गेले ते दिन... (भाग २)

Submitted by chaukas on 5 January, 2012 - 22:18

मिरवणुकीची सुरुवात मंडईतून होणार होती. प्रशांतच्या वेस्पावरून आम्ही पोचलो नि 'आर्यन' सिनेमासमोर थांबलो. बर्‍याच वेळाने महापौर, पोलिस आयुक्त आदि लवाजमा आला. मानाच्या पहिल्या गणपतीची पूजा झाली आणि मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक यथातथाच होती. सिटीपोस्ट चौकात पोचेस्तोवरच दीड तास गेला. मला अचानक जाम कंटाळा आला. मी प्रशांतला म्हणालो, "भाड्या, एवढे काय प्रसिद्ध आहे या मिरवणुकीत? वैताग नुसता च्यायला".
"हो ना यार, मलाही कंटाळाच आलाय". प्रशांतचे हे एक बरे होते. त्याला स्वतःचे असे मत नसे. मी जर 'मिरवणूक किती छान आहे' असे म्हणालो असतो तर त्याने तरीही री ओढली असती.
"कंटाळा आलाय तर काय करायचे ते सांग".
"चल सिंहगडला जाऊ". तोवर कॉलेजला दांड्या मारून सिंहगडला जाणे तीनचार वेळेला झाले होते, त्यामुळे त्याला लगेच सिंहगड आठवला.
"सिंहगड नको नेहमीनेहमी. चल बनेश्वरला जाऊ".
"मला रस्ता माहीत नाही".
"मला तरी कुठे माहीती आहे? विचारत विचारत जाऊ. सातारा रस्त्यावर खेड शिवापूरपर्यंत जायला लागते असे ऐकले आहे".
"चल तर मग". हेही एक प्रशांतचे बरे होते. असा 'हूं जाऊंद्या' छाप निर्णय घ्यायची वेळ आली की तो मागे हटत नसे. एकदा त्याच्या वेस्पावर आम्ही निगडीला त्याच्या आतेबहिणीला भेटायला गेलो. तिथवर गेलोच आहे तर तळेगांवला घराचे काम कितपत झाले आहे ते बघावे म्हणून त्याला मी पुढे दामटवले. तिथे गेल्यावर आता लोणावळा काय फार लांब नाही म्हणून त्याने मला लोणावळ्यापर्यंत दामटवले. तिथे 'मुनीर'मध्ये आम्लेटपाव हाणल्यावर जरा अजूनच भूक लागली. ऐन पावसाळी वातावरण होते. मग "एवढे आलोच आहोत तर खोपोली असे कितीसे लांब उरलेय? 'रमाकांत'चा वडा खायलाच हवा" म्हणून मी त्याला खोपोलीपर्यंत दामटवले. एकूण, सकाळी नऊला निघून निगडीला जाऊन साडेअकरापर्यंत परत येऊ म्हणून निघालेले आम्ही, संध्याकाळी सहाला परतलो.
थोडक्यात, आम्ही बनेश्वरच्या दिशेने निघालो. कात्रजचा घाट तेव्हा 'बॉबी' सिनेमात क्लायमॅक्सच्या सीनमध्ये दिसतो तितकाच सुंदर होता. 'बॉबी' येऊन दहा वर्षेही झाली नव्हती म्हणा. वेस्पा सेकंडमध्येच निवांत चढत होती. एकदाचा बोगदा आला. अख्ख्या बोगद्यात पलिकडून येणारे एकही वाहन दिसले नाही. बोगदा ओलांडल्यावर उतरायला लागलो नि जाणवले, की जेवढा घाट चढलो त्याच्या जेमतेम एक-तृतियांश उतरलो (हाच अनुभव नंतर प्रवास करताना खंबाटकी घाटातही आला). पुढे दहा पंधरा मिनिटे गेलो न गेलो तोच एक पावसाची जोरदार सर आली. उजव्या बाजूला एक बरेसे रेस्टॉरंट दिसले म्हणून तिथे स्कूटर घुसवली नि आडोशाला थांबलो. ते 'बॉबी'च्या क्लायमॅक्समधली मारामारी जिथे चित्रित करण्यात आली ते ठिकाण होते. गल्ल्यावरच्या माणसाने ही माहिती दोन चहा आणि एक गोल्फ्लेक या बदल्यात पुरवली. आमचे एवढे कड्डक ड्रेस (आणि 'मेडल्स') यांचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडलेला दिसला नाही. नंतर कळाले की 'पुरंदर' किल्ल्यावर तेव्हा आर्मी-बेस होता. तिथे जाऱ्ये करणार्‍या अस्सल ओ-जी कलरच्या युनिफॉर्ममधली माणसे पहायची त्या परिसरातल्या सगळ्यांनाच सवय झाली होती. त्यामुळे खाकी रंगामध्ये तसाच युनिफॉर्म दिसला तर तो आर्मीचा नाही हे त्यांना कळत असे.
पावसाची सर ओसरली. आम्ही परत बाहेर पडलो. बनेश्वरला तिथून अर्धा तास लागला. ठिकाण सुंदर होते. पण तिथे प्रशांतबरोबर जाणे म्हणजे अरसिकतेचा कळस होता. सोबत एखादी हुरहूर लावणारी व्यक्ती असणे अधिक बरे पडले असते असे मला जाणवले. पुढे प्रेमात पडल्यावर मला माझ्या जाणिवेतला फोलपणा कळला.
तोवर तीन वाजून गेले होते. भूक चांगलीच जाणवायला लागली होती. मग परत निघालो नि पुन्हा 'बॉबी' रेस्टॉरंटमध्ये जाऊन गरम ऑम्लेट नि नरम बनपाव असे जेवण केले. जेवण माफक झाले हे एक बरे झाले, नाहीतर रात्रीची अपुरी झोप अंगावर येऊन मी तिथेच लवंडलो असतो.
पुण्याला पोचेस्तोवर पाच वाजले. मिरवणूक आता रंगात यायला लागली होती बहुतेक. कारण ठिकठिकाणचे रस्ते बंद व्हायला लागले होते. आमचा अजूनही कामावर जायचा मूड नव्हता. आम्ही थेट 'राहुल'ला पोहोचलो नि तिथे लागलेला 'Apocalypse Now' हा पावणेसहाचा शो पकडला. @#$सुद्धा कळला नाही. तो संपेस्तोवर साडेसात वाजले.
आता घरीच जावे असा विचार करत असताना प्रशांतची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाली. "मी तरी ट्रॅफिक कंट्रोलला जाणार. तुला वाटेत हॉस्टेलला सोडतो." त्याचा एकंदर Holier than thou आविर्भाव बघून मीही चिडलो. "हॉस्टेलला जाऊन काय करू? झाडू मारू? चल खंडूजीबाबा चौकात". स्कूटर जिमखान्याच्या मैदानाजवळ लावून आम्ही लकडीपुलाच्या याबाजूला असलेल्या पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये पोहोचलो. आमचा डिरेस अजूनही बराच कड्डक होता. "संध्याकाळी ड्यूटीवर यायला सांगितले होते आम्हांला" या आमच्या बोलण्यावर तिथल्या पीएसआय जगतापांनी लगेच विश्वास ठेवला. कारण सकाळी आलेले बहुतेक कॅडेट्स तोवर पळ काढते झाले होते. त्यामुळे आमच्या सरांनी संध्याकाळी, खर्‍या कामाच्या वेळेला, दुसरी तुकडी पाठवली असे समजून ते खूष झाले. या 'दुसर्‍या तुकडी'त आम्ही दोघेच होतो ते सोडा.
तोवर गर्दी दाटू लागली होती, नि जगताप कावलेले होते. "हवाल्दार जगदाळे, ह्या दोन पोरांस्नी घे तुझ्यासंगं नि तो 'डायमंड'चा कोपरा मार आदी" असा त्यांनी आदेश सोडला. जगदाळे हे एक साडेसहाफुटी आडदांड व्यक्तिमत्त्व होते. मी पाच सात नि प्रशा साडेपाच. आम्हा दोघांकडे एक 'हाय लेव्हल' दृष्टीक्षेप टाकून जगदाळ्यांनी आपली नापसंती चेहर्‍यावर स्वच्छ जाहीर केली. त्यांच्या 'युटोपिया'त बहुधा सहा फुटांखालील मनुष्यमात्रांना नागरिकत्त्वाचा हक्क नसावा. पण 'आलिया भोगासी' म्हणत त्यांनी आम्हांला 'डायमंड वॉच कंपनी'च्या कोपर्‍यात नेले. आता आम्हांला तो कोपरा 'मारायचा' होता.
म्हणजे काय? तर (१) जनसमुद्राच्या दोबाजूंनी येणार्‍या लाटा थोपवणे, (२) त्या लाटा मुख्य मिरवणुकीत घुसणार नाहीत हे पहाणे, (३) गर्दीचा फायदा घेऊन कुणी स्त्रियांच्या अंगचटीला जात असल्यास त्याला अटकाव करणे, आणि (४) हे सर्व करीत असताना जनसमुद्रातून येणार्‍या खवचट शेर्‍यांकडे निर्विकार दुर्लक्ष करणे.
पहिल्या दोन गोष्टी जरा तरी जमल्या. चौथी गोष्ट जमणे कठीण होते. म्हणजे आम्ही जी नेमप्लेट अभिमानाने छातीवर लटकवली होती ती वाचून गर्दीतून "अरे देशाच्या पांड्या", "अरे पाट्या", "ए प्रशू", "अरे विजूबाळा" अशी कोल्हेकुई सुरू झाली. दहा मिनिटांतच आम्ही आमच्या नेमप्लेट्स काढून खिशात घातल्या. तिसरी गोष्ट जमणेही अवघडच होते. "अरे बघ बघ कुठला गणपती आला" अशा आरोळ्या मारत एखादे टो़ळके स्त्रियांच्या जमावाच्या अंगचटीला जात असे. बायकांना त्याची सवय असावी. आमचाच जीव कासावीस होत होता. त्या टो़ळक्याला हाकलायला जावे तर तोवर एखादी लाट मिरवणुकीच्या मार्गावर सांडायला निघाल्याचे जाणवून आम्ही घाईघाईत परतत असू. तेवढ्यात कुणीतरी मिरवणुकीवर उधळायचा गुलाल नेम धरून आमच्यावर फेकत असे.
हे इतक्यावेळा झाले की रिकामपोटी सटासट फेणी मारून मग समुद्रात पोहायला जावे तसे आमचे डोके गरगरू लागले. मध्येच घड्याळ बघितले तर पावणेबारा झाले होते. आणि येणारे लोंढे वाढलेले होते. दीड वाजता जगदाळेमामांनी आम्हांला बखोटीला धरून 'पूरब'जवळ नेले नि तिथल्या पोलिसांच्या तंबूत वाटप होणारी पुरीभाजी खाऊ घातली. तोवर गुलाल घशात जाऊन आमची वाचा बसली होती. हाताने जमावाला रेटणे एवढेच काय ते आम्ही करू शकत होतो.
आम्ही तरी अठरा-एकोणीसचे तरुण होतो. पन्नाशीच्या पोलिसांचीही तीच अवस्था होताना पाहिली. आजतागायत मी कधीही पोलिसांवर टीका करू शकलेलो नाही. "पोलिस पैसे खातात" हे म्हणणे सोपे आहे. पण ते जो गुलाल खातात नि हेटाळणी पितात त्याकडे कुणीही बघत नाही. नंतर वर्गातल्या जावेद शेखच्या घरी मॉडर्न कॉलेजलगतच्या पोलिस वसाहतीत जेव्हा गेलो तेव्हा गळक्या छपरांच्या नि भरून वाहणार्‍या संडासांच्या इमारतीत रहाणारी ही माणसे काम करतात म्हणून आपण बरेच निर्वेधपणे जगतो यावर विश्वासच बसला नाही. असो.
पुरीभाजी हे एक वेगळेच प्रकर्ण होते. पुर्‍या 'डनलॉप' ब्रँडच्या होत्या. बटाटाभाजी लागायला सुरुवात झालेली होती. आणि कसेबसे दोन घास पोटात गेल्यावर भूकही खवळली होती. मग नुसत्या पुर्‍या चाबलायच्या, जबडा तुटायला आला की भाजीचे बकाणे मारायचे, उलटून पडेल असे वाटायला लागले की परत पुर्‍या चाबलायच्या, असे करत 'जेवण' उरकले. पोटात काहीतरी ऐवज गेल्यावर "...औरभी लडेंगे" असे दत्ताजी शिंदेछाप विचार मनात घोळू लागले. जगदाळेमामांनी 'संभाजी छाप विडी' पेटवल्यावर आम्हीही हावरटपणे एकेक विडी मागून घेतली. जो काही ठसका बसला...
परत 'कामावर' रुजू झालो. पोटात अन्न गेल्यामुळे असेल, वा offence is the best defense हे जाणवल्यामुळे असेल, आम्ही बरेच धीट झालो. जगदाळेमामांनी आम्हांला दोन पोलिसी लाठ्याही मिळवून दिल्या. आता आम्ही बिनदिक्कत गर्दी आवरायला लागलो. जिकडे गोंधळ होईल तिकडे आधी लाठी चालवायची आणि मग (जमल्यास) चौकशी करायची हा शिरस्ता आम्ही अवलंबला. त्याला बरेच यश आलो. आमच्यावर फेकल्या जाणार्‍या गुलालाचे प्रमाण झपाट्याने कमी झाले.
दगडूशेटची मिरवणूक आली तेव्हा लख्ख उजाडलेले होते. आम्ही दातओठ खाऊन एल्गार केला आणि ती मिरवणूक आमच्या कोपर्‍यावरून नीट काढून दिली. मग गर्दीही झपाट्याने ओसरली आणि आम्हांलाही अगदीच थकून जायला झाले. जगदाळेमामांनी आम्हां दोघांना 'गुडलक'मध्ये चहा नि बनमस्का दिला. वरती एकेक अख्खी गोल्फ्लेकही. याहून जास्त (किंवा एवढेही) कौतुक त्यांनी कदाचित त्यांच्या मुलांचेही केले नसेल.
प्रशांतने मला खोलीवर सोडले. खाटेवर अंग टाकल्यावर मला जी झोप लागली ती मोडण्याची ढेकणांचीही हिंमत झाली नाही. ती हिंमत झाली हर्‍याची. बारा वाजता त्याने दरवाजावर लाथा घालघालून मला उठवले. आणि टेकडी ओलांडून मेसमध्ये जेवायला नेले. झोप दाटल्याने मी झिंगल्यासारखाच चालत होतो. पण "नीट जेवल्याशिवाय परत झोपायचे नाही" या त्याच्या हट्टाला बळी पडावेच लागले. परतल्यावर परत गुडुप झालो तो रात्री जेवण्यासाठी हर्‍याने परत उठवल्यावरच. नाहीतर सलग चोवीस तास झोपेचा विक्रम नक्की केला असता. तो विक्रम नंतर एकदा 'सवाई गंधर्व'ला तीन रात्री सलग जागल्यावर चौथ्या दिवशी केला.
आमच्या 'ट्रॅफिक कंट्रोल'ची बातमी कळल्यावर सरांनी पुढच्या परेडला आम्हांला पुढे बोलावून एक छोटेसे भाषण ठोकले. आम्ही कसे निष्ठेने काम करत होतो आणि पार पहाटेपर्यंत तिथे हजर होतो याबद्दल जगदाळेमामांनी '२ महाराष्ट्र बटालियन'मध्ये खुद्द जाऊन आमचे कौतुक केले. त्यावेळेस परांजपेसर तिथे हजर होते म्हणे. आम्ही सकाळच्या ऐवजी संध्याकाळी ड्यूटीवर हजर झालो हे ना जगदाळेमामांनी सांगितले ना सरांनी विचारले. सुटलो.
एकंदरीत हॉस्टेलचे दिवस मजेत चालले होते. खाटेतल्या ढेकणांचीही सवय होऊ लागली होती. एखादी रात्र त्यांनी फारच सतावले तर दुसर्‍या दिवशी खाट बाहेर व्हरांड्यात काढून, वर्तमानपत्राची सुरळी करून ती पेटवून खाटेचा कानाकोपरा जाळण्याचा कार्यक्रम होई. बरेचसे ढेकूण त्यात मरत. काही हुशार ढेकूण खाट हलवली की लगेच उड्या मारून भिंतीचे कोपरे, खिडकीचे कोपरे गाठत दुसर्‍या खोलीत जात. त्यातले काही मग तिथल्या मालकाच्या पुढच्या जाळपोळीला बळी पडत.
सकाळी फर्ग्युसनच्या टेकडीवर पळायला जाणे बरेच नियमित झाले होते. इकडून चढून भारत सेवक समाज, मारुती मंदिर आणि पॅगोडा मार्गे खिंड गाठायची नि परत फिरायचे. असे तीन-चार वेळेस तरी व्हायचे. शनिवारी क्रॉस कंट्रीची प्रॅक्टीस. म्हणजे मैदानावरून पळायला सुरुवात करायची, हॉस्टेलगेटने बाहेर पडून दीवार, लेडिज हॉस्टेलगेट, रोज बेकरीवरून वळून बीएमसीसी रस्त्याने एनसीसी ऑफिस, बालभारती, खिंड, पत्रकारनगर, वेताळटेकडी चढून चतुश्रुंगीच्या मागच्या पोलिस वायरलेस स्टेशनपर्यंत आणि परत.
हॉस्टेलला एक धुड्याचा चौधरी होता. धुड्याचा म्हणजे धुळ्याचा; त्याची जीभ "ळ" म्हणायला वळत (वडत) नसे. ही धुडे-जडगांवची मंडळी आमच्या वेळेस खूप होती. नंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ झाल्यावर मग ती तिकडे पांगली.
तर हा चौधरी म्हणजे एक नमुना होता. एक तर ते तीन भाऊ. एकेका वर्षाच्या अंतराने जन्मलेले. अजय, अतुल नि अनिल. अजय आमच्यासोबत FYला होता तेव्हा अतुल SYला नि अनिल TYला. तिघेही तीन हॉस्टेलच्या तीन खोल्यांत. दुसरे म्हणजे ते तिघेही दरवर्षी किमान दोन स्पर्धांमध्ये (एकूण मिळून सहा; दोन भाऊ एका स्पर्धेत कधीच नसत) भाग घेत. पण एक अट पाळून. स्वतः धरून जास्तीतजास्त तीन स्पर्धक असतील तरच यापैकी एखादा बंधू उतरे. मग किमान तिसरा क्रमांक ठरलेला. आणि सर्टिफिकेट घेताना न चुकता "A Y Chaudhari" या नावाने घेत. त्यातला अनिल भुसावडला जडगाव जिल्हा सहकारी बँकेत क्लार्क म्हणून लागला. त्याला घरापासून फार लांब जायचे नव्हते. पण नंतर दुप्पट सर्टिफिकेट्सच्या जोरावर अतुलने बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी पटकावली. आणि आमच्यासोबतच्या अजयने तिप्पट सर्टिफिकेट्स घेऊन थेट पोलिसदल गाठले. ते ऐंशीचे दशक होते. पदवीधर असणे हे आत्ताएवढे किरकोळ प्रकरण नव्हते. आणि त्यात वेगळाल्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याबद्दल अजूनच मार्क मिळत.
हा अजय दररोज सकाळी पाचला उठून मैदानावर पळायला जाई. मग तसाच खाली ज्ञानेश्वर पादुका चौकात जाऊन एक दूधपिशवी घेई आणि चालत परत येतानाच ती दातांनी फोडून दूध पीत येई. हॉस्टेलला परतेपर्यंत ती संपवली नाही तर त्याला उरलेल्या दुधावर पाणी सोडावे लागे (हॉस्टेलला राहिलेल्यांना हे माहीत असेलच की उष्टे-पाष्टे असल्या बुरसट कल्पना तिथे कुणाच्या मनाला शिवत नाहीत). मग बाकीची नित्यकर्मे.
एकदा प्रशांत रात्री माझ्याकडे रहायला आला होता. रात्रभर जागून अभ्यास करावा असा बेत होता. रात्री साडेदहा-अकरापर्यंत गप्पा मारण्यात वेळ गेला. मग झोप यायला लागली म्हणून 'गुडलक'ला जाऊन चहा-सिगरेट कार्यक्रम झाला. तिथून परतल्यावर बीए करणार्‍या सुपनेकरच्या खोलीत बसून परत गप्पा हाणल्या. आता अभ्यासाला बसायचे या इराद्याने माझ्या खोलीकडे जायला निघालो तेव्हा दीड वाजून गेला होता. माझ्या खोलीत गेल्यावर पुस्तके, नोट्स गोळा करण्यातच अर्धा तास गेला. आणि मग अर्थातच झोप यायला लागली. चांगलीच चिडचीड झाली. त्यात अजयचे गजराचे घड्याळ बंद पडले होते. आम्ही रात्रभर जागणार म्हणताना त्याने बिचार्‍याने आम्हांला त्याला साडेचारला उठवायला सांगितले होते. आमचा अभ्यास होत नाही म्हणून आम्हांला वाईट वाटतच होते. त्यात आता आमच्यामुळे बिचार्‍याचा एका दिवसाचा व्यायाम बुडणार या विचाराने अजूनच वाईट वाटले. मग हर्‍याने त्यातून मार्ग काढला.
आम्ही तिघांनी आमची मनगटी घड्याळे सव्वाचारवर नेऊन ठेवली. आणि आम्ही तिघांनी जाऊन अजयला उठवले. "आम्ही रात्रभर काही बसू शकत नाही, आता फारच झोप यायला लागलीये. पण म्हटले तुला उठवावे नि मग झोपावे. म्हणून साडेचारऐवजी सव्वाचारलाच उठवतोय" असे आमची घड्याळे त्याच्या झोपाळलेल्या नजरेसमोर नाचवत म्हटले, येऊन घड्याळे परत नीट केली नि कपडे बदलून झोपलो.
नंतर झाले ते असे, की अजयला काही कपडे धुवायचे होते. ते धुऊन मग पळायला जावे म्हणून त्याने पाचऐवजी साडेचारला उठवायला सांगितले होते. पंधरा मिनिटे लौकर तर पंधरा मिनिटे लौकर म्हणत त्याने कपडे धुऊन घेतले. आणि खोलीतच पंधरा मिनिटे काही व्यायाम करून तो तीनला मैदानावर पळायला निघाला. दारात खरोसेमामा झोपलेले होते. बाहेर काळोख होता. पण दिवस पावसाळ्याचे होते, त्यामुळे पहाटे पाचलाही बर्‍याचदा काळोखच असे. त्यामुळे त्याला विशेष वेगळे काही वाटले नाही. पांढरी हाप्पँट, पांढरा बनियन, पांढरे कॅनव्हस बूट या अवतारात त्याने पळणे सुरू केले.
मैदानाच्या कोपर्‍यावर एका खोपटात रहाणारे 'बाहेरचे' रखवालदार चाहुरेमामा (खरोसेमामा आणि इतर हॉस्टेल्सचे मामा हे 'आतले' रखवालदार होते) त्यांच्या खोपटाबाहेर मन लावून झोपले होते. एकटेच होते बिचारे. कसलीतरी चाहूल लागली म्हणताना त्यांनी उठून पाहिले तर मैदानावर काहीतरी पांढरे हलताना दिसले. त्यांची तंतरली. "रामराम जयराम आस्तिक आस्तिक" असा बहुउद्देशीय जप करत ते बसून राहिले. अर्ध्या तासाने तो पांढरा प्रकार त्यांच्या दिशेने यायला लागल्यावर त्यांचा देव-देवतांवरचा विश्वास उडाला आणि ते थरथरत्या हातात लाठी घेऊन भुता-दैत्यांचा सामना करायला सज्ज झाले. हॉस्टेलला परतायची (आणि ज्ञानेश्वर पादुका चौकाकडे जायची) वाट रखवालदाराच्या खोपटाजवळून जात होती, त्यामुळे अजय फासफूस करत तिकडे चालला होता. त्याला काळे घोंगडे पांघरून खोपटाच्या दरवाज्यात बसलेले चाहुरेमामा दिसलेच नाहीत. अजय मुकाट्याने ज्ञानेश्वर पादुका चौकाकडे चालता झाला.
आपल्यापासून तीन फुटांवरून पांढरे भूत गेले हे जाणवल्यावर चाहुरेमामा अजूनच भेदरले नि 'आतल्या' रखवालदारांपैकी जवळच्या खरोसेमामांकडे त्यांनी धाव घेतली. तोवर खरोसेमामा उठून बाथरूमला जाऊन (त्यांना मधुमेह होता) आले होते. तेही दिंडीदरवाजाला आतून घातलेली कडी कुणी काढली असेल याचा विचार करत बसले होते. चाहुरेमामा आल्यावर सगळा प्रकार कळला नि त्यांनाही कापरे भरले. 'एकास दोन बरे' या विचाराने ते दोघेही "रामराम जयराम आस्तिक आस्तिक" करत बसले.
इकडे अजयबुवा ज्ञानेश्वर पादुका चौकात तर पोचले, पण तिकडे मिट्ट अंधार. पहाटेच्या चार वाजता त्याच्यासाठी 'कर्नाटक हिंदू हॉटेल'च्या कोपर्‍यावरच्या कुत्र्याखेरीज कुणीही वाट बघत नव्हते. ते कुत्रे मात्र तत्परतेने त्याच्या मागे लागले, नि "अरे हाड, कायला अंगाव येऊ र्‍हायला, पड, हाड" करत (नेहमीच्या मैदानावरच्या वेगाच्या) दुप्पट वेगाने धावत अजयने हॉस्टेल गाठले.
हॉस्टेलच्या दिंडीदरवाजात एक पिवळा बल्ब तेवत होता. त्याच्या प्रकाशात मामाद्वयांना तो पांढरा प्रकार त्यांच्याकडे येताना दिसला. पण त्या प्रकाराची पावले सुलटी असल्याचेही त्यांनी निरीक्षले आणि ते थोडे आश्वस्त झाले. त्यात त्या कुत्र्याला हाकलायला अजयबुवा जो जप करत होते त्यातला खानदेशी लहेजा खरोसेमामांना बरोबर पोचला नि ते आश्वस्तच नव्हे, तर धीटही झाले. "अहो चौधरी, कुटे गेला होता एवढ्या फाटपटी?"
अजय आधीच कावला होता. एकतर मैदानावर नेहमीपेक्षा जास्ती अंधार होता त्यात तो ठेचकाळून पडला होता. नंतर हे कुत्रे नि आता खरोसेमामा. "अहो मामा, वेड बघा ना नीट. पहाट नाही, सकाड झाली ना?"
सगळे (सगडे) नीट उलगडल्यावर अजय रागारागाने मामाद्वयांना घेऊन माझ्या खोलीवर आला. आम्ही खरोखरच गाढ झोपलो होतो. पण अजय पेटला होता. त्याने कडी निखळते की दरवाजा मोडतो हे तपासायच्या निर्धाराने दार ठोकणे सुरू ठेवले. अखेर झोप ठार उडाली नि उठलो. एकंदर प्रकार लक्षात आल्यावर परत डोळ्यांवर झोप पांघरली नि झोपाळल्या डोळ्यांनी त्या तिघांना आमची मनगटी घड्याळे दाखवली. त्यात चार वीस वाजले होते. मग प्रेमळपणे अजयची चौकशी सुरू केली. "आम्ही नव्हतो आलो हे नक्की, कारण आम्ही तर दोनलाच झोपलो होतो. तुला स्वप्न पडले असेल. कोणकोण आले होते तुला उठवायला? मी नि प्रशांत? की हर्‍यापण होता? मी कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता? आणि तुला उठवताना मी घड्याळ दाखवले होते का तुला? माझ्या हातावर आहे तेच घड्याळ ना?"
थोडक्यात, झोपेत चालणारी माणसे असतात, जागेपणी चालणारी माणसे असतात. पण झोपेत स्वप्न बघून, स्वप्नातल्या घटनांमुळे उठून जागेपणी चालणेच नव्हे, तर पळणे करणारी माणसे विरळा असतात. आणि त्या माणसांत अजयची गणना होते हा संदेश (मामाद्वयांमार्फत) सगळीकडे पोहोचला. आम्ही दुसर्‍या (म्हणजे त्याच) दिवसापासून अजयपाशी 'नेहमीप्रमाणे' वागायला सुरुवात केल्यामुळे तो बिचारा पारच गोंधळला आणि त्याचाही मामाद्वयांच्या प्रचारावर विश्वास बसला. त्यानंतर तो सकाळी सहा वाजल्यावरच (तेव्हा त्याच्या शेजारचा सुपनेकर उठून व्यायामशाळेत जात असे, तो अजयला उठवत असे) मैदानावर जाऊ लागला. 'घड्याळाचा गजर झाला आहे नि आपण उठलो आहोत' असे स्वप्न पडले तर काय घ्या म्हणून त्याने गजराचे घड्याळही मला देऊन टाकले. मला अर्थातच त्याच्या उपयोग नव्हता.
एकूण, दिवस बरे चालले होते. पण सगळेकाही आबादीआबाद असले की अचानक सरकार पिसाळते नि पेट्रोलचे भाव वाढवते तसे अचानक कॉलेज पिसाळले नि पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या.
ही बातमी घेऊन प्रशांत माझ्याकडे आला तेव्हा मी (अर्थातच कॉलेजला दांडी मारून) निवांत Freedom At Midnight वाचत पडलो होतो. बातमी कळाल्यावर मीही घाबरलो. पहिले वर्ष कॉलेजच्या अखत्यारीत होते. त्यात चाळीस टक्के Internal (ट्यूटोरियल्स इ) साठी आणि साठ टक्के External (म्हणजे कॉलेजनेच सेमिस्टरच्या शेवटी घेतलेली परीक्षा) साठी होते. Internalच्या चाळीस टक्क्यांपैकी पासापुरते सोळा मार्क कसेबसे मिळाले असते. थोडक्यात, एकंदर स्कोअर चांगला हवा असेल तर External मध्ये जोरदार हात मारणे गरजेचे होते. आणि दुष्ट कॉलेजने परीक्षा केवळ चार आठवडे आधी जाहीर केली होती. सुदैव की बातमी जाहीर केल्याकेल्या प्रशांतला ती कळली.
काय करावे यावर आम्ही बराच खल केला. अहोरात्र अभ्यास करणे आणि स्कोअर काढणे हा मार्ग आम्ही टाळला. असले अगोचर वागणे थोर पुरुषांना शोभते. आम्ही थोर नव्हतो, आणि होण्याचाही संभव नव्हता. शेवटी आम्ही 'निर्णय घेणे जड जात असेल तर निर्णयच लांबणीवर टाकणे' हा राजकारणी मार्ग स्वीकारायचे ठरवले. पण निर्णय पुढे टाकायचा तर तो कसा? परीक्षेच्या वेळेस काय करायचे? आजारी पडायचे? डॉक्टरचे सर्टिफिकेट कोण देणार? या गहन प्रश्नांची उकल करायला आम्ही कँटीन गाठले. बनवडा खाल्ल्याने मेंदूला चालना मिळते हे एव्हाना आमच्या लक्षात आले होते.
कँटीनच्या दारातच निकभिक भेटला. म्हणजे निखिल राजे. निखिलचा निक झाला. आणि आडनाव जरी राजे असले तरी "हा कुठला राजा, हा तर भिकारी" या अवधूतच्या शेर्‍याला मान देऊन भिकारी म्हणजे भिक. सीकेपी मुली फाकडू असतात नि मुले बावळट या नियमाच्या दुसर्‍या अर्धुकाला न्याय देणारे असे हे व्यक्तिमत्व होते (पहिले अर्धुक सिद्ध करण्यासाठी एफवायबीएची संचला रेगे पुरेशी होती).
तर हा निकभिक लगबगीने कँटीनमधून बाहेर पडत होता. निकभिक बायल्या होता, आणि तरीही एनसीसीत होता या गोष्टीवरून प्रशांतचे डोके नेहमी फिरत असे. एनएसएसला जाण्याऐवजी हे मेषपात्र इकडे कुठे आले हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडत असे.
"का रे भिकार्‍या, एवढ्या लगबग लगबग कुटं जाऊ र्‍हायला? (प्रशांतला मधूनच त्याच्या चाळीसगावच्या आजोबांची आठवण येत असे आणि त्याची भाषा त्याप्रमाणे वळत असे) आन मागल्या रैवारच्या परेडला काहून लेट करून आला बे? (हे नागपूरचे मामा) जरा वेळेवर आलास तर काय नाकातले केस पांढरे होतील काय रे तुझ्या? (हे परांजपेसर)" या सरबत्तीने निकभिक गांगरला. त्याचे एकंदर गणित जरा हुकलेलेच होते. गांगरला की तो छाती काढून हातवारे करत बोलत असे. फक्त त्याच्या तोंडून शब्द पटकन फुटत नसत. तत्प्रमाणे तो छाती काढून हातवारे करायला लागला. "गपे भाड्या, माशा मारायलायस काय?" (ही कोल्हापूरची आत्या).
"ए, बाजूला हो, मला सिलेक्षनला जायचं आहे उद्या. तयारी करायला एकच दिवस आहे नुसता. आणि मी लेट नव्हतो काही परेडला, तू कोपर्‍यात जाऊन सिगरेट ओढत होतास म्हणून मीच तर प्लॅटून गोळा केली होती".
हे सिगरेटचे खरे होते. पण निकभिकने प्लॅटून गोळा केली नव्हती, करायचा प्रयत्न केला होता. त्याच्या मुळमुळीत आवाजात दिलेल्या ऑर्डर्स कुणालाच पोहोचल्या नव्हत्या. पण प्रशांतला काहीही करून निकभिकला झापायचे होते त्यामुळे काय खरे होते नि काय नाही याबद्दल त्याला काही घेणेदेणे नव्हते. पण ही 'सिलेक्षन'ची काय भानगड?
खोदून चौकशी केल्यावर कळले की गोव्याला एनसीसीचा नॅशनल ट्रेकिंग कँप होता. त्यासाठी दुसर्‍या दिवशी सिलेक्षन होते. कँटीनमध्ये जाण्याचे सोडून आम्ही घाईघाईने नोटीसबोर्ड गाठला. आम्हांला सुटकेचा मार्ग अंधुकसा दिसू लागला. नोटिसबोर्डावर तारखा बघितल्यावर तर त्या मार्गाचा एकदम दिव्यांनी झगमगलेला मरीन ड्राईव्हच झाला. तो कँप दोन आठवड्यांचा होता आणि परीक्षा सुरू झाल्यावर दोन दिवसांनी संपत होता. आता त्या सिलेक्षनला जाऊन आपले नाव त्या यादीत घुसवणे एवढेच उरले होते. आम्ही तसे एनसीसीमधले स्टार होतो, त्यामुळे त्यात काही अडचण नव्हती. आम्ही लगेच सरांना गाठले. "परीक्षेला दांडी मारायला पाहिजे काय रे भोसडिच्यांनो? मारा, मारा. पहिले वर्ष कॉलेजचे आहे तेवढ्यात काय ती मजा करून घ्या. एकदा युनिव्हर्सिटीच्या परीक्षा सुरू झाल्या की मग बसेलच बांबू" असा त्यांनी आशीर्वाद दिला.
मग एक अडचण लक्षात आली. सिलेक्षन सकाळी नऊ वाजता होते. म्हणजे अठरा तासांवर. आणि आमचा चांगला ड्रेस धुतलेला नव्हता. तो धुऊन वाळायला घातला तेव्हा चार वाजून गेले होते. जाड कापडाचा तो ड्रेस सकाळपर्यंत वाळणेसुद्धा शक्य नव्हते. मग त्याला इस्त्री कोण करणार? घरी जाऊन ड्रेस धुऊन प्रशांत परत आला आणि आम्ही त्या प्रश्नाची उकल करायच्या मागे लागलो.
अलका टॉकीजवरून पुढे दांडेकर पुलाकडे गेले की उजव्या हाताला पायोनिअर (वा तत्सम नावाची) लाँड्री होती. तिथे त्यांची 'फॅक्टरी' होती. तिथे स्टीमप्रेस, रोलरप्रेस आदि प्रकार होते. ही सगळी माहिती अवधूतने दिली. आम्ही पत्ता शोधत तिथे जाऊन पोहोचलो आणि लक्षात आले की तो वार गुरुवार होता. वीज जाण्याचा वार, म्हणून लाँड्री बंद. ती सकाळी सातला उघडते या कोपर्‍यावरच्या चांभाराच्या बोलण्यावर विसंबून आम्ही परतलो. नाहीतरी गुरुवार असल्याने बाकीच्या लाँड्र्याही बंदच असणार होत्या. 'सिलेक्षन' म्हणजे काय करतील याचा विचार करीत झोपी गेलो.
प्रशांत सकाळी सहालाच त्याचा ओलाकिच्च ड्रेस घेऊन आला. साडेसहाला आम्ही लाँड्री गाठली. पहिला कर्मचारी सव्वासातला आला. तोवर आम्ही मिनिटाला एक या गतीने पंचेचाळीस वेळा घड्याळ बघितले आणि मिनिटाला प्रत्येकी एक या गतीने पुणेरी निवांतपणाला नव्वद शिव्या मोजल्या. पहिला कर्मचारी आला तो साफसफाई करणारा. लाँड्रीचे काम करणारा असा एकजण पावणेआठला उगवला. आणि त्याने आमचे काम करायला स्वच्छ नकार दिला. "येवडे ओले कपडे आम्ही न्हाई घेत. शाकबिक बसंल तर मंग?" जास्ती पैसे देऊ करण्याचे आमिषही वाया गेले. "पैशापायी असली शाक खायची कामं न्हाई करनार" असे तडफदार उत्तर देऊन तो आत चालता झाला.
आम्ही दारातच उभे राहून अजून नव्वद शिव्या (मनातल्या मनात; तो कर्मचारी भलादांडगा होता) मोजल्या नि परत कोपर्‍यावर आलो. तिथल्या पानटपरीवर दोघांत एक गोल्फ्लेक पेटवली. "प्रशा, लेका सिलेक्षनला न जाताच त्या यादीत कसे घुसायचे याची काहीतरी युक्ती काढ बघ" या माझ्या आवाहनाला प्रतिसाद काय द्यावा हे प्रशांतला कळले नाही. शेवटी दुसरा (चांगला नसलेला) ड्रेस घालून सिलेक्षनला जावे लागणार हे लक्षात आले. तो ड्रेस एकदमच कडक होता, कारण एकदाही वापरलेला नव्हता. प्रशांतचे घर तिथून जवळ होते त्याच्याकडे आधी गेलो. तो दुसरा ड्रेस प्रशांतला पुरून दशांगुळेच काय, पंधरांगुळे उरला. स्कूटरवर बसून जाताना वार्‍यामुळे तो होडीच्या शिडासारखा फडफडायला लागला. त्याला हसता हसता हॉस्टेलवर पोहोचलो आणि हसायची संधी प्रशांतलाही मिळाली. माझा ड्रेस आठवीतल्या मुलाच्या मापाने केलेला होता बहुतेक. श्वास रोखून धरला तर मी कसाबसा त्यात शिरत होतो. पण तो घालून हालचाल करणे अशक्यप्राय होते. पण इलाज नव्हता. दुसरा पर्याय नव्हता (परीक्षेला बसण्याचा विचारही आम्ही आदल्या दिवसापासून डोक्यातून काढून टाकला होता). निघालो तसेच अन काय.
'सिलेक्षन' म्हणजे नावापुरतेच असेल असा आमचा तर्क कर्नल कर्व्यांनी पार खोटा ठरवला. आम्हांला एनसीसी ऑफिस ते युनिव्हर्सिटी सर्कल आणि परत एवढे अंतर त्यांनी पळायला लावले. लँब्रेटा घेऊन ते आमच्या मागावर खुद्द आले, त्यामुळे सगळे अंतर पळावे लागले. प्रशांत नि मी या दोघांत कुणाची अवस्था जास्ती वाईट होती हे सांगणे कठीण होते. मला श्वास घेणेही अवघड झाले होते. आणि प्रशांतकडे बघून एक तंबू हालचाल करीत असल्याचे भासत होते.
अखेर ते पळणे झाले, परत येऊन मैदानात आमची परेड घेऊन झाली आणि एकदाचे आमचे सिलेक्षन झाले. परीक्षा टाळून आम्ही गोव्याला रवाना झालो. त्या संस्मरणीय कँपबद्दल पुढच्या भागात.
भाग १ http://www.maayboli.com/node/31728
भाग ३ http://www.maayboli.com/node/31730
भाग ४ http://www.maayboli.com/node/31731

गुलमोहर: 

पुढे प्रेमात पडल्यावर मला माझ्या जाणिवेतला फोलपणा कळला.>>> Lol

अख्खा भागच मस्त आहे. हसून हसून पुरेवाट झाली.

अवांतर : रेगे आडनाव ब्राह्मणांत असतं. सीकेप्यांत शक्य नाही. बाकी लेख वस्तुस्थितीला धरून आहे! Lol

छान

धम्माल!!

सारखी 'शाळा' आठवत होती. हेही तसंच निरागस आहे. Happy

>>>> रेगे आडनाव ब्राह्मणांत असतं. सीकेप्यांत शक्य नाही. >>>> रेगे ब्राह्मण, सीकेपी आणि शिवाय सारस्वत ही असतात. आणखीन म्हणजे यातलेच कोणीतरी रेंगेही असू शकतात. Happy

काय सांगताय मामी, रेगे सीकेपी? नाय हो. बायकोची शप्पत घेऊन सांगतो, रेगे सीकेपी असणं शक्य नाही! (बायको सीकेपी आहे!)

Lol

मस्त मस्त.
एनसीसी कॅम्पसाठी सहामाही बुडवणे हा एक वंदनीय प्रकार ११वी मधे मी पण केलाय. ७ इन्फंट्री, २ नेव्ही आणि २ एअरविंग (त्यातली एक मी) अश्या सगळ्या मुलींसाठी नंतर वेगळी परिक्षा घेतली गेली होती.