कांचेचा खुळखुळा

Submitted by अज्ञात on 27 August, 2008 - 00:42

का वार्‍याचे द्वार बंद
गुदमरू लागल्या कळा
समेवर येइच ना ही तान
बिनसला ताल अडाणा खुळा

मिटेच ना बघ अदय पापणी
दिसे परस मोकळा
कडांवर सागर; निश्चल वेळा
झाला कांचेचा खुळखुळा

उडून यावी वाटे बुलबुल
भरून घ्यावा डोळा-
व्हावे श्वासांमधले दीर्घ उसासे
हुंदक्यात गोळा !

...............अज्ञात
१३२४,नशिक

गुलमोहर: 

अज्ञात, मला याची पाश्वभुमी देऊ शकाल ? कदाचित माझा आनंद त्यात द्विगुणीत होईल.

प्रयेसीकडून कुठलीच बातमी नसल्याने जगण्या वागण्याचा ताल बिनसला. अंगण मोकळं पाहून दुष्ट पापणी मिटे ना. डोळ्यात पाणी आणि समय सरे ना, डोळ्यांच्या काचा झाल्या. प्रयेसी अचानक उडून यावी, तिला तृप्त अंतःकरणानी बघून घ्यावी आणि मनातले दीर्घ उसास्यांचे आनंदाश्रू व्हावेत. Happy
.................अज्ञात

खरं तर तू तुझ्या अनुभूतीतून तुझे स्वतःचे अर्थ लावायला हवेस. प्रत्येकाच्या अनुभूती आणि समज, अर्थ लावण्याच्या पद्ध्ती वेगवेगळ्या असू शकतात्/असाव्यात.
असो.

तेच ते. त्यासाठीच हा खटाटोप केला. पण मी येथे प्रेयसीचा विचार नाही केला. माझा प्रवास अज्ञाताच्या वाटेवर होता. जे गवसावे वाटते ते गवसत नाही. ही स्थिती वेगळीच. पण मग वाटले तुमची प्रेरणा जाणुन घ्यावी. यात कदाचित मी योग्य मार्गावर असल्याचा आनंद मिळेल. असो. मार्ग जरी भिन्न असले तरी आनंद आहेच. हेही नसे थोडके.

कौतुक,
कुठल्याही लिखाणाला अथवा विचारासाठी कांहीतरी निमित्त हवं असतं. त्याचं महत्व अनेकदा फक्त तेवढ्यापुरतंच असावं अशा रूपकात्मत मांडणीत. मूळ कवी/लेखकाची झाकली मूठ असावी, म्हणजे वाचक; त्याचे विचार आणि लिखाणाचा त्याच्या परीने लागलेला आशय इथपर्यंत सीमित रहातो आणि त्याला वैयक्तिक संदर्भ रहात नाहीत. तू लावलेला "अर्थ आणि आनंदही" बरोबरच आहे कारण तुझी त्या वेळची मनस्थिती तशी असेल. तिसरा कोणी अजून वेगळ्या अँगलने विचार करू शकतो/करावा. शब्द किंवा वाक्यरचनेचा अर्थच लागत नसेल तर जरूर विचारावं कारण प्रांतवार भाषा, प्रचलित अथवा प्रसंगानुरूप आपोआप तयार झालेला एखादा नवीन शब्द यामुळे वाचतांना अडचण येऊ शकते. असो. पुरे करतो. फार लेक्चरबाजी झाली की काय बुवा ???? सांभाळून घे बाबा. Happy

कवी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचं; त्यांच्या समोर इतकं भिन्न सादरीकरण झालं की ते स्वतःच अवाक झाले. जे मांडलं होतं ते त्या परिस्थितीत अतिशय सुंदर आणि समर्पक होतं पण ती कविता लिहितांना त्यांना वेगळंच कांही अभिप्रेत होतं. त्यांनी ते मान्यही केलं. (तो कर्यक्रम, "लेणी तेजामृताची" या नावाने, त्यांच्या अमृत म्होत्सवाच्या आणि त्यांना ज्ञानपीठ मिळाल्याच्या निमित्ताने आम्हीच बसवला होता. त्याचे नाशिक्-पुणे-धुळे-दिल्ली असे एकूण २५ प्रयोग झाले, पैकी नाशिकचे सराव आणि दिल्लीचा प्रयोग त्यांच्या उपस्थितीत झाले. मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे.)

मान्य. तुमची कविता वाचली तेव्हा मी 'कोहं' च्या नादात होतो. म्हणुन पार्श्वभुमी विचारली. तुम्ही पुर्ण रसग्रहण दिले. त्यातही आनंद.
असो. पुन्हा भेटुच.