खोया खोया चांद

Submitted by स्वप्ना_राज on 13 December, 2011 - 23:12

जिंदगीमे कुछ लम्हे खास बन गये
मिले तो मुलाकात, बिछडे तो याद बन गये
और जो दिलसे कभी ना गये
...................वो आप बन गये

त्याची माझी पहिली ओळख झाली ती माझ्या लहानपणी, माझ्या आजोळच्या घरी - त्याची एक मजेशीर आठवण आहे. झालं असं की रात्रीच्या जेवणानंतर आम्ही सगळे गप्पा मारत दिवाणखान्यात बसलो होतो. एका विशिष्ट ऋतूत दिसणारे काही किडे भिंतीवर चालत होते, दिव्यावर झेपावत होते. 'ए आई, हे किडे बघ कसे तिरपे तिरपे चाललेत' मी नवलाने म्हटलं. आजोबांनी एकदा त्या किड्यांकडे पाहून घेतलं आणि मग आजीकडे पाहून मिस्किलपणे म्हणाले 'अगदी देव आनंदसारखे चाललेत नाही?" झालं. विधानसभेत होणार नाही एव्हढा प्रचंड गदारोळ दिवाणखान्यात झाला. आजी, आई, मावश्या सगळेच देवचे जबरदस्त पंखे. 'अग, जोक केला' असं म्हणून आजोबांनी सपशेल शरणागती लिहून दिली नसती तर त्यांना पुढला आठवडाभर तरी जेवण मिळणं कठीण झालं असतं. मी मात्र विचार करत होते 'कोण बरं हा देव आनंद?" काही दिवसांनी टीव्हीवर एक गाणं लागलं. "मोठा कर, मोठा कर व्हॉल्युम' आई-बाबा जवळजवळ एकदमच ओरडले. मी धावत जाऊन व्हॉल्युम मोठा केला. 'ओहो, हा का देव आनंद?" मी तिरप्या तिरप्या धावत चाललेल्या त्या नायकाकडे पाहून आईला विचारलं. 'हो' तिने डोळे वटारत म्हटलं. केसांचा फुगा काढलेल्या, मान तिरपी करत, दातातली फट दाखवत निर्व्याज खटयाळ हसणार्‍या त्या हिरोला पहाताना मी गाण्यात वहिदा रेहमानही आहे हेच विसरले आणि त्या दिवसापासून देवच्या चाहत्यात आणखी एका पंख्याची भर पडली. ओळखलं असेल ना तुम्ही ते गाणं? अगदी बरोब्बर! 'काला बझार' मधलं 'खोया खोया चांद".

"युध्दस्य कथा रम्या:' असं म्हटलं जातं. चित्रपटाच्या निर्मितीच्या कथाही अशाच सुरस असतात. नेपाळचे राजे बिरेंद्र ह्यांच्या लग्नासाठी देव नेपाळला गेला होता. तिथे काही हिप्पी लोकांच्या जमावात त्याने एक भारतीय मुलगी पाहिली - जसबीर तिचं नाव. तिला तिथे पाहून देवला आश्चर्य वाटलं. थोडी चौकशी केली तेव्हा तिच्याशी बोलता येऊ शकेल असं त्याला सांगण्यात आलं. देव त्याप्रमाणे तिला भेटला, तिची कहाणी त्याने ऐकली. आणि त्यातून 'हरे रामा हरे कृष्णा' चं कथाबीज त्याच्या डोक्यात फुललं. त्याचा पहिला ड्राफ्ट पोखराला बसून त्याने ३ दिवसात तयार केला. जेव्हा तो राजे बिरेंद्रचा निरोप घ्यायला गेला तेव्हा त्यांनी 'काही मदत हवी असल्यास सांग' असं म्हणताच देवने 'एक चित्रपट बनवायचा आहे. आणि शुटिंगसाठी परवानगी हवी आहे" असं सांगितलं.

220px-Hare_Rama_Hare_Krishna_.jpg

पिक्चरचं शुटींग संपलं पण झीनत अमानला हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आपल्या भवितव्याबद्दल खात्री वाटत नव्हती. मायलेकी झीनतच्या सावत्र वडिलांकडे फ्रांसला कायमच्या जायच्या तयारीत होत्या. अर्धं सामान बोटीने पाठवलेलं आणि अर्ध बांधून तयार अश्यातली गत. देवला जेव्हा जे कळलं तेव्हा त्याने त्यांना चित्रपट प्रदर्शित होईतो थांबायचा सल्ला दिला. पुढला इतिहास सर्वांना माहीत आहे. काही काही गाणी अशी असतात की त्यातली एखादी ओळ ऐकली की घश्यात दाटून येतं, एक अनामिक हुरहूर लागते, आत्ताआत्तापर्यंत स्वच्छ दिसत असलेलं नजरेसमोरचं अचानक धूसर दिसायला लागतं - 'हरे रामा हरे कृष्णा' मधल्या एका गाण्यात एक अशीच ओळ आहे "देखो हम तुम दोनो है एक डालीके फूल, मै ना भुला तू मुझको कैसे गयी भूल'. तिची काहीही चूक नसताना आयुष्यात चुकीच्या मार्गाला लागलेल्या आपल्या धाकट्या बहिणीला परत आणण्यासाठी एका भावाने घातलेली आर्त साद ऐकणार्‍याच्या जीवाचं पाणीपाणी करून जाते. जेव्हा जेव्हा मी "फुलोंका तारोंका सबका कहना है" ऐकते तेव्हा तेव्हा देवला भेटलेली खरी जसबीर परत आपल्या घरी, आपल्या माणसात सुखरूप परत गेली असेल का हा प्रश्न मनात पिंगा घालत राहतो.

एक दिवस एक मुलगी देवकडे त्याचं एक पेन्सिलने काढलेलं स्केच घेऊन आली. ते लॅमिनेट केलेलं होतं. तिने देवला सांगितलं की ते तिच्या आजोबांनी बनवलं होतं आणि ते कोणालाही त्याला हात लावू देत नसत. त्यांनी सांगून ठेवलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर २४ तासात ते देवकडे दिलं जावं. आजोबांच्या इच्छेनुसार ते गेल्यावर नात ते स्केच देवकडे त्याला द्यायला आली होती.

देवची स्मरणशक्ती तल्लख होती. त्याने ते स्केच पाहिलं आणि त्याला ते आधी कुठे पाहिलं होतं हे आठवलं. ५० च्या दशकात जेव्हा तो हिंदी चित्रपटसृष्टीत धडपड करत होता तेव्हा एकदा मरिन लाईन्सच्या कट्टयावर बसला होता. एक माणूस तिथे आला, त्याच्या हातात पेपर आणि पेन्सिल होती. त्याने देवला तुझं स्केच करू का म्हणून विचारलं. देव म्हणाला मी कोणी हिरो वगैरे नाहीये बाबा. त्यावर तो माणूस म्हणाला की तो हिरोच आहे. शेवटी देव स्केचसाठी तयार झाला. ते पुरं झाल्यावर तो माणूस ते देवला द्यायला लागला पण देव म्हणाला 'मी हे घेऊन काय करू? तुझ्याकडेच राहू देत.'. तेव्हा तो माणूस ते घेऊन निघून गेला. पण ह्या जगातून जायच्या आधी ते जीवापाड जपलेलं ते स्केच देवच्या हवाली करायला मात्र तो विसरला नाही. हे असे चाहते मिळाले हे देवचं भाग्य का त्या चाहत्यांना भरभरून प्रेम करायला देव मिळाला हे त्यांचं भाग्य? एरव्ही लोकांची ताटातूट करण्यातच समाधान मानणार्‍या नियतीलाही ही भेट घडवून आणताना आतून खूप छान वाटलं असेल कारण नियतीच्या स्वत:च्या नशीबात हे असे क्षण दुर्मिळच असतील. म्हणूनच 'एक बुत बनाउगा तेरा और पूजा करुंगा' अस साधनाला बजावून सांगणारा देव पाहिला की मला हे गाणं देवच्या चाहत्यांसाठीच लिहिलं गेल्याचा भास होतो.

अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोमे मिले
जिस तऱ्ह सूखे हुये फूल किताबोमें मिले

गोष्ट १९५० सालची - अफसर बनत होता तेव्हाची. 'विद्या'च्या सेटवर भेटलेले सुरैय्या आणि देव एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण तिच्या आजीला मात्र हे फुलणारं नातं साफ नामंजूर होतं. पिक्चरमधल्या एका गाण्यासाठी देव सुरैय्याच्या डोळ्यांचं चुंबन घेतो असा शॉट द्यायचा होता. पण तिची आजी सेटवरून हटेना. जिथं शूटींग व्हायचं होतं तिथंच ठाण मांडून राहिली. शेवटी टीममधल्या एकाला काही कारण काढून तिला सेटवरून बाजूला नेण्यात यश मिळालं आणि घाईगडबडीत शॉट पुरा करण्यात आला. नियतीचं अस असतं ना की एखादी गोष्ट तिला पसंत नसेल तर आपण आकाशपाताळ एक केलं तरी ती गोष्ट ती होउ देत नाही. सुरैय्या आणि देवच्या नात्याचं तेच झालं. 'जीत' च्या सेटवर देवने लग्नाची मागणी घालताना तिला दिलेली हिर्‍याची अंगठी तिच्या आजीने समुद्रात फेकून दिली म्हणतात. तिच्या आईचा आणि मामाचा विरोध नसतानाही केवळ आजीच्या दुराग्रहापायी हे नातं कायमचं तुटलं. देवने पुढे कल्पना कार्तीकशी लग्न केलं पण सुरैय्या आयुष्यभर अविवाहित राहिली. आणि दैवाचा खेळ बघा. ती त्याच्या आयुष्यातून दूर झाली आणि त्याला यश मिळायला लागलं म्हणतात. जणू नशीब एका हाताने काढून घेतलेलं दुसर्‍या हाताने देऊ पहात होतं. आज युट्यूबवर 'विद्या' मधलं त्या दोघांचं 'लायी खुशीकी दुनिया' पहाताना माझ्या डोळ्यांसमोर ती समुद्रात फेकून दिलेली अंगठीच आहे. ती सुरैय्याच्या बोटात राहिली असती तर?

जुळत आलेली नाती निर्दयपणे तोडणार्‍या नियतीवर धड रागावताही येत नाही कारण कधीकधी हीच नियती दोन अश्या लोकांची भेट घडवून आणते जे नियती नसती तर कदाचित भेटलेही नसते. एकदा देवची भेट स्टुडिओत अशाच एका माणसाशी झाली. दोघं बोलत असताना तो माणूस सारखा देवच्या शर्टाकडे टक लावून पहात होता. देवने न रहावून त्याला कारण विचारलं तेव्हा त्याने खुलासा केला. देवने जो शर्ट घातला होता तो त्या माणसाचा होता. धोब्याने कपडयांची अदलाबदल केली होती. दोघेही हसत सुटले. तसे ते दोघेही तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत धडपड करत होते. एकाला ब्रेक मिळाला की त्याने दुसर्‍याला संधी द्यायची हे त्यांनी पक्कं केलं. नियतीने संधी देवला दिली. त्याने एक चित्रपट बनवायचं ठरवलं तेव्हा आपल्या ह्या मित्राला संधी दिली. तो मित्र होता गुरुदत्त आणि चित्रपट होता 'बाझी'. आज बाझीतलं 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले' ऐकते तेव्हा वाटतं स्वत:वर विश्वास ठेवून देव आणि गुरुदत्त हा डाव खेळलेच नसते तर?

तुम्हाला माहित आहे देव प्रथम मुंबईत आला तेव्हा मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्ये सेन्सॉर क्लार्क म्हणून काम करत होता? दुसर्‍या महायुध्दात रणांगणावर असलेल्या सैनिकांनी पाठवलेली पत्रं सेन्सॉर करायचं काम त्याच्याकडे होतं. हे काम आवडत नसलं तरी पोटासाठी करणं त्याला भाग होतं. दर संध्याकाळी ५:३०-६.०० च्या सुमारास देव बसमधून पाली हिल बस स्टॉपवर उतरला की त्याला तिथे त्याची वाट पहात असलेला गोल्डी दिसायचा. जवळच असलेल्या इराण्याच्या हॉटेलात मग ते दोघे एक ग्लुको बिस्कीटाचा पुडा आणि पोलसन बटरचं पॅकेट घ्यायचे. आपली अंगकाठी मजबूत व्हावी म्हणून देव २ ग्लुको बिस्कीटाच्या मध्ये बटर लावून सॅन्डविच बनवून खात असे. अनिता पाध्येच्या 'एक होता गोल्डी' मध्ये जेव्हा हे वाचलं तेव्हा किती प्रयत्न केला तरी ऑफिसमध्ये बसून ९ ते ५ काम करणारा, कोणाही सर्वसामान्य नोकरदारासारखा संध्याकाळी काम संपल्यावर बसमधून उतरून घरी येणारा देव डोळ्यासमोर येईचना. त्याने आपलं हिरॉईनच्या पुढे मागे नाचावं, गावं, तिची थट्टामस्करी करावी, होय ना? पण मग पुढे सिनेमातल्या एका गाण्यात चणेफुटाणे खात संध्याकाळी रस्त्याने चालणारा देव पाहिला आणि वाटलं की हे शुटींग करताना अनेक वर्षांपूर्वीचं आपलं आयुष्य त्याला आठवलं असेल का? तुम्हाला आठवलं ना हे गाणं - 'असली नकली 'मधलं 'तेरा मेरा प्यार अमर'.

देवचा एक चित्रपट बनवून तयार होता. दिल्लीच्या त्याच्या एका वितरकाने तो पहाण्याची मागणी केली. यश जोहर तेव्हा नवकेतनचे प्रॉडक्शन कंट्रोलर होते. त्यांनी गोल्डीला त्याला २ गाणी दाखवू द्यायची परवानगी मागितली. देवला न सांगता त्याला ती दाखवली गेली. ती गाणी बघून तो वितरक चकित झाला कारण अशी गाणी चित्रित झालेली त्याने कधीच पाहिली नव्हती. त्याने लगेच तो चित्रपट वितरणासाठी घेण्याचं मान्य केलं. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा गोल्डी आणि देवला कोणी फोन केला नाही. ते दोघे बिचारे आपापसात चर्चा करत चित्रपट लोकाना आवडला असेल की नाही ह्याचे आडाखे बांधत बसले होते. दिल्लीच्या प्रिमिअरला अख्खं मंत्रिमंडळ हजर होतं. मग हळुहळु बातम्या यायला लागल्या. चित्रपट लोकांना आवडू लागला होता. ते दिवस पावसाचे होते पण का कोणास ठाउक पावसाला अजून सुरुवात झाली नव्हती. चित्रपट प्रदर्शित होऊन १० आठवडे झाल्यावर देवने स्क्रीनमध्ये एक मोठी जाहिरात दिली - गाईड प्रेज फॉर रेन. आणि लवकरच पाउस कोसळू लागला. कदाचित तो आकाशीच्या देवाने पृथ्वीवरच्या देवला दिलेला शुभसंकेतच असावा. तुम्ही ओळखलंच असेल की हा चित्रपट होता गाईड. आता सांगा पाहू त्या वितरकाला दाखवलेली गाणी कोणती असतील? एक होतं 'पिया तोसे नैना लागे रे' आणि दुसरं 'गाता रहे मेरा दिल'.

220px-Guide_1965_film_poster.jpg

पण ह्या दोन्हीपेक्षाही माझं ह्या चित्रपटातलं सर्वात आवडतं गाणं आहे - आज फिर जीनेकी तमन्ना है. माणसाला कसला शाप आहे कोणास ठाऊक पण श्वास चालेतो त्या श्वासांचं, आयुष्याचं, सुखाचं आणि दु:खाचं सुध्दा काही मोलच वाटत नाही. आपण एक तर आपल्या सुखात मश्गुल होऊन ते सुख कायम राहिलच असं गृहित धरत राहतो नाहीतर अडचणींचे, त्रासाचे डोंगर उभे राहिले की त्याखाली दबून जाऊन जगायचं विसरून जातो. "सांगा कसं जगायचं?" ह्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आधी 'जगायचं आहे' हे तरी निश्चित करायला हवं ना? म्हणूनच ह्या गाण्यातली जुनं आयुष्य फेकून देऊन नव्याला सुरुवात करणारी, भरभरून जगायचा निश्चय करणारी नायिका मला जवळची वाटते. आणि का कोणास ठाऊक पण तिच्या आनंदाचं, उत्साहाचं, चैतन्याचं कारण असलेला माझा लाडका देव शेजारीच असूनही मला ह्या गाण्यात कधी दिसतच नाही. Sad

'नौ दो ग्यारह' ह्या चित्रपटाच्या जन्माची कहाणीही अशीच मजेदार आहे. देव, गोल्डी, कल्पना कार्तिक आणि नवकेतनचे कॅमेरामन वीरेंद्र रात्रा गाडीने महाबळेश्वरला चालले होते. गोल्डी देव आणि कल्पना कार्तिकच्या मध्ये बसला होता. गोल्डीने 'नौ दो ग्यारह' चं स्क्रिप्ट शर्टाच्या खिशात दडवलं होतं. देवने त्याला अचानक म्हटलं 'तू स्क्रिप्ट लिहिलं आहेस म्हणे. ऐकव बरं आम्हाला.". गोल्डीने पडत्या फळाची आज्ञा घेऊन ऐकवलं. देव काहीच बोलला नाही. पण महाबळेश्वरला पोचल्यावर त्याने हॉटेलमधून नवकेतनच्या प्रॉडक्शन मॅनेजरला फोन केला आणि १० दिवसांसाठी कारदार स्टुडीओ बुक करायला सांगितलं. 'नौ दो ग्यारह' मधलं 'हम है राही प्यारके' जेव्हा जेव्हा बघते तेव्हा ट्रक चालवणार्‍या चिकण्या देवला पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेलच ह्याविषयी शंका वाटत नाही. वाटतो तो फक्त कल्पना कार्तिकचा हेवा Happy

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. परदेशात ३-४ वर्ष काढल्यावर मी भारतात परत यायचा निर्णय घेतला होता. नाही नाही म्हणता जवळ खूप गोष्टी जमा झाल्या होत्या. आणि त्यातल्या काहीही मागे सोडून येणं अगदी जीवावर आलं होतं. निगुतीने पॅकिंग करून ५-६ खोकी भारतात पाठवली होती. पण त्यातलं एक खो़कं इथे आलंच नाही. त्यात नेमकी माझ्या जिवलग मित्रमैत्रिणींनी भेट दिलेली पुस्तकं होती. मला खूप वाईट वाटलंच पण चिडचिड्सुध्दा खूप झाली. ४-५ दिवस मी अगदी खराब मूडमध्ये होते. आज विचार करते तेव्हा हसायला येतं पण तेव्हा खूप रडले होते. रडत रडतच माझ्या आवडीची जुनी गाणी लावून बसले होते. अचानक एका गाण्यातल्या २ ओळी कानावर पडल्या, जणू त्यांचा अर्थ नव्याने लागला आणि एकदम जाणवलं की मी किती वेडेपणा करतेय. हव्याहव्याश्या वाटणार्‍या अनेक गोष्टी आयुष्याने पुढे हिरावून घेतल्या पण प्रत्येक वेळी त्याच दोन ओळी माझ्या मदतीला आल्या. जणू माझ्या आयुष्याची फिलॉसॉफीच बनून गेल्या.

जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया
जो खो गया मै उसको भुलाता चला गया

220px-Humdono.jpg

खरं तर "हम दोनो" तल्या ह्या गाण्यासाठी, हया ओळींसाठी गीतकार साहिर लुधियानवीचे आभार मानले पाहिजेत. पण हे गाणं आणि ह्या ओळी आठवल्या की नेहमी बेफिकिरीने सिगरेट पाण्यात भिरकावून देणारा देवच आठवतो ही माझी मजबूरी आहे आणि राहील.

DevAnand.jpg

माझी आजी म्हणायची की घराच्या चार भिंतीत ऋषी बसलेले असतात. आपण काही बोललो की ते 'तथास्तु' म्हणतात. रेडियो मिर्ची चॅनेलवर झालेल्या मुलाखतीत देव एकदा म्हणाला होता 'Man should die with his boots on'. चारही ऋषीनी तेव्हा त्याला नक्कीच 'तथास्तु' म्हटलं असणार कारण कार्यरत असतानाच त्याला मृत्यू आला. तो कायमचा चाललाय ते त्याच्या चाहत्यांना कळलं असतं ना तर त्यांनी त्याच्याच एका गाण्याच्या ओळी त्याला ऐकवून थांबवून घेतलं असतं.

जाता कहा है दिवाने सबकुछ यहा है सनम
बाकीके सारे फसाने झुठे है तेरी कसम

तरीही मला हेच वाटतंय की देव कुठेच गेलेला नाहिये. जगात जिथेजिथे म्हणून उत्साह आहे, उर्जा आहे, मनापासून भरभरून जगण्याची उमेद आहे, नियतीने दिलेले टक्केटोणपे खाऊनही आयुष्यावर अपार प्रेम करायची छाती आहे आणि मृत्यू घेऊन जायला येईतो काम करत रहाण्याची जिद्द आहे तिथेतिथे देव नेहमीच असेल.

बाबुमोशाय म्हणतो तेच खरं - आनंद मरा नही, आनंद मरते नही.
-------

वि.सू. - देवची अनेक गाणी तुम्हाआम्हा सगळ्यांच्या आवडीची आहेत. पण त्याच्या ज्या आठवणी लिहायच्या होत्या त्यांच्या अनुषंगाने आलेली गाणी लेखात समाविष्ट केली आहेत.

आठवणींचे मूळ स्त्रोत:
१. रेडियो मिर्ची चॅनेलवर आरजे अनमोल सादर करत असलेला पुरानी जीन्स हा कार्यक्रम
२. टेक २५ - भावना सोमेय्या
३. एक होता गोल्डी - अनिता पाध्ये
४. छायाचित्रं - आंतरजालावरून घेतलेली आहेत.

गुलमोहर: 

मस्त लिहिलंय... मला फार आवडलं...


पण ह्या दोन्हीपेक्षाही माझं ह्या चित्रपटातलं सर्वात आवडतं गाणं आहे - आज फिर जीनेकी तमन्ना है.
+१११
आणि त्या सगळ्याच पॅराला +१००००!!
Happy

छान लिहिलय. माझा मोठा भाऊ त्याचा पंखा आहे. (त्याच्या भाषेत
देवसाब तो.) त्याच्या जून्या चित्रपटात (हम दोनो, काला बाजार, जब प्यार किसीसे होता है, अमरदीप, नौ दो ग्यारह ) मधे जास्त चांगली गाणी होती.

स्वप्ना, सुंदर.
देवाच्या गाण्यांवर तुझा लेख आला की नंतर मी देववर लेख लिहीण्याची इच्छा बाळगून होतो. आता ती गेली.
इतका सुंदर लेक लिहीला आहेस की कितीही आणि कसंही लिहिलं तरी यापेक्षा चांगलं मी लिहूच शकणार नाही.
अनेक माहित नसलेल्या गोष्टी वाचायला मिळाल्या.
अप्रतीम Happy

आणि हो, धन्यवाद!!!

आनंदयात्री, मी मुक्ता., बेफ़िकीर, आशुतोष०७११, भरत मयेकर, किश्या, नादखुळा, चिमुरी, दिनेशदा, मंदार_जोशी, जिप्सी - खूप खूप धन्यवाद! Happy

आमच्या घरात 'मौसी भी तय्यार, बसंती भी तय्यार' असा प्रकार फक्त २ हिरोंबाबत होतो - एक देव आनंद आणि दुसरा सुनील दत्त. Proud

मस्त लिहिलंयस. आवडलं. सकाळीच 'गाईड' मधलं गाणं ऐकुन आले होते आणि ऑफिसला आल्यावर चक्क हा लेख समोर.. आजचा दिवस देवमय केलास तु. Happy

गो>>>ड लिहिलंयस!!!!!!!!
मागच्या आठवड्यात आम्ही काही मित्रमंडळ जमून शनिवारी एकामागूनएक देव चे सिनेमे पाहिले(गाईड्,पेंईग गेस्ट्,असली नकली, ज्वेल थीफ इ.इ.) आणी रविवारी..रात्रभर त्याची गाणी पाहात बसलो,गात बसलो..
आमच्यापरीने देव ला दिलेली आदरांजली!!!!

एकदम मस्तच लिहिलंय.
मै जिंदगी का साथ निभाता चला गया.
हे फक्त एकच गाणं नाहीये अशी भरपूर मस्त गाणी देव आनंद ची आहेत.
जवळ पास तीन पिढ्या त्याने गारुड टाकून ठेवला होता.
गाईड पिक्चर तर अप्रतिम केवळ अप्रतिम.
कथा गाणी आणि डायरेक्शन सुद्धा मस्तच.

परत एकदा वाचलं.
>>जेव्हा जेव्हा मी "फुलोंका तारोंका सबका कहना है" ऐकते तेव्हा तेव्हा देवला भेटलेली खरी जसबीर परत आपल्या घरी, आपल्या माणसात सुखरूप परत गेली असेल का हा प्रश्न मनात पिंगा घालत राहतो.

ह्याच वाक्यासाठी सुद्धा.

Pages