कोण हरिहरी करते?

Submitted by ह.बा. on 22 December, 2011 - 04:57

कोण हरिहरी करते?

जगण्याच्या जखमेत असे का मरण वेदना भरते?
अवघडलेले वादळ आता मंद मंद वावरते...

पारंबी सुकल्यावर तेथे कोण झोकतो जगणे?
ती वार्‍याचा करुनी झोका एकटीच थरथरते

तीच मिठी अन हे ते सगळे रोजचेच ते त्याला
ती ही पहिल्या भेटीइतकी ते तसेच बावरते

लागेना डोळ्याला डोळा शांत होइना तगमग
चाहुल येते शांतीची अन रात्र नेमकी सरते

दिंडी आहे तोवर, आहे भाव तोवरी नाचू
मटणाच्या ताटावर सांगा कोण हरिहरी करते?

- हबा

गुलमोहर: 

मस्तच रे !

<<तीच मिठी अन हे ते सगळे रोजचेच ते त्याला
ती ही पहिल्या भेटीइतकी ते तसेच बावरते>>> इथे थोडा गोंधळलोय !

मतल्यातील दोन ओळींत परस्पर संबंध स्पष्ट नाही.

पारंबी सुकल्यावर तेथे कोण झोकतो जगणे?
ती वार्‍याचा करुनी झोका एकटीच थरथरते

दुसरी ओळ सहज. पहिल्या ओळीवर जरा अजून विचार व्हावा.

तीच मिठी अन हे ते सगळे रोजचेच ते त्याला
ती ही पहिल्या भेटीइतकी ते तसेच बावरते

ठीक आहे द्विपदी.

लागेना डोळ्याला डोळा शांत होइना तगमग
चाहुल येते शांतीची अन रात्र नेमकी सरते

बरी आहे ही सुद्धा द्विपदी.

दिंडी आहे तोवर, आहे भाव तोवरी नाचू
मटणाच्या ताटावर सांगा कोण हरिहरी करते?

जुना विचार. हटके मांडण्याच्या प्रयत्नात गझलेची मजा घालवून बसलेली द्विपदी.

-सुभाष

ती ही पहिल्या भेटीइतकी ते तसेच बावरते>>> इथे थोडा गोंधळलोय !
>>> अशा ठिकाणीच माणूस नेमका गोंधळतो. सावरायचं स्वतःला Wink कळलं का? धन्यवाद!

धन्यवाद बेफिकीरजी!! (नावातल्या र ला वेगळा का केलाय का?-'बेफिकी र'!)

विस्तृत व अभ्यासपुर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद सुभाषजी!

खूप आवडली ....खूप आवडली ............
अवांतर : सध्या विडंबन लिहिले आहे जरूर वाचावे
तुमच्या कवितेवर नाही दुसर्याच्यावर केले आहे ........

जगण्याच्या जखमेत असे का मरण वेदना भरते?
अवघडलेले वादळ आता मंद मंद वावरते...

पारंबी सुकल्यावर तेथे कोण झोकतो जगणे?
ती वार्‍याचा करुनी झोका एकटीच थरथरते

मस्तच!

चांगली गझल ह.बा...

मतला वाचायला चांगला वाटत आहे... पण दोन ओळींचा संबंध प्रयत्न करूनही लागत नाहीये... शक्य असेल तर समजावून सांगतोस का?

पारंबीचा शेर आवडला... झोका घेणे ह्या अर्थी झोकणे शब्द बरोबर वाटत नाही पण Sad

जगण्याच्या जखमेत असे का मरण वेदना भरते?
अवघडलेले वादळ आता मंद मंद वावरते...

आयुष्यभर दु:ख सहन केल्यावर पुन्हा वेदनादायी, त्रासदायक मृत्यू येणार आहे. त्यामुळे एकेकाळी वादळी/तडफदार आयुष्य जगलेले कुणीतरी आज असहाय्यपणे मरणाला विनवीत जगते आहे. कदाचित हा शेर जमलेलाच नाही. पण मला तो आवडलेला आहे. एवढ्या वेळी शेराची सूट घेतो. बाकी ते झोकणे झोका घेण्यासाठी नाहिच्चे. धन्यवाद!

लागेना डोळ्याला डोळा शांत होइना तगमग
चाहुल येते शांतीची अन रात्र नेमकी सरते

दिंडी आहे तोवर, आहे भाव तोवरी नाचू
मटणाच्या ताटावर सांगा कोण हरिहरी करते?

आपण बढिया लिहिता.