गेले ते दिन... (भाग ४)

Submitted by chaukas on 5 January, 2012 - 22:21

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निघायचे होते. रात्री बराच वेळ झोप आली नाही. सकाळी उठून स्वच्छतागृहांसमोर रांग लावण्यात बराच वेळ गेला. 'माकाकु'वर दया दाखवून मी माझा आलेला नंबर त्याला देऊन टाकला. नाहीतर त्याची खाकी हाफपँट पिवळी व्हायची वेळ आली होती. बिचारा आयुष्यात कधीच 'हॉस्टेल', 'ट्रेक' असल्या गोष्टींच्या वाट्याला गेला नव्हता.
निघण्यासाठी ग्राउंडवर नऊ वाजता फॉल-इन झालो तेव्हा कळले की महाराष्ट्राचे साठ आणि कर्नाटकचे साठ असे एकशेवीसजण आमच्या तुकडीत असणार होते. ट्रेक म्हणजे काय, तर गोवाभर पायपीट करून परत नावेलीला पोहोचणे. आमचा कमांडंट होता कॅप्टन संतोष हेगडे, एएमसी. गोरा, घारा, मध्यम उंची, विरळ केस, पंचविशी ओलांडली असेल नसेल. प्रथमदर्शनी तरी माझे मत त्याच्याबद्दल काही चांगले झाले नाही.
तरी 'कॅप्टन' म्हणजे किमान दोन पायऱ्या चढलेला (सेकंड लेफ्टनंट-लेफ्टनंट-कॅप्टन) म्हणून थोडा आदर बाळगायचा मी प्रयत्न केला. पण नंतर लगेचच एअरफोर्स एनसीसीच्या अरोराने सांगितले की एएमसी (आर्मी मेडिकल कोर; एनडीए ऐवजी एएफएमसी मधून सैन्यात भरती झालेले डॉक्टर) मध्ये पहिलीच पोस्ट कॅप्टनची देतात. हात्तिच्या. म्हणजे हा तर सेकंड लेफ्टनंटच की.
बाहेर पडून चालायला सुरुवात केली. अण्ण्या नि बाब्याला असल्या रटाळ चालण्याची अजिबात सवय वा इच्छा नव्हती. त्यांनी त्या चालण्याची मिरवणूक करून टाकली. अगदी विसर्जनाची मिरवणूक. "एक दोन तीन चार, सेकंड महाराष्ट्रची पोरे हुशार", "गणपतीबाप्पा मोरया" इथपासून तो "जय भवानी जय शिवाजी" पर्यंत. मध्येच तोंडी लावायला म्हणून "अमुकतमुकच्या बैलाला हो" आणि तेव्हा नुकतेच गाजू लागलेले 'टुरटूर' मधले "तुझ्या आईचा घो, नानाची टांग, आजीच्या चिपळ्या नि आबाचा ढोल". यातल्या नक्की कशामुळे कॅप्टन हेगडे पिसाळला कोण जाणे. "व्हॉटस दॅट? आयचा घो? व्हॉट डज दॅट मीन?" अशी सरबत्ती करत बैलासारखा फुसांडत आला. भीतीपेक्षा आश्चर्यानेच सगळेजण गप्प बसले.
आमचा पहिला मुक्काम नावेलीपासून जेमतेम सहा-आठ किमी असलेल्या एका डोंगरावरील चर्चमध्ये होता. ते चर्च बाणवलीच्या जवळपास होते. चालायला सुरुवात करून एक-दीड तासांतच "हॉल्ट" अशी गर्जना झाल्यावर आमचा तरी चांगलाच अपेक्षाभंग झाला. आता दिवसभर करायचे काय म्हणून आम्ही समोरच्या पटांगणात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. आणि अचानक बाथरूम्सच्या दिशेने (म्हणजे जिकडे झापांचे आडोसे केले होते त्या दिशेने) आरडाओरडा ऐकू आला. बाब्याने पहिला गोल केला होता.
बाब्याला आली होती अंघोळ करायची हुक्की. पण मुक्कामाला तिथे पोहोचल्या पोहोचल्या सगळ्या कानड्यांनी जलस्त्रोत ताब्यात घेऊन अगदीच निवांतपणे अंघोळ-कपडे आदी प्रकार सुरू केले होते. बाब्याही अचाट. पाचेक मिनिटे वाट पाहून झाल्यावर त्याने नळाखाली बसलेल्या एका कानड्याला ढकलून दिले. तो कानडीअप्पा बाब्यापेक्षा फूटभर तरी उंच होता. पण अचानक झालेल्या हल्ल्याने तो गांगरला. त्याची शाब्दिक प्रतिक्रिया ही 'म' अथवा 'भ' या श्रेणीतल्या शब्दाची होती असा समज करून घेऊन बाब्याने त्याच्या कानाखाली जाळ काढला. आणि समजूत काढायला म्हणून आलेल्या दुसऱ्या एका कानड्याला तो चावला.
नंतर कळाले की तो 'चावण्या'चा प्रसंग ज्यांनी बघितला नाही ते केवळ दुर्दैवी. प्रेमभावना अनावर झालेल्या एखाद्या नायकाने आवेगाने नायिकेला मिठीत घ्यावे आणि चुंबनासाठी आपले तोंड तिच्या तोंडाकडे झपाट्याने न्यावे तसे सगळे बाब्याने केले. फक्त तोंडाचा रोख ओठांऐवजी कानांकडे ठेवला आणि काचकन कानाचा तुकडा पाडायचा प्रयत्न केला.
या झणकजाळ हल्ल्यासमोर कानड्यांनी लगेच शरणागती पत्करली. पण कॅप्टन हेगडेने त्याच्या राज्यबांधवांची बाजू घेतली आणि बाब्याला दीड तास पटांगणामध्ये 'सावधान' मध्ये उभे करून ठेवले. टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच.
तो अख्खा दीड तास बाब्याने हेगडेला जी शिव्यांची लाखोली वाहिली ती जर त्याने ऐकली असती (आणि त्याला समजली असती - बाब्याच्या शिव्याही natural numbers सारख्या सोप्या नसून complex numbers सारखा अनघड होत्या) तर तो मुकाट्याने एएमसी सोडून सिरसी नाहीतर सिद्धापूरला सुपारीचा व्यापार करत बसला असता.
उरलेला दिवस तसा शांततेत गेला. संध्याकाळी "बीचवर जाऊन येऊ का?" या प्रश्नाला अपेक्षेप्रमाणेच हेगडेने नकार दिला. बीच तिथून चालत तासाभराच्या अंतरावर होता असे कळले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना हेगडेच्या चेहऱ्यावर दुष्ट स्मितहास्य विलसत होते. आम्हांला नीट फाईलमध्ये उभे करून तो जीपमध्ये बसला. 'आता पुढच्या सहा-आठ किमीसाठी हा बाबा जीपमध्ये का बसायलाय, आणि तेही असले खलनायकी हसू घेऊन'? या आमच्या अव्यक्त प्रश्नाचे उत्तर अगदी सविस्तरपणे, पुढचे आठ तास मिळाले. त्या दिवशीची एकंदर चाल होती साधारण चाळीस किमी. बाणवलीपासून ते थेट वास्कोपर्यंत. चांगलाच पिट्ट्या पडला. जेवायलाही त्या भोसडीच्याने थांबवले नाही. एक ट्रक आणून आमच्या जरा पुढे नेऊन उभा केला. त्यात पुरीभाजीची पाकिटे होती. त्या ट्रकजवळून जाणाऱ्या प्रत्येकाला हातात एकेक पाकिट दिले. चालताचालताच खायचे. पुढच्या ट्रकमध्ये पाण्याची पिपे. तिथून जाताना पटकन ग्लासभर पाणी घोटायचे. वास्कोला INS Hansa मध्ये मुक्कामाला जाईस्तोवर सायंकाळ झाली. आमच्या स्वागताला जीपमध्ये बसलेला हेगडे होताच.
तिथे मात्र पुढचा एक अख्खा दिवस मुक्काम होता. त्यात आम्हांला दाभोळी विमानतळावर नेऊन तेव्हा अगदी नवीनच आलेल्या 'सी हॅरियर' या विमानांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ही विमाने हेलिकॉप्टरसारखी जागच्या जागी उडू शकतात असे आमच्यातल्या एअरफोर्स एनसीसीच्या बऱ्याच लोकांचे म्हणणे होते. नंतर कळाले की हा बराचसा कल्पनाविलास होता. खरे होते ते एवढेच की बाकीच्या विमानांच्या तुलनेत हे अगदी कमी अंतराच्या रनवेवरून टेकऑफ घेऊ शकत असे. ही सोय खासकरून विमानवाहू नौकांवरून उड्डाणे करण्यासाठी होती.
संध्याकाळी आम्ही वास्को मार्केटमध्ये फेरफटका मारला. अर्थातच अनाधिकृतपणे. बाब्याने इथेही सुरक्षा व्यवस्थेतील भोक शोधून काढले होते.
आणि इथेही 'माकाकु'ने कँप कमांडंट बोसकडून परतून थोबाड फोडून घेतले. अगदी नावेलीचा ऍक्शन रीप्ले. फरक एवढाच की आम्ही यावेळी बिअर ऐवजी दीडदीड पेग जीन मारून आलो होतो.
पुढच्या दिवशी आमची वरात वास्को बंदरात नेण्यात आली. तिथून फेरीतून दोना पाऑल. परत चालत चालत पणजी. त्यावेळेस मांडवीवरचा पूल पडलेला होता. कितव्यांदा ते आठवत नाही, बहुधा पहिल्यांदाच. तर तिथून परत फेरीबोटीने पलिकडे. बेती-ब्रिटोना रस्त्यावर एका मोठ्या मैदाना कँप होता. तिथे दोन दिवस मुक्काम होता. तिथे आमच्या आधीची बॅच येऊन एक दिवस जुनी झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुढे रवाना झाली. वास्कोला आमची गाठ कशी पडली नाही? तर वास्कोला दोन बॅचेस एकदम ठेवायला INS Hansaने नकार दिल्याने आलटून पालटून एकेक बॅच मार्मागोवा पोर्ट ट्रस्टच्या शाळेत ढकलण्यात आली होती.
या कँपचे कमांडंट ब्रिगेडिअर कपूर होते. ते निवृत्त होण्याआधीची शेवटची पोस्टिंग म्हणून एनसीसीत आले असावेत. किंवा निवृत्त झाल्यावर 'मानद' म्हणून आले असावेत. 'ब्रिटिश आर्मी'मध्ये जडणघडण झाल्यासारखीच त्यांची एकंदर भाषा होती ('माय बॉईज', 'जॉली गुड फेलो' इ इ).
या कँपमधून आम्हांला अगदी रीतसर चार तासांची सुट्टी काढून पणजीला जायची सुविधा मिळाली. इथे आमच्या ग्रुपमधल्या दाद्या तांबेने धमाल उडवली.
हा महापुरुष जुन्नरजवळच्या कुठल्यातरी गावातला. इतिहास आणि/किंवा समाजशास्त्र घेऊन बीए करीत होता चिंचवडच्या का खडकीच्या कुठल्यातरी कॉलेजातून. तसा बराचसा भाबडा होता. त्याचा कुठल्याही गोष्टीवर चटकन विश्वास बसे.
आतापर्यंत 'कायदेशीर'रीत्या कँपबाहेर पडता येत नाही म्हणून जी पंचाण्णव टक्के जनता मुकाट्याने बसून होती त्यांच्यातला हा दाद्या होता. आता 'अधिकृत'रीत्या बाहेर पडता येतेय म्हणताना त्याने त्याचा डबा लगेच आमच्या इंजिनला जोडला.
दाद्याने आयुष्यात मद्य सिनेमातच काय ते पाहिले होते. त्याचा 'पदवीदान समारंभ' उरकूनच टाकावा अशी प्रशाला हुक्की आली आणि पुढची कथा घडली.
लग्न होऊ घातलेल्या व्यक्तीला लग्नाच्या जरा आधी जसे 'आपले लग्न होते आहे' या भावनेनेच बावचळायला होते तसे दाद्याला 'आपण आता दारू पिणार' या भावनेनेच तरंगल्यासारखे वाटायले. पणजीच्या मार्केटमधून फिरताना तो शोधक नजरेने सगळ्या फ्रॉकवाल्या किरिस्तांव फटाकड्या न्याहाळू लागला. आयुष्यात दारू जरी कधी प्यायला नसला तरी 'बाटली'च्या षोकाच्या बरोबरीनेच 'बाई'चा षोकही करायचा असतो असा त्याच्या मनात हिशेब बसला होता.
'कदंब'च्या पणजीच्या बसस्टँडकडून पश्चिमेकडे, म्हणजे मार्टिन्स कॉर्नर वा गुडिन्होज कडे, जाताना मांडवीच्या एका छोट्याशा फाट्याला रस्ता ओलांडतो. त्या छोट्याशा फाट्याला लागूनच असलेल्या एका बारमध्ये आम्ही वरात नेली. बार तसा लहानच, पण खाली-वर असा होता. वर जाण्याचा लाकडी जिना आतूनच होता. वर जेमतेम दोन टेबले होती. त्या वेळी वर कुणीही नव्हते. निवांत बसावे म्हणून आम्ही वर गेलो.
आता दाद्याला काय पाजावे हा गहन प्रश्न उभा राहिला. मला तोवर फेणीची चटक लागलेली नव्हती. त्यामुळे मी बिअर घेण्याचे ठरवले. प्रशांतने खूप विचार करून अखेर बिअरवर गाडी आणली. अण्ण्या नि बाब्या नेहमीप्रमाणे काजू इ चरायला बसले. दाद्याने मात्र बिअर प्यायला साफ नकार दिला आणि फेणी पिण्याचे ठरवले. 'मारून मारायचा तर डास कशाला, हत्तीच मारू' असा त्याचा एकंदर आविर्भाव होता. फेणीचा पेग त्याने पाणी प्यायल्यासारखा पिऊन टाकला आणि आमच्याकडे निरागस नजरेने पाहून तो विचारता झाला, "झालं? चलायचं?" दारू पिणे म्हणजे एवढा रोखठोक आणि तत्पर व्यवहार नसतो हे त्याला कसे समजवावे हा प्रश्न आम्हांला पडला. मग आमची बिअर पिऊन होईस्तोवर फेणीबरोबर आणलेले ड्यूक्स लेमोनेड (फेणी त्याने तशीच उडवली होती) पीत बसण्याचे त्याने मान्य केले. अर्थात अजून एक पेग ऑर्डर करण्याच्या अटीवर.
मग दादासाहेब जरा खुलायला लागले. आमच्या टेबलाजवळ कुठल्याही बारमध्ये असते तसे अर्ध-अनावृत्त आणि पाऊण-अनावृत्त ललनांनी भरलेले एक कॅलेंडर होते. दादासाहेब नीट मन लावून एकेका महिन्याच्या ललनेची न्याहाळणी करू लागले. खूप विचारांती त्यांनी मे महिन्याची ललना पसंत केली आणि कॅलेंडरचे पान बदलून तिला जनतेसमोर परत एकदा आणले. ऑक्टोबर महिना चालू होता त्याची त्यांनी अजिबात फिकीर केली नाही.
प्रशाला हे जरा धोक्याचे वाटले, त्यामुळे त्याने दाद्याची समजूत घालायचा प्रयत्न केला "अरे, तो बारमालक काय म्हणेल? असे बाहेर गेल्यावर करणे बरे दिसते का?" एव्हाना दादासाहेबांचा दुसरा पेगही उदरस्थ झालेला होता. त्यामुळे सुरवंटाचे फुलपाखरू जवळजवळ होत आले होते. खरेतर सरड्याचा डायनॉसोर झाला होता म्हणा. त्या डायनॉसोरने डरकाळी मारली आणि बारमालकाला वर बोलावले. मग उच्च स्वरात त्याने मे महिन्याच्या पानावर असलेल्या ललनेची तोंड भरून स्तुती केली आणि तिच्या तुलनेत ऑक्टोबरच्या ललनेला कसे काही 'अपील'च नाही हे त्याने अगदी रांगड्या भाषेत मांडले. बारमालकाला मराठी कळत
असले तरी जुन्नरी बोली त्याला माहीत नसल्याने सुटलो.
एव्हाना आमचा बिअर पिण्याचा उत्साह संपून आता याला परत कसे न्यायचे हा प्रश्न भेडसावू लागला होता. त्यामुळे एकेक ग्लास बिअरवरच 'बास' असे म्हणून आम्ही बिल चुकते करायला निघालो. तर दादासाहेबांनी "अजून एक तरी पेग व्हायलाच हवा, नाहीतर सानेगुरुजींना काय वाटेल?" असा बिनतोड सवाल केला. सानेगुरुजी कुठून आले कोण जाणे. विचारणे अर्थातच मूर्खपणाचे ठरले असते. कसाबसा त्याला बाहेर काढला. गार अंधारातून लखलखीत उजेडात आल्यावर जरा वेळ डोळे मिचमिचे करून दादासाहेबांनी परिस्थितीशी जुळवून घेतले. तोवर आम्ही 'कदंब'च्या बसस्टँडजवळ पोहोचलो होतो. फेरीबोट तिथूनच पुढून सुटत असे. पण बसस्टँडवरील एका स्कर्टधारक ज्यूडी/शार्लट/तत्सम यौवनेला पाहून दादासाहेबांची सौंदर्यदृष्टी उफाळून आली. "मला तिला एक लिपष्टिक विकत घेऊन द्यायची आहे" असा पुकारा करीत त्यांनी त्या दिशेने कूच केले. अण्ण्या नि बाब्या नेमके मागे कुठेतरी रेंगाळत होते भोसडीचे. आणि दादासाहेब तसे अंगापिंडाने मजबूत होते. त्याला आवरताना आणि अण्ण्याच्या नावाने पुकारा करताना आम्हा दोघांच्या तोंडाला फेस आला.
अखेर अण्ण्याने दाद्याच्या गळ्यात हात घालून त्याचा गळा आवळला आणि त्याला बोकडासारखा फरपटत फेरीत नेऊन घातले. तरीही दाद्याने जमेल तेवढा दंगा चालूच ठेवला. कसाबसा कँपमध्ये पोहोचलो तोवर दुपार उलटून गेली होती. त्याला गप्प कसे करावे या विचारात असतानाच दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे दुपारच्या चहाबरोबर स्नॅक्स म्हणून बटाटवडे देत असल्याची कुणीतरी आवई उठवली. लगेच अण्ण्या-बाब्या हे सदैव भुकेलेले प्राणी तिकडे पळाले. ती आवईच होती हे खूप नंतर कळले. दुसरे म्हणजे ब्रिगेडिअर कपूर टेंट इन्स्पेक्शनला येणार असल्याची आवई उठली आणि ती खरीही निघाली. एव्हाना दादासाहेबांनी तुर्यावस्था प्राप्त केलेली होती. येताना फेरीत अजून कुठून फेणी मिळवलीन की काय कोण जाणे? आमच्या तंबूत ताठ बसून, पद्मासन घालून, त्यांनी "बम भोले, बम बम भोले" सुरू केले होते. ब्रिगेडिअर कपूर येताहेत या बातमीवर त्यांनी "मग मी काय नाचू का?" असा मार्मिक प्रश्न केला. मग एकदम "अरे, मराठी गडी आहे मराठी मातीतला. त्या पंजाब्याला कोण घाबरतो? हाड!". मी तंबूच्या दारात उभा होतो. दाद्याने "हाड!" ही डरकाळी इतक्या जोरात मारली होती की काय आवाज झाला हे बघण्यासाठी आमच्या तंबूपासून चार तंबू दूर असलेले ब्रिगेडिअरसाहेब मधले तंबू बायपास करून थेट आमच्याकडे येताना मला दिसले. आता काहीतरी करायला हवे होते. आणि पटकन.
प्रशा आत बसला होता. आम्ही एकमेकांकडे पाहिले. मी दाद्यावर उडी मारून त्याला आडवा केला. प्रशाने गुंडाळी करून ठेवलेली ब्लँकेटस उघडली नि माझ्यावर नि दाद्यावर मिळून अंथरली. आणि पटकन आत शिरून तोही दाद्याला आवरण्याच्या उपक्रमात सहभागी झाला. मी दाद्याच्या तोंडावर उशी दाबली होती. दाद्या बिअरच्या फेसासारखा उसळत होता. तेवढ्यात ब्रिगेडिअरसाहेब आमच्या तंबूच्या दारात पोहोचलेच. "व्हॉटस हॅपनिंग माय बॉय? एनी प्रॉब्लेम?" मी ब्लँकेटच्या बाहेर तोंड काढून आम्ही तिघेही आजारी असल्याचे, आणि आमच्यापैकी एकाला चांगलेच हींव भरल्याने तो थडाथड उडत असल्याचे सांगितले. "ओके, ओके, बट व्हॉटस कॅप्टन हेगडे डुइंग अबाउट इट? ही इज अ डॉक्टर, फॉर ख्राईस सेक". यावर काय बोलावे मला सुचले नाही. मी 'कॅप्टन हेगडेंना कळवले आहे पण ते अजून आले नाहीत' असे सांगून टाकले. थाप तर थाप, वेळेवर तरी मारावी. आम्हांला किती ताप आला आहे हे बघायला ब्रिगेडिअरसाहेब ब्लँकेटमध्ये आले असते त्यांचा रक्तदाब आभाळात पोहोचला असता.
नशीब आमचे. "टेक केअर, टेक रेस्ट" म्हणून कपूर गेले.
नंतर कळलेली गंमत म्हणजे कॅप्टन हेगडे खुद्द स्वतः पणजीला गेला होता तो रात्री उशीरा आला. आल्या आल्या त्याला ब्रिगेडिअरसाहेबांनी झापला. 'कोण आजारी पडले आहे एवढे?' या बुचकळ्यात पडलेला हेगडे आमचे बारा तंबू पालथे घालीत हिंडला. पण तोवर दादासाहेब निष्पाप पाखरासारखे झोपून गेले होते. आणि तशीही ब्रिगेडिअरसाहेबांनी आमची नावे विचारलेली नव्हती. त्यांच्यासोबतची मंडळी चार तंबू मागे असताना ब्रिगेडिअरसाहेब एकटेच त्या "हाड!"चा शोध घेण्यासाठी आलेले असल्याने इतरही कुणाला तो हिंवाने थडथडणारा कॅडेट माहीत नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर सामान भरायचा आदेश आला. परत फेरीतून पलिकडे. आणि रायबंदरमार्गे ओल्ड गोव्याकडे कूच. रायबंदर गाठेस्तोवर सगळा चमू बराचसा विस्कळित झाला. त्यात आम्ही सगळ्यात मागे राहिलो कारण माझ्या सॅकचा एक स्ट्रॅप तुटला. तो आधी गाठी मारून दुरुस्त करायचा प्रयत्न करून झाल्यावर शेवटी रायबंदरच्या नाक्यावर बसलेल्या चांभाराने तो दुरुस्त करून दिला. तोवर पेटी ऑफिसर सतीश नायर कंटाळून आम्हांला मागे रहायची परवानगी देऊन पुढे चालता झाला. कॅप्टन हेगडे तर जीपमधून पुढे गेलाही होता.
आम्ही होतो कितीजण? माझ्याबरोबर माझ्या कॉलेजचा म्हणून प्रशा, आम्हा दोघांना एकटे वाटू नये म्हणून अण्ण्या, आणि त्याला एकटे वाटू नये म्हणून बाब्या. शिवाय पुण्याच्या आम्हा चौघांना एकटे वाटू नये म्हणून पुण्याचाच एअरफोर्सचा अरोरा असा सगळा तर्कशुद्ध मामला होता. एवढे निवांत रेंगाळण्याचे कारण म्हणजे आजचा मुक्काम जेमतेम दहाबारा किमीवर असलेल्या ओल्ड गोव्यात असल्याची बातमी आम्हांला कळली होती.
एव्हाना मीही 'कॅपस्टन'ला आपले मानले होते. अरोराही अग्निहोत्री. निवांत धूर काढत आम्ही रायबंदरमधून मांडवीच्या काठाने चाललो होतो. तेवढ्यात मागून एक बस आली. तिच्यावरची पाटी बघून अरोरा एकदम खूष झाला आणि उभाच राहिला. आमच्या तराटणीला "अबे जरा इत्मिनान से सिगरेट तो पीने दे, बादमें बताता हूं एक खुषी की खबर" असे उत्तर देऊन तो निवांतपणे नाकातून धूर काढत बसला.
आणि सिगरेट संपल्यावर त्याने आम्हांला मागून आलेल्या दुसऱ्या बसमध्ये चढवले. बस होती पणजी-रायबंदर-ओल्ड गोवा-मंगेशी-फोंडा. पंधरा मिनिटांत आम्ही ओल्ड गोव्याला पोहोचलो. वाटेत सतीश नायरच्या हुकमतीखाली चाललेली आमची खाकी माकडे दिसली. पण तेव्हा आम्ही माना पार खाली घालून बसलो. ओल्ड गोव्याला उतरल्यावर आम्ही आधी एक छोटासा बार गाठला, आणि पहिली तुकडी दिसेपर्यंत निवांत बिअर ढोसली. पहिली तुकडी आल्यावर कांदा-बडिशेप प्रयोग करून साळसूदपणे मध्येच त्यांच्यामागे शिरलो.
हे उत्तम होते. कारण काढून मागे रेंगाळावे, बस गाठून पुढे जावे, बिअर प्यावी आणि परत धोपटमार्ग गाठावा.
ओल्ड गोव्यात आमचा मुक्काम सेंट झेवियर चर्चमध्येच होता. पणजीकडून गेल्यावर उजव्या हाताला लागते ते. जिथे झेवियरचा मृतदेह ठेवला आहे ते. तिथल्या कोर्टयार्डच्या आसपासच्या व्हरांड्यातच आमचा मुक्काम असणार होता.
तिथे सामान टाकून आधी आसपास फिरून आलो. तेवढ्यात कुणीतरी बातमी आणली की चर्चमध्ये 'सर्व्हिस' चालू असून ती संपल्यावर तिथला 'फादर' प्रत्येकाला घोटघोट वाईन देतो. लगेच सगळे चपळाईने चर्चमध्ये शिरलो. 'सर्व्हिस' चालू असताना गुडघे टेकून बसणे तसे अवघडच गेले. शिवाय कधी उठायचे नि कधी परत गुडघ्यावर यायचे याची कल्पना नसल्याने बराच गोंधळ झाला. शेवटी वाईनवाटप चालू झाले एकदाचे. पण दोन भानगडी झाल्या. एक म्हणजे घोटभर कुठली, चमचाभरच वाईन तो 'फादर' देत होता. दुसरे म्हणजे आम्ही भाविक किरिस्तांव नसल्याचे त्याला कळले आणि त्याने आम्हां सगळ्यांना हाकलून घातले.
प्रशाची ध्येयासक्ती केवळ दुर्दम्य होती. त्याने त्याच चर्चमध्ये त्याच फादरकडून पाच वेळेस हाकलून घेतले आणि मगच हार मानली. तोवर आभाळ भरून आले होते. संध्याकाळ लौकरच झाली आणि त्या व्हरांड्यात कुठेही दिवे नसल्याची जाणीव झाली. जेवण पेट्रोमॅक्सच्या उजेडात उरकले आणि परत अंधारात येऊन आडवे झालो. एव्हाना ऑक्टोबरातला अवेळी पाऊस रिपरिपायला सुरुवात झाली होती. ही योग्य संधी साधून मी सगळ्यांना भुताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. रत्नागिरीहून काजरघाटीमार्गे लांज्याला जाताना कसा एकदा तात्यामामाला एकच बुवा परतपरत हात करत होता आणि त्या बुवाला कसे कानच नव्हते ही हातखंडा गोष्ट झाली. एव्हाना श्रोतृवर्ग पुरेसा चिडीचूप झालेला होता. नंतर हरचेरीच्या (लक्ष्मीकांत बेर्डेचे गाव) नदीपात्रातली कलिंगडे कशी अमावास्येला तोडली तर पाण्याच्या माठासारखी पोकळ निघतात आणि ती तोडणाऱ्याची दातखीळ बसते या गोष्टीला भयाणच शांतता पसरली.
रात्री दहा वाजून गेले. पावसाचा जोर वाढला होता. अजून वेरवलीच्या घाटीत कसे पंचमीच्या रात्री दिवट्यांचे नाच दिसतात हे सांगायचे होते. पण रात्री जेवताना पोटभर प्यायलेल्या पाण्याने आपले काम केले होते. बाहेर पडत्या पावसात झाडांना पाणी घालणे क्रमप्राप्त होते. आणि भुताच्या गोष्टी सांगून सांगून मलाच जरा वेगळे वाटू लागले होते. मी प्रशाला ढोसले. तो बिचारा तयार झाला पण तोही जरा सरबरलेलाच होता. अण्ण्या नि बाब्या घोरायला लागले होते. इतर श्रोतृवर्गापैकी कुणीही यायला तयार झाले नाही. शेवटी अंधारात एकमेकांचा हात धरून आम्ही मागचा लाकडी दरवाजा उघडला. त्या उघडण्याच्या आवाजाने आणखीनच धडकी भरली. शेवटी फार बाहेर न जाता "गळत्यात मुतणाऱ्याचे फावते" ही कोंकणी म्हण सार्थ करून आम्ही परतलो.
एकदा सगळ्या लोकांत परतल्यावर मात्र आमचा संताप अनावर झाला. आम्ही इथे बाहेर भुतांच्या हद्दीपर्यंत एकटे जाऊन आलो आणि या फोकळीच्यांना त्याची ना पर्वा ना कौतुक! मग मी कसे बाहेर गेल्यावर काही 'वेगळेच' वाटू लागले, प्रशा कसा माझ्या डावीकडे होता तो उजवीकडून परतला वगैरे कथा रंगवायला सुरुवात केली. उत्कंठा पुरेशी शिगेला पोहोचल्यावर 'माकाकु'ने प्राणभयाने किंकाळी फोडली.
तसाही तो पेद्रूच. त्यालाही जरा 'जाऊन' यावे अशी इच्छा होऊ लागली होती. पण मी आल्यावर जी कथा रचायला घेतली त्यामुळे त्याला बाहेर जावे तरी पंचाईत, न जावे तरी पंचाईत अशी दुविधा झाली. आणि व्यक्त होण्याचा एकुलता एक मार्ग म्हणून तो किंचाळला. त्याच्या किंकाळीने झोपलेले काहीजण जागे झाले. काय झालेय हे त्यांना नक्की कोणी सांगेना. 'माकाकु' तेवढ्यात "चला ना कुणीतरी माझ्याबरोबर" अशी विनवणी करू लागला. तो भुताचा आवाज आहे या समजुतीने अजून काही जणांनी किंकाळ्या फोडल्या. एकंदर झकास गदारोळ माजला.
आणि एक दार उघडल्याचा आवाज आला. सगळे एकदम चूप बसले. दार उघडले आणि समोर हातात मेणबत्ती घेतलेली एक काळ्या पांढऱ्या आकृती उभी राहिलेली दिसली. आता मात्र शंभरएक डुकरांची एकदम कत्तल होत असल्यासारखा किचकिचाट कानांचे पडदे ओरखडायला लागला.
अखेर दहा पंधरा मिनिटांनी सगळे गणित सुटले.
वरच्या मजल्यावर बसून 'आकाशातल्या बापा'चा संदेश वाचत बसलेल्या 'फादर'चे कुतूहल 'माकाकु'च्या किंकाळीने जागे झाले आणि पांढऱ्या झग्यातला तो प्रकार हातात मेणबत्ती घेऊन वरच्या मजल्यावरून खाली आला नि त्याने ते दार उघडले.
एव्हाना पाऊसही थांबला होता पण फादर भडकला होता. त्याने तत्काळ आमची रवानगी आतल्या व्हरांड्यातून बाहेरच्या बाजूला असलेल्या पडवीत केली. ती रात्र कशीबशी दाटीवाटीने काढली. पाऊस थांबला असल्याने उकडायलाही लागले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत प्रशाने 'सर्व्हिस'ला जायचा प्रयत्न केला पण एव्हाना 'फादर' त्याला चांगलाच ओळखायला लागला होता. त्याने थेट कॅप्टन हेगडेकडे तक्रार केली आणि प्रशाचे कान उपटण्यात आले.
पुढचा टप्पा होता असाच तासा-दोन तासांचा. मंगेशीपर्यंत. परत एकदा माझ्या सॅकचा स्ट्रॅप 'तुटला'. परत आम्ही पाचजण मागे राहिलो. आणि संधी साधून 'कदंब'कृपेने सगळ्यांच्या पुढे पोहोचलो. पण मंगेशीला एक अडचण आली. देऊळ जवळ असल्याने असेल, इतर ठिकाणसारखे 'नजर फिरवावी तिकडे बार' असा प्रकार नव्हता. किंबहुना एकही बार दिसेना. गोव्यात एवढाच एरिया 'ड्राय' आहे की काय या विचाराने आम्ही घाबरलो. तिथे उभा असलेला एक शिडशिडीत माणूस आमच्याकडे कुतूहलाने वा कौतुकाने वा आदराने बघत होता. त्याने प्रेमाने आम्ही कोण, कुठले याची चौकशी केली. मग आम्ही आमची शंका त्याला विचारल्यावर त्याने आम्हांला आश्वस्त केले की गोव्यात 'ड्राय' काही असेलच तर तो अंघोळीआधीचा टॉवेल असतो. मग एका बेचक्यात दडलेला बार दाखवायला तो भला गृहस्थ जातीने आमच्यासोबत आला.
मागून येणाऱ्या जथ्याचा कलकलाट ऐकू आल्यावर आम्ही कांदा-बडिशेप प्रयोग करून हळूच त्यांच्यात शिरलो. मुक्काम देवस्थानातल्या एका इमारतीत होता. दरवाजापाशी तिथला कँप कमांडंट नायक कड्डक ऑलिव्ह-ग्रीन पोषाखात स्वागताला उभा होता.
त्याने आम्हां पाचजणांना वेचून बाजूला काढले आणि चौकशी सुरू केली. च्यामायला, कुणी चुगली केली असेल आमची? कारण तो गुन्ह्याच्या खुणा तर अगदी बरोबर सांगत होता.
शेवटी आमची ट्यूब पेटली की जातीने बारपर्यंत सोडायला आलेला 'भला गृहस्थ' तो हाच. आता यावर काही अपीलच नव्हते. मुकाट्याने खाली मान घालून शिक्षेची वाट पाहत राहिलो. कॅप्टन हेगडेने आसुरी आनंदाने शिक्षा ठोठावली - जेवण घेऊन येणाऱ्या ट्रकसोबत परत मडगांवला रवानगी. आणि कंप्लीशन सर्टिफिकेट न मिळताच तिथून पुण्याला रवानगी.
आता काय करावे? या विचाराने आम्ही अस्वस्थ झालो. खरोखरच असे झाले असते तर केळकरसरांनी आम्हांला फाडून खाल्ले असते. पण करणार तरी काय?
काय करायचे ते आमच्यातल्या कन्नडिगांनीच केले. आमचे एकंदर 'चित्तवृत्ती उल्हसित करण्याचे प्रयोग' त्यांना फारच बोचत होते. आतापर्यंत शहाण्यासारखे वागलो, झक मारली" अशा तऱ्हेच्या भावना यंडगुडकुंडमड असल्या भाषेत व्यक्त करण्यात आल्या आणि त्यांच्यातल्या एका टोळक्याने बाहेर पडून बार गाठला. आणि बॅकलॉग भरून काढण्यासाठी थेट फेणीतच तोंड घातले. आमच्या भीषण भवितव्याची कल्पना त्यांना कुणी दिली नाही.
दीड तासांनी कानडी गाणी म्हणत आणि आसमंतात फेणीचा सुगंध पसरवीत सगळे कानडीअप्पा आले. आणि आमच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले. आम्ही थेट कॅप्टन हेगडेलाच जाऊन खुन्नस दिली. मुकाट्याने, एखादी बिअर पिणारे आम्ही गुन्हेगार, तर भसाभस फेणी ढोसणारे हे कोण? आम्हांला मानहानीकारक रीत्या परत पाठवण्याची शिक्षा, तर त्यांना काय महावीरचक्र? कँप कमांडंट नायकलाही आमचा युक्तीवाद पटला.
आणि पक्षपाती हेगडे काही केल्या कन्नडिगांवर कारवाई करायला तयार होईना. शेवटी रात्रीच्या जेवणाचा ट्रक आला. आणि रिकामी भांडी घेऊन परत गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळी करून मंगेशीच्या देवळात गेलो. स्वच्छता, संपत्तीचे अति-संयत आणि सूचक दर्शन, येणाऱ्या मंडळींची बटबटीत न वाटणारी भाविकता... सगळे काही वेगळेच आहे.
आता पुढचा मुक्काम होता फोंड्याजवळ एका मिलिटरी कँपमध्ये. अंतर परत तासादोनतासाचे. पण यावेळेस आम्ही मुकाट्याने सगळ्यांसोबत चालत गेलो. मिलिटरी कँप फार्मागुडीजवळ कुठेतरी होता. एव्हाना कशाने कुणास ठाऊक, माझी पाठ घामोळ्याने पार भरली होती. त्यामुळे माझी सॅक वाहून नेण्यासाठी मी एक मोठा सोटा मिळवला होता. त्याला आम्हा दोघांच्या सॅक लटकावून मी आणि प्रशांत पालखीच्या भोयांसारखे चालत असू.
पाठीला लावण्यासाठी म्हणून कॅप्टन हेगडेने एक मलम दिले होते आणि काही गोळ्या. दोहोंचाही काही उपयोग होताना दिसत नव्हते.
फोंड्यातला मिलिटरी कँप म्हणजे खराखुरा मिलिटरी कँप होता. मिलिटरीचे जवान तिथे राहत असत. सकाळी पाचलाच त्यांचा दिवस सुरू होत असे आणि बघावे तेव्हा परेड, फायरिंग प्रॅक्टीस, बेयॉनेट प्रॅक्टीस इ चालू असे. आम्हांला त्यात बघण्यापलिकडे काही काम नव्हते. संध्याकाळी मात्र मजा झाली. सात-साडेसातला मेसच्या बाहेर जवानमंडळी एका खिडकीसमोर रांग लावू लागली. बघतो तर काय, प्रत्येकाला दोनदोन पेग रम दिली जात होती!
मी आणि प्रशा बनियन आणि खाकी हाफचड्डी या जवानमंडळींच्याच वेषात होतो. आम्हीही जाऊन रांग पकडली. दोनदोन पेग म्हणण्यापेक्षा प्रत्येकी एकेक क्वार्टर म्हणावी एवढी रम त्या माणसाने क्षणार्धात आमच्या पांढऱ्या इनॅमलच्या मगमध्ये ओतली. ती संपवायला आम्हांला तासभर लागला. तोवर बाब्याने आमचे जेवण घेऊन ठेवले होते म्हणून बरे.
पुढचा कँप फोंडा मडगांव रस्त्यावर एका शाळेत होता. तिथे पोहोचेस्तोवर माझ्या पाठीने फारच उच्छाद मांडला. मी परत कॅप्टन हेगडे गाठला. "हे तीन दिवसांत बरे होईल, दोन दिवस तर होतच आले आहेत" असे सांगून त्याने माझे सांत्वन करण्याचा (वा मला फुटवून लावण्याचा) प्रयत्न केला. पण मला अगदीच बेचैन वाटायला लागले होते. सतत पाठीवर खाज. आणि खाजवणे वाईट हेही माहीत होते. माझी अशी दैना झाली की मला धड सिगरेट ओढता येईना. शेवटी माझ्या दर पंधरा मिनिटांनी होणाऱ्या दर्शनाने वैतागून कॅप्टन हेगडेने हुकूम दिला की उद्याचा शेवटचा टप्पा मी चालत येण्याची गरज नाही. जो ट्रक रात्रीचे जेवण घेऊन नावेली बेसकँपमधून येईल त्यात बसून मी परतावे. जरा हुशारलो. एव्हाना दिवस मावळायला आला होता. मैदानात कबड्डीचा डाव रंगत होता.
तोच शाळेच्या एका खोलीतून आरडाओरडा ऐकू आला. काय कारणाने कुणास ठाऊक, बाब्याने हाणामारी सुरू केली होती. कारण गंभीर असावे, कारण अण्ण्याही त्याच्या मदतीला धावला होता. कानड्यांच्यातही दोन सव्वासहाफुटी रेडे होते. त्यामुळे युद्ध बरोबरीत चालले होते. मधल्यामध्ये एक कपाट आणि एक खिडकी तेवढी फुटली. आणि हे सगळे दोनपाच मिनिटांत, कॅप्टन हेगडे तिथे पोहोचेपर्यंत.
कॅप्टन हेगडे संतापाने वेडापिसा झाला. त्याने दोन्ही पार्ट्यांमधील योद्ध्यांना फुल एनसीसी ड्रेस (चामड्याच्या बुटांसकट) घालून ग्राऊंडला चकरा मारायला पाठवले. मग इतरांना त्याने ऑर्डर सोडली की आज रात्रीचा मुक्काम रद्द, त्याऐवजी नाईट मार्च करत नावेली बेसकँपला परतायचे. त्यामुळे सगळ्यांनी सामानसुमान बांधून अर्ध्या तासात तयार राहावे.
पंधरावीस मिनिटांतच ग्राऊंडला पळत चकरा मारणारे वीर भेंडाळले. मग तेही सामान घेऊन व्यवस्थित फाईलमध्ये उभे राहिले.
एवढ्यात जेवणाचा ट्रक आला. लगेच सगळे रांगा मोडून तिकडे पळाले. हेगडे अजूनच भडकला. त्याने ऑर्डर बदलली. नाईटमार्च, विदाऊट डिनर. जेवणाचा ट्रक तसाच माघारी पाठवण्यात आला. मला घेऊन अर्थात.
त्या रात्रीचे जेवण कल्पनातीत होते. फ्रुटसॅलडच्या पिंपाला खेटून मी ट्रकच्या मागल्या भागात उभा होतो. माझ्यासमोर पुऱ्यांचे डालगे होते आणि भाजीचे पातेले. भाताचे टोपले नि वरणाचे पिंप मी पाहिलेही नाही. इनॅमलचा मग भरभरून फ्रुटसॅलड, आणि गोडाने जीभ फारच वेटाळली की मध्येच एखादी पुरी आणि त्यासोबत तिखट बटाटा भाजी. नावेलीला पोहोचेपर्यंत पोटाला तडस लागून जमाना झाला होता.
नावेलीला पोहोचल्यावर कर्नल चोप्रांना जेवण आणि त्यासोबत मी का परतलो याचा रिपोर्ट दिला आणि झकास झोप काढली. पहाटे सहाच्या सुमारास पार भेंडाळलेले वीर पोहोचले. दुपारपर्यंत तर सगळे झोपलेलेच होते. जेवणालाच उठले. आता परतीचे वेध लागायला लागले होते. चार दिवसांनी परतीची रेल्वे गाठायची होती.
पण प्रशांतला नि मला हे 'परतीचे वेध' मनापासून मान्य नव्हते. गोव्याहून एवढ्या लगेच परतणे हे अन्यायाचे वाटत होते. पण काय करणार?
या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आम्ही एक अख्खा दिवस जंग जंग पछाडले. एकाऐवजी दोनदोन बिअर प्यायलो आणि पाचपाच कॅपस्टन ओढल्या. मग संध्याकाळी कँप कमांडंटला जाऊन परवानगी विचारली, की आम्ही नंतर आमचे आम्ही आलो तर चालेल का? ठाम नकार मिळाला.
संध्याकाळी 'माकाकू'ला भेटायला आलेल्या एका पाहुण्याने आम्हांला तो प्रश्न सोडवून दिला. तो पाहुणा म्हणजे 'माकाकू'चा आतेभाऊ सुभाष. सुभाष मूळचा गोव्याचा. 'माकाकू'च्या आत्याने (देव तिचे भले करो) योग्य ठिकाणचा माणूस लग्नात पत्करला होता. हा सुभाष एकदम जिंदादिल माणूस होता. एक ओपन जीप घेऊन तो आपल्या मामेभावाला भेटायला रोजरी स्कूलमध्ये दाखल झाला. खरेतर त्याची आणि आमची गाठ पडलीही नसती. कारण 'माकाकु'चे एकंदर वर्तन पाहता तो बाळगणीय मित्रांपैकी नसून टाळणीय बलांपैकी आहे याची आमची खात्री पटली होती. पण एखाद्या सिनेनटासारखा (टू बी स्पेसिफिक, 'राजकिरण' या त्यावेळच्या नटासारखा) दिसणारा हा पुरुषावतार चक्क 'माकाकू'बद्दल चौकशी करतो आहे हे बाब्याला काही उमगले नाही. तो सुभाषला घेऊन आधी आमच्याकडे आला. तरीही आम्ही 'माकाकु'कडे त्याला नेऊन सोडल्यावर ते विसरूनही गेलो. अर्ध्या तासाने सुभाष परत आम्हांला शोधत आला, "बाय" म्हणायला. मग आम्हीही जरा गप्पाटप्पा कराव्यात म्हणून त्याला सिगरेट ऑफर केली. ती त्याने स्वीकारल्यावर तो 'अगदीच वाया गेलेला नाही' हे सिद्ध झाले. सिगरेट ओढायला आम्ही त्याला मागच्या पटांगणाच्या कोपऱ्यात घेऊन गेलो. सिगरेटी पेटवल्यावर "मग कसे काय वाटले आमचे गोवा?" या त्याच्या प्रश्नाला आम्ही जो गहनगंभीर नि:श्वास सोडला त्याने त्याचे कुतूहल जागृत झाले. आमचा प्रश्न त्याच्यासमोर दाखल केल्यावर सुभाषने सिगरेट संपायच्या आत आम्हांला उत्तर सुचवले. आणि गोव्यात दोन दिवस राहण्या-फिरण्याची सोय करण्याचेही कबूल केले.
आम्ही लगेच जाऊन कँप कमांडंटकडे जाऊन जाहीर केले की आम्ही आत्ताच घरी एसटीडी केला होता तेव्हा कळाले की प्रशाची आई खूप आजारी आहे त्यामुळे दोन दिवसांनी जाण्यापेक्षा आम्हांला लौकर जाणे गरजेचे आहे. 'आम्ही' म्हणजे, ज्याची आई आजारी आहे तो मुलगा 'एकटा' गोव्याहून पुण्यापर्यंत कसा जाईल? त्याला सोबतीला कुणीतरी लागणारच. परवानगी लगेच मिळाली.
प्रशाची आई का? तर ती माउली चार वर्षांआधीच अनंतात विलीन झालेली होती. त्यामुळे थाप मारतानाही कुठल्या जिवंत माणसाचे वाईट चिंतले जाऊ नये हा सदहेतू. आधी विचार केला होता की 'कॉलेजने परीक्षा लौकर घ्यायचे ठरवले आहे' असे ठोकावे (त्याकाळी एफवायची परीक्षा कॉलेजकडे असे). पण कॉलेजची जरी असली तरी ती परीक्षा शेकडो विद्यार्थ्यांसाठी असते. सोयिस्कररीत्या निवर्तलेली माऊली एखाद्यालाच असते.
रेल्वे संध्याकाळची होती. एव्हाना दुपार टळून गेली होती. त्यामुळे आम्ही लगेच तयारी सुरू केली. आधी सुभाषला फोन लावून मडगांव रेल्वे स्टेशनवर गाडी सुटल्यासुटल्या भेटायचे ठरवून टाकले. मग आमचे परतीच्या प्रवासाचे 'वॉरंट' ताब्यात घेतले. कँपमध्ये सामील झालेल्या प्रत्येक कॅडेटला शेवटच्या दिवशी एक 'भेटवस्तूंनी भरलेली पिशवी' देण्याचे ठरले होते. ती पिशवी मिळाली. त्यात महत्वाचे म्हणजे एक किलो काजूगर होते. शिवाय तळलेले फणसाचे गरे इ इ कोंकणमेवा होता. काजूगर सोडून उरलेल्या गोष्टी लगेच वाटून टाकल्या.
ऐन वेळेस एक संकट उपटले. पेटी ऑफिसर नायर आम्हांला सोडायला यायला निघाला. आम्ही "कशाला सर उगाच तुम्हांला त्रास?" ची रेकॉर्ड चारसहा वेळेस वाजवून पाहिली पण त्याला शंका येऊ लागल्यावर थांबलो. आता काय करायचे? मग अण्ण्या, बाब्या, एअरफोर्स एनसीसीचा अरोरा, आणि इतर एकदोनजणही आम्हांला 'सोडायला' आले. मिलिट्रीच्या ट्रकमधून गाडीच्या वेळेआधी पंधरा मिनिटे आम्ही स्टेशनला पोहोचलो. सुभाषची जीप आंबोळी-सांबारवाल्याच्या दारात उभी दिसली.
पण आम्हांला उतरवून जाण्याऐवजी पेटी ऑफिसर नायर खाली उतरला. म्हणाला, "तुम्हांला डब्यात बसवूनच देतो".
आम्ही हार मानली नाही. फलाटावर गेलो. गाडी आली. आम्ही बसलो. अगदी गाडी सुटायच्या शिट्या झाल्या. मग अण्ण्याला इशारा करून पेटी ऑफिसर नायरला 'गोल्डस्पॉट' पाजायला तिथल्या टीस्टॉलपाशी (डब्यापासून शंभरेक फूट लांब) न्यायला सांगितले. अण्ण्याने त्याच्या रुद्रभीषण इंग्रजीत बोलून नायरला कोल्डड्रिंक पिण्याचे आमंत्रण दिल्यावर नायर मुकाट्याने हिंदी बोलत तिकडे गेला. आम्ही लगेच विरुद्ध दिशेच्या दरवाजाने सामानासकट खाली रुळांवर उतरलो. रेल्वे सुटली. आम्ही मुंड्या खाली घालून विरुद्ध दिशेला (वास्कोच्या दिशेला) पळालो. फलाटाचा शेवट येईस्तोवर रेल्वे सगळी निघून गेली होती. मग एका पिण्याच्या पाण्याच्या नळकोंडाळ्यामागे लपलो. नायर आणि कंपनी रेल्वे सुटल्यावर अनोळखी लोकांना 'टाटा बाय बाय' करत निघून गेल्याचे पाहिल्यावर प्रगटलो आणि रेल्वे वॉरंटचा रिफंड घेण्यासाठी गेलो. खिडकीतल्या क्लार्कने "रेल्वे सुटून गेलेली असल्याने पन्नासच टक्के परत मिळतील" असे सांगितल्यावर आम्ही त्याला सहर्ष मान्यता दिली. पन्नास टक्के रक्कम गमावलेले हे दोघे इतके हर्षवायू झाल्यासारखे का वागताहेत हे त्या क्लार्कला उमगले नाही. त्या बिचाऱ्याला काय माहीत की आमच्या दृष्टीने ती रक्कम म्हणजे शुद्ध 'बोनस' होता?
लगेच सुभाषच्या जीपकडे गेलो. तो कुठे दिसला नाही. तो येईस्तोवर आंबोळी खाऊन घ्यावी म्हणून आत गेलो तर पठ्ठ्या तिथे बसून गप्पा हाणीत होता. त्याचा तो नेहमीचा अड्डा होता वाटते. आम्ही आधी चारचार आंबोळ्या हाणल्या. तोवर सुभाषचा अड्डाही आवरत आला. मग आम्ही आमचे सामानाचे लटांबर सांभाळीत जीपमध्ये बसलो.
सुभाष एकदम 'आमच्या'तला होता. जीप सुरू करण्याआधी त्याने सिगरेटचे पाकिट काढले नि आम्हांला प्रत्येकी एक एक ऑफर केली. सिगरेट 'रॉथमन्स' होती! पुढचे दोन दिवस कसे जातील याची जणू चुणूकच त्या सिगरेटने दिलीन.
सुभाष आम्हांला घेऊन थेट बाणवली बीचवरच्या त्याच्या मित्राच्या घरी पोहोचला. तो मित्र (हेक्टर मेंडोन्सा) तेव्हा एकटाच राहत होता. त्याचे आईवडील त्याच्या मोठ्या भावाकडे दुबईला गेले होते. हेक्टरचे घर तसे छोटेखानी होते, पण घरामागच्या नारळांच्या झाडांपलिकडे थेट बीचच होता. आणि घर छोटे होते म्हणजे काय, तर चार खोल्यांचे होते. प्रशाला नि मला एक अख्खी खोली मिळाली. सामान टाकल्याटाकल्या आम्ही सुभाष आणि हेक्टरबरोबर कोलवा बीचला निघालो. तेव्हा कोलवा बीच हा कुणाला फारसा माहीतही नव्हता. फारसा काय, अजिबातच नव्हता म्हटले तरी चालेल. अख्ख्या बीचवर एकच शॅक होती. आणि त्यातही जेमतेम चार माणसे.
शॅकचा मालक टॅडियूक नावाचा कुणी होता. सुभाषला पाहिल्यावर लगेच त्याने 'आज खेकडे अगदी ताजे आहेत' अशी खबर दिली. सूर्यास्ताला आम्ही रॉथमन्स, किंग्स बिअर आणि खेकडे यांत मग्न होतो.
पुढचे दोन दिवस (आणि रात्री) जे काही आम्ही तरंगत होतो.... लांज्याच्या बसमध्ये आम्हां दोघांना सुभाषने बसवून देईस्तोवरचा काळ स्वप्नातला होता की सत्यातला हा प्रश्न अजूनही पडतो...
भाग १ http://www.maayboli.com/node/31728
भाग २ http://www.maayboli.com/node/31729
भाग ३ http://www.maayboli.com/node/31730

गुलमोहर: 

एका दमात सगळे भाग वाचले. तुमचे सगळे लेख एकदम भन्नाट आहेत. हसून हसून दमायला झालं. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतेय.

छान आहे लिखाण. खरच कॉलेज चे दिवस आठवले, मी पण फर्गसन मधे शिकलो......

आ.सु :- लेखाच्या खाली किंवा वरती आधिच्या आणि नंतरच्या लेखांची लिंक दिलीत तर वाचायला अजुन सोपे जाईल.....

चौकस,
केवळ महान लिहिलंय तुम्ही. हसून हसून खरंच पोटात दुखायला लागलंय. भुताचा किस्सा लय भारी.. Proud

अशक्य धमाल केलीये तुम्ही लोकांनी....
माकाकुची मात्र दया आली. तो नाही आला का त्याच्या भावाकडे?

छान लिहले आहे. ह्या लेखमालेसह इतर लेखही वाचले. आवडले.
लिहायची शैली भन्नाट आहेच पण इतक्या वर्षांपूर्वीच्या घटना सुद्धा इतक्या तपशिलात दिल्या आहेत की ते चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.

अजुन वाचायला आवडेल. शुभेच्छा!

अशक्य लिहीलय..... कोपरापासुन नमस्कार...... एकदम मुक्त.... अभ्यास वगैरे क्षुद्र गोष्टींचा विचार न करणार.... तुमची शैली छान आहे...

चौकस तुमचे लेखन जबरदस्त आहे. पहिल्या भागात सुरू झालेली उत्कंठा आता अजूनच वाढलेली आहे. शिवाय मनोरंजन असं चढत्या क्रमाने झालंय... कुठे ही ढूप नाही झाले. काही प्रसंग प्रचंड हसायला लावणारे आहेत.
पुलेशु!

पुढील मनोगत लवकरात लवकर टाका. Happy

_/\_ _/\_ _/\_ Rofl
खुर्चीतून खाली पडले हा भाग वाचून.

देवा !!! काय वाह्यात पोरं ही !!! Proud

मी सुद्धा एकापाठोपाठ एक सर्व भाग वाचून काढलेत. कारण मधे थांबवणे शक्यच नाही. अफाट लिखाण ! मानलं तुम्हाला.

Pages