बटाटेवडे - "तू तळ, मी खाणार आहे.."

Submitted by लोला on 9 December, 2011 - 12:48
batate wada
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

४ मोठे बटाटे (उकडल्यावर चिकट न होणारे. Russett किंवा बेकिंग पोटॅटोज चालतील. जुने असावेत.)

५-६ मोठ्या लसूण पाकळ्या.
१ इंच आले
५-६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी-जास्त करु शकता.)
८-१० कोंथिबीरीच्या काड्या (देठासह. जून असतील तर खालचे थोडे काढा.)
५-६ कडिपत्त्याची पाने
मीठ
हळद

दीड वाटी साधे बेसन
अर्धी वाटी लाडू बेसन (हे रवाळ असते, याने कव्हर चांगले होते. घालायचे नसल्यास साधे बेसन दीड ऐवजी २ वाटी घ्यावे)
१ मोठा चमचा मैदा (ऐच्छिक. कव्हर जाडसर होण्यासाठी.)
१ छोटा चमचा ओवा (ऐच्छिक)

पाणी (पीठ भिजवण्यासाठी. साधारण १ वाटी.)
तेल

क्रमवार पाककृती: 

- बटाटे उकडून गार झाल्यावर मॅश करावे. अगदी गुळगुळीत करु नयेत. थोडे तुकडे राहू द्यावे.
- आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाणी न घालता वाटायचे, फार बारीक करायचे नाही.
- हे वाटण, मीठ, हळद बटाट्यात घालून नीट मिसळून घ्यावे. १ मोठा चमचाभर तेल तापवून त्यात हळद घालून ते तेल बटाट्यावर ओतले तरी चालेल.
- कडिपत्त्याची पाने हाताने तुकडे करुन मिश्रणात घालावी.
- मीठाच्या अंदाजासाठी मिश्रणाची चव घेऊन पहावी.
- मिश्रण तयार झाल्यावर त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे तयार करुन ठेवावे. तळव्यात दाबून थोडा चपटा आकार दिला तरी चालेल. आकारावर अवलंबून आहे पण दिलेल्या प्रमाणात साधारण १० गोळे होतील.

- साधे बेसन, लाडू बेसन आणि मैदा एकत्र करुन घ्यावा.
- त्यात मीठ आणि ओवा घालावा. (हळद ऐच्छिक)
- चमचाभर तेल तापवून पीठात ओतावे मग १ वाटी पाणी आणि नंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून हाताने मिसळत पीठ तयार करावे. गुठळ्या मोडाव्यात.
- फार पातळ होता कामा नये. (२ वाट्या पीठ असेल आणि २ वाट्या पाणी घातले तर पातळ होईल.)

- कढईत तेल चांगले तापवून घ्यावे.
- पिठाचा थेंब टाकून तापल्याची खात्री करुन घ्यावी. पीठ लगेच वर आले पाहिजे.
- बटाट्याच्या मिश्रणाचा एकेक गोळा पिठात नीट बुडवून तेलात सोडावा. पिठातून बाहेर काढल्यावर लगेच तेलात टाकावा. टाकण्यापूर्वी पीठ फार निथळून काढू नये. गोळ्याला चिकटलेलेच रहावे.
- वडे सोनेरी रंगावर तळावे, फार लाल करु नयेत.
- एकावेळी खूप वडे तळू नयेत, प्रत्येकाला कढईत नीट जागा मिळेल असे पहावे.
- दुसरा घाणा टाकण्यापूर्वी तेल पुन्हा नीट तापले आहे याची खात्री करावी कारण एक तळण झाले की तापमान कमी झालेले असते.
- तळून झालेले वडे पेपर टॉवेल, कागदावर काढावे.
- पिठाच्या दिलेल्या प्रमाणात सगळे तळून व्हावेत, नाहीतर अर्ध्या प्रमाणात पुन्हा पीठ बनवता येईल.

vada2.jpg

वाढणी/प्रमाण: 
१० वडे ३ लोकांना पुरतील बहुतेक.
अधिक टिपा: 

- वडे शक्यतो ताजे/गरम खावेत.
- वड्याबरोबर पाव तळलेल्या मिरच्या, चिंच-खजूर आंबटगोड चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, कच्चा कांदा इ. घेता येईल.
- उपाहार असेल तर बरोबर चहा द्यावा.
- जेवण म्हणून असेल तर नंतर काहीच नाही किंवा दही-भात, सोलकढी- भात चालतो.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त. फोटो जीभ चाळवणारा आहे अगदी.
मागे रेसिपी देताना तू हळद नाही घालायची असं म्हणाल्याचं आठवतंय्/वाटतंय.

बरं, जुने बटाटे कसे ओळखायचे कुणी सांगेल का ? मी आणलेले रसेट नेहमी चिकट निघायचे म्हणून मग आता मी फक्त युकॉन गोल्डच आणते.

मलाही वरचा अगोने विचारलेला प्रश्न पडलाय. मी ही युकॉन गोल्डच वापरते.
कॅनी, मला वाटलं तू बटाट्याच्या मिश्रणात हळद घालत नाहीस म्हणून मी घालायची बंद केली Proud
माझ्या नणंदेच्या सासूबाई डाळीच्या पिठात एक बटाटा कुस्करुन घालतात आणि लिंबूही पिळतात. कव्हर छान होतं म्हणे त्याने.

>>असे कातील वडे (आयते) कुठे मिळतात? >>> बारा गटग किंवा लालूचं घर. Happy
रेसिपीचा उगम न लिहिल्याने रेसिपी पोलिसांना आयतं कोलित मिळायची शक्यता नाकारता येत नाही.

तो.पा सु.
हा अजुन एक फोटो कॅनीच्या वड्यांचा :).
vade.jpg

( अता मायबोलीकर मोजा ज्यांनी कॅनीने तळलेले वडे खाल्ले आहेत.)

१.दीपांजली
२. मैत्रेयी
(अ‍ॅड करा पुढचे.)

मस्तच !
मुंबईच्या नानाचौकात एका साध्याशा हॉटेलात अशा वड्यांबरोबर दह्यात किंचित मीठ, बारीक चिरलेला कांदा व थोडं तिखट घालून दिलेलं आठवतं; फार छान जमलं होतं काँबिनेशन !

मस्त रेसिप!! एकदम यम्मी.
लालूची ही रेसिपी आधी कोणाच्या तरी विपूमध्ये भोचकपणे वाचुन हे वडे एकदा केले होते.

ह्याला म्हणतात " बटाटेवडे एक्स्पर्ट " . सगळ्या फोटोंमधले वडे एकाच साईझचे , एकाच रंगावर तळलेले .
म हा न !! ( मला कधी खायला मिळणार ??? Uhoh )

कव्हर थोडे जाड करण्यासाठी मैदा वापरायचा .......या टीप साठी थॅंक्स
त्यासाठी पिठात थोडा बटाटा कुस्करून सुद्धा वर्क होईल बहुतेक
दोन्ही प्रकारानी करून बघणार.

Pages