बालपण...

Submitted by हर्षल_चव्हाण on 10 December, 2011 - 16:14

दि. १० ऑक्टो. २०११- Rough Draft.

* "...................खिडकीबाहेरचं जग खुणावायला लागलं, की मग सगळा कारभार विस्कळीत व्हायला लागतो. बसल्याजागी हवेत उडावसं वाटतं. किंवा तडक उठून बाहेरच्या एखाद्या झाडावर चढून आकाशाला हात टेकवावेसे वाटतात. आणि मग... समोरच्या कामाच्या चिंध्या होतात. आणि हे सगळं काही ठरवून होत नाही. म्हणजे मन ताळ्यावरच असतं. पण मग ते आपलं राहत नाही. ते त्याच्या स्वतःच्या जगात उलथापालथ करत असतं. बर्‍याच दिवसांपासून एखादी डोळ्यांआड झालेली वस्तू शोधून काढण्यासाठी. मग ते अगदी झाडून सगळे काने-कोपरे धुंडाळतं. कपाटातल्या अगदी तळाशी पडलेल्या जुन्या-पुरान्या कपड्यांना उलथून, त्याखाली ठेवलेला फोटो -

'मागच्या वेळी पाहिला होता ना इथेच, मग आत्ताच का सापडंत नाही?'

म्हणून ते पुन्हा आणखी वेगांनं सगळ्याच कप्प्यातली एकेक ओळखीची वस्तू पुन्हा पुन्हा चाचपायला लागतं. हवं ते सापडलं तर ठीकच; पण जुन्याच गोष्टी नव्याने हाती लागल्याची अपूर्वाई काही औरच!" *

** "....................आणि हे सर्व होत असतांना आपण मात्र सैरभैर झालेलो असतो. म्हणजे बाहेरची कागदपत्रं मनाच्या या सुसाट वादळामुळे सगळीकडे पसरलेली असतात. आपण ती गोळा करण्याच्या मागे लागलेलो असतो आणि त्याच्याबरोबरच हेलकावेही खाऊन वेंधळ्यासारखे हाती आलेले सोडूनही देत असतो." **

*** "...................एक वेळ वाटतं, द्यावं सारं सोडून आणि सुसाट सुटावं त्याच्याबरोबर उतारावरून घरंगळत. म्हणजे पायाला चाकं लागावी आणि भन्नाट वेगानं पोचावं पायथ्याच्या नंदनवनात. जिथे खेळलो, बागडलो, उनाडक्या केल्या. टिंगल-टवाळी, दंगा-मस्ती आणि खोड्या. पडलो-उठलो-धावलो तसेच रक्ताळलेले गुडघे घेऊन, आपल्या आवडत्या झाडांभोवती पिंगे घालत. त्यांच्या अंगा-खांद्यावरून उड्या मारत. त्यांच्या अगदी उंचावरच्या ताकदवान बाहूभोवती गुंडाळलेल्या जाड काथ्याला अडकवलेल्या फळीवर बसून, गुडघे वाकवून आणि जीव खाऊन उंचच उंच घेऊन जाणार्‍या त्या झोक्यावर; तोच जीव बाहेर पडेपर्यंत किंचाळावं. त्याच वेगात चालू झोक्यावरनं हिंमत करून उडी मारावी आणि अन् वाळूवर खरचटलेले हात झटकून पुन्हा हसत हसत उठावं." ***

**** "..................मग तसंच पोचावं, ते खालून वाहणार्‍या पाटाच्या पाण्यापाशी. जिथे आधीच्या बाजूला बांध घालून गोल पाईपातून पुढे सोडलेलं पाणी, नंतरच्या बाजूला त्याच्या या तोंडामधून फेसाळत वेगात बाहेर पडतं. तिथंच उभं राहून एकमेकांच्या अंगावर मनसोक्त पाणि उडवावं. पुढे चालत जाऊन शांत झालेल्या पाण्यातल्या दोन दगडांवर टांगा टाकून, खाली वाकून बारीक बिचोळ्या मासळ्यांना ओंजळीत पुन्हा पुन्हा पकडू पहावं. कधी अलगद, तर कधी फट्कन् ... मग ती मासळी काही हाती येत नाही; म्हणून जवळच पडलेली मातीने माखलेली प्लॅस्टीकची पिशवी धरून 'एकोणीस' तास एक पाय उचलून; मग दुमडून आणि शेवटी दोन्ही पाय पाण्यात बुडवून अन् बूड दगडावर टेकवावं. एवढं सगळं करून मग एखादी जरी मासळी आत आली, की तिला पुन्हा पाण्यातच सोडून, रिकाम्या हाताने हसत हसत बाहेर यावं." ****

***** ".................बाजूला आंबट चिंचांच्या झाडांच्या शेंड्यावर लगडलेल्या चिंचांना मग दगड मारण्याची शर्यत लावावी. अगदी किडक्या-मिडक्या जरी पडल्या तरी धावत जाऊन त्यातलं एखादं तरी चांगलं बुटूक मिळतं का पहावं. मग तेच घेऊन रस्त्यानं चोखत चोखत निघावं. दुपारच्या उन्हानं लाल झालेल्या कानशीलांची पर्वा न करता. घामानं अंग निथळून निघावं. आणि आता संध्याकाळ होईल तेव्हा आपल्याच चाळीत जाऊन खेळावं म्हणून घराकडचा रस्ता चालू लागावा..." *****
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

.........................अरेच्या, संध्याकाळ झाली पण! नायकाची संध्याकाळ कशी असावी याचा विचार राहूनच गेला म्हणायचा. 'चला, थोडं आवरून घेऊ आणि स्वतःसाठी एक कप चहातरी करू', असं म्हणून मी उठलो. समोर सगळी कागदं पसरली होती. उघड्या खिडकीतून बराच वारा आत वाहून आल्यामुळे आणि माझंही लक्षं नसल्यामुळे. चहा करून गॅलरीत आलो, तेव्हा खाली खेळत असलेल्या ५-१० वर्षांच्या मुलांकडे लक्ष गेलं. त्यांच्या 'आया' समोरच्या एका कट्ट्यावर एकमेकींपासून हात-हात अंतरावर एकमेकींशी काहीच न बोलता बसल्या होत्या. सायकल खेळणार्‍या (ती सुद्धा बाजूला दोन चाकांचा आधार असलेली...) आपापल्या मुलांना, 'बेटा सँभलके... Slowly, Slowly...' असल्या सुचना देत होत्या. ते पाहून वाटलं, कसलं हे या मुलांचं बालपण. सोसायटीच्या कंपाउंडमध्येही अती काळजीच्या सुचनांनी बांधलेलं. यांना पडण्याचेही प्रशिक्षण दिलं जातंय, आणि दुखर्‍या गुडघ्यांच्या वेदना कधीही बर्‍या न होणार्‍या आजाराप्रमाणे मनावर बिंबवल्या जात आहेत. क्षणभर विषाद वाटला. पण तेवढ्यापुरताच...

.........................मोबाईल वाजला म्हणून घरात येऊन उचलला.

"बाबा, आज यायला उशीर होईल. संध्याकाळच्या प्रॅक्टीससाठी थांबलोय."

एवढं म्हणून मुलाने फोन ठेवलाही. वाटलं विचारावं; 'काही खाल्लंस का रे?' म्हणून. पण मग माझं मलाच हसू आलं. काय सांगणार? 'सांभाळून खेळ...' असं. छॅ:...!!!

म्हटलं लागलं तर लागू दे की! मन लावून खेळेल तरी. आणि पुन्हा जागेवर येऊन बसलो. आतापर्यंतं काय लिहिलंय हे एकदा वाचून पहावं तरी म्हटलं आणि तेवढ्यात प्रोड्यूसर साहेबांचा फोन वाजला. म्हणाले...

"काय? नायकाचं लहानपण थोडंतरी वेगळं असेल ना? चारचौघांसारखा नायक नकोय आपल्याला...!!!"

चहाचा शेवटचा घोट उरला होता. पण थंड झाल्यामुळे प्यायला गेला नाही.
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
हर्षल (१०/१०/११-रात्रौ. ११.००)
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"...................एक वेळ वाटतं, द्यावं सारं सोडून आणि सुसाट सुटावं त्याच्याबरोबर उतारावरून घरंगळत. >>>>>>>>> फारच छान.

एवढं सगळं करून मग एखादी जरी मासळी आत आली, की तिला पुन्हा पाण्यातच सोडून, रिकाम्या हाताने हसत हसत बाहेर यावं." >>>>>> अगदी अगदी

शेवटही छान केलात. पोहोचल सर्व...