त्रिवार अर्जुन!!!

Submitted by आदित्य डोंगरे on 14 January, 2012 - 13:58

त्रिवार अर्जुन!!!
महाभारत! भारतीय माणसाचा जीव की प्राण! यातील अनेक पात्रांना अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आदर्श मानत आलेली आहेत. पण त्यातल्या त्यात अर्जुन हा सर्वांना, विशेषतः तरुणांना नेहेमीच हवा हवासा वाटलेला आहे. लाडका असणं ठीक आहे, पण आजच्या तरुणासमोर तो आदर्श ठेवू शकेल? होय, अगदी नक्कीच ठेवू शकेल. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात IT industry मध्ये काम करणारया तरुणांसमोर तर शब्दशः त्रिवार आदर्श ठेवू शकेल तो. त्याच्या जीवनातील ३ प्रसंगांमुळे.
सध्याच्या काळात सर्वच कार्यालयांमध्ये multi-tasking हा परवलीचा शब्द झालेला आहे. एकाच माणसावर अनेक कर्मचारयांच्या जबाबदारया टाकून पगाराचा पैसा वाचवण्याची कंपन्यांनी लढवलेली ही शक्कल आहे. आणि या युक्तीला भुलून ही तरूण मंडळी एकाच गोष्टीवर असाधारण एकाग्रता राखण्याच्या कौशल्याला कमी लेखू लागली आहेत.एका वेळी हजार गोष्टींच्या मागे लागून शेवटी कुठलीच नीटपणे पार पडत नाही व आपल्याला समाधान मिळत नाही हे ते विसरत चालले आहेत. शिवाय internet, t.v., वगैरे surfing करावयाच्या गोष्टी यात भर घालतातच. एखादी match, एक सीरियल, व एकदोन सिनेमे असं सगळं एकाच वेळी पाहिल्याशिवाय यांना मजाच येत नाही. हे पाहिल्यावर आठवतो तो विद्यार्थीदशेतला अर्जुन. "पोपटाशिवाय,... नव्हे, पोपटाच्या डोळ्याशिवाय,... मला दुसरे काहीच दिसत नाही". असे म्हणून आपल्या गुरुची वाहवा मिळवणारा अर्जुन. पण त्या वेळचे द्रोणाचार्य जर आजच्यासारखे कुठल्यातरी IIM-परशुराम आश्रम मधून MBA झालेले management guru असते, तर ते अर्जुनाला म्हणाले असते,"गधड्या, अरे बाकिचे शिष्य बघ कसे मस्तपैकी मल्टिटास्किंग करत आहेत! पोपट,झाडे, आजूबाजूचे शिष्य,मी,डोंगर, इत्यादी सगळं एकाच वेळी पाहत आहेत ते. असं पाहिजे, सगळीकडे एकाच वेळी लक्ष देता आलं पाहिजे! नुसत्या पोपटाच्या डोळ्याला काय चाटायचं आहे?"
होय तरुणांनो, मला माहित आहे की office मध्ये तुम्हाला या आधुनिक द्रोणाचार्यांचं म्हणणं मान्य करावंच लागेल. पण निदान office बाहेर, जीवनातील तत्व म्हणून तरी याला मान्यता देऊ नका. एखाद्या गोष्टीवर एकाग्र होवून त्यात निष्णात होणं, हा माणसाला महान बनवणारा गुण आहे. त्याचा त्याग करू नका. multitasking केल्यामुळे तुमचा तात्कालिक फ़ायदा होईलही पण जीवनात अत्त्युच्च पातळी गाठण्यासाठी, एकाच गोष्टीवर focus करणं, specialise करणं, हेच जास्तं महत्वाचं आहे, हे अर्जुनाकडून शिका.
IT-industry मध्ये काम करणारयांच्या आता एक गोष्ट चांगलीच अंगवळणी पडली आहे, ती म्हणजे अधून मधून project नसणे. म्हणजे त्यांच्या भाषेत बेंचवर असणे. एवढंच नव्हे तर हल्लीच्या मंदीच्या काळात तर नोकरी जाणे, बराच काळ unemployed असणे, हे सुद्धा बरयाच जणांना अनुभवायला मिळत आहे. हा अनुभव पांडवांना पण आला होता बरं का! कधी म्हणून विचारताय? त्यांचा १४ वर्षांचा वनवास हे एकप्रकारे बेकार असणे किंवा बेंचवर असणेच नव्हते का?१४ वर्षं बेंचवर, कल्पनाही नाही करवत ना?
युधिष्ठीर, नकुल, सहदेवांनी चकाट्या पिटतच घालवला हा काळ. भीमाने अनेक राक्षसांशी द्वंद्वयुद्ध खेळून आपली शक्ती शाबूत ठेवली व युद्धाची सवय ठेवली. पण खरया अर्थी या काळाचा सदुपयोग केला अर्जुनाने. शंकराच्या पाशुपतास्त्रापासून इंद्राच्या अमोघ शक्तीपर्यंत अनेक दिव्यास्त्रे प्राप्त करून घेण्यासाठी, थोडक्यात म्हणजे आजच्या भाषेत value addition साठी करून घेतला. योद्धा म्हणून अजिंक्य, अवध्य होण्यासाठी, best of the best होण्यासाठी केला. हा आदर्श ठेवून आजचा तरूण सुद्धा कठीण काळात निराश न होता नवनवीन technologies, softwares, शिकू शकतो, पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवू शकतो. किंवा अगदी नोकरी करताना वेळ न मिळाल्यामुळे राहिलेले काही छंदही पूर्ण करू शकतो. ज्याचा आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडण्यासाठी नक्कीच उपयोग होवू शकतो.
अश्या प्रकारे unemployed असलेला हा professional, मग जी पहिली नोकरी मिळेल ती पत्करतो. कधी ती कमी पगाराची असते, कधी त्यात job satisfaction नसते, कधी त्याच्या इभ्रतीला साजेशी नसते. अश्या वेळी आठवावा तो अज्ञातवासातील अर्जुन! तुम्ही थोडी कमी दर्जाची नोकरी पत्करलीत तरी ती नोकरी करणारी व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व तुम्हाला बदलावं लागत नाही, व्यक्ती म्हणून तुम्ही तेच असता. भारतीय असणं, मराठी असणं, सुशिक्षित, सुसंस्क्रुत, मध्यमवर्गीय माणूस असणं सोडून द्यावं लागत नाही. पण अर्जुन? त्याला अज्ञातवासात त्याचा क्षत्रियाचा, योद्ध्याचा मानाचा व्यवसाय त्यागावा लागलाच, पण राजपुत्र असणं, प्रतिष्ठित राजघराणे इत्यादी सगळं विसरून पायात चाळ बांधावे लागले. याहीपुढे जाऊन, अगदी सगळ्यात basic ओळख, "पुरुष असणे" याचाही त्याग करावा लागला. संपूर्ण पुरुष अशी ओळख असलेल्या त्या जीवाचं काय झालं असेल खरच त्या वेळी?
पण तरीही , वर्ष संपता संपता जेव्हा प्रसंग आला, तेव्हा हाती धनुष्य घेऊन एकट्याने सर्व कौरवांचा पराभव केला. त्या एका वर्षात त्याच्या मनाचं खच्चीकरण का झालं नाही? कुठून आला हा आत्मविश्वास?
याचं कारण असं आहे की बाहेरून जरी नपुंसकाचं जिणं जगावं लागत असलं तरी आपण खरे कोण आहोत हे तो एक क्षणही विसरला नव्हता. शमी व्रुक्षावर लपवलेल्या शस्त्रांचा विसर त्याला तिळमात्रही पडला नव्हता.
असंच आता काहींच्या बाबतीत होत असेल, आधीच्या नोकरीत तुम्ही team leader असाल, पण आता तुम्हाला programmer ची नोकरी करावी लागत असेल. तरीही शमी व्रुक्षावर जपून ठेवलेल्या leadership qualities, ते ज्ञान, ती विद्वत्ता, ते शिक्षण यांचा क्षणभरही विसर पडू देऊ नका. मग जेव्हा जेव्हा interview साठी जाल, तेव्हा team leader च्या आत्मविश्वासानेच जाल. व ते पद परत एकदा मिळवाल.
या तीन प्रसंगांव्यतिरिक्त अर्जुनाच्या संपूर्ण आयुष्यालाच व्यापून उरलेली गोष्ट म्हणजे, त्याची श्रीक्रुष्णावर असलेली अपार श्रद्धा. वरील सर्व प्रसंगातही ती लेशमात्रही कमी झाली नाही. त्याच्यासारखाच अढळ विश्वास परमेश्वरावर ठेवा, यश तुमचेच आहे. गीतेत म्हटलच आहे,
यत्र योगेश्वरः क्रुष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
आपले पूर्वज खरंच सांगत होते, महाभारत कधीच कालबाह्य होणार नाही. यात भर घालून मी म्हणेन, की अर्जुन कधीच म्हातारा होणार नाही!!!

गुलमोहर: 

लेख छान आहे आणि अर्जुनाकडुन शिकण्यासारख्या अनेक गोष्टी पैकी लक्षाचा सतत पाठलाग ही
सर्वोत्तम आहे.
अर्जुनाने १४ वर्षाचा काळ अजिंक्य योद्धा बनण्यासाठी घालवल्याचे दिले आहे पण युधिष्टीर आणि इतर कंपनी चकाट्या पिटत होती हे चुकीचे वाटले. वनवासातुन सर्व जण असे विद्या शिकायला एकाचवेळी जाणे अशक्य होते, किंबहुना अर्जुन आणि भीमसेन शक्तिशाली होइपर्यंत युधिष्ठीराने युद्ध टाळले यात मला त्याची मुत्सद्देगीरीच जास्त जाणवली. वनवासाच्या काळात देखिल त्याने अनेक ऋषी, राजे यांना भेटुन आपली राजनैतिक बाजु मजबुत केली.
मला वाटते आजच्या काळात या व्यक्तिरेखेवर अन्याय झाला आहे. श्रीकृष्ण स्वतः आपला मार्ग निष्कलंक करण्यासाठी अर्जुन आणि भीम यांच्या शक्तिचा वापर करु पहात होते पण युधिष्ठीराने असा वापर शांतिच्या नावाखाली अतिरिक्त होउ दिला नाही.
खरा राजा तोच असतो जो सर्वांचा उत्कर्ष पहातो स्वतःचा नाही.

निलीमा, तुमचा विचार खरोखरच खूप छान आहे, युधिष्ठिराकडे बघण्याचा एक वेगळाच द्रुष्टिकोन दिलात त्याबद्दल आभार. मला वाटतं की द्रौपदीला पणाला लावणे या गोष्टीमुळे सगळ्या भारतीयांमध्ये त्याच्याबद्दल एक प्रकारची तुच्छता आहे त्यामुळे त्याच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असावे नकळतपणे.