>>>>>>>>>>>

जग हे निर्लज्ज आहे...पण त्याने लाजून चूर व्हावे म्हणून मीच दिगंबर होतो.

मस्त गझल, कैलास. सगळेच शेर उत्तम. 'धूर' आणि शेवटचा जास्त आवडला.
'आबनूर' शब्द नव्यानेच कळला, धन्यवाद. पण त्या शेराचा अजून नीटसा अर्थ लागला नाही, विचार करतो आहे.

उत्तम गझल, पुलेशु.

डॉक,आख्खी गझल बेहतरीन !
मला "आबनूर" जास्त आवडला त्यात उर्दू शब्द आहे म्हणून नव्हे पण तो शब्द ,ती कल्पनाच एकमेवाद्वितीय वाटली

राग लोभ मत्सरास दूर ठेवतो
आजकाल मी असाच सूर ठेवतो

वाटते भिती , कुणा कळेल यामुळे
रक्त जाळतो मनात धूर ठेवतो..... दमदार शेर... सुरेख गझल. Happy

फारच छान! मला वाटतं ह्या सर्व रचनांचे पुस्तक रुपात प्रकाशन व्हावे. ते संग्रही ठेवून वाचायला आवडेल.
हीच सूचना बेफिकीर यांना. इतकं विपुल लेखन इथे रोज वाचायला वेळ होतोच असे नाही!

वाटते भिती , कुणा कळेल यामुळे
रक्त जाळतो मनात धूर ठेवतो >>> आवडला...

चूर - कल्पना मस्त आहे.. पण वाक्यरचना सदोष वाटते ... चूर चूर ठेवतो असे आपण म्हणत नाही चूर होणे असा शब्दप्रयोग आहे असे वाटते किंवा चूर ठेवणे असेल तर मलाच माहीत नाही

Pages