जीवाची मुंबै!-------एक मजेशीर दिवस अन एक रम्य संध्याकाळ!

Submitted by टोकूरिका on 2 January, 2012 - 04:24

१ जानेवारी, २०१२ चा दिवस उजाडला! नुसता उजाडला नव्हे तर नवी उमेदच घेऊन आला....नव्या गोष्टी, नवे विचार, नवे संकल्प, यांनी मन इतकं भरून गेलं की गतवर्षात शरीरासोबत मनावरही चढलेली मलीनतेची झालर जपून ठेवायला जागाच उरली नाही....त्यामुळे अंथरूणात लोळत न पडता मी नव्या वर्षातली पहिली सकाळ पहायला खिडकीचे पडदे बाजूला सारले........नव्या वर्षात येणार्‍या उज्ज्वल आयुष्याची आस घेऊन सूर्यकिरणे हळूहळू पृथ्वीच्या अन माझ्या मनाच्याही कक्षेत प्रवेश करत होती.........!

किती आश्चर्यकारक आहे ही गोष्ट! नेहमीचाच सूर्य, नेहमीच्याच दिशेस उगवलेला.....नेहमीसारखीच सकाळ....दरवर्षी थंडीत दिसणारे तेच ते धुक्यांचे पांढरेशुभ्र पडदे.......तीच दवबिंदूंनी नटलेली पानेफुले..... आपणही नेहमीचेच......अन वातावरणही नेहमीचंच....पण तरीही वैशिष्ट्यपूर्ण वाटणारं!

मी सकाळ पाहण्यात इतकी रमलेली की पतिराज कधी अंथरूणातून उठ्ले मला पत्ताही लागला नाही....त्यांनी आज कधी नव्हे तो माझ्या हातात गरमगरम वाफाळत्या चहाचा आयता कप दिला तेव्हा मात्र मनाचे पंख घेऊन आकाशात भरारी मारणारी मी जमिनीवर आले! काही मिनिटं तसंच बसून आयत्या मिळालेल्या चहाचा आस्वाद घेतला अन कामाला लागले......

नवीन वर्षाची सुरूवात बाप्पाच्या दर्शनाने अन आशिर्वादाने करायची, हे आम्ही आधीच ठरवलेलं असल्याने दिवसभराचं प्लॅनिंग करण्यात वेळ न दवडता ....साडे अकरापर्यंत सगळं आवरून ठरल्याप्रमाणे निघालो. कल्याण ते दादर असा प्रवास करताना सगळ्या मित्रमैत्रिणींना अन आप्तस्वकीयांना फोनून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. १ ते १.१५ च्या दरम्यान दादरला पोहोचलो. स्टेशन च्या बाहेर बाप्पासाठी फुले अन दूर्वा खरेदी करून , कबुतरखान्याजवळ टॅक्सी पकडली.....पण अर्ध्याच रस्त्यात उतरलो कारण दर्शनाची रांग तिथून सूरू झालेली.... रांग जलद गतीने पूढे सरकत होती त्यामुळे मला अन नवर्‍यालाही कंटाळवाणं वाटलं नाही, उलट गप्पा मारायला वेळ मिळतोय म्हणून स्वारी भलतीच खुष होती......'' बरंच आहे रांग लांबतीय ते.. तेवढाच गप्पा मारायला वेळ मिळतोय.... एरवी वेळ नसतोच ना आपल्याला अश्या निवांत गप्पा मारायला???'' असा त्याचा सूर ऐकून, मीही आनंदले.....मग लहानपणी शाळेत, घरी काय काय उचापत्या करायचे इथपासून ते कॉलेजातल्या पहिल्या क्रशपर्यंत जे जे काही शेअर करायचं उरलं होतं ते ते सगळं करून घेतलं......... मित्रमैत्रिणींबरोबर मुंबईत भटकताना कधीच न चुकवलेलं सिद्धिविनायकाचं दर्शन, कॉलेजकाळात केलेल्या छोट्यामोठ्या सफरी, कॉलेज संपताना लागलेली हुरहुर, नोकरी करण्यासाठी घरच्यांकडे केलेला हट्ट, परवानगी मिळाल्यावर केलेला जल्लोष, जुन्या ऑफिसच्या गमतीजमती चुकतमाकत घडत गेलेलं मन, बोहल्यावर चढताना डोळ्यांत तरळलेले अश्रू अन मनातील संमिश्र भावना, लग्न झाल्यावर आयुष्याचा नव्याने उमगलेला अर्थ अशा अनेक मनाच्या कप्प्यात जपलेल्या आठवणी हेंदकळून वर येत होत्या...........गप्पांना उधाण आलेलं असताना गाभार्‍यापर्यंत कधी पोहोचलो ते कळलंच नाही!

मंदिरात '' गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!'' चा नुसता जयघोष सुरू होता......गर्दीच्या रेट्यातून शरीर पूढे ढकलताना, मन मात्र बाप्पाच्या नामस्मरणात गुंतून गेलेलं......ॐ गं गणपतये नमो नमः , श्री सिद्धिविनायक नमो नमः , अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया.....नकळत तोंडातून श्लोक बाहेर पडत होते.....अखेर आम्हाला बाप्पा दिसला! दोन तासाच्या प्रतीक्षेने आलेला शारिरीक थकवा त्या विघ्नहर्त्याच्या नुसत्या मुखदर्शनाने दूर पळून गेला! माझं एक नेहमीचं असं आहे....कुठेही गेले तरी बाप्पा मला नेहमीसारखाच प्रसन्न चेहर्‍याने हसत पाहतोय असे वाटते.....गणपतीचं उग्र स्वरूप मी आजवर मूर्तीतूनही कुठेही पाहिलेलं नाही.......उजव्या सोंडेच्या हसर्‍या गणूबाप्पाला मनसोक्त पाहून घेत, हातातली फुले अन दूर्वा त्यांच्यावर उधळत अन गर्दीतून वाट काढत आम्ही गाभार्‍याच्या बाहेर आलो.......श्रीमुखाकडे पाहून डोळे मिटून शांतपणे प्रार्थना करणे, त्याच्याशी आपल्याच तंद्रीत गुजगोष्टी करणे अन त्याच्या दर्शनाने शांत अन प्रफुल्लित झालेलं मन घेऊन परतणे यापेक्षा उत्तम दुसरं सुख नाही माझ्यासाठी! Happy

मंदिरातून प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालो तेव्हा ४ वाजले होते. आता पोटात भूकेने आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात केलेली. लगेच सबवे गाठून मनसोक्त हादडलं......पून्हा टॅक्सी पकडून थेट गिरगाव चौपाटी गाठली....गर्दीचे लोंढे वाहत होते तिथे....भेळपूरी, पाणीपूरीच्या गाड्या, चनाचाट विकणारे फेरीवाले......आणि बच्चेकंपनीचा कलकलाट यात समुद्राच्या लाटांचा आवाजही विरत जात होता.....आम्हाला शांतता अनुभवायची असल्याने आम्ही लगेच तिथून काढता पाय घेतला.....चालतच थोडं पूढे जाऊन मरिन ड्राईव्हचा कठडाच निवडला बसायला......सव्वा पाच वाजता आम्ही येऊन बसलो तेव्हा फारसा गजबजलेला नसलेला कठडा पाहता पाहता माणसांनी भरून गेला, इथे मात्र बरीचशी शांतता होती....त्या शांततेचा भंग करायचं धाडस फक्त चिल्लीपिल्लीच करू शकत होती! Proud

काय वर्णू ती रम्य संध्याकाळ! कितीतरी दिवसांनी निवांत अनुभवली! सूर्यास्त म्हणजे आहाहा!
त्या विशाल जलसागराच्या लाटा इतक्या उसळत होत्या....जणू त्याच्याही लूप्त भावना उचंबळून आल्या असाव्यात सन्सेट पाहून.....हळूहळू पूढे सरकणार्‍या लांबलचक नौका.......कंदिल लावलेल्या फेअरी बोट्स... स्प्पीडबोट्स ची एकामेकांत लागलेली शर्यत.....गर्दीने तुडूंब भरून राहिलेला किनारा....सागराच्या त्या विशाल जलमय पृष्ठभागावर पडलेलं भास्कराचं केशरी प्रतिबिंब......सग्गळं सगळं अगदी चित्रासारखं भासत होतं! कारण इतकी रम्य संध्याकाळ मी यापूर्वी फक्त चित्रांतच पाहिलेली होती!

अंधार पडू लागला तशी विजेच्या दिव्यांनी झगमगली मुंबई! दोन तास! संपूर्ण दोन तास गेले तरी तिथून हलायची इच्छा होत नव्ह्ती....असंच बसून रहावे.......ऑफिस, घर, कसलीही चिंता करायची गरज वाटू नये......इतक्या अविरत शांततेत अंतर्मुख होताना आपल्या मनाशीच चाललेलं हितगूज......अन मध्येच होणार्‍या हलक्याश्या विनोदावर खळखळून हसणारा समुद्र.......बस्स! यही लाईफ थंब जाती तो कितना अच्छा होता! असं नकळत वाटून गेलं! पाय निघत नव्ह्ता पण घरी परतणं भाग होतं....कसेबसे आम्ही तिथून उठलो अन सीएसटी कडे निघालो.....खोलवर कुठेतरी मन गुणगुणत होतं.....'' ऐ दिल है मुश्किल जिना यहाँssss.....जरा हटके, जरा बचके ये है मुंबई मेरी जाँssss'' Happy

परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये आमच्या पलीकडच्या सीटवर बसलेल्या एका आजोबांनी एका गर्भार बाईला पाहून स्वतः उभे रहात.......तिला बसायला जागा दिली...ते बघून समोरचा तरूण उभा राहिला अन त्याने आजोबांना आपल्या सीटवर बसवलं.तेव्हा कुठे तरी वाटलं......की आपण रोजच्या धबडघाईत स्वतः मध्ये इतके हरवून जातो की, '' दुसर्‍याचा विचार करायला फुरसतच कुठे आहे?? '' अशी कायम तक्रार करत असतो. पण आपली ही मुंबई रोज इतकी वेगाने धावत असतानाही माणूसकी विसरलेली नाही!

माझ्या चेहर्‍यावर ओसंडणारा उल्हास पाहून नवर्‍याने विचारलं '' काय मग मॅडम? धमाल आली ना? परत कधी यायचं मुंबई फिरायला??'' मी म्हटलं, '' आज मन उत्साहाने भरून वाहतंय! हा उत्साह काही महिन्यांकरता नक्की पूरेल......आजच्या अनुभवांना आता मनाच्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवलं आहे...यथावकाश तिथे भर घालावीशी वाटेलच.....मग येऊ की पून्हा जीवाची मुंबै करून घ्यायला!'' Happy

==============================================================
सोमवार, दिनांक ०२.०१.२०१२
टो़कू Happy

हा फोटू आंतरजालावरून साभार....
आम्ही काढलेली प्रचि कमिंग सून Happy

marinenightbig.jpg

हा बघा बाप्पा! Happy

siddhivinayak_temple.jpg

हा मंदिराचा कळस
images.jpeg

गुलमोहर: 

>>परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये आमच्या पलीकडच्या सीटवर बसलेल्या एका आजोबांनी एका गर्भार बाईला पाहून स्वतः उभे रहात.......तिला बसायला जागा दिली...ते बघून समोरचा तरूण उभा राहिला अन त्याने आजोबांना आपल्या सीटवर बसवलं.तेव्हा कुठे तरी वाटलं......की आपण रोजच्या धबडघाईत स्वतः मध्ये इतके हरवून जातो की, '' दुसर्‍याचा विचार करायला फुरसतच कुठे आहे?? '' अशी कायम तक्रार करत असतो. पण आपली ही मुंबई रोज इतकी वेगाने धावत असतानाही माणूसकी विसरलेली नाही!

अगदी, अगदी. टोके हे वाचून मुंबईकर असल्याचा अभिमान दुणावला.

(सॉरी हां पु.ल. यु सेड अभिमान बिलॉन्ग्स एल्स्व्हेअर Proud )

छान..

छान..

टोकु.... मस्तं लिहिलयस..... Happy
अत्ता वाचल्याने सकाळी सकाळी बाप्पांचं दर्शन झालं... Happy

तुलापण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

खुपच मस्त लिहिले आहेस. मी पुण्याची , ३० ला बहिणी कडे गेले होते. ३१ ला आंम्ही पण बाप्पाचे
छान दर्शन घेतले. १ तासात मिळाले . व नंतर बान्द्राला लिंक रोडवर फिरुन जिवाची मुंबई केली. Happy
माझा पण सिध्हिविनायकला जायचा पहिल्यांदाच योग आला होता. खुपच सुंदर मुर्ती आहे. आणि आवार
पण खुपच आवडले. २ दिवसात तुझा त्यावरच लेख वाचुन व फोटो बघुन पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.

किरण Happy
धन्स भुंगेश, मंगेशा...
प्रिती खरच तिथे गेल्यावर सगळं अनुभवतानाच ठरवलं होतं, हे अनुभव बंदिस्त करायचे....ते निसटून गेलेले क्षण पुन्हा येणे नाही, पण आठवणी मात्र जपून ठेवायच्या. बाप्पाचं दर्शन तर भारीच Happy

मस्तच वर्णन. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पांचा फोटो आंतरजालावरचा आहे की तुम्ही काढलेला? भारीच आलाय. धन्यवाद.

.आजच्या अनुभवांना आता मनाच्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवलं आहे...यथावकाश तिथे भर घालावीशी वाटेलच.....मग येऊ की पून्हा जीवाची मुंबै करून घ्यायला >>>>>>> smileyvault-cute-big-smiley-animated-023.gif छान लिखाण, आवडले

किशोर हे फोटो आंतरजालावरचे आहेत, मी काढलेले अजून अ‍ॅडायचे आहेत. Happy

रेव्यु, बागुलबुवा, बित्तुबंगा, सुनिल परचुरे सर्वांचे खुप खुप आभार Happy

प्रसिक धन्यवाद. Happy

Pages