अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग २

Submitted by मी मुक्ता.. on 20 December, 2011 - 23:35

http://www.maayboli.com/node/31346
अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग १
------------------------------------------------------------------------------------
सकाळी ऑफिसला पोहचली तेव्हा शाल्मली फोनवरच होती नेहमीप्रमाणे. होणार्‍या नवर्‍याचा फोन. नाजूक आवाजात खुसूखुसू चाललेलं. तसं ते दिवसभरच चालू असतं म्हणा हल्ली.. "झालंय काय या बयेला? डोकं-बिकं गहाण टाकलं की काय हिने?" शाल्मली आणि द्रौपदी गेली ४-५ वर्षे सोबत होत्या. द्रौपदीला त्यांच्या टीममधली ती एकच पोरगी जरा सेंसिबल वाटायची. शाल्मली होतीही तशीच. दिसायला स्मार्ट.. हुशार, कष्टाळू.. उत्तम नृत्य करायची.. तिला स्वतःचा बिझनेस सुरु करायचा होता किंवा डान्स क्लास.. मुख्य म्हणजे तिला तिचे विचार होते. कंपनीत नविन जॉईन झाल्या तेव्हापासून त्यांचं चांगलच जमलं होतं. बराच वेळ गप्पा, चर्चा चालायच्या त्यांच्या. किंबहुना द्रौपदीच्या घटस्फोटानंतरच्या काळात "फार काही वेगळं झालं" अस न जाणवणारी शाल्मलीची एक नजर होती. पहिल्यासारखं सामावून घेणारी. नाहीतर प्रत्येक नजरेत प्रश्न.. आणि एक उपहास पण. हिचा स्वभाव आधीच रोखठोक. त्यामुळे हे व्हायचंच होतं अशा किंवा लव्ह मॅरेज होतं ना, तरी का? असल्या प्रश्नार्थक नजराच वाट्याला आल्या तिच्या. असो.. तर शाल्मली.. अनेक प्रोजेक्ट्स वर काम करताना त्यांनी रात्री जागवल्या होत्या. अनेक इव्हेंटस मध्ये शाल्मलीची हुशारी, समजूतदारपणा दिसला होता. अर्थातच अशा मुलीवर मुलं फिदा न होतील तरच नवल. एका मित्राला तिने हो म्हटलं. त्याच्या घरुन नकार होता. तोच सर्वसामान्य प्रॉब्लेम. इंटरकास्ट. हिच्या घरी कशाचीच कल्पना नव्हती पण ते विरोध करणार नाहीत याची खात्री होती हिला. त्यामुळे आधी तुझ्या घरुन परवानगी मिळव असं सांगितलेलं. पण त्याच्या घरचे ऐकेचनात तेव्हा एकमताने वेगळे झाले दोघे. "चला! ठिकच झालं. फार काही गुंतवणूक नव्हती तर प्रॅक्टिकल निर्णय घेणंच योग्य आहे." द्रौपदी म्हणालेली. कारण शाल्मलीच्या घरुनही वरसंशोधन चालूच होतं. पण आता जे काही चाललेलं तो म्हणजे पूर्णपणे धक्काच होता द्रौपदीसाठी. कालपर्यंत स्त्रियांच्या प्रश्नांवर हिरीरीने मतं मांडणारी, त्यांच्या स्वातंत्र्यावर बोलणारी शाल्मली लग्न ठरल्यावर इतकी बदलली..? तिचं डोकं वाजू लागलं..
"समर्पण हा स्त्रियांचा स्वभावच असतो. आणि आक्रमण पुरुषांचा.."
"आवरा...! असं काही नसतं. समर्पण आणि आक्रमण या भावना दोघांच्यातही असतात आणि सारख्याच असतात. फक्त त्याचं स्वरुप स्थळकाळानुसार बदलतं. तीव्रता कमी जास्त होते. पण भावना तिच. प्रत्येकालाच तीव्र समर्पणाची ओढ असते तशी आक्रमणाची पण. काहीतरी जिंकून घ्यावं आणि कुठेतरी हरुन जावं या भावना बेसिकच आहेत. गंमत म्हणजे या हरण्यामागेही जिंकण्याचा गनिमी कावा असतोच.."
"बरं मग तुला काय म्हणायचं आहे? कदाचित ही तिची जागा असेल समर्पणाची."
"कसं शक्य आहे? फक्त लग्न ठरलं म्हणून आपण कोणाशी नातं कसं निर्माण करु शकतो. कशी काळजी वाटून घेवु शकतो? कसं गोड बोलू शकतो? एखाद्याला न ओळखताच त्याच्यावर प्रेम कसं करणं शक्य आहे?"
"तू केलेलंस ना ओळखून प्रेम. काय झाल?"
"...."
"प्रेम आणि संसार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संसार करताना थोडं सांभाळून घ्यावच लागतं."
"अर्रे पण सांभाळून वगैरे घ्यायचा प्रश्न आलाच कुठे? साधी गोष्ट आहे. ज्याचा मुद्दा बरोबर असेल तो मान्य व्हायला हवा. त्यासाठी तो दोन्ही बाजूंनी नीट लॉजिकली मांडला जायला हवा. काही युक्त्या-प्रयुक्त्या वापरुन आपला मुद्दा मान्य करवुन घेणं यात स्वतःच्या स्वत्वाची हार नाही वाटत का माणसाला? आपण कोणालातरी आपल्या मताप्रमाणे चालायला लावतो हा अहं म्हणजे त्या नात्याची हार नाही का त्या? आणि ज्या नात्यांतला अहं नात्यांपेक्षा महत्वाचा असतो ती नाती बेगडी असतात."
"इतका आदर्शवाद फक्त कल्पनेत असतो. माणसाचा मूळ अहम् च काहीतरी जिंकून घेण्यात दडलेला आहे. तुला स्वतःला जिंकण्यात समाधान आहे. तिला दुसर्‍याला. पण मूळ भावना तिच. माणून बुद्धीमान आहे ना, मग तो बुद्धी वापरुन जिंकायला बघतो. आणि हा प्रकार जीवसाखळी टिकण्याच्या खेळाचा भाग आहे."
"श्शी.. नको असली नाती.."
"खरंच नको?"
"मी नाती नको म्हटलं नाहीये. असली नको म्हटलय."
"हे सगळ्याच नात्यांत होतं. तुझा तूच विचार कर. ज्याला तू सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल नातं वगैरे म्हणतेस त्यात हे नाही होत? इथे बोलणं वापरुन जिंकता, तिथे विचार वापरुन. काय फरक झाला? हे म्हणजे एखाद्या नोकरदाराने वारांगनेला नावं ठेवण्यासारखं झालं? पण दोघांच्यात फरक काय? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धी विकतो, त्या शरीर विकतात असं उत्तर देण्यातला प्रकार.."
"..."
"कामाला लागा.."
"हं..."
काही दिवसांनी शाल्मलीचं लग्न झालं. अर्थात अतिशय धुमधडाक्यातच. द्रौपदीने तिचा विषय काढूनच टाकला डोक्यातून. शाल्मलीने कंपनीपण सोडली आणि अगदी स्वखुशीने मोठ्या पगारच्या नवर्‍याच्या घरची हाऊसमेकर झाली.
क्रमशः
----------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/31384
अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - अंतिम

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एखाद्या नोकरदाराने वारांगनेला नावं ठेवण्यासारखं झालं? पण दोघांच्यात फरक काय? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धी विकतो, त्या शरीर विकतात

हम्म...! या भागात मुक्ताशैलीला आवर घातलात की कै?

पहीला पॅरा निबंधासारखा दिसतोय. जरा सुटसुटीत कराल तर वाचायला बरं पडतं. आणि मोठा भाग टाका पुढल्यावेळी.

@mit,
लक्षात ठेविन.. Happy
फार पाल्हाळ लावायला नको म्हणून आवरता घेतलाय पॅरा. मिंया मुठभर दाढी हातभर कशाला? Wink

मी मुक्ता.. | 20 December, 2011 - 22:25 नवीन
वपु पहिल्यांदा चांगले वाटलेले मग बोर झाले.. म्हणून म्हटलं..

>>> १००%
अजिबात वपुंसारखे लेखन नाहीये.

<<<मिंया मुठभर दाढी हातभर
हे आवडलं. बाकी गोष्ट छान सांगतेस. मोठे भाग टाक म्हणजे उगाच १० भागाची कथा ३० भाग लांबत जायला नको. Wink

निलिमा..
Happy

शिल्पा बडवे,
Lol
हो.. १० चे ३० नाही करायचेय मलाही. पण एक पार्ट नीट संपतो तिथे ब्रेक करावा असा विचार केला. म्हणून ते जरा लहान वाटतायेत.. Happy दुसरा भाग अर्धा लिहून ब्रेक केला तर वाचकांची पण लिंक लागणार नाही असं वाटलं..