कविता कोणाची ?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ही एक कविता वहीत टिपून ठेवलेली (त्या गुलजारच्या कवितेसारखीच), पण हिची अवस्था तर आणखी वाईट, कारण हिचे नाव-गाव काहीच माहिती नाही, कर्ताकरविता माहिती नाही. एक उगीचच अंदेशा असा की खलिल जिब्रानची असावी, तसे असेल तर अनुवाद कोणी केला तेही माहिती नाही... असा सगळा आनंद आहे ! अशी मजबूत कविता टिपून ठेवताना असे का केले ? करंटेपणा, शुद्ध करंटेपणा. तेव्हा (परत एकदा) आवाहन करतो, कोणाला अधिक माहिती असल्यास कृपया कळवा. खूप आभारी राहीन. धन्यवाद.

  ही टिपूनही दहाएक वर्षे झाली असतील. कविता बहुधा त्याहूनही जुनी असावी. अजूनही यातील प्रत्येक कडवे अगदी सद्यकालीन वाटते ही शोकांतिका म्हणावी का ? की आपण कथेचा अंत आला असे समजण्यात घाई करत आहोत ? मला नेहमीच वाटते की आपण स्वातंत्र्यासाठी किंमत मोजली, पण लोकशाहीसाठी ? जसे स्वातंत्र्यासाठी झगडलो, तसे लोकशाहीसाठी खरेच झगडलो का ? ती तर स्वातंत्र्याबरोबर आयती मिळाली असेही म्हणता येईल... जिथे जिथे आता प्रगल्भ लोकशाही आहे, तिथे तिथे लोक तिच्यासाठी झगडले आहेत, तिची किंमत त्यांनी मोजली आहे. मग आपल्या इथे हे जे काय चालू आहे ते अपरिहार्य आहेच... ही आपण मोजत असलेली किंमत आहे असेही म्हणता येईल. हे समर्थन नव्हे, हे लक्षात ठेवणे महत्वाचे. याचा अर्थ आपण अपरिहार्यता स्विकारून गप बसावे असा तर मुळीच नाही. उलट ती स्विकारून आता आणखी उत्साहाने पुढे जाता येईल कारण ज्यासाठी अपरिहार्य किंमत मोजत आहोत ते मिळणेही अपरिहार्यच ! शिवाय किंमत मोजायला तयार आहोत याचा अर्थ आपल्याला ते मिळवण्याची इच्छा आहे... हेसुद्धा महत्वाचे ! इथे सर्व आयुष्य काढलेला बाप कधीकधी उद्वेगाने म्हणतो, अरे, हे सुधारणार नाही. मी म्हणतो, या स्थित्यंतराच्या वेणा आहेत. खरे काय ?
  असो. घडाभर तेल झालेच नाही म्हणता म्हणता....

   ज्या देशात अंधश्रद्धा अमाप असतात, पण धर्म असा एकही असत नाही
   त्या देशाची दशा दयनीय असते.
   जो देश स्वतः न कातलेली वस्त्रे अंगावर धारण करतो
   स्वतः न पिकवलेल्या धान्याची भाकर खाऊन पोट भरतो
   त्या देशाची दशा दयनीय असते.
   अंत्ययात्रेची वाटचाल चालताना ज्यांच्या ओठांना वाचा फुटते
   भूतकालीन भग्नावशेषच ज्यांच्या अभिमानाचे विषय होतात
   त्यांच्या देशाची दशा दयनीय असते.
   वधस्थलावरला ओंडका व मारेकर्‍याची कुर्‍हाड यांच्या कचाट्यात
   कंठ आल्यावर ज्यांना बंडाचा उठाव आठवतो
   त्यांच्या देशाची दशा दयनीय असते.
   जेत्याचे स्वागत ज्या देशात तुतार्‍यांच्या ललकारीने होते अन्
   पदच्युतांची पाठवणी हेटाळण्यांच्या आरोळ्यांनी केली जाते,
   पण ती कशासाठी ? तर नव्या सत्ताधार्‍यांचे स्वागत पुन्हा तुतार्‍यांनी करण्यासाठीच
   म्हणूनच त्या देशाची दशा दयनीय असते.
   ज्या देशातले ऋषीमुनी वर्षानुवर्षे मौन राखतात अन्
   पराक्रमी पुरूष पाळण्यात पडून मुठी चोखत असतात
   त्या देशाची दशा दयनीय असते.
   ज्या देशाच्या एकसंधतेचे एवढे एवढे तुकडे होतात अन्
   प्रत्येक तुकड्यावरचे प्रजाजन स्वतःला स्वतंत्र राष्ट्रच मानतात
   त्या देशाची दशा दयनीय असते.

    प्रकार: 

    अप्रतिम.. पण जिब्रानची नाही वाटत.. खरय तुझं.. आज सुद्धा ही अगदी तंतोतंत लागू पडते..

    >>>इथे सर्व आयुष्य काढलेला बाप कधीकधी उद्वेगाने म्हणतो, अरे, हे सुधारणार नाही. मी म्हणतो, या स्थित्यंतराच्या वेणा आहेत. खरे काय ?
    >>>>
    खरे पहिले विधान.. मला काही ह्या स्थित्यंतराच्या वेणा वाटत नाहीत.. प्रत्येक समाजाचे एक वैशिष्ट्य असते.. जपानी - कष्टी, इंग्रज - मुत्सद्दी.. रशियन - कामचोर.. आपण - ???

    अल्-रुबानी ने १२ व्या शतकात (चू.भू.द्या.घ्या.) म्हटले होते - भारतीयांचे गणित आणि खगोलशास्त्रातील ज्ञान हे शेणात पडलेल्या रत्नांसारखे आहे.

    ह्म्म.... आपले वैशिष्ठ्य काय ? आपण टिकलो आहोत अजूनही हे... स्वतःच्या survival चे गणित प्रत्येक समाजाचे वेगळे असते. आपले गणितही वेगळे आणि फार गुंतागुंतीचे आहे... आणि खास बात ही की तरीही ते येनेकेन प्रकारेण इथे सर्वत्र झिरपले आहे असे दिसते. 'इतका काळ टिकलो आहोत म्हणून(च) पुढेही टिकू' हे absurd नाही, उलट तीच अचूक कारणमीमांसा आहे. म्हणजे जी काय व्यवस्था होती ती 'योग्य' होती का ? आणि जी काय सध्या आहे ती 'योग्य' आहे का ? हा विचार अवश्य केला जावा, पण तो विचार करताना एक लक्षात ठेवलेच पाहिजे की शेवटी समाज स्वतःच ठरवतो, कशी व्यवस्था पाहिजे ते. लादून काही होणार नाही. जे लोकांतून आले तेच टिकेल.
    हा समाज टिकला हे नैसर्गिक आहे कारण कुठलाही समाज ती धडपड करणारच, परंतु त्याचवेळी हे विलक्षण आहे कारण आपली गुंतागुंत, वैविध्य बघता आपण जगू हे खरे वाटणार नाही, स्वयंनियंत्रित (self-regulated) समाज इथे भविष्यात कधी घडेल हे खरेच वाटत नाही... बाहेरच्यांचं जाऊच दे, पण आपण आपल्याकडे बघतो तेव्हा बाकी काहीही वाटो, पण मनापासून अचंबा वाटतोच ना. इतका गोंधळ असूनही आपण 'राहिलो' इथे. अस्तित्व टिकवणे (survival) हाच एक जुगाड असताना आपण त्या survival चाही जुगाड जमवलाय... तसे करणारी आपली एकमेव जमात असावी... त्यामुळे, काहीही असो, शेवटी आपली जगण्याची, टिकण्याची जी आदिम, मूलभूत इच्छाशक्ती आहे तीच जिंकेल असे माझे मत अन् ती जिंकणार असेल तर स्थित्यंतर हे अटळ आहे. किंबहुना, स्थित्यंतराच्या माध्यमातूनच ती शक्ती जिंकेल. (जर तसे नसेल, तर हे सर्व म्हणजे माझा स्वप्नाळू आशावाद होईल. ठिक आहे, जगण्यासाठी ते आवश्यक असेल तर तेच सही :))
    कष्टी नाही रे, कष्टाळू म्हणायचंय ना तुला ? कष्टीचा अर्थ वेगळाच होतो. Happy
    अल्-रुबानीचं वक्तव्य आवडलं Happy

     ***
     We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus

     हा समाज टिकला हे नैसर्गिक आहे कारण कुठलाही समाज ती धडपड करणारच >> समाज टिकला तो सामाजिक पातळीवर कि वैयक्तिक पातळीवर हे मह्त्वाचे आहे. मला वाटते समाज टिकण्यापेक्षा आपल्याकडे व्यक्ती (आणी म्हणूनच नकळत समाज) टिकली आहे. समाजाचे प्रचंड रित्या बदललेले स्वरुप हे त्याचेच प्रत्यंतर आहे .
     व्यक्तिगत टिकण्याची प्रेरणा हे primal instinct आहे, त्यामूळे त्याचा फारसा बडेजाव नसावा. समाज (समाजापेक्षा समाजाची व्याख्या करणारे गुण म्हणणे जास्ती सयुक्तिक ठरेल का ?) टिकण्याची (कि टिकवण्याची ?) इच्छा हि खरी मापाची पट्टी असावी. त्याबाबत पद्धतशीर विचार फारसा झालेला सहजपणे तरी दिसत नाही.

     कविता कोणाची माहित नाही. पण फार विचार करण्याजोगी आहे.

     आपल्या समाजातले, संस्कृतीतले विरोधाभास दुसरी कडे कुठे आढळणार नाहीत.
     एकीकडे नैनं छिंदंति शस्त्राणि घोकायचं अन दुसरी कडे स्पृश्यास्पृश्यता पाळायची.
     एकीकडे उपास तापास, जप जाप्य सगळे रीतिरिवाज पाळायचे अन दुसरी कडे हुंड्यासाठी एका जित्या जागत्या मुलीचा जीव घ्यायचा किंवा तिला जीव द्यायला भाग पाडायचं.

     अगदी अलीकडे सुद्धा ' आम्ही नाही जात बीत मानत' म्हणायचं अन तरी मुंजी करायच्या. त्या मुंजीचा अर्थ मुंजा मुलाला तर जाऊ दे त्याच्या आई वडिलांना सुद्धा माहीत नसतो. पण ' शी, मुंजच नाही करायची म्हणजे काय? आमच्यात नै बै असलं काही चालत ' म्हणायचं. 'आमच्यात' मधे परत ती जात आलीच ना?

     जाता जाता, - स्वीकार असं लिहायला हवं होतं. ( मायबोली वर इतकी वर्षे घालवल्या नंतर जे शुद्ध लेखनाचा आग्रह धरतात त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल असेल काय?)

     'इतका काळ टिकलो आहोत म्हणून(च) पुढेही टिकू' हे absurd नाही, उलट तीच अचूक कारणमीमांसा आहे. >>>
     खरे तर हे मला पटलेले आहे पण माझ्यातील ऐक दुसरा माणूस असे नेहमी सांगत असतो की survival पुढे आपण नतमस्तक होऊन बाकी गोष्टींचा विचार न करता वैयक्तीक विचार करतो. ( म्हणुन असाम्याचा विचार / मत ही खरेच वाटते). रादर मी नेहमी चर्चेत हेच सांगत असतो की आपला समाज हा मूळी समाज नसुन वेगवेगळ्या व्यक्ती ऐकत्र आल्यामुळे झालेले कडबोळ आहे. माझे नेहमीचे उदा द्यायचे झालेच तर आपला भारतीय समाज हा पिअर टु पिअर नेटवर्क वर काम करनारा समाज आहे.

     पण त्याच वेळेस भारताचा ईतिहास पाहाता आपण नक्कीच ऐक चांगला "समाज" होतो. फार दुर वेदात, उपनिषीदात न जाता नुसते चाण्यक वा वात्सायनाच्या कामसुत्राच्या वाचनाने नो व्हाईस व्यक्तीलाही हे कळेल. शिवाय भारता बाबतीत बोलायचे झाले तर आपण कधीही ऐक देश न्हवतो. ऐक सारखी संस्कृती असनारे व (ती जपनारे) आपण लोक होतो व आहोत. आजच्या भाषेत कुणी कुणावरही राज्य / आक्रमन करायचे पण ऐक कॉमन मिनीमम प्रोग्राम असायचा, ज्याने आपल्या सर्वांना बांधुन ठेवले होते. आणि ह्या अशा अवस्थेत वाढल्यामुळेच नंतर परकिय आक्रमन आले तरी आपण आपली मुळ व्यवस्था टिकवुन ठेवली. ( जी आपोआपच ठेवल्या गेली).

     मलाही ह्या या स्थित्यंतराच्या वेणा आहेत असेच वाटत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आता आपण निदान पेपर वर का होईना ऐक देश आहोत. लोकांचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. आज अगदी १ लाखच तसे लोक असतील पण कदाचित ५० वर्षानी तसे ५० करोड असतील. समाज नक्कीच बदलत चालला आहे.

     असाम्या, उलट आपल्याकडे समाज टिक'व'ण्यासाठी फारच पद्धतशीर विचार झालाय....वर्णाश्रमव्यवस्था. ही चौकट इथेच मांडली गेली. तेव्हा सुसुत्र विचार झाला आहे. हा विचार व्यक्तीकेंद्रीत असूनही अंतिमतः 'समाजधारणेची चौकट'च होता. मध्यंतरी त्या चौकटीलाच महत्व आले त्यामुळे प्रश्न निर्माण झाले. साध्यापेक्षा साधनच महत्वाचे ठरले. असे होते तेव्हा स्थितीस्थापकत्व येते. शोनू म्हणते तसे जातविचार गेला नाहीये आणि त्याचे प्रचलित स्वरूप बदलायला अवकाश आहे, पण वर्णाश्रमव्यवस्थेच्या प्रणेत्यांना या चौकटीत जो अंगभूत dynamicism अभिप्रेत होता तो मात्र हळूहळू दिसू लागला आहे.
     >>> आजच्या भाषेत कुणी कुणावरही राज्य / आक्रमन करायचे पण ऐक कॉमन मिनीमम प्रोग्राम असायचा,
     Happy समाज कशाने(ही) बांधला जाईल ?!
     शोनू, मला 'स्विकारून' असा शब्दप्रयोग करायचा असल्याने इकार काढला. 'स्वीकार' हे मूळरूप असेल, पण ते रुप बदलले तर इकार बदलतो का की तसाच राहतो ? कृ.जा.प्र.पा. बाकी शुद्धलेखनाचा आग्रह आणि माबोवरची वर्षे यात काही संबंध असावा असे वाटत नाही. केदार, किती काळ आहेस रे इथे ? Proud

      ***
      We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus

      कविता खरच छान आहे. पण जर ही कविता भारतावर केलेली असेल तर खालिल २ ओळी खटकल्या --

      जो देश स्वतः न कातलेली वस्त्रे अंगावर धारण करतो
      स्वतः न पिकवलेल्या धान्याची भाकर खाऊन पोट भरतो
      त्या देशाची दशा दयनीय असते.

      -- कारण अजूनही भारतात सूत तयार होते आणि शेती केली जाते.

      बी
      ते लौकिक अर्थाने आहे रे. शब्दशः नाही. तसं पाहिलं तर त्या दोन ओळी अमेरिकेला, बर्‍याचशा अखाती देशांना जास्त चपखल लागू पडतील.
      स्वीकारून च हवं असं माझं ( अल्प) मत. माबो वर अनेक वर्षं घालवून आलेलं एक शहाणपण - शुद्ध लेखनाचा आग्रह सरसकट सगळ्यांना करू नये Happy

      सध्याच्या भारतीय परिस्थितीत जनसामान्यांमधे समाज विषयक विचार अभावानेच आहेत. स्वतःचे संरक्षण, संवर्धन यालाच महत्त्व. समाज गेला xxxxx मधे. देवळात, जत्रेच्या ठिकाणी , कुंभ मेळ्यात होणारी चेंगरा चेंगरी, त्यातून होणारी मनुष्यहानी; रस्त्यात सिग्नल पाशी , रेलवे फाटका पाशी होणारी बेशिस्ती हा सगळा me first and me always वृत्तीचा परिणाम आहे. दुर्दैव हे की पुढच्या पिढी वर पण हेच संस्कार होत आहेत.

      माझे नेहमीचे उदा द्यायचे झालेच तर आपला भारतीय समाज हा पिअर टु पिअर नेटवर्क वर काम करनारा समाज आहे.
      भारतीयच का? इतर समाजात वेगळे काय होते? ते कळले नाही.
      या व्याख्येप्रमाणे इंटरनेटमुळे समाजाला विशिष्ठ देशाचेहि बंधन नाही! भारतातल्या मुलीला पाकीस्तानातल्या मुलाशी लग्न जमवता येते. अमेरिकन लोक अफ्रिकेतली मुले दत्तक घेतात. समाज हा विश्वव्यापी झाला आहे. सारे जग हा एकच समाज!

      मुळात 'बदल' हा काळाचा नियम आहे. तेंव्हा समाज बदलणार. नि जोपर्यंत 'पिअर टु पिअर नेटवर्क ' आहे, तोपर्यंत 'तो समाज 'टिकणार'.
      जरी इंटरनेट हा मुद्दा सोडला, नि फक्त भारताचा, इतकेच काय, फक्त महाराष्ट्राचा विचार केला तरी, मुळात 'समाज' ही केवळ 'क्षणिक' अवस्था आहे. शुद्धलेखन बिघडले, भाषा बदलली, स्वीकार ऐवजी accept हा शब्द सर्रास वापरात आला, तर समाज 'टिकला' नाही का? बाराबंदी, धोतरा ऐवजी शर्ट, पँट आले, संध्या करणे बंद झाले, 'अस्पृश्य' लोक ब्राह्मणांबरोबर राहू लागले, तर समाज 'टिकला' नाही का?
      त्याची अवस्था 'दयनीय' म्हणजे काय? वाहातुकीची बेशिस्त? सार्वजनिक ठिकाणी घाण? ते उद्या बदलेल ना? मग आजचा समाज उद्या 'टिकला' नाही का?
      नि उदाहरणादाखल म्हणू की अमेरिकेत ते फार कमी आहे, म्हणून त्याची अवस्था 'दयनीय' नाही? me first and me always हा महामंत्र इथे लहानपणापासूनच मुलांना शिकवला जातो! हा समाज लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी चांगला नाही, इथे ड्रग्स चा प्रॉब्लेम मोठा आहे, गुन्हेगारी वाढते आहे, म्हणून अत्यंत सुशिक्षित नि हुषार असे भारतीय, अमेरिका सोडून भारतात जातात. आता कुठल्या समाजाची अवस्था 'दयनीय' म्हणायची?

      अमेरीकेची Happy

      झक्कीसाहेब, खूपच छान!!!!!

      असाम्या, उलट आपल्याकडे समाज टिक'व'ण्यासाठी फारच पद्धतशीर विचार झालाय....
      >> बरोबर आहे पण हे कधी झाले हे बघ. त्यानंतर त्यात कालसंगत बदल कितीसे झाले ? समाजधारणेची चौकट बदलायचे प्रयत्न हे मूळ उद्देशाशी सुसंगत असले पाहिजेत. (नाहितर जे होते ते फक्त patch work). मूळात हे बदल सुचवणारे कितीसे लोक आजूबाजूला दिसतात ? मूळात बदल घडायला हवा ह्याची जाणीव असलेले कितीसे आहेत ? होणारे बदल बरे कि वाईट हा मुद्दा अलहिदा. फक्त बदल व्यायला हवा हि अंत:र्भूती तर व्ह्यायला हवी ना ? व्यक्तिगत रित्या बदलण्याचे instincts हे वेगळ्या कारणांमूळे drive होत असतात, त्या बदलानुरुप होणारे सामाजिक बदल हे समाज (योग्य रित्या) टिकवण्याच्या द्रुष्टीने किती उपयुक्त असतील ?

      असामी
      किती प्रश्नबंबाळ पोस्ट रे? बरा आहेस ना Happy

      Happy उत्तरे म्हटली कि त्यावर एक भूमिका बांधणे आले, प्रश्न विचारायला असे बंधन नसते ना ? Happy

      उत्तरे म्हटली कि त्यावर एक भूमिका बांधणे आले, प्रश्न विचारायला असे बंधन नसते ना ?
      धन्य रे देवा! अशाने मला उत्तर कधीच देता येणार नाही!
      नि मला सगळेच कळते नि माहित असते! असे मलाच वाटते. इतरांच्या लक्षात येणार नाही म्हणून मुद्दाम सांगतो आहे!! म्हणून मला प्रश्नहि विचारायचे नसतात!
      :P, Light 1

      झक्की, बदल नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, ती मूढता ठरते. समाज टिकणे म्हणजे रुढीपरंपरा, चालीरिती, पद्धती (घाण टाकणे, नियम न पाळणे) इ.इ. कायम जीवंत राहणे असा अर्थ नव्हे, बरोबर ? तुम्ही म्हणता त्याला माझे अनुमोदन आहे, म्हणजे या सवयी बदलतीलच... म्हणून तर मी या सवयी म्हणजे एक स्थित्यंतर मानतो. परंतु, कैक जणांच्या मनात हा बदल होईल का असा रास्त प्रश्न येतो. म्हणून तर हा उहापोह.
      मला असं नाही वाटत की बदल हे सुचवावे लागतील. जेव्हा बदल हाच पर्याय राहील (अथवा नष्ट व्हा) तेव्हा बदल कोणी सुचवो न सुचवो, ते आपोआपच स्वीकारले जातीलच. तेच बदल टिकणारे असतील. 'टिकणारे बदल' हा शब्दप्रयोगही विचित्रच आहे. उत्तम बदल तोच जो टिकत नाही असे म्हटले तर ? आपल्याला बदल टिकायला नकोय, पण बदलायची/बदलण्याची तयारी टिकली पाहिजे. तेव्हा बदल टिकतील असं म्हणण्यापेक्षा, जेव्हा पर्यायच राहणार नाही तेव्हा बदलण्याची मानसिकता निर्माण होईल. (ही मानसिकता नसणे म्हणजे दयनीय अवस्था...) हां, आता काही लोक व्यक्तीपलीकडे जाऊन सामाजिक स्तरावर जाणीवपूर्वक बदल घडवण्याचा प्रयत्न करतीलच... आणि नेहमीच आणि सगळीकडेच, म्हणजे प्रगल्भ समाजातसुद्धा 'फक्त काहीच' लोक तसा प्रयत्न करतात व करतील असे वाटते. त्या लोकांची संख्या कमी असणे हे नैसर्गिक आहे, इतकेच नव्हे, तर माझ्या मते ते समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यकही आहे.
      .
      ठिक आहे, फार कमी जण समाजाचा असा (म्हणजे तरी काय ?) विचार करतात. पण मला वाटतं, स्वतःची गरज ओळखण्याची समाजाची जी क्षमता आहे तिला आपण कमी लेखतो. आपण कसं ठरवायचं की संपूर्ण समाजात एक विशिष्ठ बदल घडवून आणायची नितांत आवश्यकता आहे हे ? आपण ती 'वेळ' कशी ठरवायची ? तेही संपूर्ण समाजासाठी ?
      मग याचा अर्थ, समाजसेवेला काहीच अर्थ नाही असा घ्यायचा का ? (आता मीही प्रश्न विचारतो :)) यावर मी विचार करतो. जे न बदलल्यामुळे खितपत पडले आहेत, त्यांना तसेच पडू देऊन नष्ट होऊ द्यायचे का ? ह्म्म... याला लगेच 'पाशवी' विचार म्हणून मला कचर्‍यात टाकवत नाही. शेवटी पशू हे सरळ रेषेत विचार करतात... तितके सरळ रेषेतले विचार मानवाला लागू करताही येणार नाहीत कदाचित, पण सरळ रेषेतला विचार नैसर्गिक आहेच... असो. तर समाजसेवेला काय अर्थ ? म्हणजे समाजातल्या एका भागाला प्रगतीच्या समान संधी उपलब्ध नसणे (गुलामगिरी, अज्ञान, दारिद्र्य आणि काही कारणे) आणि स्वयंशिस्तेच्या अभावी वाहतुकीचे नियम मोडणे, घाण करणे इ.इ. यात फरक करता येईल का ? जर समाजाला 'आपण समाज म्हणून बदलणे' हा अंतस्थ उमाळा नसेल तर दुसर्‍या कोणी केलेला 'हस्तक्षेप' प्रभावी ठरेल का ? अन् जोवर बदलण्याची गरज नाहीये तोवर बदलण्यासाठीचा हा निकडीचा उमाळा/अंतर्भूती येईल का ?
      जाता जाता, इथे स्वानंदाचा मुद्दा उपस्थित केल्याशिवाय राहवत नाही. इतिहास असा की स्वानंदासाठी केलेले काम समाजात रुजले, तेच प्रभावी ठरले. स्वानंदातून जे काम झाले, जे विचार आले, त्यांनी सक्षमीकरण झाले. लादलेली सेवा आणि चालवलेली गादी प्रभावी ठरल्या नाहीत... त्यांच्यामध्ये मूळ विचारातील, मूळ कामातील अभिजातता नव्हती आणि त्यांच्याद्वारे क्रांतीही घडली नाही... चालू राहिली ती परंपरा (कार्याची, विचारांची) आणि परंपरेचं म्हणाल तर समाजाला गरज आहे म्हणून आहेत, त्यांसाठी इतर कुठल्याही चिन्हाची गरज नाही.

       ***
       Skating away on the thin ice of the new day...

       आता एक वेगळा मुद्दा. समाज म्हणजे समाजाची भाषा, धर्म, पोषाख, रूढी नि परंपरा असे म्हंटले तर ते बरोबर आहे का? अर्थातच सर्व रूढी नि परंपरा, कालबाह्य झाल्या तर बदलाव्याच लागतील. मग समाज बदलेल, पण 'टिकेल' का? समाजाची अशी कुठली मूल्ये समाजाचे वेगळेपण दर्शवतात, त्या समाजाची व्याख्या करतात? ती मूल्ये 'टिकली' तर समाज 'टिकला' असे म्हणता येईल का?
       पुनः एकदा, फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचे तर ही मूल्ये कोणती?

       मूल्ये तरी कुठे कायम राहतात ? माझ्या मते, मूल्ये टिकली म्हणजे समाज टिकला असे म्हणण्यापेक्षा मूल्ये काय असावीत, कशी, कधी आणि किती बदलावीत हे सर्व ठरवण्याचा अधिकार जोपर्यंत समाजाकडे असतो तोपर्यंत तो समाज टिकला असे म्हणता येईल. मूल्यव्यवस्था बदलायला समाजाचा विरोध असतो का खरंच ? मला नाही वाटत तसे. संघर्ष उद्भवतो जेव्हा समाजाचा हा मूल्यसंबंधीत अधिकार हिरावला जातो... तो अधिकार असणे ही कुठल्याही समाजाची मूलभूत ओळख म्हणता येईल. जिथे जिथे हा अधिकार दडपला गेला तिथे तिथे संघर्ष झाला आणि जिथे समाजाने निमूटपणे ती दडपशाही स्वीकारली तो समाज 'टिकला' नाही असे मी मानतो.
       रशियन कम्युनिस्ट सरकारने सर्वांना एकसुरी अशी ओळख बहाल केली (म्हणजे समाजानेच खरे तर तो अधिकार त्यांना देऊ केला) तेव्हा त्या मानवीसमूहाचे 'समाज' म्हणून जे स्थान होते ते धोक्यात आले. चीनमध्येसुद्धा हा अधिकार हिरावून घेतला गेलाय. नुकतीच तिबेटच्या संदर्भात जगभर निदर्शने झाली, त्याचे पडसाद अमेरिकन विद्यापीठांतही उमटले. चिनी विद्यार्थ्यांचं म्हणणं असं की 'चीनमुळे तर तिबेटची प्रगती झालीये, तिथे पायाभूत सोयी चीनी सरकारने उभारल्या आहेत... असे असता चीन तिबेटवर अन्याय करतोय असे कसे म्हणता येईल ?' परंतु, 'ही प्रगती आहे की नाही' हे ठरवण्याचा तिबेटी जनतेचा हक्क त्या विद्यार्थ्यांच्या लक्षातच येईना. या गोष्टींना प्रगती मानणे ही मूल्यव्यवस्था आपण तिबेटी जनतेवर लादत आहोत हे त्यांना कळले नाही, पक्षी 'ही प्रगती आहे की नाही' हा मूळ मुद्दा त्यांना कळलाच नाही... त्याअर्थी (=त्या अर्थाने) तिबेटी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इराणमध्येही इस्लामी क्रांतीनंतर हेच झाले. पर्शियन समाज हा अरबी नाही, तो रूढार्थाने इस्लामी नाही, तो पाश्चिमात्य नाही आणि पौर्वात्यही नाही... अशा समाजावर इस्लामचे कलम करण्यात आले, एवढेच नव्हे तर काही ठिकाणी त्यांची पर्शियन ही ओळख पुसून टाकण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले, पण त्याला पूर्ण यश आलेले नाहीये. याचे कारण अजूनही आपली मूल्यव्यवस्था ठरवण्याचा अधिकार लोकांनी येनकेन प्रकारेण अबाधित ठेवला (National Geographic च्या या महिन्याच्या अंकाचा मुख्य विषय इराण हाच आहे, जरूर वाचा). भारतातही हेच झाले. अनेक परकीय शक्ती आल्या आणि गेल्या, पण आमच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट हे आम्हीच ठरवले. त्यात बदल झाले, कैक बदल झाले, पण तेही आम्हीच केलेत. त्यामुळे आपणही 'टिकलो'.

        या प्रश्नाला जी आर्थिक बाजू असते तिचे महत्व तर उत्तरोत्तर वाढतच जाईल कारण आता वर्चस्व हे आर्थिक सत्तेच्याद्वारे प्रस्थापित करता येते. मूल्यव्यवस्था ही अर्थव्यवस्थेशी अभूतपूर्व रितीने निगडीत झाली आहे (नेहमीच होती, पण आता ज्या प्रमाणात तो संबंध येत आहे ते मात्र अभूतपूर्व होय). हे तर सुस्पष्ट आहे. दुसरे म्हणजे जगतिकीकरणाच्या रेट्याचे परिणाम... एक बाजू अशी की रेटा इतका प्रचंड आहे की सर्वच जण 'टिकणार' नाहीत आणि दुसरी बाजू अशी की जागतिकीकरण होत असल्यानेच आता समाज टिकणे हे अपरिहार्य आहे. मी जगणे हे माझ्याइतकेच इतरही अनेक जणांना आवश्यक वाटते. त्यामुळे आपोआपच एक प्रणालीजन्य (systemic) सुरक्षाजाळे निर्माण होत आहे जेणेकरून तुम्ही प्रणालीच्या बाहेर फेकले जाणार नाही. 'यापुढचा इतिहास' हा या दोन बाजूंमधील द्वंद्व असेल असे वाटते.

         महाराष्ट्राचे काय ? आपली काय ओळख ? ह्म्म... माझ्या मते, आपण वैचारिकदृष्ट्या मोकळे आहोत ही आपली ओळख होय. मराठी समाज बदलांना नुसताच भिडला नाहीये, तर कैक वेळा मराठी समाजाने बदलांना जन्म दिला आहे, तद्भव क्रांतीचे नेतृत्व केले आहे. पार ज्ञानोबांपासून आतापर्यंत कितीएक नावे घ्यावीत ! कृतीशील विचारवंतांची इथे वानवा नाही. शिवाय, मराठी माणसाला शिव्या घालण्यात मराठी माणूसच आघाडीवर असणे हे मला चांगले आणि वाईट असे दोन्ही वाटते... वाईट अशा अर्थाने की एकमेकांचे पाय ओढणे हा जुना छंद अन् चांगले कारण आपण स्वतःचे विश्लेषण करायला कधीच घाबरत नाही. स्वत:चे वैगुण्य नाकारू नये हे खोलवर ठसले आहे....एकंदरीतच, बदलाला आणि बदलायला आपण इतर प्रांतीयांपेक्षा कमी घाबरतो असे वाटते. ही सर्व सबगोलंकार विधाने आहेत हे मान्य, तरीही मला हा आपला लसावि वाटतो. (यातील बहुतेक वैशिष्ठ्ये बंगाल्यांतही दिसून येतात).
         मराठी असणे म्हणजे काय यावर मला सर्वात बोलकी टिप्पणी एका कवितेत दिसते (आणखी एक !!!!). दि. पु. चित्र्यांच्या या कवितेत अगदी अथपासून इतिपर्यंत 'सर्वार्थाने मराठी असणे' दिसून येते, म्हणून ती देतोच Happy
         .
         यापुढचं महाराष्ट्रगीत

          यापुढचं महाराष्ट्रगीत कदाचित मीही लिहीन, कोणी सांगावं ?
          ऍटलांटिक किंवा पॅसिफिकच्या किनार्‍यावरून मुक्त लयींत.
          कारण दुरून डोंगर साजरे जरी आंधळं दळतं
          आणि कुत्रं पीठ खातं. किंवा कुंपणाने शेत खाल्लेलं असतं
          आमच्या बोलीभाषेतल्या म्हणीत.

           आणि लिहिताना माझा अचूक हात सह्याद्रीच्या आकाराची
           सही करायला धजेल भविष्यावर. कारण आठ शतकं
           ही भाषा रुजलेली आहे स्वतंत्र प्रज्ञेच्या भुईवर.
           ज्यांचा कधी पाडाव होऊ शकला नाही अशी आडमुठी
           आणि उत्तुंग माणसं इथं सतत उगवली गावरान.

            रक्त आकाशाचा अंदाज घेतं ह्या गावागावांत.
            ह्या भागात धनगरसुद्धा परमेश्वराला जेवण घालू शकतो.
            इथं विक्षिप्त माणसं असतात गल्लोगल्ली आणि
            नाक्यानाक्यावर टीकाकार. इथली माणसं जेव्हा जागी होतात
            तेव्हा सारा देश भानावर येतो असंही होऊन गेलंय.

             जेव्हा वेडीपिशी होते इथली मराठी भाषा तेव्हा
             कोट्याधी ओव्या आणि अभंगांचे प्रतिध्वनी उठतात
             खोलवरून आणि इरसाल अध्यात्म इथलं भडकवतं
             माणसाचं माथं तेव्हा पुकारली जातात
             स्वतंत्र प्रज्ञेची काव्यशास्त्रं माणसाचा जन्म साजरा करायला.

              यापुढचं महाराष्ट्रगीत कदाचित मीही लिहीन, कोणी सांगावं ?
              आणि लिहिलं तर कोणाच्याही बापाची परवानगी मागणार नाही.

               -- दि. पु. चित्रे

                ***
                Skating away on the thin ice of the new day...