श्वान पंथी

Submitted by विनायक.रानडे on 24 December, 2011 - 03:17

प्रत्येकाला निवड स्वातंत्र्य आहे हे मला मान्य आहे तसेच ते इतरांनी मान्य करावे अशी माझी रास्त इच्छा आहे. पण निवड केलेला विषय, विचार, मार्ग अथवा एखादी वस्तू इतरांनी मान्य करावी हा आग्रह असणे, मान्य केल्यास मित्र नाहीतर शत्रू किंवा बिनडोक वगैरे लेखणे म्हणजे इतरांच्या निवड स्वातंत्र्यावर अतिक्रमण असेच माझे मत आहे. पण जेव्हा निवड, विचार, मत स्वातंत्र्याचा वापर करून इतरांना त्रास देणे, शिव्या देणे किंवा शत्रू ठरवणे असे घडते तेव्हा ह्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणार्‍यांना ह्या मानवी समाजाचे शत्रू समजणे, ठरवणे आवश्यक झाले आहे.

स्वातंत्र्याचा असाच फायदा घेऊन नवीन पंथ निर्माण झाले, होत आहेत व ह्या पुढे होतील हे निश्चित आहे. श्वान पंथी हा त्यातलाच एक प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. श्वान पंथीय व श्वान पथक हे दोन वेगळे प्रकार आहेत. श्वानाचा उपयोग करणारे, त्यांचे अनुकरण करणारे, श्वानाला मानवी दर्जा मिळवून देणार्‍यांना मी श्वान पंथी गणले आहे. श्वानाचा उपयोग घराचे, मालमत्तेचे संरक्षण व म्हणून श्वान पथकाचे संरक्षण हा एक पशू पालन पंथ आहे. श्वानाला आवश्यक तेवढेच महत्त्व ह्या पंथात असते. ह्या पंथात प्राण्याचे प्राणी म्हणून हक्क देण्याचे सगळे नियम आहेत व त्याचे काटेकोर पालन होते ह्याचा मला अनुभव आहे.

दुसरा श्वान सोबत पंथ आहे. ह्या पंथीयांचे मानवी समाजातील अतिक्रमण हा एक फार त्रासदायक प्रकार झपाट्याने बोकाळतो आहे हे मी रोज अनुभवतो आहे. श्वान सोबतीचे काही उप पंथ आहेत ते असे, श्वान मित्र, श्वान पालक, श्रिमंतिची मुजोरी, श्वान व्यवसायी वगैरे. पण सगळ्यात वाईट परिणाम श्वान वृत्तीचा आहे.

मी जे अनुभवले ते असे काहीसे होते.

श्वानाचा उपयोग - ज्यांची घरे भली मोठी व नोकर चाकर अशी होती, तिथे हे श्वान रक्षक म्हणून घराबाहेर होते. त्यांना बागडायला भरपुर हिरवळ होती. घरात त्यांचा वावर फार कमी होता. मालक मालकिणी बरोबर बाहेर थाटात भटकणारे नव्हते. ह्या श्वान मंडळींना त्यांची मर्यादा चांगली दाखवलेली होती. ते ऊठ सुट कोणावर भुंकण्यात वेळ घालवणारे नव्हते. काही श्वान मेंढपाळाचे साथी होते, जनावरांचे नियंत्रण व रक्षण करणारे होते, त्यांचा थाट मला फार आवडतो. उगाच रस्त्याने भुंकत फिरत नव्हते. ही एक वेगळीच जात होती.

श्वान मित्र - दोन प्रकारचे आहेत, एका प्रकारात श्वान मानवाचा तर मानव श्वानाचा मदत करणारा मित्र दिसतो, दोघे आपापल्या मर्यादा ओळखून असणारे, उगीचच एकाचे दुसर्‍यावर वर्चस्व नसते. त्यांच्या मैत्रीचा हेवा करावा अशी ती मैत्री असते. पण दुसरा प्रकार श्वानाने निवडलेला मानवी मित्र असाच असतो. श्वानाचे सगळे चोचले व नखरे पोसणारी मंडळी व त्यांची वर्तुळं ठरावीक अड्ड्यातून मोठ्या दिमाखात आपल्या श्वानाचा कौतुक इतर श्वान सोबत्यांना सांगण्याचा आनंद लुटताना मी बघतो आहे.

श्वान पालक ह्यात दोन पोटजाती आढळल्या - १ - श्वानाला अपत्याचा दर्जा देणारे, कारणे वेगवेगळी होती, अपत्य नसल्याने एक सोबत असावी ह्या हेतूने श्वानाचे पालक झाले होते. त्या श्वानाचे जणू जन्मदाते आहेत असे पालन करत होते. त्या श्वानाची देखभाल हाच त्यांना विरंगुळा होता. २ - तर काही पालक आपल्याच अपत्यावर नियंत्रण मिळवण्यात नाकाम झाल्याने ते नियंत्रण श्वानावर मिळवण्यात यश मानत होते. रोज २४/७ त्या एका किंवा जमल्यास अधिक श्वानांचे नियंत्रण करण्यात पुढील आयुष्याची वाटचाल सांभाळीत आहेत असा काहीसा प्रकार होता.

श्रीमंतीची मुजोरी - वाजवी पेक्षा जास्त पैसा हातात आला की बर्‍याच व्यक्ती ह्या पंथात आपले नाव नोंदवतात असे मला समजले. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही श्रीमंतीची मुजोरी करण्याची सवय होते. प्रत्येक जण आपल्या आवडीचा एक श्वान घरात आणतो, संस्काराप्रमाणे त्या श्वानाला सोबती करतो किंवा नोकर असल्या सारखे दर दोन मिनिटाला काही तरी काम सांगतो. थोड्याच दिवसात तो श्वान देखील श्रीमंतीत लोळायला शिकतो. श्रीमंतीचा माज त्याच्याही अंगात भरतो. मालकाने दहा वेळा बोंबलल्यावर तुच्छ नजरेने त्याच्या कडे बघत काम केल्याचे दाखवतो.

श्वान व्यवसायी - हा फार मोठा व्यवसाय आहे. पशू वैद्य, औषध विक्री, खाद्य विक्री, पशू वैद्यकीय प्रशिक्षण, पशू प्रशिक्षक, श्वान सोबत प्रशिक्षक व त्या प्रशिक्षणाचा उपयोग समजवून देणारे सल्लागार, पशू सौंदर्य सल्लागार, सौंदर्य प्रसाधने व सौंदर्य शाळा. अशा प्रत्येक माध्यमातून महिन्याला ४ ते ५ अंकी रकमेची उलाढाल होते असे माझ्या बघण्यात आले आहे. हा सगळा महागडा प्रकार आजच्या जीव घेण्या महागाईत सहज सांभाळणारे रोज नवे हौशी श्वान सोबती रस्त्याने दिमाखात फिरताना मी बघतो आहे.

श्वान वृत्ती - मानव समाजाला सगळ्यात घातक असणारा प्रकार मानवातील लाळघोटी वृत्ती जी पाळीव श्वानात जन्मजात असते. काही श्वान त्यांची जीभ बाहेर काढून हवर्‍या डोळ्यांनी मालका समोर लाळ गाळत मालकाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करताना मी नेहमीच बघतो तोच प्रकार श्वान वृत्ती असणार्‍या मानवांचा मी फार जवळून अनुभवला आहे. अशा श्वान वृत्तीच्या मनुष्यबळावर अधिकार गाजवणारे अधिकारी व नेते मंडळींनी भारतात गोंधळ घालण्याचा उच्चांक गाठलेला जाणवतो आहे. ही लाळघोटी वृत्ती परदेशात पण बघायला मिळाली, तिथे देखील श्वान वृत्तीच्या मनुष्यबळावर अधिकार गाजवणारे अधिकारी अनुभवले आहेत फक्त प्रमाण बरेच कमी होते.

माझे श्वान सोबतींशी झालेले संवाद काहीसे असे होते.

सोसायटीत एक वयाने मोठ्या झालेल्या पुरुषाने एका अती उत्साही श्वानाला मोकळे सोडले होते, त्या श्वानाने बगीच्यात खेळणार्‍या दोन लहान मुलांच्या हाताला चावले होते. त्यावर भांडण चालू होते, श्वान मालक

निर्लज्ज पणे सांगत होता "आमचा टॉमी फार खेळकर आहे, त्याला आम्ही नेहमी इंजेक्शन देऊन निरोगी ठेवतो, तुम्ही घाबरू नका, थोडा वेळ दुखेल मग मुलं शांत होतील !" मुलांच्या आयांनी भरपूर ठेवणीतल्या शिव्यांचा उपयोग केला होता. ती दोन लहान मुळे केकाटत घरात गेली होती.

त्या प्रसंगानंतर दोन दिवसाने एका पोनिटेल धारक मुलीने तिचा अती उत्साही श्चान रस्त्याने मोकळा सोडला होता. तो श्वान माझ्या मागून पाया जवळ आला, मी जोरात पाय आपटल्यावर घाबरून तो त्या मुलीकडे पळाला. त्या मुलीने पंजाबी मिश्रीत इंग्रजी माझ्यावर टाकले "अंकल हा फार प्रेमळ आहे, कोणाला चावत नाही, मी त्याला माझ्या अंगावर सारखा खेळवत असते, वगैरे....." मला त्या मुलीचा राग आला होता तरीही राग आवरत म्हटले "माफ करा, ही माझी विनंती आहे, तुमच्या श्वानाला कायद्याने पट्टा बांधणे आवश्यक आहे. कोणत्याही प्राण्याचा फार भरवसा नसतो तेव्हा भांडण टाळण्या करता पट्टा बांधणे जास्त चांगले !" ती पोननीटेलवालीने तिचा पट्टा न वापरण्याचा मुद्दा कायम ठेवत सांगितले "मी त्याला पट्टा बांधणार नाही, तुम्हाला समजत नाही का ?" मी चिडलोच होतो "मी सूचना देण्याचे काम केले आहे, पुन्हा हे कुत्रं अंगावर आले तर काय करीन ते तेव्हाच कळेल !" ती पोनिटेल बया "अनएजुकेटेड, बत्तमीज बुढा म्हणत त्या श्वान सोबत्याला तीच्या कडेवर उचलून घेऊन गेली.

माझी शतपावली अजून सुरू असताना ती पोनिटेल तीच्या नवर्‍याला घेऊन आली "ये आदमी मेरेसे बत्तमीजी करता है" तिचा नवरा - " साहेब तुम्ही तर शिकलेले दिसता, आमचा कुत्रा अगदी शांत आहे, वगैरे...." मी राग आवरत त्याला बोललो - "शिक्षण घेऊन हेच वागणे असेल तर त्या देवाला माझा धन्यवाद मी शिकलेलो नाही, एक अडाणी परवडला, प्रत्येकाला आपला मुलगा सोनुला असतो, तुम्हाला तो मुलगा असेल, मला तो एक कुत्राच आहे. मी तुम्हाला विनंती व सूचना केलेली आहे, ह्या नंतर मात्र जे घडले त्या करता तयारी ठेवा !" दोघे वाकडी तोंडे करीत निघून गेली.

मागच्याच महिन्यातील प्रसंग, पुन्हा एक पोनिटेल श्वान सोबतीण रस्त्यावर उतरली, त्या श्वानाच्या गळ्यात असलेला पट्टा काढून तिने त्याला बागडायला मोकळा सोडला, त्याचे पायावर करणे चालू होते, मी माझ्याचं बायकोबरोबर शतपावली करत होतो, तो अती उत्साही श्वान माझ्या अंगावर धावून आला, मी त्याला मारण्याच्या तयारीत असताना पोनीटेलवाली म्हणते " तो फार खेळकर आहे चावणार नाही". मी तरीही तिला सांगितले "माझा माणसावर विश्वास नाही श्वानावर तर मुळीच नाही, कृपया पट्टा बांधा !" पण पोनिटेल उडवत पुन्हा त्या श्वानाचे कौतुक सुरू झाले, मी पण तिच्याच सारखे हसत तिला म्हटले " माझ्या बायकोला विचार मी पण अगदी प्रेमळ आहे, मला पण तुला मिठीत घ्यावेसे वाटते, तुला व तुझ्या नवर्‍याला आवडेल का ? तिने एकदम तीच्याच तोंडावर हात ठेवला.

कालच माझा शेजारी सुट्टी घेऊन गावाला गेला तो पण एक श्वान सोबती आहे. त्याने त्याच्या श्वानाला १० दिवसा करता एका हॉस्टेल मध्ये दिवसाला २०० रुपये मोबदल्यात ठेवले आहे. व्वा क्या बात है श्वानाचे हॉस्टेल !!!!! जय श्वान पंथी !!!!

गुलमोहर: 

हे तर आमचंच शहरी रडगाणं आहे Sad
(तरी तुम्ही भर उघड्यावर मालक/मालकिणीन्च्या साक्षीने रस्त्यावर होत असलेल्या श्वानान्च्या नैसर्गिकविधीवर लिहीले नाहीये - अवांतरः शंकरमहाराजमठाच्या धाग्यावरील प्रकरणामुळे घाबरलात की काय? Wink असो)

>>>> माझ्या बायकोला विचार मी पण अगदी प्रेमळ आहे,........>>>><<<<< Lol Lol Lol
हे आवडले. लक्षात ठेवले पाहिजे, म्हणजे नेक्स्ट टाईम आमच्या इकडे हाच "डॉयलॉग" मारीन. Proud