गोगलगाय

Submitted by vandana.kembhavi on 11 December, 2011 - 19:40

मुलाकडे सुट्टीवर आलेल्या गुजराती काकांनी मला इंडियन तुळशीची दोन रोपे दिली, मी ती व्यवस्थित लावली. इकडची एक तुळस आधीच लावलेली होती आणि ती चांगली बहरलेली होती. पण भारतातले काही मिळाल्याचा आनंदच वेगळा.

सकाळी उठून पाहिले तर त्या चिमुकल्या रोपांची पाने कुरतडलेली दिसली. इथे चिमण्या नाहीत मग कोणी बरे कुरतडली असतील? काकांना सांगितलं तर ते म्हणाले की ती गोगलगाय खाऊन जाते...गोगलगाय....मला कशी बरे कधीच दिसली नाही? तुळशीची कुंडी काका घेऊन गेले, रोपे वाढली की आणून देतो म्हणाले कारण त्यांच घर वरच्या मजल्यावर होतं. माझ्या तुळशी त्यांच्या घरी वाढू लागल्या. मी मात्र येता जाता गोगलगाय शोधू लागले.

आणि एक दिवस मला ती छान टपोरी गोगलगाय दिसली, मी हरकून गेले. तिच्या त्या सुंदर शंखातून बाहेर येऊन ती दिमाखात पुढे पुढे सरकत होती. किती वेळ मी तिचं निरिक्षण करत राहिले. तिचा शंख करड्या रंगाचा होता आणि आतले तिचे अंग गुलाबीसर रंगाचे....खूपच सुंदर दिसत होती ती. तिच्या गतीने ती गॅलरीच्या कोप-यात सरकू लागली, बहुदा तिथे तिने तिचे घर केले असावे....पण तिचे घर तर तिच्या पाठीवरच असते ना? मला स्वतःचेच हसू आले. एवढीशी ती गोगलगाय माझ्या घरी (गॅलरीमध्ये) रहायला आल्याचा मला कोण आनंद झाला होता.

रोज एकदा तरी गॅलरीत डोकावून तिला पहायचा छंदच लागला मला. ती चालू लागली की एक करड्या रंगाची चंदेरी झाक असलेली रेघ जमिनीवर उमटायची, त्यामुळे ती कुठे आहे त्याचा पत्ता मला लगेचच लागायचा. एक हातभर लांबीच्या परिसरातच ती फिरत रहायची. मला लहानपणापासून वाचलेल्या गोगलगायीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या, प्रत्येक गोष्टीत मी माझ्या त्या गोगलगयीला पहायला लागले आणि त्या गोष्टी मला अजूनच जवळच्या वाटू लागल्या.

गोष्टीतल्या राक्षसासारखा एक दिवस आला उंदीर! मी आत काहीतरी करत होते आणि मला काहीतरी आपटल्याचा बारिकसा आवाज आला. आवाजाच्या रोखाने मी गॅलरीमध्ये आले आणि पहाते तो काय? उंदीरमामाने माझ्या गोगलगायीला आपटून आपटून ठार केले होते, मी धावत काठी घेऊन उंदराला हुसकावून लावले आणि माझ्या गोगलगायीकडे पाहिले. एवढासा तो जीव गतप्राण झाला होता, तिचा शंख तुटून गेला होता आणि आतली गोगलगाय मरुन गेली होती. मला खूप दुःख झाले.

उंदीर कोरफडीच्या मागून माझ्या कडे लक्ष ठेवून होता, त्याला त्याची शिकार फस्त करायची होती पण मी तिथेच उभी असल्याने तो काही करु शकत नव्हता. मला त्याच्या कडे पाहून शाळेत शिकलेल्या "फूड चेन" ची आठवण आली. त्याचे ते खाद्यच होते आणि त्याने ते त्याच्या हिमतीवर मिळवले होते. त्याला अडवणारी मी कोण? आणि गोगलगाय तर मरुन गेली होती....जड अंतःकरणाने मी आत आले आणि गॅलरीचा दरवाजा गच्च लावून घेतला.
दुस-या दिवशी गॅलरीत एका बाजूला पडलेला रिकामा शंख दिसला......

तिचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी होती आणि ती मी पार पाडली नाही असे थोडे दिवस मला वाटत राहिले पण मग त्यानंतर गॅलरीमधे गोगलगाय दिसली नाही तेव्हा जाणवले की जिथे धोका असेल तिथे त्या रहातही नाहीत. स्वसंरक्षणाची जबाबदारी तिच्यावरच होती असं काहीसं वाटून घेतल आणि हळूहळू तिच्यासाठी हळहळण देखील कमी होऊन गेलं. त्यानंतर अंगणात ब-याचदा गोगलगायी दिसल्या पण आता त्यांच्यात गुंतायचच नाही अस मनाशी पक्कं केलं.

आज सकाळी उठल्यावर गॅलरीचा दरवाजा उघडताना काचेच्या दारावर चिमुकली गोगलगाय तिच्या चिमुकल्या शंखातून बाहेर येऊन सरकताना दिसली. तिला पाहून माझे मन काळजीने भरुन गेले आहे. दारावर वरपर्यंत सरकून बहुदा ती थकली आहे कारण आत्ता ती तिच्या शंखात निवांत पहुडली आहे, देवा...तिचं रक्षण कर, एवढीच प्रार्थना मी करु शकते. लक्ष द्यायचं नाही अस ठरवलं तरी सारखं तिच्याकडे लक्षं जातच आहे, पण मनाची कवाडे अन गॅलरीचं दार बंद करावे लागणार आहे......

गुलमोहर: 

छान! वंदना तुझ्या मनाची कवाडं सताड उघडी आहेत बरं का! कारण अवती भोवती चाललेल्या निसर्गातील छोट्या छोट्या घडामोडींची दखल घेतली जातेय मनात!
माझ्या कमळाच्या टाकीत गोगलगायींची प्रचंड पैदास झालीये. मीही लक्ष ठेऊन आहे त्यांच्यावर.