ओलीताचं अंकुर कोरडवाहूत फुलेल का?

Submitted by आशिष वाटसरू on 18 December, 2011 - 11:16

ओलीताचं अंकुर कोरडवाहूत फुलेल का,
जाशील जरी कुठे,
तुझ्यात तुझं काही उरेल का.
भास जरी जगण्याचा कुशीत नवऱ्याच्या तुझ्या,
कर सारे प्रयत्न,
पण तुझ्यातला मी कधी मरेल का.

थंडीचे ते दिवस तुला नक्कीच ताप आणतील,
वाचव तू स्वतःला,
आठवणींचे वार तुझा नक्कीच घात करतील
खुशाल टाक पाऊल तुझ्या नव्या संसारात,
पण सांभाळून जरा,
पैंजणाचे आवाज माझं गाणं गातील.

गंध मोगऱ्याचा माझ्या आलिंगनात,
दरवळेल तोच सुगंध,
त्यानी आणलेल्या गजऱ्यात.
गुलाबाचा हट्ट कर मोगऱ्याला म्हण नाही,
पण लक्षात असू दे,
टवटवीत गुलाबाचा गंध कधीच दाटत नाही.

भातुकलीच्या खेळात तुझ्या मीच खरा राजा,
मात्र तुझ्या खऱ्या संसारात,
फक्त भातुकलीचेच राणी राजा.
दुसऱ्या कुणासाठी आरश्यात सजणं जमेल का,
जमला जरी शृंगार,
माझ्या हातांच्या कंबरपट्ट्याविना रूप तुझं खुलेल का.

ओलीताचं अंकुर कोरडवाहूत फुलेल का,
जाशील जरी कुठे,
तुझ्यात तुझं काही उरेल का.

गुलमोहर: