भारतरत्न पुरस्काराचे महाभारत!

Submitted by शांतीसुधा on 21 December, 2011 - 09:05

भारतरत्न, हिंदूस्थानातील एक सर्वोच्च नागरी पुरस्कार! भारतरत्न अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने मानवतेसाठी, समाजासाठी उच्चकोटीची तसेच भरगच्च कामगीरी केलेली आहे. सुरूवातीला हा पुरस्कार देशासाठी भरीव कामगीरी केलेल्या व्यक्तींना दिला जात असे. पण आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला दिला जातो त्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरीक असण्याचंही कारण नाही आणि त्या व्यक्तीने भारतीय समाजासाठी विशेष केलेलं असण्याचीही आवश्यकता नाही. ह्या पुरस्काराची घोषणा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र पसाद यांनी २ जानेवारी १९५४ ला केली. सुरूवातीला हा पुरस्कार केवळ जीवंत असलेल्या व्यक्तींनाच देण्यात यावा अशी तरतूद होती पण जानेवारी १९५५ मधे त्यात सुधारणा घडवली गेली आणि हा पुरस्कार मरणोत्तर देण्यासही सुरूवात झाली.

अत्तापर्यंत हा पुरस्कार एकूण ४१ व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्याची यादी विकीपीडीया इथे उपलब्ध आहे. त्यातील दोन व्यक्ती खान अब्दुल गफारखान (सरहद्द गांधी) आणि नेल्सन मंडेला भारतीय नागरीक नाहीत. हा पुरस्कार देण्यासाठी नक्की कोणते निकष लावले जातात याचे जाहीर प्रकाशन फारसे उपलब्ध नाही. अत्तापर्यंत जे काही बाहेर आले आहे त्यावरून असेच वाटते की विशिष्ठ क्षेत्रातील व्यक्ती------जिवंत अथवा मृत आणि त्यांनी केलेली कामगीरी इतकेच निकष दिसतात. आपण जर यादी नीट पाहीली तर अधिकाधिक वेळा पुरस्कार प्राप्त व्यक्ती ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत, राजकीय व्यक्ती तसेच कॉंग्रेसशी संबंधीत आहेत. उदा. राजीव गांधींनी अशी कोणती भरीव कामगीरी भारत देशासाठी किंवा मानवतेसाठी किंवा समाजासाठी केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर शोधूनही सापडणार नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती कला क्षेत्र (सुब्बालक्ष्मी, सत्यजीत रे, पं भिमसेन जोशी, लता मंगेशकर, पं रविशंकर, शहनाई सम्राट बिस्मील्ला खान, एम जी रामचंद्रन), सामाजिक कार्य (विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, मदर टेरेसा, नेल्सन मंडेला) तसेच विद्वान-शास्त्रज्ञ (सी व्ही रामन, ए पी जे अब्दुल कलाम, अमर्त्य सेन, डॉ आंबेडकर, पांडुरंग वामन काणे, झाकीर हुसेन, विश्वेश्वरैय्या), उद्योजक (जे आर डी टाटा) यांची नावं आहेत. एम जी रामचंद्रन यांनी मानवतेसाठी आणि समाजासाठी नक्की काय भरीव कामगीरी केलेली आहे हे समजत नाही. राजकीय क्षेत्रातील अनेक नावं अशी आहेत की त्यांच्या भरीव (??) कामगीरी बद्धल प्रश्न पडतात.

यात अजुन एक महत्त्वाचा मुद्दा राहून जातोय आणि तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेलं मरणोत्तर भारतरत्न काढून घेणे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण कामगीरी कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे अगदी जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षाही भरीव कामगीरी नेताजींची आहे. पण केवळ त्यांच्या मृत्युचं सर्टीफिकीट नाही म्हणून त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाता कामा नये असे म्हणून दिलेला पुरस्कार नाकारण्यात आला. आता एक गंमत बघा की हेच कॉंग्रेस सरकार सार्‍या जगाला ओरडून सांगत असतं की सुभाषचंद्र बोस जिवंत नाहीत.....ते जिवंत असणं शक्यच नाहीत असं त्यांचे नातेवाईकही मान्य करतात. मग भारतरत्न पुरस्काराच्याच वेळी यांना ते मृत नाहीत असं का वाटावं? मुख्य म्हणजे लोकांकडून मागणी होते म्हणून घटनेत दुरूस्ती करून भारतरत्न पुरस्कार देण्यात येण्याच्या यादीत खेळाडूंची वर्णी लावली गेली. पण सुभाषचंद्र बोसांवर किती अन्याय होतो आहे याचा कुणीही विचारही करत नाही. इंदिरा गांधीला १९७१ साली हा पुरस्कार देण्यात आला आणि १९७५ साली तिने लोकशाहीची पायमल्ली करून देशात आणीबाणी निर्माण केली. मग ही भारतरत्न पुरस्काराची पायमल्ली नाही काय? राजीव गांधींचं नाव बोफोर्स गैरव्यवहारांसहित स्विस बॅंकेतील काळ्या पैशासंदर्भातही आलेले आहे. मग एकूणातच काहीही कामगीरी न केलेल्या आणि भ्रष्टाचारात नाव गोवले गेलेल्या व्यक्तीचं भारतरत्न का काढून घेऊ नये?

सचिन तेंडूलकरने क्रिकेट या खेळात भव्य कामगीरी केलेली आहे. तशी ध्यानचंद यांनीही तेंडूलकर जन्माला येण्याआधी हॉकीच्या क्षेत्रात सुवर्ण कामगीरी केलेली आहे. मग केवळ सचिन तेंडूलकरसाठी (म्हणजे क्रिकेट साठी) नियम बदल केले जातात. [मी हे असं लिहीलं आहे याचा अर्थ मी सचिन तेंडूलकरची कामगीरी आजीबात महत्त्वाची नाही असं म्हणते आहे असा होत नाही.] उद्या अमिताभ बच्चनचे चाहते एकत्र येऊन त्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करतील. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे क्रिकेटमधला नाही. त्यामुळे वयाच्या चाळीशीतच भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला तर त्याला पुढे कोणताच भारतातील पुरस्कार स्विकारता येणार नाही. याउलट मला असं वाटतं की अत्ता त्याला हा पुरस्कार न देऊन त्याला भारतीय समाजासाठी/ मानवतेसाठी काही उत्तम करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे भविष्यात जेव्हा हा पुरस्कार त्याला दिला जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांसाठीच ते अधिक अभिमानास्पद असेल.

बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतरही आयुष्यातील शेवटची काही वर्षं त्यांनी हालाखीत एका झोपडीत औषधपाण्याविना काढलेली आहेत. काय उपयोग त्या भारतरत्न पुरस्काराचा? ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबाबतीतही त्यांचा अपमान होण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत.

हे भारतरत्न पुरस्कार वगैरे सगळा दिखावा आहे. नागरी पुरस्कार देण्याची जी कमिटी आहे त्या कमिटीवर तसेच सत्ता कोणत्या पक्षाच्या हाती आहे त्यावर हे सगळं अवलंबून आहे. वर नमूद केल्याप्रमाणे राजीव गांधी, इंदिरा गांधी तसेच इतरही काही पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या बाबतीत जे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसं होऊ नये याची काळजी घेण्यासाठी भारतरत्न पुरस्कार पात्रता निवडीत वयाची अटही असावी असे वाटते. म्हणजे व्यक्तीला अधिक काळ परखून मगच हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जावा. मला असं वाटतं की सद्य परिस्थीतीत तसेच निकषांच्या बाबतीत पारदर्शकता असावी तसेच हा पुरस्कार मरणोत्तरच दिला जावा म्हणजे पुरस्कार प्राप्त काही विद्यमानांचा (बिस्मिल्ला खां आणि अब्दुल कलाम) जसा अपमान होतो आहे/झाला आहे तो तरी भविष्यात होणार नाही. तरच या पुरस्काराची मानदंडता राखली जाईल. नाहीतर दिवसेंदिवस त्याचे महत्त्व कमी होत राहील यात शंका नाही.

गुलमोहर: 

मुद्द्यांची प्रचंड सरमिसळ झाली आहे.

वयाचा आणि कर्तुत्वाचा संबंध असणे जरुरी नाहि. समजा उद्या एखाद्या भारतीय PhD candidate ने नोबेल पारितोषिकप्राप्त संशोधन केले तर त्याला वयाचा निकष लावून भारतरत्न डावलणार का ?

तसेच active खेळांच्या क्षेत्रांमधे तेंडूलकराचे वय हे veteran म्हणण्याएव्हढे आधीच आहे. तसेच "इतर खेत्रांमधील खेळाडूंना अजून दिला नसल्यामूळे ह्यांना आत्ताच का ?" हा मानदंड पूर्ण चूकीचा आहे.

तरच या पुरस्काराची मानदंडता राखली जाईल. >> ह्याबाबत दुमत नसावे. पण त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यक्तींना एक गठ्ठा मापदंड लावणे अशक्य नि चूकीचे आहे.

असामी, मुद्दे मांडताना थोडी सरमिसळ झाली खरंय. ते दुरूस्त केलं आहे.
कर्तुत्त्वाला वयाचं बंधन नसतं हे अगदी मान्य. अगदी नोबेल पारीतोषिक देताना सुद्धा कितीही महत्त्वाचं संशोधन असलं तरी त्या संशोधनाची खरी उपयुक्तता त्या त्या क्षेत्रात खरंच किती आहे हे काही वर्षं पाहूनच मगच नोबेल पारीतोषिक देण्याचे ठरवले जाते. त्यामुळे आपण जर पाहीलं तर शक्यतो संशोधन जरी तरूण वयात केलेलं असेल तरी नोबेल पुरस्कार मिळेपर्यंत तो संशोधक करिअरच्या अनेक टप्पे पुढे गेलेला असतो. अपवाद मेरी क्यूरीचा. आईनस्टाईन, जॉन नॅश इत्यादिंचे नोबेल पुरस्कार विजेते काम हे त्यांना पुरस्कार मिळाला त्यावेळी बरंच जुनं झालेलं होतं.

भारतरत्न विषयी वाद चर्चा अनेक वर्षे चालू आहे म्हणूनच काही वर्षं झाली या पुरस्काराची घोषणा बंद झालेली आहे. याचं कारण मधल्याकाळात सरसकट जाहीर झालेले पुरस्कार. सुभाषबाबूंच्या बाबतीतही अन्याय झाला आहे.

>>> तसेच "इतर खेत्रांमधील खेळाडूंना अजून दिला नसल्यामूळे ह्यांना आत्ताच का ?" हा मानदंड पूर्ण चूकीचा आहे.>>> हा मानदंड नाहीये........तर दबावाचं राजकारण आहे. आज सचिन तेंडूलकरमुळे आपल्याला सगळ्यांना हे समजलं तरी की भारतरत्न पुरस्कार हा क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना देता येत नाही. इतर क्षेत्रातील खेळाडूंना नाही आणि ह्यांना अत्ताच का असं कोणीच म्हणत नाहीये. हा मुद्दा सचिन तेंडूलकरच्या विरूद्ध नसून घडत असलेले राजकारण दाखवण्यासाठी आहे.

भारतरत्न पुरस्कार वास्तविक पाहता फक्त भारत देशासाठी, समाजासाठी भरीव कामगीरी केलेल्यांनाच देण्यात यावा. विविध क्षेत्रांची जी पुरस्कारांत सरमिसळ केलेली आहे त्यामुळे सगळा घोळ होतो आहे. खरं तर हा पुरस्कार मरणोत्तरच देण्यात यावा म्हणजे पुरस्कार दिल्यानंतर ती व्यक्ती पुरस्काराच्या मानदंडास सयुक्तीक असं नाही वागली तर तोंडघाशी कशाला पडायचं?

नाहीतर सरळ बाय डिफॉल्ट हा पुरस्कार गांधी घराण्यातील व्यक्ती आणि काँग्रेसचे निकटवर्तीय तसेच काँग्रेसच्या ध्येयधोरणांविषयी हांजी हांजी करणार्या विविध क्षेत्रातील भरीव (??) कामगीरी केलेल्या लोकांनाच देण्यात येईल. इतरांनी अपेक्षा ठेवू नये किंवा आंदोलनेही करू नयेत. असंच जाहीर करून टाकावं.

शांतीसुधा, यावर एक अख्खा बीबी होता.
मला व्यक्तीश: मुद्दे पटले. काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात,
कि त्यांच्या नावापुढे पुरस्कार गौण ठरतो, तर काहींना ओळख टिकवण्यासाठी
पुरस्कार लागतात.

दिनेशदा, मला माहिती नव्हते की या विषयावर एक अख्खा बीबी होता.

>>काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात,
कि त्यांच्या नावापुढे पुरस्कार गौण ठरतो, तर काहींना ओळख टिकवण्यासाठी
पुरस्कार लागतात.>>> १००% पटलं.

सध्या नेमकं ज्यांना पुरस्कार लागतात अशाच लोकांची जास्त चलती झाली आहे. शेवटी सूर्याचं तेज लपून रहात नाही हेच खरं.

शांतिसुधा,

आईन्स्टाईनबद्दल एक प्रचंड चूक. कृ.गै.न.

>> ...तरीही त्याला दोन्ही साठी जे नोबेल पारीतोषिकं मिळाली ही खूपच उशीरा मिळाली.

आईन्स्टाईनला सापेक्षतावादाच्या सिद्धांतासाठी नोबेल मिळालं नव्हतं. ते मिळालं ते प्रकाशविद्युत्प्रभावासाठी (फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट). कारण सापेक्षतावादाचे सिद्धांत गणिती पद्धतीचे आहेत. ते प्रायोगिक शोध नाहीत.

सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांतात जी संक्रमके (संक्रमण समीकरणे) आहेत त्याला लॉरेंट्झ ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. ही समीकरणे आईन्स्टाईनच्या बर्‍याच आगोदर हेंड्रिक लॉरेंट्झने मांडली होती. तोही नोबेलने सन्मानित झालेला आहे. मात्र त्यालाही ते समीकरणांसाठी मिळाले नसून झीमन इफेक्टसाठी (झीमनसोबत विभागून) मिळाले आहे.

अर्न्स्ट रूदरफोर्डच्या मते सापेक्षतावादाचे सिद्धांत ही विनोदी प्रकरणे आहेत. त्यांना फारसं गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

आ.न.,
-गा.पै.

भारतरत्नच कां, इतरही बाबतीत तेंच घडतंय; न्हावा-शेवा बंदराला मराठी माणसांच्या मागणीनुसार कन्होजी आंग्रे यांचं नांव देणं औचित्यपूर्ण नसतं झालं ? शेवटीं झालंच ना तें जवाहरलाल नेहरु बंदर. वरळी-वांद्रे समुद्र पूलाला इतके पर्याय सुचवले गेले तरी शेवटी राजीव गांघींचच नांव दिलं गेलं ना ?

गामा पै, चूक दाखवून दिल्याबद्धल धन्यवाद.

भाऊ नमसकर, खरंय. आता भारत या नावा ऐवजी नेहरूस्थान किंवा गांधीस्थान असंच नाव देशाला देणं सोयीचं ठरेल. आपला देश आपल्या महामूर्ख लोकांनीच एखाद्या घराण्याला विकला आहे त्याला काय करायचं? आपलेच दात आणि आपलेच ओठ.

आपल्या महामूर्ख लोकांनीच
>>
म्हणजे कोण ? तुम्ही सोडून बाकीचे का?

लोड घेऊ नका. पुरस्कार असेच वाटायचे असतात. आता बघा पद्मजा फेणाणी ना आणि डॉ. मिश्राना त्यांचेपेक्षा जास्त कर्तृत्व असणार्‍या लोकाऐवजी मिळानी ना पद्मश्री/ ? का बरे?कोणाच्या एक्यावन कविता गायल्याने की कोणाचा व्यक्तिगत फिजिशियन असल्याने?

बाळू जोशी,

आपला देश एका घराण्याला विकला गेला आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. तुम्ही ज्या ५१ कवितांचा उल्लेख करता आहात त्यावरून देश विकला गेल्याचे दिसून येत नाही. आपल्याला कुठेही अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे उड्डाणपूल, झोपडपट्ट्या, इस्पितळं, मोठमोठ्या शहरांतील रस्ते, शहरांतील भाग बनलेले दिसत नाहीत. ह्याच उलट भारतातील प्रत्येक शहरात एम जी रोड (महात्मा गांधी रस्ता), राजीव गांधी नगर, राजीवगांधी उड्डाण पूल, जवाहरलाल नेहरू रस्ता, जवाहरला लाल नेहरू रूग्णालय, गांधी नगर, इंदिरा गांधी झोपडपट्टी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इ. इ. दिसून येतात. इतकंच काय पण काँग्रेसच्या योजनांची नावं सुद्धा इंदिरा आवास योजना, राजीव गांधी खेलकूद वगैरे दिसून येतात. त्यामुळे या देशात दुर्दैवाने फक्त गांधी घराणंच देशप्रेमी आणि बाकी सगळे बिनकामाचे असं चित्रं रंगवलं जाऊन जनतेला लुबाडलं जातंय हे सत्य आहे. यात मतदान करणारे, न-करणारे, इच्छा असूनही मतदानास उपस्थित राहू न शकणारे असे सगळेच जबाबदार आहेत. महामूर्ख ते आहेत की जे फक्त गांधी कुटुंबातील लोकांनाच राज्यकरण्याचा अधिकार आहे असे समजून निमूटपणे त्यांच्या तालावर नाचतात. बाकी सगळे थोड्याफार फरकाने सारखेच.

सचिनचा खेळ हा व्यवसाय आहे. समाजसेवा नव्हे... त्यामुळे खेळाडूना भारतरत्न देऊच नये.. जनता काही मागनी करेल... नियमानुसारच जायला हवे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे उड्डाणपूल, झोपडपट्ट्या, इस्पितळं, मोठमोठ्या शहरांतील रस्ते

अजून अटलजी जिवंत आहेत ! ते वर गेले की त्यांच्याही नावाने काही ना काही होईल... Happy .. पन्नास वर्षे देश काँग्रेसने चालवला.. म्हटल्यावर त्यांच्याच नेत्यांची नावे येणार ना? का विरोधी नेत्यांची नावे द्यायची असतात?

>>सचिनचा खेळ हा व्यवसाय आहे. समाजसेवा नव्हे... त्यामुळे .....>> १००% मान्य

हे सुद्धा विचार करण्यासरखं आहे की आज क्रिकेटमधे जितका पैसा... आहे जर तितका पैसा क्रिकेटमधे नसता तर सचिन तेंडूलकर झाला असता का? म्हणजे त्याच्या आई-वडिलांनी त्याला स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून सुरूवातीलाच प्रशिक्षणास पाठवीले असते का? चाहत्यांचं प्रेम बघून विक्रम करणार्‍यांना अजून स्फूर्ती मिळते. जर क्रिकेट मधे इतका पैसा नसता तर आज क्रिकेट इतका लोकप्रिय खेळ असता का? खाशाबा जाधव काय किंवा ध्यानचंद काय त्यांच्याकाळात कोणत्याच खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी पैसा मिळत नसत. म्हणजे तो व्यवसाय नसे. त्याचप्रमाणे प्रशिक्षणा ऐवजी स्वत:च्या अंगभूत गुणवत्तेवरच सगळं अवलंबून असे. त्यामुळे ध्यानचंद किंवा खाशाबा जाधव यांचे विक्रम हे सचिन तेंडूलकरच्या विक्रमांपेक्षा काकणभर सरसच आहेत आणि त्यांच्यापैकी कुणाला भारतरत्न दिलं तर स्युक्तीकच होईल.

समाजसेवेच्या बाबतीत तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. बाबा आमटे यांच्यासारखे अतिशय खडतर परिस्थीतीत उत्तम कार्य उभे करणारे लोक या भाऊ गर्दीत दुर्लक्षितच राहीलेले आहेत.

<< सचिनचा खेळ हा व्यवसाय आहे. समाजसेवा नव्हे... >> विधानाच्या दुसर्‍या भागाशी कांहिसा सहमत असलो तरी पहिल्या भागाशी नाही सहमत होऊं शकत; खेळासारख्या जीवनाच्या एका अत्यंत महत्वाच्या पैलूलाच बदनाम केल्यासारखं वाटतं त्यामुळे. व्यावसायिक जगाने खेळाचा - त्यांत सचिनचाही खेळ आलाच - व्यवसाय बनवला, म्हणून खेळाना - व सचिनलाही - दोष देण्यात काय अर्थ आहे ? [आणि, व्यक्तीशः माझं मत तर खेळ ही देखील समाजाच्या सर्व थराना निकोप आनंद देणारी समाजसेवाच आहे, असंही आहे ! पण तो एका वेगळ्या चर्चेचाच विषय होईल ].
<< म्हणजे त्याच्या आई-वडिलांनी त्याला स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून सुरूवातीलाच प्रशिक्षणास पाठवीले असते का? >> कित्येक दशकं गल्लीबोळातसुद्धा हजारो मुलं खेळाचा आनंद लूटत असतात तीं काय त्यांत पैसा आहे म्हणून; लाखो क्रिकेट खेळणार्‍यातून एखादाच सचिन होतो हे माहित असूनही मुलं क्रिकेट खेळतात तें काय व्यावसायिक हेतू मनाशी बाळगून ? आणि प्रशिक्षणाची गरज वरच्या दर्जाच्या स्पर्धेत खेळताना लागतेच. कुठल्याही क्षेत्रात. आई-वडील ठरवतातच ना मग त्याकरता आपण मुलाला/मुलीला त्याची/तिची कुवत, ईच्छाशक्ती इ. पाहून किती मदत करावी, करूं शकतो तें. मला नाही वाटत पैशाचा हिशेब मांडूनच असे निर्णय सर्वच पालक घेतात असं.

चिनचा खेळ हा व्यवसाय आहे. समाजसेवा नव्हे... त्यामुळे >>

डॉक्टरी हा व्यवसाय नसून समाजसेवा आहे का?
राजकारण हा तर पैसे कमविन्याच्या मस्त व्यवसाय आहे, हे तुम्हाला मान्य नाही का?
फिल्म मेकिंग / अ‍ॅक्टींग ही समाजसेवा आहे का?
इंडस्ट्री टाकणे म्हणजे व्यवसाय नसून समाजसेवा आहे हे आत्ताच कळाले.
सिंगर असणे हा व्यवसाय नसून समाजसेवा आहे हे पण आत्ताच कळाले.

अजूनही लिहू शकतो, पण मुद्दा कळाला असावा. आय होप.

व्यवसाय असो की नसो, भरीव कामगिरी महत्त्वाची*. ती सचिनने केली नाही असे म्हणने असल्यास माझे काही म्हणने नाही.
* ह्यासाठी दिला देशसाठी चांगली कामगिरी. नाहीतर उदया कोणी दाऊदने भरीव कामगिरी केली नाही का असा बाफ काढून तो प्रश्न विचारेल.

जामोप्या. मान्य की अटलजी वर गेले की त्यांच्या नावानेही काहीतरी होईल. पण सर्वत्र केवळ वाजपाई परिवार असं चित्रं तर नक्कीच नसेल. त्या राजीव गांधी ने काय केलंय हो देशासाठी? आई जिवंत होती तोपर्यंत मजा मारली.....बायको-पोरांना घेऊन इटलीतच रहात होत. आई मेल्यावर लागलीच त्याला (काँग्रेसजनांना राजीव त्यांचा तारणहार वाटला) देश आठवला. अवघ्या नऊ-दहा वर्षांत इतकं कर्तुत्त्व (???) [राममंदिर वाद उगाचच उकरला, शहाबानो प्रकरण, लंकेत पाठवलेली शांतीसेना, बोफोर्स तोफा भ्रष्टाचार.......जोडीला क्वात्रोचीशी सलगी] की लगेच एल टी टी ई ने त्याची हत्याच घडवली. जर कोणी भारतातील संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं श्रेयं राजीव गांधीला देत असेल तर आमान्य कारण तो नसता तरीही संगणकीय तंत्रज्ञान भारतातच काय सर्व जगात पसरणारच होतं.
विरोधी पक्षातील एक तरी महत्त्वाचा नेता दाखवा की जिथे घराणेशाही चालू आहे आणि भारतीय राजकारणात त्या घराण्याशिवाय पर्याय नाहीये? दाखवताच येणार नाही. कारण हे फक्त गाम्धी घराण्याच्या बाबतीतच आहे. हे अगदी मोतीलाल नेहरूंपासून चालू आहे.

>>हे सुद्धा विचार करण्यासरखं आहे की आज क्रिकेटमधे जितका पैसा... आहे जर तितका पैसा क्रिकेटमधे नसता तर सचिन तेंडूलकर झाला असता का? म्हणजे त्याच्या आई-वडिलांनी त्याला स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून सुरूवातीलाच प्रशिक्षणास पाठवीले असते का?<<
अहो क्रिकेटमध्ये आज पैसा आहे.. सचिन च्या आई-वडिलांनी जेव्हा त्याला स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून प्रशिक्षणास पाठवले तेंव्हा नव्हता!!! फारच सरमिसळ करता बुवा तुम्ही मुद्द्यांची Proud

बाकी काही मतं पटली.. तुमचा सुर तेंडूलकर विरोधी नाही हे पण पटले.. आज नियम वाकवल्या नंतर ज्या ध्यानसिंगांना प्रथम पुरस्कार द्यावा अशी शिफारस केली जातेय त्याच ध्यानसिंगांसाठी नियम वाकवावा असं इतक्या वर्षात कोणाला वाटलं नाही ?? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे आणि नियम वाकवणार्‍या राजकारण्यांसाठी (आणि अर्थातच त्यामुळे वादाला तोंड फोडण्यासाठी) साठी सचिनच निमित्त ठरावा हे त्याचे दुर्दैव! Sad

केदार ... दाऊदने भरीव कामगिरी केली नाही का >> हा हा हा .. पण मुद्दा बरोबर आहे तुमचा Happy ... सत्ताधारी काय मनात आले (आणि सत्ता टिकत असेल ) तर हे सुद्धा करतील. :p ...

अभि....,

सचिन तेंडूलकर जेव्हा लहान होता तेव्हा क्रिकेट मधे सुनिल गावसकर वगैरे मंडळी बक्कळ पैसा कमवत होती....त्यामुळे त्या खेळाला भविष्यच नाही, त्या खेळातील खेळाडू हे नोकरी आणि पैसा दोन्हीही नाही म्हणून सराव करू शकत नाहीत, रहायला घर नाही, झोपडपट्टीत रहात आहेत......अशी तर स्थिती नक्कीच नव्हती.. सचिन तेंडूलकरचे गुरू (प्रशिक्षक) आणि सुनिल गावस्करचे प्रशिक्षक एकच (रमाकांत आचरेकर) हा सुद्धा फारच योगायोग नव्हे. त्यामुळे त्याकाळी अत्ता इतका पैशाचा धबधबा नसेल पण पैसा नव्हता हे म्हणता येणार नाही.

>>त्याच ध्यानसिंगांसाठी नियम वाकवावा असं इतक्या वर्षात कोणाला वाटलं नाही ?? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे>> आजीबात अनुत्तरीत नाहीये. हा वाद सचिन तेंडूलकर विरूद्ध ध्यानचंद हा नसून क्रिकेट विरूद्ध इतर खेळ असा आहे. आज क्रिकेट मधे इतका पैसा नसता तर क्रिकेटला इतकं अवाजवी महत्त्व प्राप्त झालं नसतं. हे आहे म्हणूनच आज लोक सचिन तेंडूलकर ला भारतरत्न मिळावे यासाठी नियम बदलवण्यासाठी दबाव आणतात. त्यांना केवळ ध्यानचंदच नाही तर खाशाबा जाधव सारख्या इतर खेळाडूंसाठीही काही वाटलं नाही याचं कारण फक्त इतर खेळांना मिळणारी वागणूक. दुर्दैवाने जिथे पैसा तिथे जनमानस असंच सध्याचं समिकरण झालेलं आहे.

१९८३ च्या वर्ल्ड कप नंतरच तसेच ८०च्या दशकातील दूरदर्शन क्रांतीने क्रिकेटला गल्लीबोळांत पोहोचवलं. तोपर्यंत क्रिकेट हा काही जनसामान्यांचा खेळ नव्हता. क्षणभर गृहीत धरलं की सगळेच आई-वडिल पैशाचा विचार करत नाहीत पण आपल्या मुलात असलेल्या टॅलंटला वाव देण्यासाठी ज्या खेळाला आजीबात भविष्य नाही असा खेळही निवडू देणार नाहीत. आणि कोणत्याही खेळाला केवळ टॅलंटचीच आवश्यकता असते असं नाही. त्याबरोबरच प्रशिक्षणाची आ॑वश्यकता असते. प्रशिक्षणासाठी पैसा. सचिन तेंडूलकर्मधे मूलभूत टॅलंट आहे तरी ते टॅलंट व्यवस्थीत बाहेर आणून त्याला आकार देणं हे प्रशिक्षणानेच घडलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यात पैशाचा रोल हा महत्त्वाचा आहेच. आणि पैशा अभावी असे अनेक तेंडूलकर (इतर खेळांतील सुद्धा) पुढे येऊ शकत नाहीत. भारतीय नेमबाज स्पर्धेतील पालक ओरडून सांगत असतात की आमच्या मुलांकडे टॅलंट आहे पण सरावासाठी गोळ्या उपल्ब्ध करून दिल्या जात नाहीत. विविध आंतर्राष्ट्रीय स्पर्धांच्या पार्टीसीपेशनचा खर्च आम्हाला स्वतःच्या पदरातून करावा लागतो. निदान सरावासाठी लागणारं साहित्य तरी शासनाने पुरवावं.

सगळे मुद्दे वाचले...........
शांती सुधा मला सांगा....आपल्यामते..१९४७ पासुन आज पर्यंत अशी कोण कोण व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळायला हवा आणि का...? या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या.........जास्त काही नको.... Happy

राजीव गांधीं भारतरत्न पुरस्काराला योग्य होते की नाही यावर वाद होऊ शकतो पण येथे "त्यांच्या कारकीर्दीत जे चांगले बदल झाले ते ते नसते तरी झाले असते, आणि ज्या चुका झाल्या त्या त्यांच्याच होत्या" असा सूर आहे तो अनुदार वाटत नाही का?
पंतप्रधान म्हणून त्यांच्या काळात झालेल्या चुकांचा दोष त्यांचा असेल तर त्या काळात जे चांगले बदल झाले त्याचे श्रेयही त्यांना द्यायला हवे.
शाहबानो प्रकरण वगैरे नक्कीच चूक होते पण शांतिसेना पाठवणे मला तरी चूक वाटत नाही (निदान तो निर्णय). त्यावेळेस भारताची अवस्था धरलं तर चावतंय सारखी झाली होती. कोणताही पक्ष व पंतप्रधान असते तरी असेच काहीतरी करावे लागले असते. नाहीतर तेथे आज एखाद्या दुसर्‍या राष्ट्राचा कायमस्वरूपी तळ दिसला असता.

udayone, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. कारण आपल्याकडे भारतरत्न पुरस्काराचे निकष उपल्ब्धच नाहीयेत. किंबहुना ते क्लीअर नाहीयेत. त्यामुळे हे असले पुरस्कार देऊच नयेत हा पहिला मुद्दा. जर द्यायचेच असतील तर मरणोत्तर द्यावेत आणि निवडीचे निकष पारदर्शक असावेत.

मला गंमत वाटतेय की सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भात कोणीच काहीही बोलायला तयार नाही. गांधी घराण्याचा विषय न संपणारा आहे. अगदी त्या इडियट राहूल गांधी ची वर्णी सुद्धा त्याच्या आई-बहिण आणि मेव्हण्याच्या नावासकट भारतरत्न मधे लागली तरी आपण हाच वाद घालत बसू.

तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. कारण आपल्याकडे भारतरत्न पुरस्काराचे निकष उपल्ब्धच नाहीयेत. किंबहुना ते क्लीअर नाहीयेत.>>>>>>>>>>>>>>>>>
जर क्लिअर नाही आहेत तर ज्यांना ज्यांना भेटले आहेत त्यावर टिका करायचा अधिकार नाही आहे.......

>>>जर क्लिअर नाही आहेत तर ज्यांना ज्यांना भेटले आहेत त्यावर टिका करायचा अधिकार नाही आहे.....>> असहमत!! ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यांच्या कारकिर्दीबाबत जर भ्र्ष्टाचार आणि अयोग्य वर्तन त्याच प्रमाणे नक्की समाजासाठी किंवा देशासाठी काय केलंय असे प्रश्न उपस्थित होत असतील तर नक्कीच टीका करण्याचा अधिकार आहे.

म्हनुन तुम्हाला विचारले की आपल्या मते कोन असावीत...त्याचे ही उत्तर येत नाही ??
मग नुसती टिका करणे जमते ?

मला गंमत वाटतेय की सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भात कोणीच काहीही बोलायला तयार नाही.
---- मला वाटते येथे कायदेशिर तांत्रिक मुद्दा उपस्थित होतो आहे म्हणुन पुरस्कार मागे घेतला गेला.

१९५६ मधे पडद्याआड गेलेल्या आंबेडकरांना रत्न पुरस्कार मिळायला १९९० सालची वाट बघावी लागते किंवा अब्दुल कलम आझाद यांना ते गेल्यानंतर तब्बल ३५ वर्षानी म्हणजे १९९२ मधे पुरस्कार मिळाला. आंबेडकर, पटेल, आझाद, बोस यांना रत्न पुरस्कार ते गेल्यानंतर ३५ वर्षांच्या कालाने जाहिर झाले होते. या सर्वांचा अधिकार थोर आहे आणि ते त्या योग्यतेचे आहेत याबद्दल वाद नाही. बोस वगळता तो सर्वांना मिळाला मग १९४८ मधे हत्या करुन मारलेल्या महत्मा गांधी यांना १९९२ पर्यंत (किंवा आजतागायत) हा पुरस्कार का दिला गेला नाही?

राजिव गांधी यांच्या नेतृत्व काळात १९८४ मधे शिखांचे दिल्ली मधिल हत्याकांड (किमान ३००० शिखांची हत्या) करणार्‍यांना सातत्याने मंत्रिपदे किंवा खासदार पदे मिळालेली होती. त्यांच्याच आदेशानुसार अर्जुनसिंग यांनी अँडरसनला सरकारी विमान (भोपाळ - दिल्ली) पुरवले होते. त्यांच्याच खात्याने अँडरसन भारतातुन सही सलामत बाहेर पडेल असे अमेरिकेला आश्वासन दिले होते. भारत दौर्‍यात, दुसर्‍या दिवशी (दिल्ली मधे) अँडरसन भारताच्या राष्ट्रपतींसोबत न्हाहारी करतो आणि नंतर २५ वर्षे बेपत्ता असतो (दाउद बेपत्ता आहे ह्याचे काहीच आश्वर्य नको वाटायला). कुणालाच त्याचा ठाव ठिकाणा माहित नसतो. भोपाळ दुर्घटना दु:ख दायक आहे पण ते हाताळणे आणि त्याचा अंतिम निकाल संतापजनक आहे. बोफोर्स प्रकरण राहू देत, पण या दोन काळ्या घटनांत हात असतांना व्यक्ती भारताची रत्न कशी ठरते? राजिव गांधी यांना पुरस्कार मिळतो तर नरसिंह राव यांना का वगळले? एम जि आर आणि राजिव गांधी यांना पुरस्कारांचे वाटप झाले तेव्हाच त्याचे महत्व कमी झाले होते.

Pages