एक रिकामी बाजू

Submitted by परिमला on 16 January, 2012 - 07:46

मध्यंतरी एक रिकामी बाजू हे एक अप्रतीम प्रायोगिक नाटक माझ्या पाहण्यात आलं. हे नाटक पाहून प्रामुख्याने हे जाणवलं की या धावपळीच्या जगाच्या रहाटगाडग्यात कित्येक breast cancer सारख्या महत्वाच्या विषयांचा आणि मुख्य म्हणजे ते विषय 'जगणाऱ्या' माणसांचा आपण विचारच केलेला नाहीये! आपण या globalization आणि modernization च्या विळख्यात कोरडे आणि स्वार्थी तर नाही ना होत चाललो? नश्वराच्या मोहापायी माणसाने माणसाचा विचार करणं थांबवणं यासारखा मानवजातीला दुसरा शाप नसेल. अशा सद्यस्थितीत हे 'एक रिकामी बाजू' एखाद्या उष:शापा सारखं पाठीशी उभं रहात आणि क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडतं. एका जवळच्या मैत्रिणीला 'कित्ती सांगू आणि कित्ती नको' असं वाटून त्या नादात त्याचं परीक्षणही tyach ratri लिहून झालं. मी कुणी पत्रकार, लेखक नाही किंवा समीक्षक तर मुळीच नाही... त्यामुळे हे लिखाण कुठल्याही व्यावसायिक कौशल्याने वा हेतूने केलेलं नाही. एका प्रेक्षकाची सहज प्रतिक्रिया म्हणून आपण या लेखनाकडे पहाल अशी अपेक्षा आहे...हे लिखाण मुद्दाम समस्त स्त्रीवृन्दासाठी आणि त्यांच्या समस्त 'त्यां'च्यासाठी शेअर करावंसं वाटलं म्हणून मांडत आहे. हा विषय बोल्ड असल्याने नाटकाची कथा त्यातील प्रसंगांचे उल्लेख हे तसेच अनुषांगिक आहेत याची वाचण्यापूर्वी कृपया नोंद घ्यावी. हे परीक्षण वाचून तुम्हाला कुठेतरी खोलवर गलबलून हे नाटक पाहावेसे वाटले तर मी कृतार्थ होईन...

............................................................................................................................................

आपलं मन आणि आपलं शरीर याचं नातं खूप अतूट असतं. म्हणजे झाडाचं जमिनीशी, ढगांच वाऱ्याशी, किंवा अगदी दहशतवादाच हिंसेशी नातं असावं ना, अगदी तस्संच! त्यामुळे त्यांच्यातील एक दुखावलं की त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतोच. म्हणजे मानसिक धक्का बसला की त्याचे पडसाद शरीरावर उमटतात आणि शरीर आजारी पडलं की मनावर त्याचा ताण येतो. या दोहोंमधला परस्पर संवाद जेवढा चांगला तेवढे आयुष्य परिपूर्ण असं म्हणायला काहीच हरकत नाही.

एका 'रितू'ने आपल्या शरीरावर झालेल्या कॅन्सरच्या हल्ल्याचा आणि त्यातून वाचू पाहणाऱ्या आपल्या उरल्या सुरल्या शरीराचा मनाने स्वीकार करणं, हीच खरी कथा आहे एक रिकामी बाजू या प्रायोगिक नाटकाची! ('रितू' हे नावही किती समर्पक!) पण या कथेची आणखी एक भीषण वास्तवाची बाजू आहे, ती म्हणजे, रितूला स्तनाचा कर्करोग झालाय. स्तनाचा कर्करोग किंवा breast cancer हे शब्द आपल्याला पूर्वी प्रमाणे दचकवत नाहीत, हे दुर्दैव! हा रोग वयात आलेल्या स्त्रीला कधीही होऊ शकतो. भारतात त्याचं संभावित प्रमाण १४:१ असं आहे. म्हणजे आज आपल्या देशात लाखो 'रितू' या दुर्धर रोगाशी लढा देत आहेत. निरनिराळ्या वयाच्या, आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्तरातल्या या रितू आपापल्या परीने झुंजत आहेत ते केवळ या रोगाशी नव्हे तर या रोगामुळे झालेल्या आपल्या आयुष्यातील महत्वाच्या बदलांशीही!

'एक रिकामी बाजू' हे नाटक या लाखो रीतुंपैकीच एकीची प्रातिनिधिक वाटावी अशी कथा मांडत. ही रितू आपल्याला नाटकभर तिच्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांतून वावरताना दिसते. स्तनात गाठ जाणवल्या पासून ते सर्जरी होऊन घरी येऊन आयुष्य पूर्ववत जगायला लागेपर्यंतचा तिचा मानसिक प्रवास विलक्षण आहे. सुरवातीला पुरुष डॉक्टरांनी तपासताना पार अवघडून गेलेली रितू, उपचारांच्या काळात केवळ एक व्याधीग्रस्त 'शरीर' बनून राहिलेली रितू सर्जरी मध्ये आपला डावा स्तन काढून टाकला आहे हे समजल्यावर चांगलीच कोलमडते. पण त्यातूनच जन्म होतो एका नव्या 'रीतु'चा. अर्धा पेला भरलेलं पाहताना रितूला पुन्हा आपल्या आयुष्यातील चैतन्य परत मिळत जातं. त्यातून ती एवढी सकारात्मक होत जाते की तिच्या 'त्या'ने तिला कायमचे सोडल्याचा तिच्यावर विशेष परिणाम झाल्याचं नाटकात दाखवलं नाही. अशा प्रकारे लढा देत देत रितू पुन्हा आपल्या आयुष्यात स्वबळावर उभी रहाते. ही सर्व झाली नाटकाची संक्षिप्त कहाणी. या कथा प्रवाहाच्या मध्ये विखरून टाकलेले रीतुच्या लहानपणीचे प्रसंग संपूर्ण नाटकालाच humour आणि base प्राप्त करून देतात. अर्धवट शाळकरी वयात हवेहवेसे वाटणारे स्तन, त्यासाठी मैत्रिणी बरोबर केलेले 'फु: फु: फु: फुलुदे' चे यडचाप प्रयत्न, मैत्रिणी घालतात म्हणून आईजवळ 'मला ब्रा घेऊन दे' असा केलेला हट्ट, लहान भावाशी चालणारी गुद्दागुद्दी हे प्रसंग तर अप्रतिम वठले आहेत.

मला खात्री आहे की रीतुच्या लहानपणीच्या प्रसंगांना दाद देणाऱ्या स्त्री प्रेक्षकवर्गाच्या डोळ्यांसमोर त्यांचे 'त्या' वयातले वेडपट दिवस उभे राहिले असणार! प्रत्येक वयात येणाऱ्या मुलीचं 'सुंदर स्तन' हे खरं तर एक गुप्त हळुवार स्वप्न असतं. मन त्या काळात शरीरातून उभारणाऱ्या कोवळ्या कोम्बांशी पिंगा घालत असतं. प्रत्येकीला मग स्वत:ची अशी काही private property सापडते. सगळ्याचंच नवल असतं- नव्या शरीराचं, नव्या विचारांचं! शरीरात भावना कशा अगदी घट्ट गुंतत जातात. अन त्यातच बाजारात पिकणारे health clubs चे मळे- हवी ती vital stats मिळवून देणारे! तर ज्या या एका गोष्टीवर स्त्रीमनाचा (आणि पुरुषमनाचासुद्धा!) अतिशय लोभ असतो, तीच गोष्ट अशी नियतीने हिरावून नेली तर?

संपूर्ण नाटकाचा बाज सुरेख प्रायोगिक असा आहे. कमीत कमी property आणि कमीत कमी कलाकार अशा आगळ्या प्रकारे हे नाटक उभं रहात. वेशभूषाही प्रतीकात्मक. कमीतकमी बदलांची. नेपथ्यही सुरेख! पद्मनाभ बिंड आणि वीणा जामकर या दोन सहकलाकारांनी रितू सोडून नाटकात येणारी सर्व स्त्री-पुरुष पात्रं समर्थपणे साकारली आहेत. तेच तेच चेहरे पुन्हा पुन्हा दिसूनही त्यांचा अभिनय आणि प्रत्येक नव्या पात्राचा वेगळा बाज त्यातील नाविन्य टिकवून ठेवतो. पद्मनाभने रितूचा 'तो', अवखळ परंतु खंबीर झालेला तिचा भाऊ, तिचे गंभीर परंतु आतून हळवे वडील, व्यावसायिक डॉक्टर पासून ते अगदी हॉस्पिटल मधील गुंड रुग्णापर्यंतच्या सर्व पात्रांच्या छत अगदी छान रंगवल्या आहेत. त्याच प्रमाणे वीणाने मुलीच्या रोगाबाबत मनात अपराधीपणाची भावना बाळगणारी रीतूची आई, शाळकरी मैत्रीण, डॉक्टर नर्स इथपासून ते दोन्ही स्तनांचा कर्करोग झालेल्या गलितगात्र रुग्णे पर्यंतची सारी पत्रे अगदी हुबेहूब रंगवली आहेत. हे दोघेही निरनिराळी पात्रे साकार करून घडणाऱ्या घटना रंगवत जातात. आणि आपण सहजच नाटकाच्या संहिते बरोबर पुढे जात रहातो. त्या दोघांमध्ये अधिक चांगलं कोण हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो. आपण पु.लं. चा एकपात्री प्रयोग पाहताना जसे तो प्रयोग 'एकपात्री' आहे हे विसरून त्या विविध पत्रांमध्ये मश्गुल होऊन जातो, तसं काहीसं या दोघांच्या कामाबाबतीत या नाटकात होत रहात.

गीतांजली कुलकर्णीने स्वत: रीतूची भूमिका अत्यंत सुंदर वठवली आहे. तिच्या अभिनयामध्ये नैसर्गिक साधेपणा आहे, अत्यंत मोकळेपणा आहे. तिच्याजवळ रंगभूमीचा १० वर्षांचा अनुभव आहे आणि ती एन.एस.डी.ची विद्यार्थिनी आहे हे सर्व जाणूनही मी म्हणेन की या नाटकात काम करण्यासाठी 'धाडस' लागतं आणि ते शिवधनुष्य गीतांजलीने लीलया पेललं आहे. स्पष्ट शाबांमध्ये मांडायचं झालं तर, कथेच्या आणि दिग्दर्शनाच्या गरजांमुळे 'रितू'चे (गीतांजलीचे) स्तन ही सुद्धा नाटकातील एक अविभाज्य property आहे. आणि तिचा वापर अतिशय तोल सांभाळून कथेच्या गाभ्याशी ईमान राखून, आवश्यक तेवढंच पण न लाजता केला आहे. त्यामुळे मुळात हा breast cancer सारखा bold असा विषय, त्यातून नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकालाही क्षणभर श्वास रोखायला लावतील असे काही अवघड प्रसंग... अशावेळी गीतांजलीच जर अवघडली असती किंवा तिची सहकालाकारांबरोबर chemistry जुळली नसती, तर संपूर्ण नाटकाचा एवढा खटाटोप वाया गेला असता.

काही खास प्रसंगांचा इथे उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही. नाटकाच्या सुरवातीलाच नामावली जाहीर करताना अंधारात दिव्यांनी काढलेले रीतुच्या छातीचे प्रतीकात्मक modern art सारखे चित्र - उजवा गोल आणि डावीकडे फक्त एक तिरपी रेघ (ऑपरेशनच्या खुणेची!); नाटकभर अधून मधून पात्रांनी थेट प्रेक्षकांना केलेला खुमासदार briefing; स्त्री डॉक्टरांनी सर्जरीनंतर भावूक झालेल्या रितूला कोरडेपणाने विचारणं 'एवढी घट्ट मिठी तुला पुरे?'; बाहेर हाणामाऱ्या करून हॉस्पिटल मध्ये आलेल्या गुंडाने रितूला 'तुम्हा बायकांची दुखणी...' असे म्हणत दात विचकत हसणं; cancer surgery त दोन्ही स्तन काढावे लागलेल्या, घरात मोलकरणीचीही किंमत न उरलेल्या रुग्नेने रितू जवळ काढलेले उध्वस्त करणारे उद्गार "बाई फक्त 'बाई' सारखी दिसली आणि मोलकरीणीसारखी राबली तरच घरात चालते."; एका स्तनाची गर्लफ्रेंडही चालेल असं म्हणणाऱ्या भावाला रीतूने अवघड शृंगारिक प्रश्न विचारून खट्टू करणं ; इत्यादी...

नाटक संपूर्ण पाहून झाल्यावर एकाच गोष्ट मात्र राहून राहून जाणवते. नाटकाच्या कथेमध्ये रितूला पुन्हा एक नव समंजस जोडीदार मिळाल्याचं दाखवलं आहे. त्याला ती तिला एक स्तन नसूनही अतिशय सुंदर भासते, कारण त्याच तिच्यावरील प्रेम अत्यंत निर्मळ व पारदर्शी आहे. त्याच्या आयुष्यात येण्याने आणि सहज सुंदर वागणुकीने रीतुच्या मनातील उणेपणाची भावना निघून जाते आणि नाटक इथेच संपतं. हा शेवट काही वाईट नव्हे, परंतु याधीच्या संपूर्ण नाटकाच्या उंचीला तो विशेष शोभत नाही. रितूला breast cancer झाला म्हणून तिच्या 'त्या'ने तिला सोडणं आणि तिला तो आजार होऊनही समीरने तिला स्वीकारणं आणि रितूने सर्वार्थाने पुन्हा सुखी होणं. मला या सुखान्तापेक्षाही रीतूने मनाने पुन्हा उभारी घेणं आणि मनातली उणेपणाची भावना काळानुसार झटकून टाकणं हे जास्त महत्वाचं वाटत. त्यासाठी तिला समीरने स्वीकारण्याची गरज भासणं यात मला नाटककाराला असलेली व्यावसायिकतेची ओढ जाणवते- happy endings! स्त्रीमुक्तिवादी प्रेक्षकांना तर यात पुरुषप्रधानातेचा वास येण्याचीही शक्यता आहे.

तर थोडक्यात म्हणजे, नाटकात शेवटी रितू अजूनही 'लग्नं' किंवा 'प्रेम' या पातळ्यांवरती disqualified नाहीये असं एखादा संकेतही प्रेक्षकांना पुरला असता, असं माझं वैयक्तिक मत आहे. रितू आणि समीर मधील पुढचे प्रसंग तर मला अगदी अवाजवी वाटतात. ते वगळणं सहज शक्य होतं. आणि वास्तवात समाजातील अशा किती रीतूंना समीर भेटतात असा विचार आपण इथे जरा बाजूलाच ठेवलेला बरा. पण कथेमधली ही एवढी खटकणारी बाब वगळता नाटक अप्रतीम आहे. मुळात प्रक्षकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, हे नाटक breast cancer या रोगाविषयी नाही. या रोगाच्या रुग्णांना treatment च्या कुठल्या दिव्यांना सामोरं जावं लागतं याची माहिती देण्यासाठीही ते केलेलं नाही, ते breast cancer चे रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी खास असंही बनविल्याच वाटत नाही, तर ती आहे फक्त एक संवेदनशील कथा- एका रीतूची, तिला घडवणाऱ्या, नाकारणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या तिच्या (आणि आपल्याच) समाजाची, आशावादाची! प्रत्येक 'ती'ने आणि तिच्या 'त्या'ने पहावेच असे हे नाटक- 'एक रिकामी बाजू' सरतेशेवटी रितू प्रमाणेच आपल्याही मनातल्या उणीवा बाजूला सारून शरीर ते मन असा सुसंवाद घडवायला शिकवतं आणि आपलंही आयुष्य परिपूर्ण होण्यास हातभार लावतं, हेच खरं!

गुलमोहर: