बोधकथा १

Submitted by chaukas on 7 January, 2012 - 10:43

एकदा एका सशिणीला रेड्याबरोबर लग्न करायची हुक्की आली. लगोलग ती सर्वात पहिल्यांदा दिसलेल्या रेड्याकडे गेली आणि तिने त्याला मागणी घातली. रेडा हबकला. म्हशींना कसे झुलवायचे याची युक्ती त्याला माहीत होती. पण सशिणीकडे त्याच्या कुळातल्या कुठल्याही नराने आजतोवेरी कुठल्याच दृष्टीने पाहिले नव्हते. त्यामुळे "तुझा गैरसमज झालाय. Let's be friends" हा डायलॉग इथे वापरावा की नाही याबद्दल त्याचा गोंधळ उडाला. शेवटी त्याने "माझी सदतीस लग्नं आधीच झाली आहेत" (मनुष्यांतील काही विशिष्ट समूहांमध्ये जशी चार लग्ने करायची परवानगी असते तसे प्राण्यांतल्या वेगवेगळ्या जमातींत ही संख्या वेगवेगळी असते, आणि रेड्यांसाठी ती सदतीस असते हे जाणकारांस माहीत असेलच) असे म्हणून पळ काढला.

पण सशिणीने हार मानली नाही. एक सिनेमा पडला तरीही तडफेने दुसरा काढणाऱ्या देव आनंदच्या चपळाईने ती दुसऱ्या रेड्याकडे गेली आणि तिने त्याच्यासमोर तिचा प्रस्ताव मांडला. दुसरा रेडा विचारवंत होता. तो कायम साहित्यिकांच्या मागोमाग हिंडत असे आणि त्यांची 'आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ' अशी शेवटच्या 'क्षी' च्या उच्चारणाआधीच विरून जाणाऱ्या शिंकेसारखी गहन चर्चा मन लावून ऐकत असे. (आता यासाठी त्याला कुठल्याकुठल्या ठिकाणी हिंडावे लागत असे ते सोडा)

त्याने प्रस्ताव नीट ऐकून घेतला. तो नीट ऐकला आहे हे तिला समजण्याकरिता मान खालीवर (डोळे मिटून; डोळे मिटल्याने या साध्याशा हालचालीला महत्त्व प्राप्त होते हेही त्याला कळले होते) केली. आणि खाकरून बोलायला सुरुवात केली. "तुमच्या प्रस्तावाचा साकल्याने विचार करायचा झाला तर पहिला मुद्दा म्हणजे या प्रस्तावावर चर्चा करताना आपल्याला प्राणीसापेक्ष दृष्टिकोन न ठेवता प्राणीनिरपेक्ष दृष्टिकोन अंगिकारणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रस्तावच निरर्थक ठरेल. दुसरे म्हणजे या प्रस्तावामागची तुमची कारणमीमांसा काय आहे हे नीट तपासून पाहावे लागेल. आणि तिसरे म्हणजे इतिहासात, अर्थात प्राणीजगताच्या इतिहासात, या आणि अशा प्रस्तावाची कुठे नोंद आहे का हेही नीट तपासून पाहावे लागेल. त्यामुळे, ही चर्चा सुरू करायला आपल्याला किमान सहा महिने तयारी करावी लागेल. आणि तशी तुमची तयारी आहे का, तुमच्या विद्यापीठाने त्यासाठी अभ्यासनिधी मंजूर केला आहे का, हा विचार करून तुम्हाला या प्रस्तावाचे पुढे काय करायचे याचा विचार करावा लागेल".

सशिणीने पळ काढला. पण घाबरून नव्हे, तर पुढच्या रेड्याकडे. पुढचा रेडा डुरकत इकडे तिकडे उधळत होता. त्याने सशिणीचे बोलणे मनावरच घेतले नाही. तिने फारच नेट लावला तेव्हा "ह्यॅ! ब्लडी घाटीज.... " असे म्हणून तो नाक वर करून चालता झाला.

सशिण विक्रमाच्या वंशातली होती बहुतेक. तिने धीर न सोडता चौथ्या रेड्याला गाठले. हा समन्वयवादी होता. त्याने शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले. त्याला तसाही एक जुना हिशेब मिटवायचा होताच. मग त्याने तिची समजूत काढायला सुरुवात केली. "हे बघ, आपल्या मीलनात अडथळे दोन. एक म्हणजे रंग आणि दुसरा म्हणजे आकार. आपली संतती कुठल्या रंगाची आणि कुठल्या आकाराची होईल कुणास ठाऊक? या अडथळ्यांवर मात करायची म्हणजे तुला माझ्याहून लहान आकाराचा आणि तुझ्यासारख्या रंगाचा प्राणी योग्य ठरेल. आणि असा एक प्राणी आहे. माझ्या मालकाच्या मालकाचा मोत्या कुत्रा. रंगाने पांढरा आहे, आणि आकाराने माझ्या चतकोर. मग जाऊ करायला बोलणी त्याच्याकडे? "

सशिणीने विचार करून होकार दिला. नाहीतरी तिला काहीतरी 'वेगळे' करण्याच्या ध्यासानेच पछाडले होते. काहीही करून 'जंगल समाचार'च्या तिसऱ्या पानावर झळकायचेच असा तिचा निश्चय होता.

मोत्यालाही मिडलाईफ क्रायसिसने पछाडले होते. त्यातून बाहेर पडायला ही युक्ती बरी आहे असा त्याने विचार केला.

उड्या मारणारा जिवंत प्राणी समोर पाहून त्याची शिकारी वृत्ती आणि प्रवृत्ती जागी झाली. झेपा टाकत त्याने सशिणीची शिकार केली आणि तिचा चट्टामट्टा उडवला.

मोत्याच्या मालकिणीने त्याला दूध-पोळी या आणि याच आहारावर वाढवले होते. "आमचा मोत्या ना, नॉन-व्हेजला अज्जिबात शिवत नाही. गुरुवारी तर फक्त दूध नि पेढे, आणि तेसुद्धा आरती झाल्यावर. हो की नाही रे मोत्या? " त्यामुळे त्याच्या शिकारी वृत्ती आणि प्रवृत्तीला त्याच्या प्रकृतीने अजिबात साथ दिली नाही. आणि अतिसाराच्या वाखांनी मोत्याही गचकला.

बोधः पाहुण्याहातून साप मारावा. सापही मरतो आणि पाहुणाही.
पूर्वप्रकाशनः 'मनोगत'

गुलमोहर: 

"तुझा गैरसमज झालाय. Let's be friends" हा डायलॉग इथे वापरावा की नाही याबद्दल त्याचा गोंधळ उडाला.

Biggrin Biggrin Biggrin Happy Happy

कथेचे तात्पर्य :

इसापाची नक्कल करणे सोपे नसते ! सापाच्या कथा लिहून ई-साप होता येत नाही.

Biggrin