असच आपलं... सटर फटर... सहा.

Submitted by ह.बा. on 30 December, 2011 - 05:18

कधी कधी काही काही गोष्टींवर स्वानुभवाशिवाय ऐकीव माहितीच्या आधारे विश्वास ठेवावाच लागतो. हे मला बालपणी मी लहान असल्यामुळे आजिबात कळत नव्हते. आता ते कळते पण पटत नाही. जसे की 'अगरबत्तीला हात लावू नको चटका बसेल!' 'बापुंची बिडी ओढू नको खोकला येईल!' 'पोहायला येत नाही तोवर एकटा नदीला जाऊ नको बुडशील!' इत्यादी सगळे करून, भाजून घेऊन, खोकून, बुडून मग आक्कल आली. पण काही प्रश्न अनुत्तरीत राहिले... पितळेच्या, चांदीच्या आणि कागदाच्या देवांसमोर म्हातारीने रोज उठून घंटा का वाजवायची? देव असतो म्हणजे काय असते? अदृश्य शक्ती म्हणजे काय? मामला सरळ असला तर आपणही सरळ घुसतो. दारू आहे का? तर आहे. ती चढते का? हो चढते. सिध्द करता येईल का? लगेच. दोन सिक्स्टी मारल्या की रंगा हवेत, टांगा पलटी, घोडे फरार... दुसर्‍या दिवशी लोकांना सांगता येते की रंगा हवेत जातो, घोडे फरार होतात... दारू नका पिऊ... किंवा टांगा पलटीच करायचा असेल तर जरूर प्या. पण देवाचे काय? देव आहे का? नाही म्हणायला मी काय गांजाडू आहे का? तो पावतो किंवा कोपतो का? तर तर... म्हणजे कोपतो किंवा पावतोच तो... सिध्द करता येईल का? छे छे... असे बोलू नये देवाला राग येतो. राग येतो म्हणजे काय होते? म्हणजे बघा... म्हसोबाचं कोंबडं हुकलं की पोराला खरूज उटती आणि मरिआईचा नारळ चुकला की म्हातारी रात्री बारा वाजता घुमायला लागती... पण हे रोग आहेत आवशिदानं बर हुत्याती. कोण म्हणतं? नारळ दिस्तवर पोरगं टरारा खांजळीत बसतं... बरं म्हणजे देव आहे? हो ना! पण काहितरी दिसायला हवं ना? म्हणजे कसं बघा... टीबी असेल तर खोकला दिसतो. छे छे असं कायबी नस्तया दिसत देवाचं...
गोंधळ झाला. नीट बोलता येईना. म्हातारी घंटी वाजवायची थांबेना. पोरगं खांजळीत बसलया. काय करावे? कोठे जावे? देव आहे म्हणावे कोण्या बळे?... तेवढ्यात एक मार्ग दिसला... गावात वरच्या आळीला पारायण सुरू झालं. बुवा आळंदीहून मागवले होते. ज्ञानी पुरूष होते. त्यानी किर्तन केले. 'संसार दु:ख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ.... असं काहिबाही बोलले... म्हाराज तुमी लयच ग्रेट हाय, संसार त्यागला तुमी? नाही नाही मला दोन मुली एक मुलगा आहे. बायको बँकेत नोकरी करते... मग मगाशी किर्तनात सांगितलत ते काय होतं? ते आध्यात्मात तसं बोलावं लागतं बाळा... तू लहान आहेस... लहान? म्हाराज मी दहावीची परिक्षा दिलीये... सगळं कळतं मला आता. सगळा घोळ आहे. संतांच्यात ताळमेळ दिसेना... एक म्हणतो संसार दु:खमूळं.... दुसरा आधी प्रपंच करावा नेटका... काहीच कळेना. मग दहावीत नापास झालो. रिकाम्या वेळेत काय करावे हा प्रश्न गहन होता... इस्लामपूर एमआयडीसीत एका ग्रीनहाऊसमधे खडी टाकण्याच्या जॉबची ऑफर आली. मी इंटरव्हिवला गेलो. तिथल्या सायबानं मला शर्ट काढायला सांगितला. मी शर्ट काढताच तो घाबरून दोन पावले मागे सरकला... बरगडीवर चामडी आहे हे लक्षात आल्यावरच बिचारा शांत झाला. रिजेक्ट! मग म्हटले चला देव शोधुया... आळंदी मधे बरेच नावाजलेले बुवे राहतात म्हणून आम्ही आळंदीला प्रस्थान केले. कराडकरांच्या मठात राहण्याची परवानगी मिळाली. प्रकरण अवघड होते. शिजवून खायचं नाही. डोक्याला केस ठेवायचे नाहीत. भि़क्षा मागायला दहा दहा किलोमिटर चालत जायचं... जाताना किंवा येताना देवानं एकदाही त्याच्या गरूड कंपणीच्या विमानात लिफ्ट दिली नाही... पहाटेपासून काय काय करावं लागायचं... ते संस्कृत अन ती संता... त्या ज्ञानेश्वरीचा तर अगदी धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे... पासून यत्र योगेश्वर कृष्णो पर्यंत कित्येक वेळा फडशा पाडला... पण गणित काही जमेना. बुवांची आणि संतांची उत्तरे... माणसात देव पहावा... जे जे भेटे भूत... देव रोकडा सज्जनी... भाव तेथे देव... लाईट आहे पण करंट दिसतो का? हात लवल्यावर करंट बसतो. काहीही बोलायचे. मग शेवटी म्हणायचे एवढे पटत नाही तर आलास कशाला? सतत चिंतन कर मनन कर श्रवण कर भजन कर... आपोआप भाव निर्माण होईल... देवही उमजेल... अहो पण मी दिसण्याबद्दल बोलतोय? तेवढा नशिबवान असलास आणि तेवढी तपश्चर्या केलीस तर दिसेलही. तपश्चर्या? म्हणजे ते कुंभमेळ्यातले साधू? एका पायावर बारा वर्षे? मग दुसर्‍या पायाचे काय करायचे? त्या जटा? ती दाढी... ती गांजा... ती दोन गटातली भांडणे.... अरेरे देव कुठे गेला? यातीकुळ माझे गेले हारपोनी...? मग वास्करांचा फड वेगळा... देहूकरांचा फड वेगळा... असे का बरे झाले... क्षत्रिय मराठा वारकरी संघ... कुंभार समाज आश्रमशाळा, सोनार समाज प्रार्थना भुवन... भेदाभेद भ्रम अमंगळ? अरे पण इथेही जातिंचीच चंगळ आहे ना... देव कुठे आहे? शोधा शोधा... बापू? बाबा? श्रीश्री? कुणी कुणाला दावला देव? मला का रे नाही दाखवत? दहाविचा निकाल आला दोन प्रयत्नात पास झालो... सोडा आता देव देव चला कॉलेजला... घरी आलो. एका प्रसन्न सायंकाळी म्हातारीला म्हटलो... आये देव बिव सब झूट... तिनं देव्हार्‍यावरचा शंख फेकून मारला... बरोबर डोक्यात बसला... त्या आघाताने डोक्यातला देवाविषयी शंका निर्माण करणारा किडा कोमात गेला... मधून मधून जागा होतो पण... लगेच कोमत जातो... आता ऑफिसला जाताना सारसबागेतल्या गणपतीला नमस्कार करतो. एबीसीत गेलो की दगडूशेटला रामराम म्हणतो... परवा तर मी हायवेच्या बाजूला रोवलेल्या किलोमिटरच्या दगडालाही नमस्कार केला... उगाच मी तसाच पुढे जायचो आणि तो म्हसोबा निघायचा.... इतिश्रीडंबपुराणेअंतिमाध्याय्समाप्त!.... पुंडलीकवरदेहारी..... पाया पडा रे देवाच्या...

गुलमोहर: 

हे ही 'सटर फटर' छान लिहलेय,
मिश्किल भावातून चांगले विचारमंथन!! +१

मलाच त्यांचा नंबर हवा होता तेव्हा मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही उचलला नाहीत. चांगला कार्यक्रम गेला त्यांच्या हातून. (आवश्य द्या त्याना नंबर)

ह.बा., तुमचे कथेकरी लैच भारी दिसतात! अहो, संसाराचा त्याग करायचा नसतो, तर त्याच्या संगाचा त्याग करायचा असतो.
आ.न.,
-गा.पै.

त्या आघाताने डोक्यातला देवाविषयी शंका निर्माण करणारा किडा कोमात गेला... मधून मधून जागा होतो पण... लगेच कोमत जातो...>>उगाच मी तसाच पुढे जायचो आणि तो म्हसोबा निघायचा.... >>>>>>> लय भारी, सगळाच लेख Happy

Happy

ह. बा. मस्तच आहे... म्हंजे तुझा लेख... >>> ही प्रतिक्रीया आहे का अपमान? च्यायला जरा नीट वागावं म्हटलं तर लोक तोंडावर खरं बोलायला लागतात... Light 1
धन्यवाद विशालदादा!!!

छान , Happy
आवांतर
एक म्हणतो संसार दु:खमूळं.... दुसरा आधी प्रपंच करावा नेटका... काहीच कळेना. >>>>>
संसार अन प्रपंच , ह.बा. हे वायल वायल हाय ( संसार - पोटा पाण्याच , प्रपंच - देह प्रपंच )

गामा पै. आणि दादा दोघेही आळंदीच्या बुवासारखे बोलतायत... Wink सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आवडलं.

आये देव बिव सब झूट... तिनं देव्हार्‍यावरचा शंख फेकून मारला... बरोबर डोक्यात बसला... त्या आघाताने डोक्यातला देवाविषयी शंका निर्माण करणारा किडा कोमात गेला..
>>
हहपुवा

सटर फटर म्हणत म्हणत देव या संकल्पनेबद्दल विचारात पाडणारे विचार मांडायची धाटणी आवडली.

(बर्‍याचदा देवाबाबत भीती, कोप, कर्मकांडांचं ओझं इ. गोष्टीच नकळत जोपासल्या जातात आणि पुढच्या पिढीवर तेच संस्कार नकळत घडविले जातात.)

Pages