रंग....!

Submitted by बागेश्री on 3 January, 2012 - 12:39

अनेक रंग माझ्या ओंजळीत दिलेस... अगदी हळूवारपणे...
हरखून गेले ते रंग पाहताना... माझ्या ओल्या डोळ्यात त्या इंद्रधनूचं प्रतिबिंब तरळलं.... नजर हलेना माझ्याच भरलेल्या ओंजळीवरून...

तू : पाहतेस काय?
मी : हे...... हे रंग.. कित्ती आहेत!! सुंदर एक- एक...
तू : हम्म, तुझेच आहेत
मी : सारे?
तू : हो
मी : काय म्हणू?
तू : डोळ्यांनी सांगितलं सारं.. हे रंग वापर, उधळ तुला हवे तसे
मी : मनसोक्त?
तू : हो, मन सो क्त

मी : हा हिरवा, हा लाल, हा केशरी, हा पारवा, करडा- गव्हाळ! हा का देतो आहेस?
तू : तुझी कांती, गव्हाळ म्हणून
मी : पण ह्या रंगामूळेच तुला खूप काही ऐकावं लागलंय आजवर
तू : तुला, कटूच आठवण येणार असेल, तर आण तो इकडे
मी : काय करशील त्याचं?
तू : ठेवेन जपून, तुझ्या इतकाच
मी : वेड लावलंस आज मला
तू : ....

मी : आयुष्याचा कॅनव्हास पुन्हा रंगवायला घेईन
तू : शुभ्र कागदावर?
मी : हम्म, मला मदत करशील?
तू : बोल ना, काय ते
मी : खूप दिवसांनी इतके रंग एकत्र पाहते आहे रे, कुठला- कुठे- कसा उतरवू, सांगशील?

तू : सुरुवात कर हिरव्याने..!!
मी : सुखाचा रंग तो, तू सर्वाथाने देऊ केलेल्या

तू : त्याच्या भोवती गुलाबी पेर
मी : आपल्या इवल्या विश्वातल्या प्रेमाचा?

तू : मग घे, केशरी-उधळ मुक्तपणे
मी : माझ्यातली बंडखोरी हेरतोस?

तू : आता ओत अवकाशाचा आकाशी अथांगपणा
मी : तुझ्या मनाचा ठाव घेणारा?

तू : मग पारवा
मी : माझ्यातला अवखळपणा?

तू : मग बुंद लाल
मी : तुझ्यातल्या जगण्याच्या जिद्दीसारखा, गडद पण मोहक, असा?

तू : आता पिवळट हलक्या- फिकट छटा
मी : वृद्धपकाळापर्यंत टिकणारी सोबत म्हणून?
तू : .....

मी : अरे, पण चित्र पूर्ण करायला, काळा नको?
तू : .... मी असेपर्यंत, 'दु:ख' असे थेट ओंजळीत येणार नाही तुझ्या!

-बागेश्री
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/2012/01/blog-post.html

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

__________________/\_______________

अशीच ओंजळ भरून वाहत राहू द्या Happy सुखाच्याच रंगांनी... !!!

तू : तुझी कांती, गव्हाळ म्हणून
मी : पण ह्या रंगामूळेच तुला खूप काही ऐकावं लागलंय आजवर >>>>>> ह्म्म्म्म्म

सुरेख लिहिले आहे....

अतिशय सुंदर, तरल... सगळंच्या सगळं आवडलं...
शेवट अगदी ठाव घेणारा...

रंग आणि त्यातून दर्शवल्या जाणार्‍या भावना यांचा काही संबंध असतो असं ऐकलंय, त्यातलं मला काहीही कळत नाही आणि त्यात हे ललित कितपत बसतं हेही माहित नाही, पण तरीही यामागची भावना थेट पोचते हे या लिखाणाचं माझ्या मते यश आहे!

मस्त.. Happy शेवट छान.. Happy

बंडखोरीसाठी लाल हवा का? त्यागासाठी केशरी/नारिंगी..?

झळाळता सनशाईन यलो.. तुझ्या खळाळत्या हसण्याकरता...

गडद निळा.. पावसानंतरच्या पावसाळी संध्याकाळसारखा.. रडून झाल्यावर तुझ्या टपोर्‍या डोळ्यांत उतरणार्‍या आभाळासारखा...

गर्द जांभळा.. फुलपाखराच्या पंखावरच्या ठीपक्यांचा.. प्रत्येक क्षणात आयुष्य जगून घेण्याच्या तुझ्या अनिवार ओढीसाठी...

मुक्ता, मस्त Happy
रेड- अ कलर ऑफ पॅशन, जिद्द- गहन, गडद पण मोहकपणा भुलावणारा!
केशरी- क्रांतिकारी! बरेचदा बंडखोरी करून केलेली क्रांति!

प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार! Happy
नचिकेत, विशेष आभार.

हा हिरवा, हा लाल, हा केशरी, हा पारवा, करडा- गव्हाळ! हा का देतो आहेस?
तू : तुझी कांती, गव्हाळ म्हणून
मी : पण ह्या रंगामूळेच तुला खूप काही ऐकावं लागलंय आजवर>>>>>
मला हे जास्त आवडल Happy
खुप सुन्दर लिहल आहेस Happy

यावर एक "रंगाच्या ब्रँडची" अ‍ॅड सुचली....

तो तिच्या ओ़ंजळीत भरभरून रंग ओततोय, ती ओंजळ उधळते आणि घराच्या एक एक भिंती वेगवेगळ्या रंगांनी भरून जातात..... वन बाय वन..... मग दोघे एकत्र येतात.... Happy

"अपने घर को सजाओ, "अपने" रंगों से......!!! Wink

कॉपीराईट्स रिझर्वड.... Happy

खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प आवडलं.... अभिनव कल्पना बागे Happy
शब्द झाले, रंग झाले... आता पुढची थीम कुठली? गंध का? Happy

मी मुक्ता, आनंदयात्री आणि भुंग्याचे प्रतिसाद विशेष आवडले.

थोडक्यात पण छान व्यक्त झालेत भावरंग
------------------------------------------------------------------------------------
पिवळा .... वार्धक्य
आणि काळा ..... "दु:ख असे थेट ओंजळीत येणार नाही तुझ्या"
हे विशेष उल्लेखनीय

Pages