'वि'स्मृतीगंध....

Submitted by बागेश्री on 29 December, 2011 - 02:11

एकापेक्षा एक उंच, आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती... आणि वर आकाशी कमनीय चंद्रकोर..
झगमगत्या काँक्रिटच्या जंगलाचा मानवी आविष्कार आणि वरती निसर्गाचा तो कोवळा आविष्कार...!
ठाण्याच्या प्रशस्त फ्लायओव्हर वरून भरधाव जाणार्‍या बसमधून हे नजरेत भरत होतं.

बसच्या त्या गतीच्या दुपटीने मन गतकाळात खेचलं गेलं..

कुठे होतो आपण? लहानगं गाव, गाव नाही - अनेक गावं! तुकड्या तुकड्यांनी प्रत्येक गावी होत गेलेलं शिक्षण- जमवलेले मित्र मैत्रिणी मागे टाकत पुढचा घडत राहणारा प्रवास.. ओघानेच पूर्ण केलेले डिग्रीचे शिक्षण आणि शेवटी नोकरी.. अशाप्रकारे नोकरीसाठी गाठलेली ही मुंबई!!

लहानपणी वृत्तपत्रात- मासिकांत पाहिलेली ही मुंबापुरीची चित्रे- झगमगाटाची, धावत्या लोकलची, माणसांची, प्रशस्तपणाची, माणुसकीची- आज रोजच्या जीवनातला कितीतरी सहजतेने भाग होऊन गेलेली.

रोज घड्याळीच्या काट्यापेक्षा सेकंदभर पुढे पळताना, गतकाळ मात्र मुठीतून निसटलेला... चौपाटीवरच्या वाळूसारखा!

ती शाळा, ते डबे, लोणच्याची फोड, प्रार्थना, फुटलेले गुडघे, न केलेला गृहपाठ, खोटेच दुखलेले पोट, मास्तरांच्या केलेल्या नकला, खेळात लिंबू -टिंबू ठरविल्याचा राग, आजारी पडल्यावर आईचं मिळणारं खास अटेंशन, बाबांनी ऑफिसमधून येताना आणलेला खाऊ.. मोठे होतांना आईची असणारी कडवी नजर, आता जीवनच बनलेला आपला गुरू, मित्रांची साथ, पहिले प्रेम, सफलता- असफलता, कॉलेज लाईफचं नाकात शिरलेलं वारं आणि तरुणाईची धुंदी...

आता पडलेल्या जबाबदार्‍यांत, ह्या आठवणीही पुसटलेल्या...

आज जरा बसावं म्हणते.. हातातलं घड्याळ बाजूला काढून ठेवून..

विस्मृतीचं जुनाट कपाट उभं करून ठेवलंय मनाच्या कोपर्‍यात, हव्या- नको त्या गोष्टी "सध्या लागत नाहीत" असं म्हणत, त्यांची गाठोडी करून, कोंबण्यापुरतीच त्या कपाटाची दखल घेत आले आहे... आज जरा वेळ काढावाच, घ्यावं हे कपाट नेटकं मांडायला...!

काढावीत एक एक गाठोडी, कराव्यात आठवणी मोकळ्या थोड्या..
काही अत्तर मारून ठेवलेले क्षण पुन्हा सुखावतील..
काही ठेवून जीर्ण झालेल्या आठवणींची गाठोडीच बदलावीत- एक अत्तराचा फाया त्यातही ठेवेन म्हणते.. पुढच्या वेळी पुन्हा उघडेन हे कपाट तर गंधाळाव्यात त्याही!!

-बागेश्री
ब्लॉगवर प्रकाशित : http://venusahitya.blogspot.com

गुलमोहर: 

पुढच्या वेळी पुन्हा उघडेन हे कपाट तर गंधाळाव्यात त्याही!! >> जरुर जरुर...... Happy
इथे मी हे कपाट उघडेच ठेवतो.....ठेवतो म्हणजे..., ते राहतेच. कारण त्या सर्व गोष्टींपासुन खुपच दुर आहे.
थोडा आणखी मागील भुतकाळातला 'गंध' तर वेगळाच.

आहाहा बागुडी.गोड ,गो$$ड. .. तुझ्या गाठुड्यांशी मिळती जुळती गाठुडी इतकी भरलेली आहेत ना कि आमचं कपाट ही उघडंच राहतं ,बंदच होत नाही कधी!!!! Happy

मस्तच बागे. खरंच अशा छोट्या छोट्या आठवणी किती सुखवुन आणि दुखवुन जातात. तेव्हाचे दु:खाचे पहाड आता छोट्याशा उंचवट्याएवढेही वाटत नाहीत. तसंच तेव्हाचे छोट्या गोष्टीतुन मिळालेले प्रचंड आनंद आता खुप मोठ्या अचिवमेंटनंतरच्या आनंदापेक्षा अजुनही मोठेच वाटतात.

मला नाही आठवणी ठेवता आल्या गुंडाळुन गाठोड्यात. माझ्या तर अशा खिशातच असतात. एखादा विशिष्ट वास, एखादी वस्तु, गाडीवर फास्ट जाताना ऐकु आलेली गाण्याची अर्धवट ओळ किंवा मग संध्याकाळी पडलेला विशिष्ठ उजेड काहीही पुरतं त्यांना बाहेर उडी मारुन यायला. (लिफ्ट मधुन जाताना अचानक एखाद्या मजल्यावर येणारा आमटी उकळण्याचा वास मला cozy शनिवार दुपार, रेडिओवर लागलेला विशिष्ठ कार्यक्रम आणि आईची आठवण करुन देतो. ) छान लिहिलंयस. मलाही खुप खुप आठवणी आल्या ललित वाचुन. Happy

तुझ्याच आधीच्या लिखाणाशी तुझेच हे लिखाण कंपेअर करता ओके वाटलं..... नेहमीसारखं खास काहीतरी येउ देत जरा Happy शुभेच्छा...!!!!!!

रिकामा वेळ आहे म्हणून >> भुंग्या या सर्व गोष्टी जेव्हा आपण रिकामे म्हणजेच 'रिते' असतो आतुन आणि बाहेरुनही तेव्हाच घडतात, उमजतात.

जागा 'खाली' होते नि 'भरते'.

मस्त मस्त मस्तच !
मनि +१
मलाही हे सगळं अनुभवायला खुप खुप आवडंत. आणी अश्या आठवणी यायला लागल्या की मग बाजुला कुणीही नको. आपण आपलेच डोळे मिटुन वाहुन जायचे या झर्‍यात Happy
बाकी आठवणींचे म्हणशील तर माझ्यासाठी त्या म्हणजे Happy
http://www.maayboli.com/node/22945

सु
रे
ख!! Happy

आणि मनिमाऊ....माझ्या मनातलच लिहिलतं! Happy

अगदी सहजतेने ओघात लिहिलंयस.... आवडलं.
आठवणी आपल्या जन्माचं संचित आहे. जपल्याच पाहिजेत त्या.

धन्स मित्र- मैत्रिणींनो..
तुम्हा सार्‍यांचे अगदी मनापासून आभार!!!
काका, मने Happy

छानच
मला चं.गोखलेंची चारोळी आठवली

आठवणींच्या देशात
मी मनाला कधी आठवत नाही
जाताना ते खूष असतं
पण येताना त्याला येववत नाही

काही ठेवून जीर्ण झालेल्या आठवणींची गाठोडीच बदलावीत- एक अत्तराचा फाया त्यातही ठेवेन म्हणते.. पुढच्या वेळी पुन्हा उघडेन हे कपाट तर गंधाळाव्यात त्याही!! >>>>>

हे महत्वाचं आहे. माणूस जरा बिझी झाला, उद्योगविश्वात रमला कि या छोट्या छोट्या बाबींचा विसर पडतो. असंच अचानक कुणीतरी लक्षात आणून देतं त्यासाठी तरी आभारच मानले पाहीजेत Happy मस्त

मनःपूर्वक आभार तुम्हा सर्वांचे, अभिप्राय वाचून फार आनंद झाला...
श्यामलीताई विशेष आभार Happy

काही ठेवून जीर्ण झालेल्या आठवणींची गाठोडीच बदलावीत- एक अत्तराचा फाया त्यातही ठेवेन म्हणते.. पुढच्या वेळी पुन्हा उघडेन हे कपाट तर गंधाळाव्यात त्याही!!>>>>>

सुंदर

बागेश्री... Happy
खासच.... आठवणींची गाठोडी, अत्तर......अप्रतिम लिहिलय... Happy

! Happy !

देश, नाती, मित्र.. सगळचं नजरेआड गेलय...त्यामुळे मन हल्ली या आठवणिंच्या हिदोळ्यावर जरा जास्तच झुलत असत आणि त्यात तु ही तार छेडलीस... Sad
खुप छान लिहिलस. मनापासुन आवडेश!!!

अहाहा!! Happy छोटुकलं, गोडुलं असं हे तुझं ललित मनातल्या 'वि'स्मृतींची कुपी उघडून मंद-मंद दरवळ पसरुन गेलंय.... काही लोक गद्य कविता लिहितात, तू पद्य लेख लिहितेस Happy

बागे काय लिहू आता?? इतकं छान मांडलस प्रत्येकाच्या मनातलं.....की शब्द पुरेनात!
मनेला अनुमोदन हवे तेवढे टक्के!
अनेकदा अशा जुन्या आठवणींची बोचकी आपापली डोकी वर काढतात, अन एक एक मणी माळेतून सुटत जावा, तश्या हळूहळू तरळत जातात,,,,,,,,,कधी मन:पटलावर मोरपिस फिरवून तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावून! Happy

येत्या नवीन वर्षातही अशीच लिहित रहा....शुभेच्छा!

नेहा, स्मितूतै, सानूली, अमित, गंधर्व, अनघा, पजो, बेफी अभिप्रायासाठी मनःपूर्वक आभार
नववर्षाच्या शुभेच्छा सगळ्यंना..! Happy